हिंदू कोड बिलाचे हिंदूमधील विरोधकांचे तीन वर्ग
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या हिंदू कोड बिलाला विरोध करणाऱ्यांचे तीन वर्ग होते. त्यापैकी एक वर्ग म्हणजे सनातनी. हे सनातनी लोक आमचे धार्मिक ग्रंथ, आमचा धर्म, आमचे नैतिक विचार हे सर्व काही ईश्वर प्रणित आहेत . आणि ते नेहमी सनातन होते, आहेत आणि राहतील अशा प्रकारची धारणा असलेले होते. त्याच्या पुढचे पाऊल म्हणजे त्यामध्ये इतर कोणालाही ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही असे मानणारे होते.
याचा दुसरा वर्ग म्हणजे राजकीय पुढाऱ्यांचा. तत्कालीन राजकीय पुढारी मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधक यांची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातच होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अंत्यज ( अस्पृश्य ) असल्याकारणाने त्यांच्या बाबत मनामध्ये एक प्रकारची तिरस्काराची , हीनत्वाची भावना बाळगून असणारे हे राजकीय पुढारी होते.तशातच आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांना मतदारांच्या बाजूने उभे राहावे लागते. त्यांना खूष करण्यासाठी मतदारांना हवी ती भूमिका त्यांना घ्यावी लागत होती . या दोन कारणांमुळे राजकीय पुढारी हे हिंदू कोड बिलाचे विरोधक होते.
आंबेडकर स्मृती
यातील तिसरा वर्ग म्हणजे सवर्ण हिंदू समाजातील वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंगंडाने माजलेला वर्ग. हिंदू कोडबिल पास झाले तर त्याचा परिणाम असा होईल की, ज्या हिंदू धर्म शास्त्रांचे आजवर कधीही संहितीकरण झाले नाही.आणि त्याचे संहितीकरण हे वर्णाने श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या एकाही हिंदूला करणे शक्य झाले नाही. पण ते एका अस्पृश्य वर्गातील बाबासाहेबांनी केले यात आपली नामुष्की होणार आहे,आपला अपमान होणार आहे , अशा प्रकारचा समज या लोकांनी करून घेतला होता.
हे बिल पास झाले तर बहुजन समाज या बिलाला ‘आंबेडकर स्मृती’ म्हणून गौरवतील . वर्ण श्रेष्ठत्वाची ‘मनुस्मृती’ बाजूला पडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली हिंदू कोड बिलाची जी नवी स्मृती येऊ घातली आहे तिला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गंध असेल !अशा प्रकारची भीती , न्यूनगंड त्यांना जडला होता .
तत्कालीन काँग्रेसची आणि नेहरूंची धरसोड वृत्ती:
तत्कालीन काँग्रेसची अडचण अशी होती की 1952 साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या.त्यावेळेला हिंदू कोड बिल हा विषय संपूर्ण देशभरात गाजत होता. 1952 आगोदर पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या सरकारमधील मंत्री काहीही झाले तरी हिंदू कोड बिल आणणारच आणि ते लागू करणारच अशा प्रकारचे वल्गना करत असायचे.मात्र जसजसा निवडणुकांचा काळ जवळ येऊ लागला तसा नेहरू सरकारचा आत्मविश्वास दोलायमान होऊ लागला. त्यांना असे वाटू लागले की हिंदू कोड बिल हे लागू केले तर 1952 ला होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचे सरकार जाऊन विरोधी पक्ष सत्तेवर येईल.आणि ती चूक करण्याइतके जवाहरलाल नेहरू निश्चितच मूर्ख नव्हते.
जवाहरलाल नेहरू हे अत्यंत चाणाक्ष बुद्धीचे होते. त्यांना काँग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेत आणायचे होते.
जर सरकार आणायचे असेल तर हिंदू कोड बिल जितके पुढे ढकलता येईल तितके ढकलणे काँग्रेसच्या गरजेचे होते.
पंडित जवाहरलाल नेहरू या आधी बिल नामंजूर झाले तर मंत्रिमंडळ राजीनामा देईल अशा प्रकारच्या घोषणा करत असत.
मात्र 1952 ची निवडणूक होणार असल्याकारणाने त्यांनी या घोषणेला साफ विसरून गेले.
