रोमन साम्राज्याच्या इतिहासाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, चांगलं आणि वाईट, दोन्ही. मी फक्त थोडक्यात काही फॅक्ट्स सांगतो, त्यांच्यापासून काय शिकवण घ्यावी ते वाचकाने ठरवावे.
रोमन साम्राज्य (अगोदर हेच साम्राज्य हे साम्राज्य नसून एक गणतंत्र होते) हे तसं पाहिलं तर इ.स.पू. 753 पासून ते थेट 1453 AD पर्यंत चालले. गणतंत्र हा शब्द सुद्धा त्यांच्याकडूनच आला आहे, रेस् आणि पब्लिका (लोकांच्या समस्या/इशूज) मिळून रिपब्लिक असं बनलं. त्यांचं रिपब्लिक म्हणजे की त्यांनी निवडलेल्या लोकांनी निवडून एक ‘सिनेट’ बनायचं, आणि हेच सिनेट नंतर एका वर्षासाठी एका ‘कंसलची’ नेमणूक करायचं, जो एक वर्ष राजासारखं राज्य करेल, आणि मग पुढच्यावर्षी दुसरा येणार. रिपब्लिक नंतर एम्पायर (साम्राज्य) बनले जेव्हा जुलियस सिजरने सेनेटच्या हातात असलेली सत्ता हिसकावून घेतली.
पूर्वेचं रोमन एम्पायर जे आता बिझंटिन एम्पायर
सिजर ने मग जवळजवळ सगळाच कारभार नव्याने सुरु केला (जवळजवळ, पूर्णपणे नाही, ते पूढे कळेल). सिजरने तर सोसिजेनेस नावाच्या एका इजिप्त खगोलशास्त्रज्ञाला बोलावून नवीन कॅलेंडर देखील बनवले, त्यामध्ये जुलै हा महिना त्याने स्वतःच्या नावाने ठेवला, जुलियस. सिजरच्या हत्ये नंतर मग पहिला खराखुरा सम्राट आला तो ऑगस्टस. त्यानंतर मग बरेच सम्राट होऊन गेले. नंतर रोमन एम्पायर/साम्राज्याचे दोन विभाग सुद्धा झाले, पूर्वीय आणि पश्चिम, आणि 306 AD मध्ये रोमन साम्राज्य हे अधिकृतरित्या एक ख्रिश्चन साम्राज्य सुद्धा बनले. आणि 476 AD मध्ये पश्चिम रोमन साम्राज्य, आणि रोम शहर, हे विसीगोथ साम्राज्याने संपविले, तर पूर्वेचं रोमन एम्पायर जे आता बिझंटिन एम्पायर बनले होते, ते अजून हजार वर्षांनी तुर्क लोकांनी संपवले (1453 AD).
तिकडचा समाज हा 4 वर्णात
आता इतका सगळा इतिहास असतांना एक गोष्ट मात्र रोमन साम्राज्यात जवळपास सनातन राहिली. ती म्हणजे तिकडची समाजरचना. गणतांत्रिक प्रदेश असतांना सुद्धा तिकडचा समाज हा 4 वर्णात (भारताशी साम्य आढळल्यास योगायोग समजावा) विभागला गेला होता. एक होते गुलाम, ज्यांना जनावारांपेक्षा वाईट वागणूक मिळायची पण रोम बनवण्यापासून ते चालते ठेवण्यापर्यंत त्यांचा घाम आणि रक्त गाळलं जायचं. मग त्यांच्या वरचे हे प्लेबीयन, हे पण अत्यंत गरीबच पण मानवाधिकार असणारे.
