कुळवाडी भूषण या पदवीचा नेमका अर्थ काय ? जाणून घेऊया,वेळोवेळी दिलेल्या आज्ञापत्रातून रयतेच्या झाडांना विकत घेऊन वापरावे, धान्य, भाजीपाला जबरदस्तीने घेऊ नये,लुटालूट करू नये या सूचना सैन्याला दिलेल्या आढळतात.
शेतीसाठी सारामाफी,बियाण-गुर-औजार कर्जाऊ देणे हेही सगळ्यांना ठाऊक आहे.
अनेक ठिकाणी वाचलेलं आहे.
यापलीकडे जाऊनही रयतेचा राजा हि पदवी सार्थ करणारी एक मोठी गोष्ट आहे.
शाहिस्तेखान पळवून लावल्यावर, सुरत लुटल्यावर मुघलांचे जणू नाकच कापले गेलेले होते.
म्हणूनच मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान असे दोघे एकत्रितपणे स्वराज्यावर चालून आले.
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतला मोठा पराभव म्हणजे पुरंदरचा तह.
यावेळी जयसिंग आणि दिलेरखान स्वराज्यात शेतीवाडी, गावे जाळून बेचिराख करत होते, सामान्य लोकांवर अत्याचार करत होते, युद्धभूमी प्रत्येक किल्ला नव्हता तर प्रत्येक गाव झालेलं होत.
किल्ले लढवताना सैनिक मारले जात होते आणि गावाकड त्यांची शेतीवाडी जाळून राख होत होती.
अशावेळी जर एखाद्या दुर्गम किल्ल्यात राजांनी आश्रय घेतला असता किंवा स्वराज्य तात्पुरते सोडून दक्षिणेत गेले असते तरीही चालल असत.
राजे आणि शंभूराजे दोघेही ह्यात नसताना रयतेने लढून औरंगजेब खुद्द दक्षिणेत असताना त्याला जिंकू दिला नाही तिथे राजे स्वतः कार्यरत असताना रयतेने मिर्झाराजे आणि दिलेरखान दोघांशी लढा नक्कीच दिला असता ना ?
मात्र हा संघर्ष असाच सुरु राहिला तर रयतेच अतोनात नुकसान होईल,उभी पिक जाळून नष्ट झाली तर पुढे लोकांनी खायचं काय आणि जगायचं कस असा प्रश्न उभा राहील या काळजीने राजांनी दोन पावल माघार घेऊन तह केला, किल्ले ताब्यात दिले आणि आग्र्याला जायची कबुली दिली.
आतापर्यंत लोकांकडून महसूल गोळा करून,प्रसंगी आपल्याच प्रजेला लुटून महाल बांधणारे आणि ऐन युद्धात रयतेला वाऱ्यावर सोडून जाणारे शेकडो राजे भारताने पाहिलेले होते.
मात्र रयतेसाठी पराभव पत्करून तह करून जीव धोक्यात घालून आग्र्याला जाण्याची तयारी करणारा राजा फक्त एकच.
आपली रयत लेकरू आणि आपण पालनकर्ते ही भूमिका बजावताना स्वहिताचा विचार मागे ठेवून रयतेचा विचार करणारा राजा दुर्मिळात दुर्मिळ.
आजच्या भांडवलशाहीच्या दावणीला कायदे करून शेतकऱ्यांना नेऊन बांधणाऱ्या आणि रयतेची जमीन गिळंकृत करू पाहणाऱ्या धनदांडग्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या खुज्या लोकांसमोर म्हणूनच कुळवाडी भूषण छत्रपती उंचीने आभाळाला टेकलेले दिसतात.
कुळवाडी भूषण हि पदवी अभिमानाने सांगावी असा एकमेव राजा !!
हेही वाचा.. रायगडावरील रोषणाई अपमानास्पद; संभाजीराजे भडकले,लोकांचा मात्र वेगळा सुर
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 19 , 2021 19:40 pm
Web Title – kulwadibhushan chhatrapati shivaji Maharaj