सचिन वाझे च्या करामती मुळे मुंबई पोलीस दल पुन्हा चर्चेत आले आहे व आणखी चर्चा व्हायला पाहिजे. मुंबई रेल्वे पोलिस कमिशनर म्हणून तीन वर्षे नंतर उत्तर मुंबई विभागाचे अॅडिशनल पोलिस कमिशनर म्हणून मी अडीच वर्षे मुंबईत काम केले होते. निवृत्त झाले की तूम्हा लोकांना वाचा फुटते अस म्हटलं जातं पण मी नोकरीत असतानाही लिहीत व बोलत होतो. मुंबईतील वातावरण,तिथली गुन्हेगारी हे माझ्या सारख्याला अलीबाबाची गुहाच होती. त्या अभ्यासा नुसार “मुंबई जळाली भिवंडी का नाही”हे पुस्तक प्रकाशित केले होते.
इथली “गुन्हे न्याय व्यवस्था(criminal justice system) कालबाह्य”
महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक विभागात कोणत्या तरी जिल्ह्यात मी एसपी म्हणून काम केले होते.
त्या आधारावर ग्रामीण भागातील पोलीस प्रशासन कसे असावे यावर मी केलेल्या प्रयोगावर आधारित पुस्तक लिहिले होते.
मुंबईत असताना”महानगरातील पोलिस प्रशासन,उत्तर मुंबई प्रयोग” या नावाने पुस्तक प्रकाशित केले होते.
मुंबई शहरातील एन्काऊंटरस्,यावर मी खूप मटेरियल गोळा केले होते.मारल्या गेलेल्या बळींची सर्वांगाने माहिती गोळा करणे सुरू केले.
दोन सस्पेंड असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट माझ्या हद्दीतील पोलिस स्टेशनला अट्याच केले होते.
ते संशोधन पूर्ण करू शकलो नाही पण त्या विषयाचं भयानक वास्तव पुढे आले.आणि उत्तरही सापडले की इथली “गुन्हे न्याय व्यवस्था(criminal justice system) कालबाह्य”आहे.
ती बदलण्या ऐवजी तात्पुरता इलाज म्हणून गुन्हेगाराला तत्काळ शिक्षा देण्यासाठी तसेच मीडिया,जनता,विरोधक….
यांना खुश करण्या साठी एन्काऊंटर सुरू झाले. सचिन वाझे हे त्याचेच प्रॉडक्ट!
पोलिस आयुक्तांच्या परवानगी शिवाय कुठलाच एन्काऊंटर होवू शकत नाही. मग हे स्पेशालिस्ट एकदम आयुक्त किंवा गृह मंत्र्यांना भेटत. मधल्या अधिकाऱ्यांना फाट्यावर मारत असत.अमाप पैसा,अमाप दहशत,अमाप प्रसिद्धी,अमाप अधिकार.असे वाझें कुणाला घाबरतील? त्यांच्यावर अंकुश कोणता?
सचिन वाझे ना व्यक्तिगत मोठा लाभ होईल
ख्वाजा युनूस चा काटा वाझेनी ज्या पद्धतीने काढला होता ती फार अमानवी केस होती ते लपविण्या साठी केलेली धडपड अशीच पोरकट होती.एन्काऊंटर स्पेशालिस्ट असे अघोरी व धोकादायक कृत्य कुणा साठी करत असावेत? समाजात शांतता सुरक्षितता राहावी म्हणून?एक कर्तव्य,जबाबदारी म्हणून? सत्याची चाड म्हणून? पुढाऱ्यांच्या सांगण्या वरून?
की? माझ्या निरीक्षणावरून या पैकी कोणतेच नाही! दुसऱ्याच्या बापासाठी कुणीही आपल्या मिशा काढायला तयार होत नाहीत!
व्यक्तिगत फायदा(आर्थिक,मेहेरबानी,भावनिक)असल्या शिवाय असे कृत्य करायला तयार होत नाहीत.
