सोशल मिडिया तील विविध विषयांवरील महत्वाच्या मतांच्या आढावा…विविध विचारांची अभिव्यक्ती
” काय खर नाही हो, सगळा चिखल आहे नुसता “
” ह्या पॉलिटिकल लोकांनी सगळा नास केलाय “
” पूर्वी किती छान होत ना हो फेसबुक , कविता- गाणी- साहित्य- कला वगैरे, आता नुसता राजकिय पोस्ट चा राडा”
” आपली संस्कृती, कला, साहित्य याबद्दल माहिती ,चर्चा या उद्देशाने आलो तेव्हा फेसबुक किती छान होत ना ? “
ही बऱ्याच लोकांची मत असतात ना सध्या ?
आपला आणि राजकारणाचा काय संबंध ? आपण भले आणि आपल्या पोस्ट-जोक्स-कविता-फोटो-ट्रिप्स हे भल , अस ज्यांना वाटत त्यांच्यासाठी,
First, they came for the Socialists, and I did not speak out— Because I was not a Socialist.Then they came for the Trade Unionists, and I did not speak out— Because I was not a Trade Unionist.Then they came for the Jews, and I did not speak out— Because I was not a Jew.Then they came for me—and there was no one left to speak for me. - Martin Niemoller
मुळात मुद्दा असा आहे की सध्याच्या काळात माझ्या दरवाज्यात आग लागलेली नाहीये
असा गैरसमज करून जे निवांत बसलेत त्यांच्या दारात जेव्हा आग येईल
तेव्हा भवताली फक्त राख उरलेली असेल,
म्हणून सध्याच्या काळात तटस्थ राहणे म्हणजे वाळूत तोंड खुपसून आपलं आपणच खोट समाधान करून घेणं आहे.
मग मी का लिहितो ?
मग मी का लिहितो ?
आपण काय खावं हे सरकार ठरवत.
मी काय वाचाव हे सरकार ठरवत.
तुम्ही काय बघाव हे सरकार ठरवत.
मी काय बोलू नये हे सरकार ठरवत.
आपल्या अपत्यांनी शाळेत , कॉलेजात काय शिकावं हे सरकार ठरवत.
माझ्या घरातल्या आजारी माणसांना किती रुपये दरान औषध मिळावीत हे सरकार ठरवत.
आपल्या घरात येणार अन्नधान्य किती रुपयांनी मिळाव हे सरकार ठरवत.
माझ्या घरात येणार पाणी कुठून आणि किती रुपये दरान याव हे सरकार ठरवत.
माझ्या घरात येणारी वीज किती वेळ येईल आणि किती रुपये दरान येईल हे सरकार ठरवत.
मला पगारवाढ मिळेल कि नाही
माझ्या गाडीत पेट्रोल टाकायला किती रुपये द्यावे लागतील हे सरकार ठरवत.
माझ्या कुटुंबाला विमा कवच घ्यायचं असेल तर त्याचा दर सरकार ठरवत.
मी जिथ नोकरी करतो त्या कंपनीला होणारा नफा नुकसान सरकारी धोरणावर अवलंबून आहे.
मार्केट नावाचा जो बागुलबुवा आहे त्याच्या नाकातली वेसण सरकारच्या हातात असतीय.
माझी कंपनी नफ्यात आली तर मला पगारवाढ मिळेल कि नाही हे ठरत.
माझ्या शेतीला कुठून आणि कस पाणी मिळेल हे सरकार ठरवत.
शेतीत पेरायला बीज आणि टाकायला खताचे दर सरकार ठरवत.
माझ्या शेतीत पिकलेल्या मालाचा बाजारभाव सरकार ठरवत.
आपल्या भवताली असणारा परिसर आज कसा असेल आणि उद्या कसा राहील हेही सरकार ठरवत.
माझ्या जन्मापासून माझ्या मृत्यूपर्यंत प्रत्येक बाबतीत
आपल्या आयुष्यात सरकार कुठे ना कुठे दृश्य अदृश्य स्वरुपात माझ्या जगण्यावर प्रभाव टाकत.