मग त्यांच्या वरती योद्धे, आणि सर्वात वर मग पेट्रीशियन, जे कि गडगंज श्रीमंत. किती श्रीमंत? तर अक्ख्या रोमन इतिहासात सर्वात श्रीमंत असलेला माणूस हा कोणी राजा-बिजा नसून एक गव्हर्नर होता, मार्कस क्रासिअस म्हणून, ज्याने स्वतःचा पैसा लावुन आणि सिजरला ‘फंडिंग’ करून रोमन गणतंत्राचे शेवटी रोमन साम्राज्य केले होते. असो. आणि रोमन लोकांना इतके तरी कळत होते की गुलाम हे काही जन्मजात गुलाम नसतात, आणि म्हणून काही गुलामांना नंतर स्वतःची गुलामी नाकारता सुद्धा यायची, पण याचे प्रमाण कमी. एका नावाजलेल्या रोमन विचारवंताने, ज्याचे नाव होते ‘गेयस’, त्याने आपल्या ‘इंस्टिट्यूशन’ या पुस्तकात ई.स.पु. 161 मध्ये लिहून ठेवले होते की “गुलामगिरी आणि गुलाम हे एक मानवनिर्मित रचना आहे (देव/निसर्ग निर्मित नाही), आणि युद्ध सुद्धा”.
कोलोसीअम
मग या गुलामांनी काही लढा दिला का? एक वेळा नाही तर तीन वेळा दिला (या मध्ये तिन्ही वेळा गुलामांनी केलेल्या लढायांचे एकमेकांमध्ये काही थेट संबंध नव्हते, पण तिन्ही वेळा गुलाम हे एकजूट होऊन रोमन राज्यावर तुटून पडले होते). त्यासाठी तर स्पार्टकस या गुलाम/ग्लॅडियटर/मिलिटरी जनरल ची कहाणी नक्की वाचाच. गुलामांचे तिसरे युद्ध (थर्ड सरव्हील वॉर) यानेच गाजवली, जरी ती अंतिमतः संपवण्यात आलीचं (कोणी संपवली? आपल्या सर्वात श्रीमंत रोमन माणसानेच, मार्कस क्रासिअस)
मग एवढं मोठं साम्राज्य आणि हि सामाजिक रचना शेवटी चालवायची कशी?
ज्यांनी रसल क्रोचा ग्लॅडिअटर मूव्ही पाहिला त्यांना कल्पना असेल, कि मग आपण लोकांना परप्रांतातील लोकांचा धाक दाखवायचा,
आणि इकडे रक्ताने माखलेली करमणूक करत रहायची, आणि तुमचं काम झालंच समजा.
त्यासाठी मग रोममध्ये कोलोसीअम बनवले गेले जे आज सुद्धा उभे आहे. यामध्ये वर्षातील 100-150 दिवस “गेम्स” चालायचे.
तर हे कोलोसीअम बनल्यानंतर एक रोमन नागरिकाचा एक साधारण दिवस कसा जायचा?
हा रोमन नागरिक सकाळी उठणार, आणि सकाळच्या गेम्स मध्ये माणसे विरुद्ध प्राणी, हा खेळ बघणार.
प्राण्यांशी लढणाऱ्या लोकांना ‘बेस्टिआरी’ म्हणत, आणि जे योद्धे यामध्ये निपुण आहेत त्यांना ‘व्हेनेटोर’.
‘बेस्टीआरी’ लोकांमध्ये आत्महत्येचं प्रमाण फार होतं
हि ‘सकाळची’ करमणूक इतकी भयंकर मोठ्या प्रमाणावर केली जात होती की यामुळे अक्षरशः काही प्राणांच्या प्रजाती या विलुप्तसुद्धा झाल्या, जसे की नॉर्थ आफ्रिकन हत्ती. वाघ, हत्ती, सिंह, चित्ता, हे दिवसाला रोज मारले जायचे (या प्राण्यांकडून मरणारे माणसं तर वेगळीच). याचा धाक इतका होता की मग या ‘बेस्टीआरी’ लोकांमध्ये आत्महत्येचं प्रमाण फार होतं. एकदा तर 29 सॅकसन कैद्यांनी (ज्यांना पुढच्या दिवशी प्राण्यांशी लढायचे होते) एकमेकात ठरवून एकमेकांचे गळे दाबून आत्महत्या केली (शेवटचा उरलेला कसा मेला ते नका विचारू फक्त कारण ते माहित नाही, संदर्भ: ‘सीमॅकस ची पत्रे’, 345 – 402 AD).
