जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST)
अंतराळसंशोधन हा नेहमीच सर्वांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. साधारणतः गेल्या तीस वर्षांत या अंतराळसंशोधनात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारी अवकाश दुर्बीण म्हणजे हबल. आपण सर्वांनी यापूर्वी हबलविषयी नक्कीच ऐकल असेल. हबलने टिपलेली एक ना अनेक अंतराळातील छायाचित्रे पाहून आपण थक्कसुद्धा झाला असाल. १९९० ला प्रक्षेपित झालेल्या हबलकडून आजवर तिच्या शक्य त्या सर्व तांत्रिक क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून झालेला आहे; अजूनही होत आहे.असे असले तरी, खगोलशास्त्रज्ञांना गेल्या वीस वर्षांपासून हबलपेक्षाही शक्तिशाली दुर्बिणीची गरज भासू लागली होती आणि त्यादृष्टीने प्रयत्न देखील सुरु झाले.अखेर जगभरातील हजारो विविध तज्ज्ञांच्या अविश्रांत मेहनतीतून तब्बल वीस वर्षांनी हबलच्या पुढच्या पिढीतली एक शक्तिशाली अंतराळदुर्बीण (space telescope) सज्ज झाली आहे. ती हबलपेक्षा कित्येक बाबतीत आणि कित्येक पटींनी सरस असणार आहे. या नव्या पिढीतल्या दुर्बिणीच नाव आहे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST). James Webb Space Telescope
हबलला तिच नाव दिग्गज खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांच्यावरून दिल गेल होत, त्याचप्रमाणे जेम्स वेब दुर्बिणीला तिच नाव नासा या अमेरिकन अवकाश संस्थेचे दिवंगत प्रशासक जेम्स ई. वेब यांच्यावरून देण्यात आलेल आहे. हबल ही तिच्या काळातली उच्च दर्जाची दुर्बीण असली, तरी अजून सखोल अवकाशसंशोधनाच्या कामात हबलला बऱ्याच मर्यादा होत्या आणि म्हणूनच गेल्या शतकाच्या अखेरीस जेम्स वेब दुर्बिणीच्या निर्मितीला सुरवात झाली. सुमारे १० बिलियन डॉलर्स म्हणजे ७३० अब्ज रुपये इतक प्रचंड निर्मितीमूल्य या दुर्बिणीच आहे. नासाची क्रमांक एकची प्राथमिकता असलेली ही दुर्बीण नासा, युरोपियन अवकाश संस्था आणि कॅनेडियन अवकाश संस्था याच्या संयुक्त सहभागातून तयार झालेली आहे. आतापर्यंतची ही सर्वांत शक्तिशाली दुर्बीण असून, येणाऱ्या दशकातल्या अवकाशसंशोधनात हे अतिशय महत्त्वाच साधन असणार आहे.
वेगळी दुर्बीण
जेम्स वेब ही दुर्बीण दिसायला सर्वसाधारणपणे आपल्या कल्पनेत असलेल्या अवकाश दुर्बिणींपेक्षा अत्यंत वेगळी आहे. हबलहून तर निश्चितच वेगळी आहे. वेब ही प्रामुख्याने इन्फ्रारेड दुर्बीण असून इतर अवकाश दुर्बिणींप्रमाणे पृथ्वीच्या कक्षेत न फिरता चंद्राच्याही पलीकडे पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर दूरवर असणाऱ्या ‘L2’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थानाभोवती सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांना पाठमोरी राहून पृथ्वीच्या सोबतीने सूर्याभोवती परिभ्रमण करत राहणार आहे.
या ‘L2’ स्थानाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सूर्य आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तींचा समतोल राखला जाऊन तिथल्या वस्तू एकाच स्थितीत दीर्घवेळ राहणे शक्य होत. ‘L2’ भोवती फिरणारी वेब हि काही पहिलीच मानवनिर्मित वस्तू नाहीये तर यापूर्वीही काही मोजकी अवकाशशास्त्रीय उपकरणे तिथे काही काळासाठी होती, २ उपकरणे सध्या आहेत आणि येत्या काळात काही मार्गस्थ होतील.