हि सरकार नावाची जी व्यवस्था आहे तिच्यात राजकारणी लोकांच मंत्रीमंडळ आल ,
प्रशासन आल , न्यायपालिका आली , कार्यपालिका आली अश्या सगळ्या संस्था आल्या.
थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम माझ्या जगण्यावर होतो म्हणून मी लिहितो
माझ्या परीने सरकारने आखून दिलेल्या नियम आणि कायद्यानुसार मी नागरिक म्हणून वागतो,पालन करतो.
ह्या सरकारला निवडून देण्याच्या प्रक्रियेतला एक भाग,अगदी लहान का असेना,
माझ मूल्य अतिशय कमी असेल , पण माझ्या मताला मूल्य आहे.
म्हणून मला जिथे जिथे शक्य होईल तिथे मी माझ्या हक्कासाठी बोलल पाहिजे.
म्हणून मी इथ राजकारणाबद्दल लिहितो.माझी राजकीय मत मांडतो.
येणारे भलेबुरे अनुभव असतील ,धोरण असतील किंवा निर्णय असतील,
त्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम माझ्या जगण्यावर होतो म्हणून मी लिहितो.
कधी समर्थन करायला तर कधी विरोध करायला.
माझ्या लिहिण्याने सरकार मत बदलेल अशी भाबडी आशा कधीच नसते.
माझ्या लिहिण्याने वाचणारे त्यांच मत बदलतील अशीही आशा नसते.
पण किमान माझ्या मनात कोंडलेली वाफ बाहेर पडावी
आणि मनमोकळ व्हाव ह्या भावनेसाठी का होईना
पण मी लिहितो.
#लिहिण्यातून
#आम्ही_भारताचे_लोक
लेखन – आनंद शीतोळे
‘पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घोरीला वीस वेळेस माफ केले’ हे खरे कि खोटे यावरून वाद चालू होता वाटसऍपवर. मी खालील उत्तर दिले असता मला ब्लॉक मिळाला एका परिचितांकडून.
घोरचा मोहम्मद ( मोहम्मद घोरी) आणि पृथ्वीराज चौहान यांच्यामध्ये दोनवेळा लढाई झाली. ते ठिकाण भटींडाजवळ ‘तराई’ हे होते. तराईची पहिली लढाई मोहम्मद घोरी हरला ( इ. स. ११९१) आणि घायाळ होऊन गझनीला पळून गेला. या पळणाऱ्या सैन्याचा पाठलाग न करता पृथ्वीराज स्वस्थ बसला. घोरीची महत्त्वाकांक्षा त्याच्या लक्ष्यात येऊ शकली नाही. केवळ लूट करायला आलेली टोळी इतकेच त्याने घोरी आणि त्याच्या सैन्याला महत्त्व दिले.
पण जखमी होऊन पळालेला घोरी गझनीला पोचताच पराभवाचा बदला घेण्यासाठी पुन्हा सैन्याची जुळवाजुळव करून एका वर्षातच परत चालून आला. लढाईचे ठिकाण पुन्हा तराई हेच होते. येथे झालेली घोरीसोबतची दुसरी आणि शेवटची लढाई ( इ. स. ११९२) पृथ्वीराज चौहान हरला आणि त्यात घोरीने पृथ्वीराजाला कैद करून मारले.
तराईच्या लढाईला जवळ जवळ १५० ते २०० वर्षांचा काळ लोटल्यानंतर लिहिली गेली
काही जैन/संस्कृत ऐतिहासिक साधनांनुसार (पृथ्वीराज प्रबंध, प्रबंध कोश आणि प्रबंध चिंतामणी ) पृथ्वीराज चौहानने तराईमध्ये २० ते २१ वेळा घोरीला पकडले आणि सोडून दिले. पण ही सर्वच जैन साधने/ ग्रंथ तराईच्या लढाईला जवळ जवळ १५० ते २०० वर्षांचा काळ लोटल्यानंतर लिहिली गेली आहेत. शिवाय फक्त एका वर्षाच्या कालखंडात २० वेळा समोरासमोरची लढाई मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यात झाली होती हे म्हणणे खूपच अतिशयोक्त वाटते.