हे सगळं बघुन झाल्यावर मग तो रोमन नागरिक बाकी वेळ आपलं काही काम करेल किंवा घरी जाऊन एक झोप काढून येईल, आणि मग वापस दुपारी ग्लॅडियटरची लढाई बघेल. या लढायांमध्ये बऱ्याच वेळा रोमन साम्राज्याने मिळवलेल्या परप्रांतीयांवरील विजयाची छोटीशी झलक दाखवली जायची आणि मग तो रोमन नागरिक आपल्या देशप्रेमाने फुगलेली छाती घेऊन घरी वापस जायचा, आपल्या गुलामांना छळायला मोकळा.
ख्रिस्चीयानीटी हा नवीन धर्म
कधी कधी तर सम्राट-राजे लोकं सुद्धा या मध्ये भाग घेत (अर्थात सर्व सेटिंग करून).
जसे की एका रोमन इतिहासकाराने लिहून ठेवले आहे, प्लिनी द एल्डर, जो लिहितो कि
एकदा आपल्या रोमवासीयांना खुश करायला एम्परर क्लॉडिअस ने एका व्हेल (हो, आपला खराखुरा देवमासा) माश्याला “हरवले” होते
(हि व्हेल चुकून किनाऱ्यावर आली असताना तिला बांधून ठेवण्यात आले आणि आपल्या शूरवीर सम्राट क्लॉडिअस मग तिला “ठार मारले”).
अशीच शौर्यगाथा एम्पारर कमॉडस ची होती, जो दुबळ्या
आणि आजारी केल्या गेलेल्या ‘ग्लॅडियटर्स’ना ज्यांना लाकडी तलवारी दिली जायची, यांना सर्वांसमोर हारवुन दाखवायचा.
हा सगळा तमाशा सुरु ठेवला कि मग गुलामांना आपल्या जागेचा आणि इतिहासाचा विसर पडतो तर पडतोच,
वरून जे इतर गोरगरीब जनता होती तिच्या डोक्यात कोणता प्रकाश पडण्यापूर्वीच
तिला कोणत्यातरी काल्पनिक शत्रूची भीती घालून किंवा रक्तरंजित करमणूक करून भुलून ठेवता यायचं.
तिकडे मग रोमन गणतंत्राचे साम्राज्य झाले, नंतर दोन विभाग सुद्धा झाले,
ख्रिस्चीयानीटी हा नवीन धर्म सुद्धा आला, पण समाजरचना जवळपास तशीच राहिली.
जॉन केनेथ गॅलब्राइथ
डॉ.बाबासाहेबांचं लिखाण वाचतांना तुम्हाला जाणवेल कि त्यांनी फ्रेंच आणि रोमन इतिहास एकदम नीट समजून घेतला आहे, आणि ते आपले मुद्दे पुढे मांडतांना या इतिहासाची उदाहरणे पण द्यायचे. कारण त्यांना कळत होते कि इतिहास माहित नसलेला माणूस हा वर्तमानात फार काही प्रयत्न नं करता तसाच गुलाम ठेवला जाऊ शकतो.
याबद्दल एक वाक्य आठवतंय, पॉल स्कॉट या लेखकाचं, ज्याने जॉन केनेथ गॅलब्राइथ यांनी एडिट केलेल्या पुस्तकात (‘गॅलब्राइथ इन्ट्रोडुसेस इंडिया’, 1974) एका लेखात सादर केलेलं. स्कॉट यांचं एका सामान्य भारतीय नागरीकाबद्दल असं निरीक्षण होतं की, “एका सामान्य भारतीय नागरिकाला त्यांच्या इतिहासातील जागेबद्दल बिलकुलसुद्धा कल्पना नसते, आणि याची कारणे परत शेवटी इथे असलेल्या कट्टर जातिव्यवस्थेच्या आणि धार्मिक मनस्थितीत आहेत, यामुळे ते निव्वळ एका स्टेज वर शो सादर करीत असल्यासारखे जगतात, भविष्याची कोणतीच काळजी न करता.”
by ~ गौरव सोमवंशी
लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञान एक्स्पर्ट आणि जगभरतील सामाजिक चळवळींचे अभ्यासक विश्लेषक आहेत
कॉर्पोरेट्स शेती : कॉर्पोरेट्स कंपन्या चा भारतीय शेती वर डोळा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)