चंद्र पृथ्वीपासून साधारणतः चार लाख किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे जेम्स वेब दुर्बीण पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर म्हणजे किती दूरवर असणार आहे, याची तुम्हाला कल्पना आली असेल. दुर्बिणीला इतक्या दूरवर ठेवण्याच कारण म्हणजे तिथ असलेल अतिशीत तापमान आणि पृथ्वीशी समांतर राहण्यासाठी असणार सुयोग्य अंतर. अर्थातच जेम्स वेबसारख्या इन्फ्रारेड किरणांच्या बाबतीत अतिसंवेदनशील असणाऱ्या दुर्बिणीसाठी भोवतालची पोषक परिस्थिती पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या जवळपासच्या कक्षेत मिळू शकत नाही.
वेब दुर्बिणीच्या चित्राकडे पाहिल्यास पटकन नजरेत भरणाऱ्या दोन मुख्य गोष्टी म्हणजे या दुर्बिणीचा सोनेरी रंगाचा भला मोठा षटकोनी आकाराचा आरसा आणि याच आरशाखाली असणारे चंदेरी रंगांचे भव्य असे पाच उष्णतारोधक थर. याच्या मुख्य आरशाची रचना ढोबळमानान आपण घरोघरी वापरत असलेल्या D2H डिशसारखी आहे, अस म्हणायला हरकत नाही. हा मुख्य आरसा सुमारे ६.५ मीटर इतक्या व्यासाचा आहे. हबल दुर्बिणीच्या आरशाचा व्यास २.५ मीटर इतका आहे. यावरून हबलच्या तुलनेत वेब किती मोठी असू शकेल, याची आपल्याला कल्पना येईल.
सर्वात विशेष गोष्ट म्हणजे वेब दुर्बिणीचा हा इतका मोठा आरसा एकसंध नसून, १.३२ मीटर व्यासाच्या सुमारे १८ षटकोनी आकाराच्या लहान आरशांनी बनलेला आहे. प्रत्येक षटकोनी आरशाच्या मागे जोडलेल्या यंत्रणेद्वारे प्रत्येक आरशाला सर्वबाजुंनी अतिशय सूक्ष्म टप्प्या टप्प्याने नियंत्रित हालचाल करता येते. इतकी सूक्ष्म कि मानवी केसाच्या जाडीच्या दहा हजाराव्या भागाइतकी. अशी अचूक हालचाल करता येत असल्याने सर्व १८ आरश्यांचा एकत्र मिळून डिशचा एक सलग खोलगट आकार प्राप्त करता येतो. या मुख्य आरशाच वजन ७०५ किलोग्रॅम असणार आहे.
जेम्स वेब ही मुख्यकरून अतिदूरहून येणाऱ्या इन्फ्रारेड किरणांना टिपणारी असल्यामुळे अचूक निरीक्षणे नोंदवण्यासाठी या दुर्बिणीच्या अतिसंवेदनशील आरशांवर सूर्याचा किंवा अगदी पृथ्वी अथवा चंद्रापासून परावर्तित होणारा प्रकाश आणि त्या प्रकाशामुळे निर्माण होणारी उष्णता किंचितदेखील पडणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
अशी प्रकाशकिरणे आणि त्यांची उष्णता यांना दुर्बिणीचे आरसे, इतर संवेदनशील कॅमेरे आणि उपकरणे यांच्यापासून दूर ठेवण्याचं महत्त्वाचं काम चंदेरी रंगाचे २२ मीटर लांब आणि १२ मीटर रुंदीचे पाच उष्णतारोधक थर करतील, जे एकमेकांपासून साधारणतः एक फुट अंतरावर असतील. प्रत्येक थर एखाद्या व्यावसायिक टेनिस कोर्टच्या आकाराएवढा असणार आहे, तर प्रत्येक थराची जाडी साधारणतः मानवी केसाच्या जाडीइतकी असणार आहे. दोन थरांमधली निर्वात पोकळीदेखील उष्णतारोधकाच काम करेल. हे पाच थर केप्टोन (Kapton) या पदार्थापासून बनलेले असून, त्यांच्यावर ॲल्युमिनिअम आणि सिलिकॉन यांचा पातळ थर देण्यात आला आहे.