तराईच्या पहिल्या लढाईत हरल्यानंतर मोहम्मद घोरी पुन्हा गझनीला पळाला होता. गझनी ते भटिंडा हे अंतर ७१९ किलोमीटर इतके आहे. त्या काळात जखमी वाताहत अवस्थेत हे अंतर कापायला मोहम्मद घोरीला बराच अवधी लागला असावा. गझनीला पोचल्यावर स्वतः बरे होणे त्यानंतर सैन्याची पुन्हा जुळवाजुळव यात काही महिने गेले असावेत, पुन्हा तराईकडे येण्यासाठी काही महिने लागले असणार ह्या सगळ्या घडामोडीत एक वर्षाचा काळ सरला असण्याची शक्यता तर्कपूर्ण वाटते.
पृथ्वीराजरासो
मग हे वीस वेळा पकडूनही पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घौरीला सोडून दिले/क्षमा केली या दंतकथेचा उगम कोठे आहे हे पहिले असता आपण जेम्स टॉड या ब्रिटिश इतिहासकाराने इंग्रजीत लिहिलेल्या Annals and Antiquities of Rajasthan या ग्रंथापर्यंत जाऊन पोहोचतो. त्याच्या पुस्तकात जेम्स टॉडने ‘पृथ्वीराजरासो’ या चंदबरदाईच्या काव्याचा बराच संदर्भ घेतला आहे.
चंदबरदाई हा राजपुतान्यातला राजाश्रय असलेला नामांकित कवी होता. त्याचा काळ ऐतिहासिक साधनांवरून १६व्या शतकाच्या शेवटचा ते १७व्या शतकाच्या सुरुवातीचा मानला जातो. या चंदबरदाईने ‘पृथ्वीराजरासो’ हे काव्य लिहिले असून त्यात पृथ्वीराज चौहानच्या चरित्राचे मोठे रसपूर्ण वर्णन केलेले आहे. त्यात प्रसिद्ध ‘पृथ्वीराज- संयोगिता’ हे प्रेमप्रकरणही आहे. त्याआधी या पृथ्वीराज संयोगिता कथेचा उल्लेख कुठे सापडत नाही. पृथ्वीराज चौहानचा काळ इ. स. ११६६ ते इ. स. ११९२ असा आहे. चंदबरदाईने त्याचं काव्य पृथ्वीराज चौहानच्या ४०० वर्षानंतर लिहिले आहे असे ऐतिहासिक साधनांवरून समजते.
पृथ्वीराजरासो या काव्यात रजपुतांच्या पराक्रमाचा इतिहास अतिशय गौरवपूर्णरित्या मांडल्यामुळे ते लोकप्रिय झाले
बखरींना जेव्हढे महत्त्व मराठ्यांच्या इतिहासात दिले गेले आहे तेव्हढे आणि तितकेच महत्त्व ‘पृथ्वीराजरासो’ ला दिले जाते. आणि या मुळातच फार अस्सल नसलेल्या ऐतिहासिक साधनावर अवलंबून टॉडने आपले Annals and Antiquities of Rajasthan लिहिले आहे. ‘पृथ्वीराजरासो’मध्ये मोहम्मद घोरीला पृथ्वीराज चौहानने २० वेळा हरवले असे लिहिलेले आहे. झालेल्या सर्व २० लढायांमध्ये प्रत्येकावेळी घोरी हरतो आणि पृथ्वीराजाकडे क्षमायाचना करतो मग पृथ्वीराज दयाबुद्धी दाखवून त्याला सोडून देतो. आणि एकवीसव्यांदा जेव्हा घोरी जिंकतो तेव्हा घोरी पृथ्वीराजाला कैद करून घोरला घेऊन जातो.