अंबानींच्या घरा समोर स्फोटके ठेवल्याने गृह मंत्री अगर मुख्य मंत्री यांना काय लाभ होणार? सरकार अगर शिवसेनेला कुठला लाभ होईल? कांही होईल असे मला तरी वाटत नाही. वाझेना व्यक्तिगत मोठा लाभ होईल असा त्याचा होरा असावा. अंबानी ,जगातला एक श्रीमंत व्यक्ती.त्याच्या जीविताला असलेला धोका टाळल्याचे,गुन्ह्याचा तपास केल्याचे व आरोपीला बेड्या ठोकल्या चे श्रेय त्याला मिळणार होते. राज्य व केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शाबासकी मिळाली असती.
सत्ताधारी नेत्याला तात्काळ रिझल्ट देणारे नोकरशहा हवे असतात
अर्णवच्या केस मध्ये केंद्रीय गृह मंत्री नाराज होते ते खुश झाले असते. या सगळ्याचा फायदा ख्वाजा युनुसची जी केस त्याचे विरूद्ध चालू आहे त्यातून सुटण्यास मदत झाली असती. असा हेतू वाजेंच्या मनात असावा असे आतातरी वाटते,पुढे वेगळेहि निघू शकते. पाहू.
अशा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा राजकारणात दबदबा असतो.वझे तर शिव सैनिकच होते.प्रचंड पैसा असल्याने ते खूप होत्याचे नव्हते करणारे(great manipulator) असतात. कोणत्याही सत्ताधारी नेत्याला तात्काळ रिझल्ट देणारे नोकरशहा हवे असतात.
नवख्या राजकारण्यांना त्याची चाल समजून येत नाही.बऱ्याच वेळा मनोधैर्य खच्ची व्हायला नको म्हणून राजकारणी त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात. मग ते सरकारलाच गोत्यात आणतात.त्यातून सचिन वाझे,भूषण उपाध्याय… निर्माण होतात . महाराष्ट्रात सात लाखापेक्षा जास्त लोक असताना सरकारला एका सचिन वाझेची गरज का भासावी? तो एवढा शिरजोर का बनावा? कारण प्रशासनात सगळ्या लोकांचा वापर कसा करायचा याची शास्त्र शुद्ध व्यवस्था नाही.
चेहरे नको व्यवस्था बदलुया
मुळात पोलिस व्यवस्था कालबाह्य आहे. मलाच फार समजत वा अक्कल आहे असा माझा दावा नाही पण इतर दुसरा पर्याय मिळे पर्यंत मी केलेल्या शिफारशी विचारात घ्या असे मी प्रत्येक सरकारला विनंती करत असतो. तशी महाविकास आघाडी सरकारलाही केलीय. बहुंतांश मीडिया,जनता, विरोधी पक्ष,विचारवंत, साहित्यिक अशा प्रश्नांची उत्तरे व्यक्ती मध्ये शोधतात.
मग सचिन वाझे, परंबिर्सिंग, देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे या नावांचा उच्चार होतो.वेळोवेळी नाव बदलतात. व्यवस्था तीच रहाते. महाराष्ट्राच्या या अवस्थेस कोण जबाब दार? कोण दोषी? माणसामध्ये १० टक्के दोष तर ९० टक्के इथली व्यवस्था जबाबदार /दोषीआहे ! त्याचा परिपाक म्हणून ” चेहरे नको व्यवस्था बदलुया.
अठरा पगड मावळे शिवशाही मॉडेल”(२०२०) हे पुस्तक मी प्रकाशित केले आहे. सचिन वाजे, परंबिर सिंग, भूषण उपाध्याय… या महा मानवांच्या निर्मितीची मुळे या व्यवस्थेत दिसतात.या सरकारलाही मी या शिफारशी पाठविल्यात!
मी माझं काम करतो.कुणी वंदा या निंदा.
लेखन – सुरेश खोपडे
( माजी एडिशनल पोलिस कमिशनर)
हे ही वाचा.. सचिन वाझे यांनीच स्फोटके भरलेली गाडी प्लॉट केली – एनआयए
हे ही वाचा.. अन्वय नाईक यांची सुसाईड नोट
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 17 , 2021 14: PM
WebTitle – Sachin Vaze Mansukh Hiren case