सूर्य, पृथ्वी आणि चंद्राची प्रकाशकिरणे पूर्णपणे परावर्तित केल्याने पाच थरांपैकी पहिला थर
ज्यावर सूर्यकिरणे पडणार आहेत तिथलं तापमान ८५ अंश सेल्सिअस इतक उष्ण असेल,
तर सर्वांत शेवटच्या थरापलीकडे कसल्याही प्रकारची प्रकाशकिरणे पोहचणार नसल्यामुळे तिथले तापमान अतिशीत असणार आहे.
म्हणजेच सुमारे उणे २३३ अंश सेल्सिअस (-२३३°C)!
(तुलनेसाठी, सियाचीनमधील आत्तापर्यंतच सर्वात कमी तापमान -५७°C नोंदल गेलेल आहे.)
इतक्या अतिशीत तापमानामध्ये दुर्बिणीचे सगळे आरसे आणि तिचा सांगाडा
या गोष्टी किंचितदेखील आकुंचन न पावता आपल्या मूळ आकारामध्ये रहावेत,
यासाठी ते सगळे बेरिलिअम या धातूपासून बनवण्यात आलेले आहेत.
बेरिलिअम हा धातू निवडण्यामागच कारण म्हणजे तो मजबूत आणि वजनाला हलका आहे.
-२३३°C अशा अतिशीत तापमानातही त्याच्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
प्रत्यक्षात या दुर्बिणीच्या -२५३°C तापमानाला विविध यशस्वी चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत.
बेरिलिअमपासून बनलेले एकसारख्या आकाराचे १८ षटकोनी आरसे पॉलिश करून झाल्यावर
त्यांच्यावर निर्वात चेंबरमध्ये शुद्ध सोन्याची वाफ करून त्याचा अतिशय पातळ मुलामा देण्यात आलेला आहे.
सोन्याचाच मुलामा का तर त्यामुळे इन्फ्रारेड किरणे परावर्तित करण्याच प्रमाण
हे इतर कोणत्याही धातूच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे ९९% राहतं.
या मुलाम्यामुळे आरशांपासून अतिशय कमी तीव्रतेची इन्फ्रारेड किरणेदेखील जास्तीत जास्त आणि चांगल्या प्रकारे परावर्तित होऊ शकणार आहेत.
दुसर म्हणजे सोन हे रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय असल्याने इतर कोणत्याही बाह्य घटकांचा परिणाम त्यावर होत नाही.
आता पातळ मुलामा म्हणजे किती पातळ तर या सोन्याच्या मुलाम्याची जाडी आहे निव्वळ १०० नॅनोमीटर.
संपूर्ण २७० चौरस फूट आरशांच्या भागावर मुलामा देण्यासाठी फक्त ४८ ग्रॅम म्हणजे पाच तोळ्याहूनही कमी सोने वापरले गेले आहे.
सर्व १८ षटकोनी आरसे बनवण्यासाठी, त्यांना पॉलिश करण्यासाठी
आणि त्यांच्यावर सोन्याचा पातळ मुलामा देण्यासाठी आजवर उपलब्ध असलेल अतिशय उच्च दर्जाच तंत्रज्ञान वापरण्यात आल आहे.
१८ आरशांच्या मिळून बनलेल्या मुख्य मोठ्या आरशावर येणारी इन्फ्रारेड किरणे
समोर असणाऱ्या एका दुसऱ्या गोलाकार आरशावर एकवटली जातील
आणि ही एकवटलेली किरणे परावर्तित करून परत मुख्य आरशाच्या मधोमध असणाऱ्या एका तिसऱ्या आरशावर पाठवली जातील.
तिथून पुढे ही किरणे मुख्य आरशाच्या मागे पद्धतशीरपणे बसवलेले उच्च दर्जाचे कॅमेरे, स्पेक्ट्रोमीटर,
इत्यादी उपकरणांकडे सखोल विश्लेषणासाठी पाठवली जातील.
ही विश्लेषणं मग उच्च क्षमतेच्या अँटेनांमार्फत पृथ्वीकडे पाठवली जातील.
ज्यावर खगोलशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ अभ्यास करून निष्कर्ष काढतील.
जेम्स वेबची मुख्य उद्दिष्टे :
1 बिग बॅंग किंवा महास्फोटानंतर तयार झालेल्या आकाशगंगा आणि तत्सम तेजस्वी पदार्थांचा शोध घेणे.
2 आकाशगंगांची त्यांच्या प्रथम अवस्थेपासून आतापर्यंत झालेली उत्क्रांती अभ्यासणे.
3 ताऱ्यांची अगदी सुरवातीपासूनची निर्मितीप्रक्रिया; तसेच त्यांच्याभोवती तयार होणाऱ्या ग्रहमालेच्या निर्मितीची प्रक्रिया जाणून घेणे.
4 आपल्या तसेच इतर बाह्य ग्रहमालांची भौतिक आणि रासायनिक वैशिष्टे अभ्यासणे आणि तिथ असू शकणाऱ्या परजीवसृष्टीची शक्यता अभ्यासणे.
5 महास्फोटानंतर अस्तित्वात आलेल्या विविध तेजस्वी गोष्टींपासून; तसेच प्रसरण पावणाऱ्या विश्वातल्या आपल्यापासून अतिदूरवर असणाऱ्या दीर्घिकांमधून आणि ताऱ्यांमधून निघणारी दृश्य किरणे प्रदीर्घ काळानंतर आपल्यापर्यंत पोहचेपर्यंत वर्णपटलाच्या लाल रंगाकडे सरकत जाऊन शेवटी इन्फ्रारेड किरणांच्या स्वरूपात बदलतात. जेम्स वेब दुर्बिणीच मुख्य उद्दिष्ट हीच इन्फ्रारेड किरणे शोधून त्यांच्यासंदर्भात संशोधन करणे हे आहे.
या दुर्बिणीच नियोजित प्रक्षेपण येत्या २५ डिसेंबर २०२१ रोजी मध्ये फ्रेंच गयाना इथून होणार असून, त्यासाठी युरोपियन अवकाश संस्थेचा उच्च क्षमतेचा एरिएन ५ ईसीए (Ariane 5 ECA ) हा प्रक्षेपक वापरला जाणार आहे.मात्र,अगदी शेवटच्या वेळेपर्यंत काही अनपेक्षित त्रुटी जाणवल्यास प्रक्षेपणाची तारीख पुढे जाऊ शकते.सदर दुर्बिण ही टेनिस कोर्टइतकी मोठी असल्याने या दुर्बिणीचा भव्य पसारा अक्षरशः ओरिगामीप्रमाणे पद्धतशीर घडी घालून प्रक्षेपकात बसवला जाईल आणि पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडल्यावर नियोजित ‘L2’ स्थानाजवळ पोहचेपर्यंत एक-एक घडी व्यवस्थित उघडली जाऊन दुर्बिणीला तिच्या मूळ आकारात आणले जाईल. वेब दुर्बिणीच्या सर्व महत्त्वाच्या चाचण्या अमेरिकेच्या विविध भागांत पार पडल्या आहेत.
प्रक्षेपणानंतर ३० मिनिटांनी वेब चे सोलर पॅनल कार्यान्वीत होतील. तिथून पुढच्या ३० दिवसात सुमारे ४० मुख्य टप्प्यात आणि शेकडो छोट्या यांत्रिकी गोष्टींद्वारे घडी घालून बसवलेली वेब दुर्बीण पूर्णपणे उघडली जाऊन तिच्या नियोजित आकारात येईल. या ३० दिवसात एखादी गोष्ट देखील नियोजित न झाल्यास संपूर्ण कामगिरी धोक्यात येऊ शकते. या पद्धतीचा अंतराळात प्रयोग करण्याची मानवाची ही पहिलीच वेळ असल्याने हे ३० दिवस भयाण काळजी आणि भीतीचे असणार आहेत.
हबल दुर्बिणीमध्ये जेंव्हा बिघाड झाला होता तेंव्हा तिला दुरुस्त करण्यासाठी यशस्वी मानवी मोहीम केली गेली होती. हे शक्य झाल कारण हबल पृथ्वीच्या कक्षेत होती. वेब हि १५ लाख किमी दुर राहणार असल्याने तिच्यात काही बिघाड झाल्यास तिथपर्यंत जाऊन दुरुस्त करण्याची कोणतीही शक्यता नाहीये. याच कारणामुळे गेली काही वर्षे तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ सतत वेबच्या विविध भागांच्या अगणित चाचण्या करत होते. या ३० दिवसांनंतर वेब ‘L2’ स्थानाजवळ पोहचून त्याच्याभोवती फिरायला चालु करेल आणि पुढील साधारण ५ महिने वेब अपेक्षेप्रमाणे करते आहे की नाही याच्या चाचपण्या केल्या जातील आणि सर्वकाही व्यवस्थित आहे याची खात्री झाल्यानंतर प्रत्यक्ष अवकाश निरीक्षणाला सुरुवात होईल.
जेम्स वेबमध्ये असणारी मुख्य उपकरणे:
१. Near-Infrared Camera (NIRCam): आकाशगंगा आणि तारे यांच्या निर्मितीप्रक्रियेमध्ये
त्यांच्या बाल्यावस्थेमधली प्रकाशकिरणे अभ्यासणे, नजीकच्या आकाशगंगेतल्या ताऱ्यांची संख्या अभ्यासणे,
तसच आपल्या मंदाकिनी आकाशगंगेतल्या आणि शेजारच्या आकाशगंगेतल्या तरुण ताऱ्यांपासून येणारी
प्रकाशकिरणे अभ्यासणे ही या उपकरणाची मुख्य कामे असतील.
कोरोनाग्राफ या तंत्राचा वापर या उपकरणात करण्यात येईल.
या तंत्रामध्ये प्रकाशमान तारा किंवा इतर कोणत्याही गोष्टीपासून येणाऱ्या तेजस्वी प्रकाशाची तीव्रता कमी करून
त्या गोष्टीच्या आसपास तुलनेन कमी प्रकाशतीव्रता किंवा मंद प्रकाश असणाऱ्या गोष्टी शोधल्या जातील.
०.६ ते ५ मायक्रॉन तरंगलांबीच्या इन्फ्रारेड किरणांचा अभ्यास या उपकरणाद्वारे करणे शक्य होणार आहे.
ऍरिझोना विद्यापीठ आणि लॉकहीड मार्टिन यांनी NIRCam ची निर्मिती केलेली आहे.
२. Near-Infrared Spectrograph (NIRSpec): हे उपकरण देखील ०.६ ते ५ मायक्रॉन तरंगलांबीच्या इन्फ्रारेड किरणांवर काम करेल. अतिदूरवरून येणाऱ्या सूक्ष्म इन्फ्रारेड किरणांचा वर्णपटल (Spectrum) अभ्यासणे हे याच मुख्य काम असणार आहे. या वर्णपटलांचा अभ्यास (Spectroscopy) करून येणाऱ्या इन्फ्रारेड किरणांच्या उगमस्थानाशी निगडित महत्त्वाची भौतिक आणि रासायनिक माहिती मिळू शकते. अतिदूरहून येणारी इन्फ्रारेड किरणे अतिशय मंद स्वरूपात असल्याने अवकाशातल्या एखाद्या गोष्टीचा अभ्यास करण्याजोगा वर्णपटल मिळवण्यासाठी एकसलग शेकडो तास जेम्स वेब दुर्बीण त्या गोष्टीकडे रोखून धरणे गरजेच आहे.
