डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष अस्तित्त्वात आला असता तर, ३ ऑक्टोबर २०२१ रोजी ६४ वर्षाचा झाला असता. रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेनंतर वर्षभरातचं दुरुस्त रिपब्लिकन पक्ष अन् नादुरुस्त रिपब्लिकन पक्ष अशा दोन गटात विभागणी होऊन आजतागायत निर्जीव अर्धशतकी पार करुन, शतकाच्या दिनेने वाटचाल सुरु आहे. तरी सुध्दा, ३ ऑक्टोबर १९५७ रोजी स्थापन झालेला रिपब्लिकन पक्ष अस्तित्त्वात नसतांनाही काही मंडळी रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन प्रत्येक वर्षी जल्लोषात साजरा करतात. (?) तर, काही मंडळी शेकाप कार्यकारणी बैठकीचा ३० सप्टेंबर हा दिवस रिपब्लिकन पक्षाचा वर्धापनदिन साजरा करतात.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३० सप्टेंबर १९५६ रोजी दिल्ली तत्कालीन शेकाफेच्या कार्यकारणीच्या बैठकीत, एक जातीय राजकारण संपुष्टात आणून सर्वसमावेशक अशा रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या पक्षात समाजवादी मंडळींना सामावून घेण्याची बाबासाहेबांची इच्छा होती. तसे ५ डिसेंबर १९५६ रोजी त्यांनी आचार्य अत्रे, एस. एम. जोशी यांना पत्रे लिहिली होती तर, ३० सप्टेंबर १९५६ च्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी डॉ. राम मनोहर लोहियांनाही पत्र लिहिलं होतं. मात्र, बाबासाहेबांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी, आकस्मित महापरिनिर्वाण झाल्यांने, ३ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ची स्थापना करण्यात आली.
सामर्थ्यवान विरोधी पक्ष
तत्पुर्वी, प्रबुद्ध भारत’मध्ये बाबासाहेबांचे १ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतीय जनतेला उद्देशून खुले पत्र प्रकाशीत झाले होते. हे पत्रचं रिपब्लिकन पक्षाचा आराखडा मानला जातो. दोन लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने सामान्य उमेदवारांकडून बाबासाहेबांचा पराभव केला होता. कर्तृत्वापेक्षा पक्षाला महत्त्व आले होते. अन् या पक्षाचे असेचं प्राबल्य राहिले तर, बाबासाहेबांनी महत् प्रयासाने उभारलेला लोकशाहीचा डोलारा उध्वस्त व्हायला वेळ लागणार नव्हता. तसे झाले असते तर, एकाचं पक्षाला महत्त्व प्राप्त झाले असते. अन् हा पक्ष आपल्या पाशवी बळाच्या आधारे अभूतपूर्व अशी अंधाधुदी माजवू शकला असता. देश हिताच्या दृष्टिने यावर एकचं पर्याय म्हणून त्यांनी सामर्थ्यवान विरोधी पक्ष निर्माण करण्याच्या व्यापक, सर्वसमावेशक दृष्टिकोणातून काही समविचारी नेत्यांना पत्रेही पाठवली होती.
सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरुकिल्ली राजकीय शक्ती हिच आहे
तुम्ही सर्वांनी खात्री बाळगली पाहिजे की, तुमचा उध्दार करण्यास दुसरा कोणीही येणार नाही; किंवा तो मी करणार नाही. जर मनात आणाल तर तुमचा उध्दार तुम्हिचं करुन घेण्यास समर्थ व्हाल. मला सांगण्यास आनंद वाटतो की, आपल्या वर्गात चळवळीचा वारा चहूकडे पसरला आहे. पण ही जागृती जरी झाली असली तरी सुध्दा मला एक महत्वाची गोष्ट तुम्हांला सांगायची आहे ती ही की, यापुढे तुमचे सर्व भवितव्य राजकारण आहे. तुमची स्थिती पालटण्यास, तुमचा उध्दार करुन घेण्यास आता तुम्हांला उपाय आहे तो म्हणजे राजकारण, कायदे करण्याची शक्ती. राजकीय सत्ता हेच आपले ध्येय असेल पाहिजे. मार्च १९३३ मध्ये मुंबईत बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आले, तेव्हा बाबासाहेबांनी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी, सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरुकिल्ली राजकीय शक्ती हिच आहे.
खालचा वर्ग वर गेल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही
(२५ एप्रिल १९४८), उच्च वर्गाच्या हातातून शासनसत्ता प्राप्त करुन घेण्यासाठी आपण संघटीत असलेचं पाहिजे.
