आपल्या आशयगर्भ साहित्याने आपले अढळ स्थान निर्माण करणारे हे मराठीचे भाषातज्ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत.वसंत आबाजी डहाके यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील ‘बेलोरा’ या गावी ३० मार्च १९४२ला झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेलोरा येथे तर पाचवी ते बी.ए. पर्यंतचे शिक्षण चंद्रपूर येथे झाले. त्या वेळेपासून ते कविता करीत असत.१९६६ साली ‘योगभ्रष्ट’ या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. “चित्रलिपी” या संग्रहाकरिता २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.
साहित्यासाठी अनेक पुरस्कार
फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.त्यांचे काव्यसंग्रह शुभवर्तमान ,योगभ्रष्ट ,शुन:शेप ,चित्रलिपी प्रसिध्द झाले आहेत व अधोलोक (कादंबरी)यात्रा-अंतर्यात्रा (ललितलेख )प्रतिबद्ध आणि मर्त्य(कादंबरी)मालटेकडीवरून (ललित लेखसंग्रह)सर्वत्र पसरलेली मुळे (दीर्घ काव्य),मराठीतील कथनरूपे ,मराठी नाटक आणि रंगभूमी – विसावे शतक,मराठी समीक्षेची सद्यःस्थिती आणि इतर निबंध मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती (संशोधित लेखन) आणि निवडक सदानंद रेगे ,शालेय मराठी शब्दकोश ,संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश ,वाङ्मयीन संज्ञा आणि संकल्पना कोश हे संपादित साहित्य प्रकाशित झाले.
त्यांना साहित्यासाठी अनेक पुरस्कार व बहुमान मिळाले आहेत कादंबरी व कवितेसाठी १९८१ व १९८७ साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार.२००३मध्ये गंगाधर गाडगीळ पुरस्कार,२००५मध्ये महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार.२००९मध्ये विदर्भ साहित्य संघाचा “जीवनव्रती” पुरस्कार.साहित्य अकादमी पुरस्कार २००९: ‘चित्रलिपी’ या काव्यसंग्रहासाठी.२०१० मध्ये मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानतर्फे ‘शांता शेळके’ पुरस्कार.कविवर्य दामोदर अच्युत कारे पुरस्कार.पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार.बाबासाहेब आंबेडकरांवरील छायाचित्रात्मक ग्रंथासाठी विशेष योगदान आहे..
अभिव्यक्तीची दिशा
कविता लिहितो म्हणून मी आहे .या विषयी सर सांगतात
‘‘आपण कविता का लिहितो याचे नेमके उत्तर देता येत नाही. गायकाला गावेसे वाटते, चित्रकाराला चित्र काढावेसे वाटते, तसे कवीचे होत असेल, पण हे काही खरे नाही. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगवेगळ्या असतील. उदाहरणार्थ, निसर्ग मला सुंदर वाटतो, परंतु बालकवींप्रमाणे किंवा महानोरांप्रमाणे मी निसर्गकविता लिहिलेली नाही. जी काही थोडी फार सृष्टी माझ्या कवितेत आलेली आहे ती खिन्न-व्याकूळ किंवा हिंस्र-अमानुष अशी आहे. यांत निसर्गसौंदर्याचा प्रत्यय नाही. सृष्टीचा (त्यात मानवी जगतही आलेच) आपल्याला कसा प्रत्यय येतो, आपण त्याला कसा प्रतिसाद देतो, आपल्याभोवतीचे जग आपल्यावर कोणता ठसा उमटवते यांतून आपली अभिव्यक्तीची दिशा ठरत असावी,’’
योगभ्रष्ट
१९ ६०च्या आसपास माझ्या कविता नियतकालिकांतून येऊ लागल्या होत्या; परंतु ‘सत्यकथे’च्या मे १९६६च्या अंकात प्रकाशित झालेल्या ‘योगभ्रष्ट ’ या दीर्घ कवितेने माझी खरी ओळख झाली. ती मला झाली तशी माझ्या समकालीन वाचकांना, कवींना झाली. ‘योगभ्रष्ट ’ हे माझे पहिले अधिकृत स्वरूपाचे कवितात्म विधान होते. १९६४ साली मी एम.ए.ची परीक्षा देऊन घरी आलो आणि ती कविता लिहू लागलो. त्या वेळचा माझा, आमच्या पिढीचा जो कल्लोळ होता तो त्या कवितेच्या रूपाने व्यक्त झाला. स्वत:चे जगणे, वाचन आणि अवतीभवती घडत असलेल्या घटना यांचे एक रसायन त्या कवितेतून व्यक्त झाले. ही कविता मी कित्येक दिवस लिहीत होतो. एक प्रकारे ती त्या वेळची माझी तारखा नसलेली रोजनिशी होती.
