हिंदू कोड बिलाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधक या हिंदू कोड बिलाबाबत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अनेक अप्रस्तुत विधाने करत होते.आंबेडकरांच्या हिंदू कोड बिल याचा प्रचंड विरोध केला गेला.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपमानित करत होते.ते कोण होते आणि ते काय बोलले त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्थकांनी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना कशा पद्धतीची उत्तरे दिली याचा आढावा आज आपण घेणार आहोत.
स्वातंत्र्यपूर्व काळात कायदे मंडळात अस्तिवात होते. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा अस्तित्वात आली. कायदेमंडळात आणि लोकसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिल याचा प्रचंड विरोध झाला. तो विरोध केवळ विरोधी पक्षाने केला असा नाही तर तत्कालीन काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यांनी पण या बिलाचा विरोध केलेला आपल्याला दिसून येईल.
विरोधी पक्षांमध्ये प्रमुख्याने श्यामाप्रसाद मुखर्जी हे होते तर हिंदू कोड बिलाची कामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवल्या दिवसापासुनच पट्टाभी सीतारामय्या, वल्लभ भाई पटेल,डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिल्यापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिल यांचे विरोधक राहिलेले आहेत.
डिसेंबर 1949 मध्ये लोकसभेत ते बील मांडले गेले होते तेव्हा तत्कालीन विरोधकांनी सभागृहाबाहेर गांधी टोप्या ची होळी करून सरकार विरुद्ध आपला निषेध व्यक्त केला होता. ज्यांच्या उत्थानासाठी, स्वातंत्र्यासाठी या बिलाची आवश्यकता होती त्यामध्ये महिला हा विशेष घटक होता.इथे विरोधाभास असा आहे की तत्कालीन महिला संघटनांनी सुद्धा हिंदू कोड बिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध केलेला आहे.
हिंदू कोड बिलाचे संसदेतील समर्थन आणि विरोध
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य पूर्वी कायदेमंडळात आणि स्वातंत्र्यानंतर लोकसभेत हिंदू कोड बिल वेळोवेळी मांडले होते. त्यावेळेला विरोधक आणि सत्ताधारी काँग्रेस सदस्यांचा या हिंदू कोड बिलाला विरोध आणि समर्थन होते. प्रथमत: आपण हिंदू कोड बिलाला झालेला विरोध पाहू ,आणि त्यानंतर हिंदू कोड बिलाचे समर्थन पाहू.
विरोधी मत असलेल्या प्रतिक्रिया
१) अजमेर मेवाड चे प्रतिनिधी पंडित मुकुट बिहारी लाल भार्गव यांनी हिंदू कोड बिलाला विरोध करताना म्हटले होते की “हे बिल पास झाल्यास हिंदू समाजाचा विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही. हिंदू विवाहाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लामी आणि ख्रिस्ती पद्धत लागू करण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच हिंदू विवाह पद्धती बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अमेरिका आणि इंग्लंड सारख्या देशामध्ये आता घटस्फोट पुरे झाले अशा पद्धतीचे वारे वाहत असताना घटस्फोटाची अनिष्ट पद्धत रुढ करणे चुकीचे होईल.”
२) महाराष्ट्राचे प्रतिनिधी हरीभाऊ पाटसकर यांनी म्हटले होते की “समाज क्रांती घडवून आणणाऱ्या बिलाची सध्या आवश्यकता नाही.
सध्या आवश्यकता आहे ती म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा.सरकारने प्रथमत: या गोष्टींचे निराकरण करावे.
त्यानंतर संपूर्ण हिंदुस्तानातील सर्व धर्मातील लोकांना एक सिव्हिल कोड लागू करावा.हिंदू कोड बिलाची सध्यातरी आवश्यकता नाही आहे.”
३) मध्य भारताचे सीताराम जाजू म्हणाले की “मारवाडी समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून मला असे वाटते की,
आमच्या खिशाला चाट लागणार या भीतीने जुनी मारवाडी लोक या बिलाचा विरोध करत आहेत.”
४) तत्कालीन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या यांनी तर हिंदू कोड बिलाला अत्यंत कडवा विरोध केला होता. ते म्हणाले होते की,” उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण, जमीनदारी पद्धतीचे उच्चाटन करणे यासारख्या गोष्टी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात होत्या.हिंदू कोड बिलासारख्या सामाजिक सुधारणा बाबत जाहीरनाम्यात उल्लेखच नव्हता. सदरचे बिल घाईघाईने मंजूर करणे चुकीचे होईल. सर्वांच्या संमतीने हे बिल पास करून घ्यावी लागेल. गेली 51 वर्षे मी सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करत आहे,पण या बिलाबाबत जरा सबुरीने घ्यावे अशी माझी सूचना आहे.”
समर्थन असलेल्या प्रतिक्रिया
१) के संथानम यांनी या बिलाला समर्थन दिले होते समर्थन देताना म्हणाले “ती हिंदी राष्ट्राच्या या घटनेला हे बिल पोषकच होईल. मनु आणि याज्ञवल्क्य यांचे जुनाट कायदे ब्रिटिश न्यायमूर्तीनी वेळोवेळी बदलले आहेत ,असे असताना मग कायदेमंडळाला हिंदू कोड बिलाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे बदल का करता येत नाहीत? आपण हवे तर हिंदुत्वाचा त्याग करा किंवा जाती निरपेक्ष हिंदुत्वाला मान्यता द्यावी” अशा प्रकारचे धाडसी विधान त्यांनी केले होते.