तुम्हा सर्वांचा नेता एकच असावा, तुमचा पक्ष एकच असला पाहिजे ; आणि त्या पक्षाचा एक सुनिश्चित कार्यक्रमही असला पाहिजे.
(१६ जानेवारी १९४९), संघशक्ती उभी करण्याबरोबरच, दुसऱ्या पक्षाशी संगनमतही करावे लागेल.
खरी लोकशाही निर्माण करायची असल्यास
आज हजारो वर्षे डोक्यावर नाचत असलेला वरचा वर्ग खाली व समाजातील खालचा वर्ग वर गेल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही.
न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही पक्षाचं ध्येय
क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले आहे. आसासह चाक पुर्ण फिरल्याशिवाय खरी क्रांती होऊ शकत नाही, ते चक्र आम्हीच फिरवू. एवढेच नाही तर, प्रबुध्द भारत मध्ये बाबासाहेबांच्या पश्चात १ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतीय जनतेला उद्देशून बाबासाहेबांचे पत्र प्रकाशित झाले होते. हे पत्रच रिपब्लिकन पक्षाचा आराखडा मानला जातो. त्यात न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही पक्षाची ध्येय असतील, पक्षाचे स्वरुप प्रादेशिक न राहता ते देशव्यापी असेल असे स्पष्ट करुन आपल्या अनुयायांना बाबासाहेब लिहितात, हा पक्ष देशातील सर्व दलित, पिडीत आणि शोषित जनतेच्या हिताचा रक्षणकर्ता असेल. शासनकर्ती जमात बनतांना आपला पक्ष, त्याचे तत्त्वज्ञान, ध्येय यांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. नेता एकच असावा, पक्षाचे चिन्ह हत्ती हे बुद्ध संस्कृतीमधील प्रतीक, तर अशोक चक्रांकीत निळा झेंडा हे निशाण !
रिपब्लिकन शिवाय पर्यायचं नसेल
आपल्यासाठी बाबासाहेबांनी व्यापक दूरदृष्टीकोण ठेवून राजकारणावर सकारात्मक, प्रभावशाली, आश्वासक, सर्वसमावेशक, मार्गदर्शक अनेक मते मांडली होती. आंबेडकरी राजकीय चळवळीच्या आभाळाला ठिगळ लावण्याऐवजी, त्याची आपणं लक्तरेचं करीत आहोत. म्हणून, भविष्यात रिपब्लिकन हा शब्द राजकारणातून बाद तर होणार नाही ना, याचीचं भिती वाटतेय. वर्तमानाचा विचार करता, भविष्यात देशातील राजकारणात भयानक परिस्थिती निर्माण झालेली असेल. अन् त्यावेळी रिपब्लिकन शिवाय पर्यायचं नसेल.
पण, त्यावेळी एकूण परिस्थिती हाताबाहेर निघून गेलेली असेल. ज्यांच्या संविधानावर आज देश चालतोय, मात्र त्यांना अभिप्रेत असलेल्या राजकीय पक्षाची आम्ही तोडमोड करुन ठेवली आहे. अन्याय अत्याचार झाल्यास रस्त्यावर येऊन लढण्याबरोबरच, संसदेत जाण्याचा आत्मविश्वास कधी निर्माण होणार ? राजकारण हे फक्त निवडणूका लढविणे एवढेच महत्वाचे नसून, ते सत्ता अन् कायदे निर्माण करण्याची शक्ती निर्मितीचे केंद्र आहे याचा विसर पडतोय का ?
पर्यायी विरोधी पक्ष
३ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर मुक्कामी लाखो आंबेडकर अनुयायी, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या स्थापनेसाठी उपस्थित होते. नेत्यांमध्ये मतभेद होते तरी, रिपब्लिकन पक्ष स्थापनेचा संमत ठराव ऍड. बी. सी. कांबळेंनी मांडला त्याचा काही भाग, – ‘हा नवनिर्मित पक्ष साम्यवाद, समाजवाद, गांधीवाद किंवा आणखी कोणत्याही तत्सम वादाला बांधून घेणार नाही.
भारतीय जनतेच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व नैतीक प्रगतीसाठी हा पक्ष बुध्दीवादी आणि आधुनिक दृष्टीने काम करेल. काँग्रेसच्या प्रतिगामी शक्तीला पर्यायी विरोधी पक्ष म्हणून उभा राहिल.’ मात्र, रिपब्लिकन पक्षाची स्थापना ३ ऑक्टोबर १९५७ ची प्रेसिडीयमच्या सर्व सदस्यांनी ठरविल्याप्रमाणे हा पक्ष, ३ ऑक्टोबर १९५८ पर्यंतचं टिकला.
रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेपुर्वीच वादविवाद
वर्षभरात या पक्षाच्या धुरीणांनी विशेषतः एन. शिवराज, दादासाहेब गायकवाड आदी मंडळींनी या काळात पक्षाचा जाहिरनामा, घटना, राज्य, केंद्रिय कार्यकारीण्यांच्या परिपुर्तता न केल्याचे कारण सांगून ऍड. बी. सी. कांबळे, आवळे बाबू, दादासाहेब रुपवते यांनी नवा रिपब्लिकन पक्ष स्थापन करुन, दादासाहेब गायकवाड, एन. शिवराज, बॅ. खोब्रागडे यांच्यावर मात केली.हा नव्याने स्थापन झालेला रिपब्लिकन पक्ष म्हणजे दुरुस्त रिपब्लिकन पक्ष तर जुना, नादुरुस्त रिपब्लिकन पक्ष. म्हणजे, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेपुर्वीच वादविवाद अन् गट होते दुर्लक्षित करता येणार नाहीत.अन् त्यानंतरची वाटचाल कोणत्या दिशेनी चालली हे समोरचं आहे.
त्यानंतरच्या नेत्यांनी आंबेडकरी राजकीय चळवळीच्या अस्तित्वाला गटा तटाच्या माध्यमातून लागलेले प्रश्नचिन्ह मिटविण्याचे प्रयत्न केले नाहीत. दशा स्पष्ट झाली असतांना, आजही दिशा स्पष्ट होतं नाही ही मोठी शोकांतिका आहे. गटा तटाच्या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणून ओळख सांगण्यापेक्षा, आम्ही बाबासाहेबांचे कार्यकर्ते म्हणून ओळख का सांगितली जात नाही ?
राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण
बाबासाहेबांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रासह देशात, राजकीय आकांक्षेपोटी अनेक वारस निर्माण झाले. परंतु त्यांनी बाबासाहेबांच्या नावाचा वारसा सांगून स्वार्थी, भावनिक राजकारण केले. परिवर्तनाच्या, पदोन्नतीच्या, संघर्षाच्या, विकासात्मक, समाज प्रबोधनात्मक, विधायक मार्गाने चळवळ व्यापक, सर्वसमावेशक न बनता नेत्यांच्या गटा तटात विभागली गेली, दिशाहीन झाली. राजकीय पुःर्नवसनासाठी अन् स्वत:चे अस्तित्व जीवंत राखण्यासाठी नविन समिकरणे निर्माण झाली. आंबेडकरी सामाजिक, राजकीय निष्ठा गौण वाटू लागल्या.
एखाद्या नेत्याची राज्यसभेवर वर्णी किंवा मंत्री मंडळात समावेश हे राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे. अशा तऱ्हेने आपले नेतृत्व अबाधित राखण्यापेक्षा अंतर्गत मतभेद मिटवायला पाहिजे होते. गटा तटाच्या राजकारणामुळे मिळालेली राजकीय प्रादेशिक मान्यता व निवडणूक चिन्हही आपल्याला टिकवता आले नाही. सत्ता हेच अंतिम ध्येय असेल तर, प्रथम सत्तेच्या नादी न लागता, सर्वांनी एका ध्येयाने, एका विचारांने, प्रामाणिकपणे, स्वाभिमानाने राजकीय भवितव्याचा गांभिर्याने दूरदर्शीपणे विचार करुन, पक्षाची सर्व पातळ्यांवर मजबूत पु:नर्बांधणी करुन, समाजाची विश्वासाहर्ता संपादन करायला पाहिजे होती.
बुद्धिजीवी गट आजही अलिप्त
सामाजीक, राजकीय पाया व्यापक स्वरुपात सर्व पातळ्यांवर बळकट करायला पाहिजे होता.
सत्तेशिवाय कोणतीच संघटना वाढत नाही, तरीपण सत्ता हे परिवर्तनाचे एकमेव माध्यम आहे अस मानण्याच कोणतही कारण नाही.
सत्तेबाहेर राहूनही अनेक कामे करता येतात. चळवळीत आलेली शिथिलता,कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले नैराश्य,
समाजात नेते व कार्यकर्ते यांच्याबद्दल निर्माण झालेला अनादर अन् अविश्वास तसेच गटा-तटांच्या राजकारणामुळे
आपल्या समाजातील अनेक लोक इतर राजकीय पक्षात आजही कार्यरत आहेत तर फार मोठा बुद्धिजीवी गट अलिप्त आहे.