उद्ध्वस्त मन:स्थितीत गावी परतलो
कशातच मन लागत नाही
अंतरात सगळा वणवा पेटलेला
अंतर्बाह्य़ उन्हाळा
छातीच्या मध्यातून अंगभर ज्वाळा
समाजाने निर्माण केलेली भाषा
योगभ्रष्ट’च्या या सुरुवातीच्या ओळींतून त्या वेळची माझी मानसिक अवस्था लक्षात येते. मी असे मानतो की, कवीची शारीरिक, मानसिक, आत्मिक प्रस्फुरणे त्याच्या कवितेतून उमटत असतात. ती वैयक्तिक असतात, तशीच सामाजिकही असतात. आपण समाजात असतो, त्यामुळे कोणतीही वैयक्तिक घटना सामाजिक होते आणि याउलटही घडते. त्यामुळे मराठी समीक्षेत व्यक्तिगत जाणीव आणि सामाजिक जाणीव असे जे वर्गीकरण केले जाते ते मला मुळीच मान्य नाही. शिवाय साहित्यात व्यक्त झालेला कोणताही अनुभव, अगदी तो खूपच खासगी असला तरी, अंतिमत: सामाजिक होतो.
समाजाने निर्माण केलेली भाषा आपण स्वीकारलेली असते, तिच्यासोबतच आणि तिच्यामधूनच अनेक गोष्टी आपल्यापर्यंत चालत आलेल्या असतात. असे असूनही व्यक्ती अताíकक वागू शकतात; विचारांच्या, वर्तनांच्या तोपर्यंतच्या नमुन्यांच्या बाहेर जाऊ शकतात. कवीदेखील भाषेच्या आणि कवितेच्या रूपबंधाच्या बाबतीत अशीच काही घडामोड करत असतात. ही घडामोड नेहमीच कवितेला समृद्ध करणारी असते असे नाही. प्रचलित विचाराच्या पलीकडे जाणारा विचार अभ्यासातून, परिश्रमातून, निदिध्यासातून आलेला असतो. अनावर आवेगी, प्रचंड उद्रेकी चित्रे काढणाऱ्या जॅकसन पोलाकच्या डोक्यात विचार आणि मनात भावना होत्याच.
भाषेशी खेळावे
मी कविता लिहितो म्हणजे नेमके काय करतो याचे उत्तर वर आलेलेच आहे. मी माझ्या विचारांना, भावावस्थांना व्यक्त करतो. व्यक्त करणे, होणे ही माझी गरज असते. कधीकधी मला भाषेशी खेळावे असेही वाटते. अर्थात भाषा निरंग, निर्वकिार नसल्यामुळे तिच्यातून माझ्या मनोवस्था व्यक्त होतातच. ‘योगभ्रष्ट’ या संग्रहातलीच एक छोटी कविता देतो:
कमळे फुलली. काळी कमळे फुलली.
घोडा पळाला. काळा घोडा पळाला.
चार घोडे रथाला जोडले.
चार काळे घोडे काळ्या रथाला जोडले.
मी हजार कमळे देवाला वाहिली.
मी हजार काळी कमळे काळ्या देवाला वाहिली.
दिवस मावळला.
काळा दिवस मावळला
भाषा-क्रीडा राहिली नाही
मुळात ही व्याकरणाच्या पुस्तकातली वाक्ये आहेत. मी काय केले? काळी, काळा, काळे, काळ्या ही विशेषणे जोडून पुन्हा ती वाक्ये लिहिली. अर्थात हा नुसती भाषा-क्रीडा राहिली नाही. शेवटच्या ओळीतले प्रश्नचिन्हही अर्थपूर्ण झाले.एखादी कविता लिहून पूर्ण व्हायला बराच वेळ लागतो, तर एखादी झर्रकन लिहून होते, नंतर तिच्यात काही बदल करावा असेही वाटत नाही. पूर्वी टंकलेखन यंत्रासमोर आणि नंतर संगणकासमोर बसून मी तत्काळ कविता लिहिलेल्या आहेत. डोक्यात काही तरी चाललेलेच असते. ते कागदावर उतरण्यासाठी थांबलेले असते. पाखरांचा थवा हलकेच उतरावा तसे हे होते, की कुणी तरी गोळीबार केल्यामुळे पटापट पाखरे खाली कोसळावीत तसे होते हे मला सांगता येत नाही.
