चित्रपटाच्या पटकथेप्रमाणेच एक नाट्यमय घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे, ज्यात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मुंबईतील एका अभिनेत्री आणि मॉडेलला चुकीच्या पद्धतीने अटक करून तिचा छळ केल्याप्रकरणी हे निलंबन करण्यात आले आहे. रविवारी ही कठोर कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणात तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांवर झालेली ही कारवाई चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीने तिच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याचा योग्य तपास न करता अटक करण्यात आल्याचा आरोप केला होता. तसेच, तिचा मानसिक छळ झाल्याचं तिने सांगितलं होतं. या आरोपांच्या आधारे केलेल्या चौकशीनंतर सरकारने तातडीने कठोर कारवाई केली आहे.मुंबईतील अभिनेत्री कादंबरी जेठवाणी ला अटक केल्याप्रकरणी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे निलंबन

कोण आहे ही अभिनेत्री आणि कोणावर कारवाई करण्यात आली?
या प्रकरणात आंध्र प्रदेश पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबईतील कादंबरी जेठवाणी या अभिनेत्रीला चुकीच्या पद्धतीने अटक केली, कादंबरीने पोलिसांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचं सांगत थेट राज्य सरकारकडे तक्रार दाखल केली होती. अनेक हिंदी, मल्याळम, पंजाबी, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्रीच्या तक्रारीवर सरकारने गंभीर दखल घेतली आणि दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई केली. दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांमध्ये माजी गुप्तचर विभाग प्रमुख पी. सीताराम अंजनेयुलू (डीजीपी दर्जाचे अधिकारी), माजी पोलीस अधीक्षक विशाल गुन्नी (एसपी दर्जाचे अधिकारी), आणि माजी विजयवाडा पोलीस आयुक्त राणा टाटा (आयजी दर्जाचे अधिकारी) यांचा समावेश आहे. या तिघांनी अभिनेत्रीचा छळ केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
नेमके काय घडले?
अटक करण्याच्या विरोधात कादंबरी जेठवाणी यांनी ऑगस्ट महिन्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार,
वायएसआर काँग्रेसचे नेते आणि चित्रपट निर्माते विद्यासागर यांनी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या विरुद्ध फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. “विद्यासागर आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझा आणि माझ्या वृद्ध पालकांचा छळ केला. कोणतीही पूर्वसूचना न देता, मला अटक करून विजयवाडा येथे आणण्यात आले. पोलिसांनी कोणतेही ठोस कारण न देता बेकायदेशीररित्या मला अटक केली आणि माझ्या पालकांनाही वाईट वागणूक दिली. पोलिसांच्या दडपशाहीमुळे माझ्या कुटुंबासह 40 दिवस न्यायालयीन कोठडीत रहावे लागले,” असे कादंबरीने सांगितले. तिने एनटीआर पोलीस आयुक्त एस. व्ही. राजशेखर बाबू यांच्याकडे ऑगस्ट महिन्यात तक्रार दाखल केली होती.
एफआयआर आधीच अटक आदेश
कादंबरीने आणखी एक गंभीर आरोप केला की, पोलिसांनी खोटे कागदपत्र तयार करून तिला खोट्या प्रकरणात अडकवले आणि जामीन मिळू दिला नाही. या आरोपांची सत्यता समोर आल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे निलंबन केले. यावेळी “प्राथमिक पुराव्यांच्या आधारावर सदर अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे. गंभीर गैरवर्तन आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला गेला आहे,” असे सरकारी आदेशात नमूद करण्यात आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे पी. सीताराम अंजनेयुलू यांनी एफआयआर नोंदवण्यापूर्वीच अटक करण्याचे आदेश दिले होते.
31 जानेवारी रोजी अटक आदेश जारी करण्यात आले होते, तर एफआयआर 2 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आला.
या तफावतीमुळे प्रकरण अधिक गोंधळाचे झाले असून, चौकशीत त्याचे स्पष्ट झाल्यानंतरच कठोर कारवाई करण्यात आली आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 17,2024 | 13:02 PM
WebTitle – 3 Senior IPS Officers Suspended for Wrongful Arrest of Mumbai Actress Kadambari Jethwani in Andhra Pradesh