अशाने आपला समाज राजकीय, सामाजीकदृष्ट्या एकसंघ, कार्यान्वित, दिशादिग्दर्शित नसेल तर
बहुजन समाजासह इतर समाज आपल्याकडे आकर्षित कसा होणार ? आपण शासनकर्ते बनून, सर्वसमावेशक नेतृत्व कसे देणार ?
इतर समाजाच्या एखादा नेता आपल्या सोबत आला तर,
त्याचा समाज आपल्या सोबत येईल एवढी मानसिकता आज तरी नक्कीच निर्माण झालेली नाही.
राजकारण का, कशासाठी व कोणासाठी?
रिपाइंच्या गटा-तटांना अनेकदा भावनिकतेवर आधारित ऐक्य करावे लागले. परंतु ते फार काळ ठिकले नाही. आंबेडकरी चळवळीच्या मर्मस्थानाच्या ठिकर्या ठिकर्या करणार शस्त्र म्हणजे युती, आघाड्या अन् प्रलोभने. एकट्या-दुकट्या नेत्याला सोबत घेऊन, सत्तेची लालूच दाखवून आंबेडकरी चळवळीत फुटीची बिजे रोवायची अन् चळवळ संपवायची, आपसूकपणे त्यांची ताकदच क्षीण करुन टाकायची हे धोरण आंबेडकरी समाज अन् नेते अजून किती वर्षे चालू देणार आहेत ? हे आपल्या राजकीय अस्तित्वासाठी अन् भवितव्यासाठी पोषक आहे का ? आपल्याला राजकिय भवितव्य काय आहे ? आपली निर्णायक बलाढ्य राजकीय शक्ती असतांना आज आपण अदखलपात्र ठरत आहोत.
आपल्या विकलांग प्रवृत्तीमुळे राजकीय प्रवाहात आंबेडकरीव्देषी लबाड लांडग्यांनी आपल्याला गिळंकृत केले आहे. त्यामुळे, आपण कोठे आहोत त्यापेक्षा आज कोणत्या दिशेला आहोत याचा गांभिर्याने कधी विचार होणार आहे की नाही ? आपल्या गटा-तटांचा फायदा इतर राजकीय पक्षांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होणार असेल तर राजकारण का, कशासाठी व कोणासाठी चाललेय ? ज्या क्रांतिकारी चळवळीला तत्वज्ञान आहे, क्रांतिकारी सामाजीक बांधिलकी असलेले कार्यकर्ते आहेत, परंतु त्याच समाजासमोर, चळवळीसमोर पर्याय नसल्याने आज अनेक प्रश्नचिन्ह आहेत. गट तट अबाधित ठेवूनही आपली अंतर्गत युती होत नाही. आजही गट तट स्वबळाचीचं भाषा करतात. (?)
दुसर्यांच्या भाकऱ्या किती दिवस भाजून आपले पोट भरणार आहोत?
बाबासाहेबाचे तत्वज्ञान अन् जातीवादी पक्षांचा मेळ कधीही बसू शकत नाही. कोणत्याच पक्षांने आपल्या उभ्या आयुष्यात आंबेडकरी विचारांचा किंवा चळवळीचा कधीही आदर केला नाही. बाबासाहेब अथवा आंबेडकरी समाजाबाबत एखादा अनुचित प्रकार घडल्यास ह्या राजकीय पक्षांच्या भूमिका किंवा प्रतिक्रिया कधी स्पष्ट झाल्या आहेत का ? उलट त्यांनी रिपब्लिकन नेत्यांची निर्भत्सनाच केली. एवढा विरोधाभास अन् विषमता असतांना भवितव्या विषयी आत्मपरिक्षण कधी होणार आहे ? बाबासाहेबांमुळे आपल्या राहणीमानात, कपड्यात, विचारात नव्हे तर, सर्व जीवनमानात आमुलाग्र बदल घडून आलेला आहे.
खातो तो घास अन् घेतो तो श्वास फक्त बाबासाहेबांमुळेच घेत असतांना,बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या
सामाजिक, राजकिय व इतर प्रश्नांबाबत आपण उपेक्षित का ?
बाबासाहेबांनी आपल्याला सर्व काही दिले असतांना आपण दुसर्यांच्या भाकऱ्या किती दिवस भाजून आपले पोट भरणार आहोत ?