२) संयुक्त प्रांताचे कृष्ण चंद्र शर्मा हिंदू कोड बिलाला पाठिंबा देताना म्हणाली होती की,
“हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती यांच्या नावावर या बिलाला विरोध करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे
की सामाजिक वाढ आणि प्रगती ज्या संस्कृतीत होऊ शकत नाही ती संस्कृतीच नाही”.
३) मद्रास चे माजी एडवोकेट जनरल अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी या बिलाला पाठिंबा दिला होता ते म्हणाले की
“अविभक्त कुटुंब वारसा, मुलीच्या उत्पन्नावरील हक्क याबाबत प्रचलित कायद्यात बदल करणे अत्यावश्यक आहे.”
४) पि.के सेन, कमला चौधरी,ओ.वी अल्लेगेशन ,गोकुळ भाई भट्ट ,डॉक्टर बक्षी टेकचंद ,प्रोफेसर के .टी शहा इत्यादी सदस्यांचा हिंदू कोड बिलाला समर्थन होते.
संसदेबाहेरचा विरोध
जसा संसदेमध्ये विरोध होता तसाच किंबहुना त्याहीपेक्षा जहरी विरोध संसदेबाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि हिंदू कोड बिलाला झाला. संसदेबाहेर चा विरोध हा अत्यंत कडवट प्रकारचा होता.डॉक्टर बाबासाहेबांचा प्रचंड अपमान करणारा होता.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीतून आल्याकारणाने आकसबुद्धीने त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन टीका करण्यात येत होती.
या टीकेमध्ये प्रामुख्याने हिंदू समाजातील धर्ममार्तंड यांचा समावेश होता.
त्यामधला सर्वात जास्त विरोध हा जेरेशास्त्री यांचा होता.संकेश्वर पीठाचे जेरे शास्त्री यांनी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि हिंदू कोड बिल यावर अत्यंत जहरी टीका केली होती.
तत्कालीन सरकारने पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले होते.
अस्पृश्य लोकांनी मंदिरात प्रवेश केल्यामुळे मंदिराचे आणि देवाचे देवत्व नष्ट झाले आहे देवालय भ्रष्ट झाले आहे
अशी भावना मनात ठेवून जेरे शास्त्री यांनी मंदिरात प्रवेश सुद्धा केला नाही.
18 जानेवारी 1950 रोजी पंढरपूर येथे एका जाहीर सभेत बाबासाहेब आणि हिंदू कोड बिल यावर जहरी टीका केली होती.जेरेशास्त्री म्हणाले होते की ,”डॉक्टर आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल नावाची नवीन भिमस्मृती रचली आहे. बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू कोड बिलातील प्रत्येक गोष्टीला धर्मशास्त्राचा आधार आहे असे सांगत आहेत.पण दूध किंवा गंगेचे पाणी कितीही पवित्र जरी असले तरी ते नाल्यातून किंवा गटारातून आले तर पवित्र मानता येत नाही,त्याच प्रमाणे आंबेडकरांसारख्या महारा कडून हिंदू कोड बिल आणी असल्याकारणाने ते प्रमाण मानता येत नाही .आंबेडकरांना धर्म शास्त्राचा आधार घेऊन कोणतीही गोष्ट सांगण्याचा अधिकार नाही .आंबेडकर विद्वान आहे त्यांचा धर्मशास्त्राचा अभ्यास आहे पण ते अंत्यज आहेत.आंबेडकरांच्या नाल्यातून आलेली धर्मशास्त्राचे गंगा पवित्र कशी असणार ?”अशाप्रकारची जहरी टीका जेरेशास्त्री यांनी केली होती.
जेरे शास्त्री यांच्या टीकेला प्रत्युत्तर
जेरे शास्त्री त्यांच्या या विखारी टीकेला तत्कालीन दैनिकांनी चांगल्याच भाषेत समाचार घेतला होता
त्यामध्ये मुंबईमधील दैनिक नवभारत यांनी असे म्हटले होते की “शंकराचार्याच्या गादीवर बसून बेजवाबदार गरळ ओकणारा पाजी शास्त्री”.
त्याचप्रमाणे पुण्याच्या दैनिक सकाळ ने म्हटले होते की “सनातन्यांची पंढरपुरात कोल्हेकुई”.
जेरे शास्त्री यांना वि स खांडेकर यांनी जशास तसे उत्तर दिले होते.16 फेब्रुवारी 1950 रोजी कोल्हापूर येथील अस्पृश्य समाजाच्या विद्यमानाने एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत सुप्रसिद्ध साहित्यिक वि .स. खांडेकर म्हणाले होते की,” अत्यंत प्रखर बुद्धीचे घटना तज्ञ महान विद्वान म्हणून संपूर्ण जग ओळखते आहे .परंतु काही दिवसांपूर्वी आंबेडकरांवर टीका करणारे हे शास्त्री कोण कुठले कुणालाच माहीत नाही ,मलाही माहित नाही. मला सांगावेसे वाटते कि गटारातून येणाऱ्या गंगोदकची उपमा देणाऱ्या जे शास्त्री यांना लाज वाटायला हवी.प्रतिगामी लोकांच्या गटारी विचारांना देखील पवित्र करण्याचे पावित्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वतेत आहे. आंबेडकरांविषयी आदरपूर्वक उद्गार काढणे आवश्यक असताना अशा प्रकारची टीका करणे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि एका पिठाच्या शंकराचार्यांच्या तोंडून अशा प्रकारची गटारगंगा वाहत राहणे हे हिंदू धर्माला लांच्छनास्पद आहे.
क्रमशः
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी 2
3 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी 4
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 04 , 2021 07 : 00 AM
WebTitle – hindu code bill dr b r ambedkar-5 2021-04-04