पुढे मग तो पृथ्वीराजाचे डोळे काढतो, मग चंदबरदाई तिथे पोहोचतो घोरीचा विश्वास संपादन करून त्याच्या दरबारात मानाचे स्थान मिळवतो, घोरीकडे पृथ्वीराजाच्या शब्दवेधी लक्षभेदनाचे कौतुक करतो, आणि हिंदी दोह्यात घोरी कुठे बसला आहे त्या विवक्षित स्थानाचा पत्ता पृथ्वीराजाला सांगतो, पृथ्वीराज मग त्याचा शब्दवेधी बाण चालवून अचूक वेध घेत मोहम्मद घोरीला मारतो. असे सगळे काव्यात्म ( आणि काल्पनिकही )वर्णन ‘पृथ्वीराजरासो’ मध्ये येते.
तराईच्या लढाईनंतर मोहम्मद घोरी १४ वर्ष जिवंत होता हे इतिहासकारांनी मान्य केले आहे.यावरून पृथ्वीराजरासोमधल्या गोष्टी किती काल्पनिक आहेत हे कळावे.
पण पृथ्वीराजरासो या काव्यात रजपुतांच्या पराक्रमाचा इतिहास अतिशय गौरवपूर्णरित्या मांडल्यामुळे ते लोकप्रिय झाले रुळले आणि पुढे इतिहास म्हणून टॉडसारख्या लोकांनी पसरविले.
अधिक जिज्ञासा असल्यास
The Last Hindu Emperor: Prithviraj Chauhan and the Making of the Indian Past 1200-2000
हे सिंथिया टॅलबॉट यांचे पुस्तक मिळवून वाचावे असे सुचवतो.
लेखन – श्री. हारून शेख
दशक्रिया विधी : य.ना.वालावलकर
एखादे कर्मकांड तर्काला पटत नाही म्हणून ते करू नये असे बुद्धीला वाटते. पण परंपरेने चालत आल्यामुळे ते केलेच पाहिजे असा भावनेच्या हट्ट असतो. अशी तर्कविहीन मानसिकता म्हणजे श्रद्धा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत तत्त्वत: भेद नाही. पण ज्या श्रद्धेपायीं माणसाची लक्षणीय प्रमाणात आर्थिक हानी होते त्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणता येईल. हिंदु समाजात दीर्घकाळ टिकून राहिलेली, मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी करणारी अंधश्रद्धा म्हणजे अंत्यसंस्कार. दशक्रिया, बारावे-तेरावे, मासिक श्राद्ध हे विधी इतके हास्यास्पद असतात की त्यांची निरर्थकता सहज कळते. पण परंपरेच्या दडपणामुळे आणि भयोद्भव श्रद्धेमुळे अनेकांना या विधीचा त्याग करता येत नाही. जे लोक निर्भयपणे रूढी तोडतात, आणि हे विधी करीत नाहीत ते परंपरेच्या जोखडातून कायमचे मुक्त होतात.
रूढी तोडल्यामुळे काही वाईट होत नाही
अनाठायीं होणारा मोठा खर्च टळतो. रूढी तोडल्यामुळे काही वाईट होत नाही हा स्वानुभव आहे. श्रद्धाळू लोक मानतात की माणसाच्या मृत्यूनंतर आत्मा मृतदेहाजवळ घुटमळत राहतो. मृतदेहाचे दहन करतात तेव्हा आत्मा देहाजवळ असतो. पण तो जळत नाही. स्मशानातच राहतो. दहाव्या दिवशी मृताचे नातेवाईक घाटावर येऊन पिंड ठेवतात तेव्हा आत्मा तिथे येतो. झाडावर कावळे असतात. इतर कोणाला न दिसणारा आत्मा कावळ्याला दिसतो. आत्मा समाधानी आहे की नाही ते कावळ्याला कळते. आत्मा समाधानी असेल तर कावळा पिंड खातो. नसेल तर पिंडाला शिवत नाही. दुसरा समज असा की अतृप्त आत्मा पिंडाभोवती घिरट्या घालतो. त्यामुळे कावळा पिंडाला शिवूं शकत नाही.
