परिव्राजक या कथासंग्रहा बद्दल मी काही वर्षांअगोदर ऐकलं होतं. हा कथासंग्रह आउट ऑफ प्रिंट असल्याने मला तो कुठेही उपलब्ध झाला नाही. फेसबुकवरच्या अनेक मित्रांना विचारलं असता त्यांच्याशीही या बद्दल पुरेशी माहिती नाही असं जाणवलं आणि या कथासंग्रहाबद्दल सध्या सोशलमिडियामध्ये कोणीही काहीही लिहिलेलं मला सापडलं नाही, याचा अर्थ असा असेल का? की, हा कथासंग्रह सध्याच्या वाचकांपर्यंत पोहोचलेला नाही किंवा हल्लीचा नवीन वाचक त्यापर्यंत पोहोचलेला नाही. अशी पार्श्वभूमी असताना हा संग्रह मिळण्याबाबत मी थेट प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवला आणि त्यांना तसा थेट मॅसेजही केला. त्यांच्या सेक्युलर आर्ट मुमेंट बद्दल ऐकून होतो.
दुसऱ्याच दिवशी प्रा. गौतमीपुत्र कांबळे सरांचा मला फोन
परंतु मुमेंटशी जवळीक कधी साधता आली नव्हती. आश्चर्य म्हणजे मॅसेज केल्याच्या दुसऱ्याच दिवशी,प्रा. गौतमीपुत्र कांबळे सरांचा मला फोन आला आणि मी चपापलोच.इतका मोठा लेखक मला मॅसेज वरून सुद्धा सांगू शकला असता.त्यांच्याशी बोलताना त्यांच्यातला माणूस सुद्धा तितकाच भावला.माझं कार्यक्षेत्र चित्रकलेशी संबंधितअसल्याचं त्यांना मी सांगितलं तेव्हा त्यांनी अक्षरशः माझं कौतुकच केलं,
आम्ही चित्रकलेविषयी आणि सेक्युलर आर्टमुमेंटबद्दलसुद्धा चर्चा केली.माझी अशा मोठ्या कार्यकर्ता लेखकाशी फोनवर बोलण्याची पहिलीच वेळ होती.त्यामुळे विश्वासच बसत नव्हता.परिव्राजक च्या तीनचार प्रति माझ्याकडे आहेत त्यातली एक मी तुम्हाला पोस्टाने पाठवू शकतो
असं त्यांनी म्हटल्यानंतर मी अगदीच सुखावलो होतो.हे पुस्तक रीप्रिंट व्हावं असं मी म्हटल्यानंतर त्यांनी त्याबद्दल अजून काही निश्चित सांगता येत नाहीपरंतु बऱ्याच कार्यकर्त्यांची अशीच इच्छा आहे हेही त्यांनी सांगितलं.मध्ये पुन्हा एकदा फोनवर त्यांच्याशी चर्चा करता आली, त्यावेळी जयंती पुस्तकाविषयी त्यांच्याच तोंडून ऐकलं होतं,
मी परिव्राजक पुस्तक वाचून कळवतो असंही म्हटलेलं.नुकतंच काही दिवसांपूर्वी जयंती हे पुस्तक प्रकाशित झाल्याची तसेच
परिव्राजक कथासंग्रह रीप्रिंट झाल्याची बातमी कळली आणि आनंद झाला.
यानिमित्त परिव्राजक पुस्तकाबद्दल आणि लेखका बद्दल थोडंसं लिहीत आहे.
हा लेखक फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या प्रवाहातील कार्यकर्ता आहे.
आणि दलित साहित्याच्या संकल्पनेपासून साहित्यातील वेगळी वाट शोधणारा, दाखवणारा लेखक आहे,असं मी म्हणत आहे कारण,
बाबासाहेबांनी विद्यापीठीय स्तरावर जे प्रबंध सादर केले.
त्या प्रबंधातून भारतीय व्यवस्थापरिवर्तनासाठी जातिव्यवस्थेचे निर्मूलन हा प्रधान प्रश्न त्यांनी पहिल्या प्रबंधापासून मांडला.
त्यांनतर बाबासाहेबांची चळवळ हि समग्रपणे महाराष्ट्रामध्ये जे कार्यकर्ते ,विचारवंत, साहित्यिक, लेखक आणि समीक्षक यांनी ज्या ताकदीने पुढे नेली अशा व्यक्तिमत्वांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. गौतमीपुत्र कांबळे आहेत. दलित साहित्यावर जी काही साहित्यक्षेत्रातून टीका, समीक्षा किंवा नाराजी व्यक्त केली जाते ती अशी कि दलित साहित्याचा भर आजच्या प्रखर वास्तव्याच्या अवस्थेला वास्तव मांडणीने महत्व प्राप्त करून देणे यावर होता, हि तत्कालीन साहित्याला किंवा प्रस्थापित साहित्याला सामाजिक, सांस्कृतिक प्रतिक्रिया देण्याची गरज होती असंही म्हणता येईल.