दुर्बिणीच्या पाच ते दहा वर्षांच्या कार्यकाळात जास्तीत जास्त अवकाशसंशोधन करता याव, एकाच वेळी अवकाशातल्या वेगवेगळ्या शंभर गोष्टींच निरीक्षण करता याव म्हणून पहिल्यांदाच मायक्रोशटर ॲरे (MSA) या नवीन संकल्पनेचा शोध लावण्यात आला आहे. विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या साह्यान ज्यांची उघडझाप नियंत्रित करता येतील, अशा मानवी केसाच्या जाडीइतक्या सुमारे अडीच लाख सूक्ष्म (प्रत्येकी १०० X २०० मायक्रॉन) खिडक्यांचा संच हवी ती इन्फ्रारेड किरणे निवडणे किंवा नाकारणे यासाठी वापरला जाणार आहे.
या संचापैकी कोणत्याही १०० हुन अधिक खिडक्यांना एकाच वेळी उघडता येऊ शकत. म्हणजेच एकाच वेळी अवकाशातील १०० वेगवेगळ्या लक्षांवर दुर्बीण केंद्रित करता येऊ शकते. आपल्या नेहमीच्या कॅमेऱ्यामध्ये शटर जी भूमिका निभावत तशीच काहीशी भूमिका या अडीच लाखांच्या शटर्सचा संच करेल. हा अडीच लाखांच्या शटर्सचा संच केवळ साडेतीन इंचाच्या चौरसाकृती जागेत चार समान भागात विभागून बसवलेला आहे हे विशेष. MSA हे तंत्रज्ञान केवळ वेब दुर्बिणीची गरज म्हणून पूर्णपणे नव्याने आणि पहिल्यांदाच विकसित करण्यात आलेले आहे. हे तंत्रज्ञान जेंव्हा खुल्या जगात वापरण्यास सुरुवात होईल तेंव्हा कल्पना करा कितीतरी नवीन गोष्टी व्यवहारात येतील. युरोपियन अवकाश संस्था आणि नासा यांनी NIRSpec ची निर्मिती केलेली आहे.
३. Mid-Infrared Instrument (MIRI): ५ ते २८ मायक्रॉन तरंगलांबीच्या इन्फ्रारेड किरणांचा अभ्यास या उपकरणाद्वारे होणार आहे. अतिदूर आकाशगंगेपासून आणि नव्याने निर्माण होणाऱ्या ताऱ्यांपासून येणारी क्षीण इन्फ्रारेड किरणे; तसंच सूक्ष्म दिसणारे धूमकेतू आणि आपल्या सूर्यमालेपलीकडच्या क्युपर बेल्टमधल्या पदार्थांना पहिल्यांदाच सखोलपणे अभ्यासने शक्य होणार आहे. यामध्ये असणारा इन्फ्रारेड कॅमेरा आपल्याला हबलहून कितीतरी उच्च प्रतीची खोल अंतराळातील छायाचित्रे मिळवून देणार आहे.
महास्फोटांनंतर पहिल्यांदा तयार झालेल्या आकाशगंगा शोधून अभ्यासणे हे MIRI च एक मुख्य लक्ष असणार आहे. इन्फ्रारेड किरणांची तरंगलांबी जितकी जास्त, त्यांचा अभ्यास करणाऱ्या उपकरणांचे तापमान तितक्याच प्रमाणात कमी असणे अत्यावश्यक असते. MIRI (५ ते २८ मायक्रॉन) हे NIRCam आणि NIRSpec (०.६ ते ५ मायक्रॉन) या दोन्हींपेक्षा अधिक तरंगलांबीच्या इन्फ्रारेड किरणांवर काम करणार असल्याने MIRI चे तापमान देखील NIRCam आणि NIRSpec पेक्षाही कमी ठेवणे गरजेचे होते.