दुसर्यांच्या सावलीत उभे राहून आपली सावली आपल्याला निर्माण करता येईल का ?
जो समाज आज राजकीयदृष्ट्या एक नाही त्याला, राजकीय भवितव्य काय असणार ?
गटा तटाच्या माध्यमातून मतांची विभागणी का चालली आहे ? मतांची विभागणी झाली तर, उमेदवार कसा विजयी होणार ?
रिपब्लिकन पक्षाची चाललेली राजकीय क्रूर चेष्टा आता तरी बंद झालीचं पाहिजे
आपण बाबासाहेबांना मानत असलो तरी त्यांच्या अनमोल, क्रांतिकारी, परिवर्तनवादी विचारांना, तत्वांना, मार्गाला दुर्लक्षित तर करत नाही ना ? बाबासाहेबांना प्रणाम मानून राजकारण झाले असते तर,आपल्यात सर्व पातळ्यांवर गट तट, मतभेद दिसून आलेचं नसते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या ध्येय धोरणांशी उभे ठाकले होते अन् त्यासाठी त्यांनी आपले जीवन अक्षरशः कुर्बान केले होते,
आपल्या कुटुंबाचाही त्यांनी समाजासाठी विचार केला नाही.
त्यांच्या महान कार्याशी,अनमोल विचारांशी,ध्येय धोरणांशी आपण किती प्रामाणिक आहोत हा अनुत्तरीत प्रश्न आहे.
आंबेडकरी चळवळ ही आत्मसन्मानाची, आत इतिहासात सोनेरी अक्षरांनी नोंद करण्यासारख्या चळवळी
आंबेडकरी जनतेने सर्व शक्तीनिशी रस्त्यावर येऊन यशस्वी केल्या आहेत.
मात्र जुन्या आठवणी कुरवळत न बनता, त्यापासून प्रेरणा घेऊन काही तरी करण्याचा प्रयत्न झालाचं पाहिजे.
“जलबिंदू वेगळा झाला आणि स्वत:ला समुद्र मानू लागला तर तो वाळवंटासारखा शुष्क होईल,
पण समुद्राचे अस्तित्व मानून जर समुद्रालाच मिळाला तर तो स्वतः समुद्र होऊन जाईल.”
हे सर्वांनी ध्यानात घेऊन, रिपब्लिकन पक्षाची चाललेली राजकीय क्रूर चेष्टा आता तरी बंद झालीचं पाहिजे.
दुसर्यांच्या सावलीत उभे राहून आपल्या चळवळीचा विस्तार, कार्यक्षेत्र कसे वाढणार ?
मागील अनेक निवडणूकांच्या अपयशावरुन, भावी राजकीय वाटचालीबाबत रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटा गटांनी, राजकीय चळवळीच्या वाताहताची कारणे शोधून, त्यावर सविस्तर चर्चा घडवून, तिच्या जीवंतपणाची लक्षणे कोणती अन् दिशा राजकीय चळवळीला दारुण अपयश आले त्याचे फार मोठे शल्य सर्वांनाच आहे.
आंबेडकरी चळवळीच्या छावण्या, बुरुज, व्होट बँका उध्वस्त होत आहेत हे दुर्लक्षित करुन किंवा फाजील आत्मविश्वास. त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. निवडणूका येतील अन् जातील पण, आंबेडकरवादी राजकीय चळवळीच्या अस्तित्वाला गटा तटाच्या माध्यमातून लागलेले प्रश्नचिन्हे मिटविण्याचा प्रयत्न झालाचं पाहिजे. राज्यसभेवर वर्णी किंवा मंत्रीमंडळात समावेषाव्दारे दुसर्यांच्या सावलीत उभे राहून आपल्या चळवळीचा विस्तार, कार्यक्षेत्र कसे वाढणार ? आंबेडकरी निष्ठा गौण ठरवून, राजकीय प्रवाहात आपले वेगळे निर्णायक अढळ स्थान कसे निर्माण होणार ? रिपब्लिकन पक्षाची भारतात लोकसत्ताक पक्ष म्हणून ओळख व्हायला पाहिजे होती, पण गटा तटांच्या राजकारणामुळे तो नेत्तासत्ताक पक्ष म्हणून ओळख बनला. खरचं, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला व्यापक रिपब्लिकन पक्ष अस्तित्त्वात न येता, भविष्याचा गांभिर्याने, दूरदर्शीपणे विचार करुन त्याची चाललेली शोकांतिका मात्र थांबलीचं पाहिजे.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 03, 2021 07:00 AM
WebTitle – The Republican Party of India