मृताच्या आत्म्याची कांही इच्छा राहिली आहे हे समजते. मग मृताचे नातेवाईक आत्म्याला उद्देशून कांही आश्वासने बोलतात. त्याने आत्म्याचे समाधान झाले तर घिरट्या घालणे थांबते. मग पिंडाला कावळा शिवतो. हे सगळे हिंदु धर्मीयांच्या परिचयाचे असल्यामुळे सारे ठीकच आहे असे गृहीत धरतात. चिकित्सा करीत नाहीत. थोडा विचार केला तर पुढील प्रश्न उद्भवतात. (माणसाच्या हृदयात आत्मा असतो. तो अमर असतो. हे आपण तात्पुरते गृहीत धरू.)
श्रद्धाळू माणसाला फसवायचे, फसवायचे म्हणजे किती?
*दहनानंतर दहा दिवस आत्मा स्मशानभूमीत राहातो. तो दिवस कसे मोजतो ? गणनेसाठी मेंदू हवा. मेंदूसाठी शरीर हवे. आत्म्याला शरीर नाही. म्हणून मेंदू नाही. त्यामुळे आत्मा गणना करू शकणार नाही. *आत्मा अदृश्य असतो. तो कोणालाही दिसत नाही. मग कावळ्याला कसा दिसतो? नुसता दिसतो असे नाही. तर तो समाधानी आहे की नाही हेही कावळ्याला समजते. कावळ्याला आत्म्याच्या भावना कळतात हे शक्य आहे काय? बरे कावळ्याला आत्मा दिसतो हे कोणाला कसे समजले? कावळा सांगतो काय? कोणत्या भाषेत सांगतो? श्रद्धाळू माणसाला फसवायचे, फसवायचे म्हणजे किती? तसा तो फसतोच म्हणा! म्हणूनच ते भटजी त्याला फसवतात.
श्रद्धेमुळे माणसाची विचारशक्ती ठप्प होते. त्यामुळे भटजी जे सांगतील ते श्रद्धाळूंना खरे वाटते.आणि त्याप्रमाणे ते करतात. भटजींनी आपल्याला मूर्ख बनविले आहे हा विचारसुद्धा त्यांच्या डोक्यात येत नाही.आतां ही एक सत्य घटना. एक गृहस्थ वारले. उत्तरक्रियेसाठी आलेल्या भटजीने त्या ग्रहस्थांच्या पत्नीच्या मंगळसूत्रातील सोन्याचा मणी मागितला.त्या बाईने मणी काढून दिला.भटजीने तो पूजेला ठेवला. सर्व आटोपल्यावर दक्षिणा घेतली. आणि जाताना तो मणीसुद्धा घेऊन गेला.
मणी देण्याची पद्धत आमच्यात नाही
अशा वेळी कांही बोलणे अवघड असते. त्याचा गैरफायदा हे भटजीलोक घेतात. फसविण्याच्या नवनवीन युक्त्या काढतात. त्या बाईने सांगितले असते की “असा मणी देण्याची पद्धत आमच्यात नाही.” तर तो गप्प बसला असता. पण आपला एक खडा टाकून बघितला. सोन्याचा मणी मिळाला. आता तो भटजी आपला पराक्रम दुसर्याला सांगेल. संधी मिळाली की तो दुसरा भटही खडा टाकून पाहील. कांही वर्षांनी असे रूढ होईल की पतीच्या उत्तरक्रियेला पत्नीच्या मंगळसूत्रातील सोन्याच्या मण्याचे पूजन करून तो पुरोहिताला दान करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. भटजी जे सांगतात ते सर्व या श्रद्धाळूंना खरे वाटते. आणि ते तसे करतात.
हे भटजी आपल्याला किती मूर्ख बनवतात याचा विचारसुद्धा त्या श्रद्धाळूंच्या डोक्यात येत नाही. त्याचे कारण श्रद्धेमुळे बुद्धी काम करेनाशी होते हे आहे. नातेवाईकाच्या मृत देहाचे योग्य पद्धतीने दहन करणे एवढेच आपले सामाजिक कर्तव्य असते. ते पार पाडावे. बाकी कांहीच करू नये. तुम्ही भटजीचे मुकाट्याने ऐकू लागलां की तुमची लूट सुरू झालीच असे समजा.आता समंजस हिंदूंनी नातेवाईकाच्या मृत देहाचे दहन विद्युत् दाहिनीत करावे. (आधीच देहदान केले असेल तर उत्तमच). ही सोय नसेल तरच चिता पेटवावी. दहनानंत्तर कोणताही धार्मिक विधी करू नये. विधी न केल्याने कुणाचे काहीही वाईट होत नाही. इतर लोक काय म्हणतील याची चिंता मुळीच करूं नये. कोणी कांही म्हणत नाहीत. उलट ते तुमचे अनुकरण करतील. असे अनेकदा घडते. ही सुधारणा झाली तर अनाठायी होणारा मोठा खर्च वाचेल.