-२३३°C अतिशीत तापमान MIRI साठी पुरेसे नसणार आहे. अवकाशातील मिड इन्फ्रारेड किरणांचा यापूर्वी कधीच सखोल अभ्यास न झाल्याने अवकाशात मर्यादित लहान जागेत -२३३°C पेक्षाही आणखीन कमी तापमान करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. अशावेळी क्रायोकुलर या उपकरणाची केवळ वेबची अत्यावश्यक गरज म्हणून पहिल्यांदाच नव्याने निर्मिती करण्यात आली. या क्रायोकुलरमुळे MIRI मधील डिटेक्टर्स सुमारे -२६६°C इतके अतिशीत ठेवणे शक्य झाले आहे. युरोपियन अवकाश संस्था आणि नासा यांनी MIRI ची निर्मिती केलेली आहे.
४. Fine Guidance Sensor/Near InfraRed Imager and Slitless Spectrograph (FGS/NIRISS) : ०.८ ते ५ मायक्रॉन तरंगलांबीच्या इन्फ्रारेड किरणांवर हे उपकरण काम करेल. उच्च प्रतीची छायाचित्रे मिळवण्यासाठी आणि निरीक्षणे नोंदवण्यासाठी जेम्स वेब दुर्बिणीला अवकाशातल्या विशिष्ट गोष्टीवर दीर्घकाळ अचूकपणे रोखून धरण्याची जबाबदारी या उपकरणावर असेल. यामध्ये असणारा स्पेक्ट्रोग्राफ मुख्यकरून महास्फोटानंतर निर्माण झालेली पहिली प्रकाशकिरणे शोधणे, पृथ्वीसदृश ग्रह शोधणे आणि त्यांचा अभ्यास करणे अशी काम करणार आहे. कॅनडियन अवकाश संस्थेने FGS/NIRISS ची निर्मिती केलेली आहे.
प्रक्षेपण
जेम्स वेब दुर्बीण २५ डिसेंबर २०२१ ला प्रक्षेपित होऊन, त्यानंतर साधारणतः सहा महिन्यांनी पूर्णपणे कार्यान्वित होईल.
जून ते जुलै २०२२ पासून प्रत्यक्ष निरीक्षणे येण्यास सुरवात होईल तेव्हा येणारी माहिती सर्वांसाठी पूर्णपणे नवीन असणार आहे.
अगणित अद्भुत गोष्टींनी भरलेल्या अवकाशातली अनेक रहस्ये जाणून घेण्यासाठी ही माहिती मोलाची भूमिका बजावणार आहे.
पुढील किमान दहा वर्षे आपल्याला वेबची कामगिरी हबलप्रमाणेच विविध माध्यमातून सतत दिसत राहील.
इन्फ्रारेड किरणांच्या स्वरूपात महास्फोटानंतरच्या घडामोडींची म्हणजे
साधारण एक हजार अब्ज वर्षांपूर्वीची माहिती प्रथमच मिळणार असल्यामुळे
एक प्रकारे आपण अंतराळाच्या भूतकाळात डोकावणार आहोत.
कदाचित खगोलशास्त्रातले आतापर्यंतचे कित्येक निष्कर्ष आपल्याला नव्याने तयार करावे लागल्यास नवल नाही.
वेब दुर्बिणीमुळे आज जगातील प्रत्येक अवकाश संशोधक उत्साहित असून दुर्बिणीपासून येणाऱ्या नव्या माहितीची आतुरतेने वाट पाहत आहे.
वेबच्या निर्मितीत मुख्य वाटेकरी असलेल्या Northrop Grumman या कंपनीने
वेबवर तयार केलेली १२ मिनिटांची YouTube वरील एक चित्रफीत खालील लिंकवर नक्की पहा आणि हो,
त्या चित्रफितीत असलेला आवाज कोणाचा आहे हे देखील शेवटी पहायला विसरू नका !
IMDb वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय 10 चित्रपटांमध्ये जयभीम ला स्थान
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 19, 2021 17: 05 PM
WebTitle – Witness the history of the James Webb Telescope