या घोषणेनेकडे त्यांनी कानाडोळा केला.जीर्णमतवादी लोकांच्या मतांसाठी काँग्रेस सरकारला त्यांच्यासमोर मान शरणागती पत्करावी लागली,
आपली तलवार म्यान करावी लागली.तत्कालीन काँग्रेस सरकारने आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या बिलाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
सनातनी हिंदूंच्या विरोधापुढे जवाहरलाल नेहरू यांनी नमते घेतले
हिंदू कोड बिलावर जीर्णमतवाद्यांचे चौफेर हल्ले सुरू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजिबात डगमगले नाहीत.
मी जसे बिल तयार केले आहे तसेच ते मंजूर झाले पाहिजे अशा आपल्या मूळ भूमिकेला ते ठाम राहिले.
सनातनी हिंदूंचा विरोध पाहून काँग्रेसच्या तत्कालीन मोठ्या पुढाऱ्यांनी पंडित नेहरूंना असा सल्ला दिला की
हे बिल आता मंजूर केले तर काँग्रेस पक्षाला मोठ्या फरकाने हार पत्करावी लागेल.आणि ती काँग्रेसला परवडणारी नसेल.
त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सुद्धा अनेकदा या विषयी चर्चा केली.यातील काही कलमांना वगळण्याची विनंती केली.पण बाबासाहेबांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना असे करण्यास मनाई केली. बाबासाहेब आपल्या भूमिकेपासून किंचितही मागे हटले नाहीत.हे पाहून जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसच्या नेत्यांचा सल्ला स्वीकारणे योग्य समजले. सनातनी हिंदूंच्या विरोधापुढे जवाहरलाल नेहरू यांनी नमते घेतले यासंबंधी लेडी हारटॉग यांनी आपल्या एका ग्रंथात असे मतप्रदर्शन केले आहे.
तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचा हिंदूकोड बिलाला विरोध
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना ओळखले जाते.
डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि प्रधानमंत्री पंडित जवाहलाल नेहरू यांच्या हिंदू कोड बिल यावरून बरीच चर्चा झाली होती.
डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी अगोदर हे बिल लोकसभेच्या चौथ्या अधिवेशनातच पास होईल असा हवाला दिला होता.
कितीही अडचणी आल्या तरी हिंदू कोड बिल पास केले जाईल आणि यावरती चर्चा करण्यासाठी
लोकसभेत किमान तीस दिवस ठेवले जातील असे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी जाहीर केले होते.
आपल्याच आश्वासनाला एक प्रकारचा हरताळ फासण्याचे काम
पण आपल्याच आश्वासनाला एक प्रकारचा हरताळ फासण्याचे काम डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केले. त्यांनी जवाहरलाल नेहरू यांना दहा कलमी विस्तृत टिपणे लिहून आपला विरोध नोंदवला होता. ते म्हणाले होते की ,”प्रिय पंतप्रधान, राष्ट्रपती पदावर येण्याअगोदर मला खूप सारे स्वातंत्र्य होते . त्या बिलासंदर्भात माझी जी मते होती ती लोक भावनेतून आली होती.
माझे काय विचार आहेत मला काय वाटते हे मी तुम्हाला सांगितले आहेच .सध्याची लोकसभा हिंदू कोड बिलाच्या कायदा पास करण्यास अजिबात अधिकार पात्र नाही. हिंदू कोड बिलातील जे वादाचे मुद्दे आहेत त्यावर दैनंदिन चर्चेमध्ये दिसून आलेल्या विसंगती माझ्या लक्षात आलेल्या आहेत. या बिलासंदर्भात मी असे म्हणेन की हे बिल पास करायचे अथवा नाही करायचे याचा अधिकार माझ्याकडे आहे आणि तो अबाधित आहे . माझ्या एका मतामुळे जर सरकार अडचणीत येणार असेल तर मी माझ्या विवेक बुद्धीचा वापर करीन . आणि माझी विवेकबुद्धी मला असे सांगते की हे बिल पास करण्याची ही योग्य वेळ नाही.”
#HinduCodeBill #हिंदुकोडबील
क्रमशः
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
2 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
3 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
4 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी 5
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी 6
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 06 , 2021 08 : 52 AM
WebTitle – Three classes of Hindu opponents of the Hindu Code Bill Javaharlal nehru rajendra prasad 2021-04-06