परंतु प्रा. गौतमीपुत्र कांबळे हे या टीकेला किंवा नाराजीला आणि दलित साहित्याच्या संकल्पनेला भेदून आपली वेगळी वाट निर्माण करतात. त्यांच्या कथेतील पात्र हि दुःखाच्या चक्रात सापडलेली नाहीत, हतबल नाहीत, सामाजिक चक्रव्यूहात गरगरणारी नाहीत किंवा दुःखाचं दर्शन घडवणारी नाहीत. त्यांच्या कथेतील पात्र हि प्रतीकात्मक आहेत ती दुःखाचं कारणभाव प्रकट करतात आणि वाचकाला अंधारात न ढकलता ते डोळस करतात.
प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचा परिव्राजक हा पहिला कथा संग्रह २००५ साली प्रकाशित झाला. हा त्यांचा पहिला कथा संग्रह असून त्यास त्यांनी जवळ जवळ दहा वर्षाचा कालावधी घेतला आहे, त्यात पाच दीर्घकथा आहेत. यातून त्यांचं चिंतनशील लिखाण जाणवतं आणि त्यांनी केलेलं संशोधनही जाणवतं. मराठी कथा साहित्याला ताडकन जागं करणारा हा कथा संग्रह ठरला आहे असं काही चिंतनशील लेखकांचं म्हणणं आहे ते खरंही वाटतं. त्यांच्या म्हणण्यानुसार ते कथालेखनात करिअर करू पाहणाऱ्यांमधले लेखक नाहीत. प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचा “परिव्राजक”
कथासंग्रहातील कथेचा घाट अतिशय भिन्न आहे. यांच्या कथांना समांतर जातील अशा कथा
मराठी साहित्यक्षेत्रात आजतरी पाहायला मिळत नाहीत, हेदेखील या कथासंग्रहाचं वैशिष्ट म्हणावं लागेल.
परिव्राजक कथासंग्रहातील कथाजगताचा विचार करता त्यात प्रकर्षाने जाणवतं की,
या कथाजगताचा वर्तमानकालीन वास्तवाशी क्वचितच संबंध आलेला आहे.
त्यातील गोष्टी विशिष्ट कालखंडात घडत असल्याने त्यातील पात्र त्या कालखंडाशी जोडलेली आहेत.
कथानक प्राचीन काळाशी जोडलं असलं तरी आजच्या वास्तवापासून तुटत नाही. त्यातील पात्रांची नावं हि लक्षवेधी आहेत.
हि पात्र प्रतीकात्मक जाणवतात, त्यामागे उभं असलेलं तत्वज्ञान हे चिरकालीक आहे हे सूचित करण्यासाठीच लेखकाने जाणीवपूर्वक कथेची रचना केलेली असावी असं जाणवते. कथा, कादंबरी यांतून होणारं कथन हे काही इतिहास नसतो तर कथन हे त्याला वाहून नेणारं साधनरूप असू शकतं आणि हेच प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी त्यांच्या कथाशिल्पातून मांडलेले आहे.
प्रा. गौतमीपुत्र यांच्या परिव्राजक च्या निमित्ताने समकालीन साहित्याचा किंवा एकूण मराठी साहित्याचा आढावा घ्यावा लागेल, तो असा की, सुरवातीच्या काळात दलित साहित्याने इथल्या सामाजिक सांस्कृतिक पिचल्या गेलेल्या समाजाचं वास्तव जीवन मांडून पोटतिडकीने वाचावं असं बरंच काही दिलं. शिकू लागलेल्या बहुजन समाजाला लिहिण्यासाठी प्रवृत्त करण्यात ह्या साहित्याचा मोठा वाटा आहे हे सुद्धा नाकारता येत नाही.
परंतु कालांतराने त्यात सारखेपणा येत राहिला आणि कल्पनाजन्यतेचा, घाटाचा अभाव वाढत गेला, यात खूप कमी लेखकांनी कल्पकतेने कथा हाताळल्या किंवा रचल्या असल्या तरी त्या कथांनी वास्तववादी चित्रणापुढे तग धरला नाही असं चित्र आहे.यातून एकूण मराठी साहित्याची हानी झाली असली तरी वाचक वर्ग तत्कालीन साहित्यात रमला होता असं दिसून येतं.