लेखन – य.ना.वालावलकर
बाबासाहेबांच्या मते स्वतंत्र आणि सार्वभौम भारताचे उद्दिष्ट काय असले पाहिजे ? What Congress And Gandhi Have Done To the Untouchables ? या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांना हाकलून लावल्यावर, स्वतंत्र आणि सार्वभौम भारतात त्रैवर्णिक शासक वर्ग काय करणार ? हा प्रश्न उपस्थित केला.त्यावर उत्तर असे मिळाले की,
स्वतंत्र आणि सार्वभौम भारताचे उद्दिष्ट काय
“What will the governing class do when India becomes a sovereign and independent state? Some hope that they will undertake reform of tenancy laws, enlarge factory legislation, extend primary education, introduce prohibition and train people to ply charkha, construct roads and canals, improve currency, regulate weights and measures, open dispensaries, and undertake other measures to ameliorate the condition of the servile classes.
No one from the servile class can be very enthusiastic about such a program. In the first place, there is nothing very great in it. In the world of today, no governing, class can omit to undertake reforms which are necessary to maintain society in a civilized state. Personally, I have grave doubts about the governing class in India coming forward to carry out even such a modest program of social amelioration.
स्वतंत्र आणि सार्वभौम
Most people forget that what leads the Congress today to mouth such a program is the desire to show that the Congress is better than the British Bureaucracy. But once the bureaucracy is liquidated, will there be the same incentive to better a lot of the masses? I entertain very grave doubts on the point….” तथापि, भारतातील बहुसंख्य नागरिकांना स्वराज्यात, स्वतंत्र आणि सार्वभौम भारतात नेमके काय अपेक्षित आहे, हे अधोरेखित करताना बाबासाहेब लिहितात, “Apart from this, is social amelioration the be-all and end-all of Swaraj? Speaking for the servile classes, I have no doubt that what they expect to happen in a sovereign and free India is complete destruction of Brahmanism as a philosophy of life and as a social order.”
संक्षिप्त विवेचन
संक्षिप्त विवेचन– भौतिक सुख सुविधा वगैरे देऊ , शिक्षण देऊ, सिंचन देऊ असले आश्वासन शासक वर्ग देत होता. ब्रिटिश नौकरशाही पेक्षा आम्ही सरस सुराज्य देऊ असा दावा त्रैवर्णिक काँग्रेस ने ठोकला होता. बाबासाहेबांनी यावर टिप्पणी करताना सांगितलं की, यात काही भव्यदिव्य इत्यादी नाही, सभ्य जगात किमान सुविधा देणं हे त्या त्या शासक वर्गाचे कर्तव्यच आहे. त्यापासून सुटका नाही.
भारतातील त्रैवर्णिक शासक वर्ग भारतीय नागरिकांना किमान सुविधा पण देईल का ? अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केली. आणि निक्षून सांगितले की स्वतंत्र आणि सार्वभौम भारतात आम्हाला जे घडावे वाटते ते हे, की ” जीवनाचे तत्वज्ञान म्हणून आणि सामाजिक व्यवस्था म्हणून ब्राह्मणधर्म समूळ नष्ट झाला पाहिजे..” बाबासाहेबांनी अधोरेखित केलेले हे उद्दिष्ट स्वतंत्र, सार्वभौम, संविधानिक भारतातील तमाम नागरिकांचे उद्दिष्ट झाले पाहिजे. क्रमशः पवनकुमार शिंदे ( संदर्भ- BAWS Volume 9)
लेखन – पवनकुमार शिंदे
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा