राज्यातील मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या महापालिका निवडणूकांचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांने आपापल्यापरीने महापालिकांची तयारी, बांधणी, रणनीती सुरु केली आहे. राज्यातील सध्याचे वातावरण पाहिले तर, लढाई अटीतटीचीचं असणार आहे हे निश्चित. महापालिकेच्या निर्णायक लढाईसाठी सर्व पक्ष सज्ज होतांना दिसत आहे. प्रत्येक पक्षासाठी महानगरपालिका निवडणूक म्हणजे अस्तित्वाची अन् अस्मितेची लढाई असते.प्रत्येक राजकीय पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.अशावेळी आंबेडकरी राजकीय चळवळी राजकीय दिशा स्पष्ट झाली पाहिजे.
बुद्धीजीवी वर्ग राजकीय चळवळी पासून आजही अलिप्त
निवडणूका येतील अन् जातील पण, आंबेडकरी राजकीय चळवळीच्या अस्तित्वाला गटा तटाच्या माध्यमातून लागलेले प्रश्नचिन्ह कोणी, कधी मिटविण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत नाहीत.आपल्या गटा तटाचे अस्तित्व अबाधित राखण्यापेक्षा अंतर्गत मतभेद मिटविण्याचा का प्रयत्न केला जात नाही ? राजकीय प्रवाहात गटा तटांचा काही फायदा झाला आहे का ? आज राजकीय आकांक्षेपोटी समाज निर्जीव गटा तटात विखुरला गेला असून, काही मंडळी इतर राजकीय पक्षात कार्यरत आहेत तर, काही बुद्धीजीवी वर्ग आजही अलिप्त आहे. अशा प्रकारे आपला समाज सामाजिक, राजकीयदृष्ट्या एकसंघ, कार्यान्वित, दिशादिग्दर्शीत नसेल तर इतर समाज आपल्याकडे कसा आकर्षित होणार ? आपण शासनकर्ता समाज होऊन, सर्वसमावेशक नेतृत्व कसे देणार ?
राज्यसभेत वर्णी किंवा मंत्री मंडळात समावेशाव्दारे दुसऱ्यांच्या सावलीत उभे राहून आपल्या चळवळीचा विस्तार अन् कार्यक्षेत्र कसे वाढणार ? आंबेडकरी निष्ठा गौण ठरवून, राजकीय प्रवाहात आपले वेगळे निर्णायक अढळ स्थान कसे निर्माण होणार ? फक्त, गट तट निर्माण करुन चळवळ मोडीत काढायची हेचं आपल्याला अभिप्रेत आहे का ?
आपल्या प्रश्नांबद्दल आपण अनभिज्ञ
मात्र, महानगरपालिका निवडणूकांच्या महासंग्रामात, रिपब्लिकन गटा तटाची भूमिका काय ते अजून स्पष्ट झालेलं दिसत नाही. रिपब्लिकन पक्षाचे सर्वचं गट तट अजून तरी शांतचं आहेत. स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत असाल तर, ती मतांची विभागणी असेल. आम्ही इतर समाजातील रुढी, परंपरा तसेच इतर राजकीय पक्षांवर, त्यांच्या नेत्यांवर अन् इतर विषयांवरही सतत सडकून टिका टिप्पणी, भाष्य, कुरघोडी करत असलो तरी, आपण आपल्या सामाजिक, राजकीय प्रश्नांवर परखड, निःपक्षपातीपणे भाष्य, चिकीत्सा का करत नाही ? बाबासाहेबांच्या पश्चात गट तट निर्माण करण्या ऐवजी, त्यांना अभिप्रेत असलेल्या संघटनेचा राजकीय पाया अधिक व्यापक, बळकट, सर्वसमावेशक करण्यासाठी कोणी का प्रयत्न करत नाहीत ? आपल्या प्रश्नांबद्दल आपण अनभिज्ञ तर नाहीत ना ?
निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर समाज, चळवळीपेक्षा युती, आघाड्या, नवीन समिकरणे निर्माण करुन स्वतःचे अस्तित्व जीवंत ठेवण्याचा, पुनर्वसन करण्याचा फुटकळ प्रयत्न होत असेल तर, निवडणूकांचे निकाल तरी अपेक्षित कसे लागणार ? आपली एकसंघ व्होट बँक नसेल तर, चमत्कार थोडाचं घडणार आहे ? आडात नाही तर, पोहऱ्यात तरी कुठून येणार ? आपल्या समाजात नुसता चळवळीचा वारा चहूकडे वाहूनचं उपयोग नाही तर, बाबासाहेबांना अभिप्रेत संघटन सुध्दा महत्त्वाचे आहे. कारण, राजकारण हे फक्त निवडणूका लढविणे एवढेच महत्वाचे नसून, ते सत्ता आणि कायदे निर्माण करण्याची शक्ती निर्मितीचे केंद्र आहे.
नेतासत्ताक रिपब्लिकन पक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात आला असता तर,
रिपब्लिकन पक्ष आज भारतात ‘लोकसत्ताक’ म्हणून ओळखला गेला असता.
परंतु, गटा तटाच्या राजकारणामुळे तो ‘नेतासत्ताक’ म्हणून ओळखला जात आहे, याचे शल्य तुम्हांला नाही का ?