आज फुले शाहू आंबेडकर विचारांना आत्मसात करणारा वैचारिक लेखक वर्ग किंवा सोशल मीडियातून व्यक्त होणारा तरुण वर्ग जो वैचारिक मांडणी करू पाहतो आहे हा कल्पनाजन्यते पासून दूर राहणं पसंत करत आहे किंवा त्याच्यापुढे मर्यादा येत आहेत किंवा निर्माण होत आहेत आणि त्यात प्रस्थापित मराठी साहित्याची बहुतांश मांडणी हि चाकोरीबद्ध असल्याने तो त्यापासून हटकून राहणे पसंत करतो.
इथेच वेगळी वाट दाखवणारे गौतमीपुत्र हे महत्वाचे लेखक ठरू शकतात.
त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून जाणं पसंद केले तर येणाऱ्या काळात सजग साहित्य निर्मिती होऊ शकते.
त्यांच्या कथांची प्रेरणा हि परकीय नसून भारतीय आहे.
जातक कथांशी नातं
त्यांच्या कथा जातक कथांशी नातं सांगू इच्छितात. जातक कथांचे कथन हे सर्वात जुने कथन म्हणता येईल.
जातक कथा बुद्धाच्या काळानंतर रचल्या गेल्या, परंतु त्या बुद्धाच्या पूर्वजन्माभोवती फिरतात,
पूर्वजन्माविषयी बोलतात आणि त्याच्या केंद्रस्थानी बुद्धतत्वज्ञान दिसून येते.
गौतमीपुत्र यांच्याही कथेच्या केंद्रस्थानी बुद्धाचं तत्वज्ञान सापडते म्हणून
मराठी साहित्य आणि गौतमीपुत्र यांचं साहित्य पाहता दोन्हीत मोठा आणि मूलभूत फरक दिसून येतो.
परिव्राजक मधल्या कथेच्या घाटापासून ते मांडणी पर्यंत चर्चा व्हायला हव्यात जेणेकरून कथा साहित्यातील उणिवा जाणून घेता येतील.मराठी साहित्यविश्वात फिक्शन हे तिथल्यातिथे कदमताल करत असलेलं दिसून येत असताना गौतमीपुत्र यांची कथाशिल्पे त्याच्या पुढे जाऊन चिंतनशील लेखन पेरतात हि महत्वाची बाब यातून दिसून येते.व्यवस्थापरिवर्तनाच्या विचाराने प्रेरित झालेला वाचक, लिहूपाहणारा वर्ग साहित्याकडे पुन्हा नव्याने विचार करू शकतो हे या पुस्तकाच्या निमित्त सांगता येईल.
आगळी-वेगळी पायवाट
‘परिव्राजक’ हा मराठीतला सर्वोत्तम कथासंग्रह आहे असंही म्हटलं जातं.
याला तितक्याच तोडीची आणि अभ्यासपूर्ण राजा ढाले यांची प्रस्तावना आहे.यात ते म्हणतात की,
“आधुनिक मराठी कथेच्या इतरांनी चोखाळलेल्या पायवाटा जिथे संपतात,त्याच्या पुढच्या टप्प्यावरून प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या कथेची आगळी-वेगळी पायवाट सुरु होते”
मी हा कथा संग्रह सलग वाचून पूर्ण केला आणि सुन्न झालो, कथेतल्या व्यक्तिरेखेपैकीच मी एक आहे असं वाटू लागलं.
यातली कथा मनात खूप काळ भिनत राहते.
आज सोशलमिडीया सारख्या धुमश्चक्रीत बऱ्याच पुस्तकांची ओळख होत असते, बरेच जण विशिष्ट पुस्तकांची दखल घेताना दिसतात मात्र असे कथासंग्रह या धुमश्चक्रीतुन निसटतात किंवा मागे राहतात, हे मागे राहण्याचं कारण शोधायला हवं असं वाटत राहतं. सोशल मीडियातून बरेच तरुण लेखक, नवलेखक लिहीत आहेत त्यांची वैचारिक मांडणी इथल्या प्रस्थापित समाज रचनेला पुनर्विचार करायला सतत भाग पाडत आहे,
हाच तरुण वर्ग जर ‘फिक्शन’कडे वळला तर इथल्या साहित्यात आलेल्या साचलेपणाला, सुमारपणाला धडका देऊ शकतो
आणि साहित्यात भरीव काम होऊ शकतं हे निश्चित.’फिक्शन’ लिहू पाहणाऱ्यांना,
कथा जाणून घेऊ पाहणाऱ्यांना ‘परिव्राजक’ कथासंग्रहअभ्यासपूर्ण ठरेल असं खात्रीशीर म्हणता येईल.
ऊसतोड मजुरांच्या जगण्याचा मागोवा घेणारी ‘यसन’
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,
आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 02,2022, 10:26 AM
WebTitle – Parivrajak : Stories of an Activist Writer By Prof. Gautamiputra Kamble