तरीदेखील आपण कविता का लिहितो याचे नेमके उत्तर देता येत नाही. गायकाला गावेसे वाटते, चित्रकाराला चित्र काढावेसे वाटते, तसे कवीचे होत असेल, पण हे काही खरे नाही. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगवेगळ्या असतील. उदाहरणार्थ, निसर्ग मला सुंदर वाटतो. झाडे, फुले, पाने, नद्या, डोंगर, पाऊस, बर्फाच्छादित शिखरे. सुंदर दृश्ये पाहताना मलाही आनंद होतो; परंतु बालकवींप्रमाणे किंवा महानोरांप्रमाणे मी निसर्गकविता लिहिलेली नाही. जी काही थोडी फार सृष्टी माझ्या कवितेत आलेली आहे ती खिन्न-व्याकूळ किंवा िहस्र-अमानुष अशी आहे.
भावनिक क्रियांची निष्पत्ती
या सृष्टीत दगडी गुलाब आहेत, पिकलेल्या केसांचा घोगरा सूर्य आहे,
ठरीव बाराखडीत कूकणारी पाखरे आहेत, जंगली बलासारखा चंद्र आहे, समुद्र एखाद्या रक्ताळलेल्या घोडय़ासारखा आहे.यांत निसर्गसौंदर्याचा प्रत्यय नाही; परंतु कलासृष्टीत अशा प्रतिमा येत असतात. व्हिन्सेंट वॉन गॉगची पिळवटलेली झाडे, कोसळून खाली पडेल असे तारकाखचित आकाश प्रसिद्धच आहे. सृष्टीचा (त्यात मानवी जगतही आलेच) आपल्याला कसा प्रत्यय येतो, आपण त्याला कसा प्रतिसाद देतो, आपल्याभोवतीचे जग आपल्यावर कोणता ठसा उमटवते यातून आपली अभिव्यक्तीची दिशा ठरत असावी. त्यात काही संस्कारांची भर पडत असावी- साहित्यकृती, पेंटिंग्ज, चित्रपट, तत्त्वज्ञान इत्यादी. मला आपल्याभोवतीचे मानवी जग सतत समजून घ्यावे असे वाटत असल्यामुळे वर्तमानपत्रे, राजकीय-आíथक विश्लेषणे, चळवळींची माहिती यांचीही भर पडते. हे सगळे संस्कार होत असताना मला लिहावेसे वाटते. लिहिणे ही माझ्या बौद्धिक आणि भावनिक क्रियांची निष्पत्ती असते.
लिहिणे या क्रियेत आपण एकटेच असतो. इतर बहुतेक क्रियांमध्ये इतरांचा सहभाग असतो. पेंटिंग करताना एकटेपणा असतो;
परंतु भित्तिचित्रासारखे मोठे काम करताना सहकारी असतात. शिल्पकृती घडवतानाही असे एकटेपण असते,
मात्र शिल्पसमूह घडवताना विविध सहायक असतात. नाटक, चित्रपट या गोष्टी तर समूहाशिवाय अशक्यच आहेत.
सादरीकरणाच्या कलांमध्ये सतत रसिकांची उपस्थिती गृहीत धरली जाते.
लिहिणे या क्रियेत तुम्ही असता, समोर कागद किंवा संगणकाचा पडदा असतो.
लिहिणे ही या प्रकारे अत्यंत एकाकीपणात घडणारी कृती आहे.
त्यामुळे कदाचित कविलोक समूहाला किंवा तूला उद्देशून बोलत असतात.काही वेळा मीच्या ऐवजी तूचा प्रयोग केला जातो.
उदाहरणार्थ,माझ्या नटासाठी पाश्र्वसूचना या कवितेतील तू हा मीच आहे.अर्थात मी म्हणजे वसंत आबाजी डहाके नव्हे.
सर आपल्या कविते विषयी सांगतात..
सर्वच कविता आत्मचरित्रात्मक नसतात. काही कवितांची आधारभूमी आत्मचरित्रात्मक असते.