बाबासाहेबांनी अभिप्रेत असलेल्या पक्षाबद्दल अन् राजकारणाबद्दल आपली मते स्पष्ट, व्यापक, प्रभावशाली व सर्वसमावेशक मांडलेली असतांना राजकारणात आपण हतबल का ? किमान आपले गट तट अबाधित ठेवून तरी, आगामी महानगरपालिका निवडणूकांना सामोरे जा, म्हणजे मताची विभागणी तरी होणार नाही.
आपल्या समाजाच्या मतांवर आपल्याला आगामी निवडणूका जिंकता येणं शक्य नसले तरी, इतर समाजाला एकत्र करतांना आपल्या समाजाला गृहित किंवा दुर्लक्षित करता येणार नाही. आपल्याला एक एक मत अत्यंत महत्त्वाचे आहे. इतर समाजाचे नेते आपल्या सोबत असले तरी त्यांचा सर्व समाज आपल्या सोबत येईल एवढे त्यांचे मानसिक परिवर्तन अजून तरी झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर पुर्णपणे अवलंबून राहता येणार नाही. तसेच अंतर्गत मतभेद, टिका टिप्पणी न करता सलोखा, संवाद, समन्वय घडवून आणणे, सर्वांपर्यंत पोहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सर्वसमावेशक नेतृत्व कसे देऊ याचा विचार झाला पाहिजे
आजचा तरुण चळवळीचा पाया झाला तर, उद्याचे तरुण त्याचे निश्चितचं कळस होतील अन् चळवळ सक्षम, व्यापक, सर्वसमावेशक होण्यास निश्चितचं मदत होईल. आजही, पहिल्या फळीतील नेतृत्व अन् दुसऱ्या फळीतील एखादे नेतृत्व वगळता इतर पातळ्यांवर नेतृत्व निर्माण झालेलं दिसत नाही. अन्याय अत्याचार प्रश्नांपुरतीचं चळवळ फक्त मर्यादित आहे. रस्त्यावर उतरुन ताकद दाखविण्यापेक्षा, आपले उमेदवार कसे निवडून येतील, इतर समाजाच्या माध्यमातून आपण शासनकर्ते कसे होऊ, सर्वसमावेशक नेतृत्व कसे देऊ याचा विचार झाला तरच आपण संविधान, आरक्षणाचे रक्षण करु शकतो. संसदेत आपली ताकद निर्माण केली पाहिजे. नाही तर, बाबासाहेबांनी महत् प्रयासाने उभारलेला लोकशाहीचा डोलारा उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही.
राजकारणात बेरजेचे राजकारण चालते पण, आपले राजकारण गटा तटाच्या बेरजेत वाढले आहे. अशा गटा तटाच्या माध्यमातून क्षणाक्षणाला कणांकणांने होत असलेले राजकीय पतन आपल्याला अभिमानास्पद आहे का ? बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या सद्यस्थितीला गटा तटाचे नेते मंडळी जेवढे जबाबदार आहेत, तेवढा समाजही जबाबदार आहे. समाजचं नेत्यांच्या मागे गेला नसता तर, एवढे गट तट निर्माण झालेचं नसते. तसेच, समाजाचा राजकारणावर अंकुश असता तर, अनेकवेळा झालेली ऐक्ये क्षणभंगूर ठरलीचं नसती. बाबासाहेबांच्या पश्चात आज आपला राजकीय पाया, भवितव्य काय आहे ?
गटतट बाजूला सारून एकच सक्षम पर्याय
बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक, राजकीय प्रश्नांबाबत आपण उपेक्षित का ?
ज्या क्रांतीकारी चळवळीला तत्वज्ञान आहे, क्रांतीकारी सामाजिक बांधिलकी आहे
त्याच चळवळीसमोर पर्याय नसल्यांने आज अनेक प्रश्नचिन्ह आहेत.
अन्याय, अत्याचार अन् भावनिक प्रश्नांपुरतीचं चळवळ जीवंत ठेवायची का ?
प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या गटा तटांचा फायदा फक्त इतर राजकीय पक्षांना होणार असेल तर, राजकारण का ? कशासाठी ?
अन् कोणासाठी ? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
बाबासाहेब ज्या ध्येय धोरणांसाठी उभे ठाकले होते अन् ज्यासाठी त्यांनी अक्षरशः आपले जीवन कुर्बान केले होते,
त्यांच्या ध्येय धोरणांशी, कार्याशी आपण प्रामाणिक राहिलो असतो तर,
देशाच्या राजकारणात रिपब्लिकन पक्षाचे निश्चितचं वेगळे अढळ स्थान निर्माण झाले असते.
येणाऱ्या महापालिका निवडणूका आणि लोकसभा विधानसभा या निवडणुकांमध्ये आता आंबेडकरी समाजानेच ठरवलं पाहिजे की आपण गटातटात विभागून सत्तेपासून लांब राहायचं की सर्वांनी एकत्र येवून गटतट बाजूला सारून एकच सक्षम पर्याय द्यायचा! आता निर्णय जनतेने घ्यायचा आहे.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on SEP 16, 2021, 16:47 PM
WebTitle – The political direction of Ambedkarite political parties should be clear