त्यामुळे कवितांमधून कवीचे आत्मचरित्र शोधले जाते. ते ठीकच आहे;
परंतु अशा प्रयत्नांतून खऱ्या अर्थाने कवीचे लौकिक आत्मचरित्र फारसे हाती लागत नाही.
कादंबऱ्यांमधून कादंबरीकारांचे, कथांमधून कथाकारांचे, नाटकांमधून नाटककारांचे आत्मचरित्र सहसा शोधले जात नाही.
ते कवितांतून शोधले जाते, कारण कवितेतील मी. हा मी आणि कवी यांना एकरूप मानले जाते.
इतर साहित्य प्रकार, इतर कला प्रकार यांच्याहून कविता हा वेगळा साहित्य/कला प्रकार ठरतो.
त्याचे हे कारण असावे. ती कविचरित्राशी, मीशी, कवीच्या स्वशी घट्ट बांधलेली असते अशीच सर्वसामान्यपणे वाचकांची जाणीव असते.
दुसरे इतर सर्व साहित्य/कला प्रकार वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात,तर कविता आत्यंतिक रीतीने आत्मनिष्ठ असते.
(चित्रकलेत एक्स्प्रेशनिस्ट आणि इम्प्रेशनिस्ट कलावंतांच्या चित्रांमधून त्यांच्या मनोवस्था व्यक्त झालेल्या आहेत.)
मला जेव्हा हे जाणवले तेव्हा अस्वस्थपणे मी आतल्या आत प्रतिकार करू लागलो.
आत्मचरित्र जितके पुसता येईल तेवढे पुसायचे, निखळ वस्तुनिष्ठ अनुभव व्यक्त करायचा,
त्यासाठी अकाव्यात्म, गद्यानुसरण करणारी भाषा वापरायची असे मी मनात ठरवू लागलो.
असा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होणे शक्यच नव्हते. त्यामुळे माझ्या कवितांमधील मीमधून,
स्वमधून आत्मचरित्रात्मक अंश डोकावतात.असे सर आपल्या कविते विषयी सांगतात..
बहुआयामी प्रतिभाशाली साहित्यकार
२०१९मध्ये जनस्थान पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठान’तर्फे दिला जाणारा मानाचा ‘जनस्थान पुरस्कार’ यंदा जेष्ठ कवी, कादंबरीकार आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना प्रदान करण्यात आला . कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी २७ फेब्रुवारीला हा पुरस्कार डहाके यांना प्रदान करण्यात आला.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे १९९१ पासून जनस्थान हा द्वैवार्षिक पुरस्कार देण्यात येतो. २०१७ चा जनस्थान पुरस्कार विजया राज्याध्यक्ष यांना प्रदान करण्यात आला होता. १९९१ साली पहिला पुरस्कार हा विजय तेंडुलकर यांना प्राप्त झाला होता. त्यानंतर १९९३ साली विंदा करंदीकर, १९९५ साली इंदिरा संत, २०१३ साली भालचंद्र नेमाडे तर २०१५ साली अरुण साधू यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. निवड समितीच्या बैठकीत बहुआयामी प्रतिभाशाली साहित्यकार वसंत आबाजी डहाके यांची एकमताने निवड करण्यात आली.
साहित्यिक संजय जोशी, सदानंद बोरसे, मोनिका गजेंद्रगडकर, विलास खोले आणि रेखा इनामदार-साने, जयंत पवार यांचा निवड समितीत समावेश आहे. वसंत आबाजी डहाके यांचे ‘योगभ्रष्ट’, ‘शुभवर्तमान’, ‘शुन:शेप’, ‘वाचाभंगं’ हे प्रसिद्ध कवितासंग्रह आहेत. तसेच ‘अधोलोक’, ‘प्रतिबद्ध आणि मर्त्य’ या कादंबऱ्या, ‘यात्रा-अंतर्यात्रा’ व ‘माल टेकडीवरून’ हे लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. याशिवाय त्यांचे ‘साहित्य आणि दृश्यकला’ हे समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहे. मराठीतील कोशवाङ्मयातही त्यांनी मोलाची भर घातली आहे. ‘समकालीन वास्तवाचे भान जागृत असणाऱ्या या बहुआयामी प्रतिभाशाली साहित्यकाराचा सन्मान करण्याकरिता ही शिफारस केली जात आहे,’ असे निवड समितीने शिफारस करताना म्हटले होते
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)