(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
पारंपरिक हिरोईजम मटेरियल सिनेमे येतात जातात, काही लक्षात राहतात काही विस्मृतीत जातात, काही बक्कळ पैसे कमावून देतात काही डब्यात जातात, सिनेमा हे दृक श्राव्य माध्यम लोकांच्या मनावर गारुड करत असतं त्यामुळे त्याचा फायदा कसा घ्यायचा हे जो तो फिल्ममेकर ठरवत असतो, फार पूर्वीपासून मराठी हिंदी सिनेसृष्टीत समांतर सिनेमा हा प्रकार आहे, जो कि सामाजिक विषमता, अन्याय, उपेक्षा, सामाजिक टॅबू यावर भाष्य करतो. असे सिनेमे मुख्य धारेत येत नसायचे परंतु आता आता काही वर्षांपासून नवीन दमाचे सिने निर्माते आणि दिग्दर्शक हेच समांतर विषय नवीन पद्धतीने हाताळताना दिसतात. परीएरुं पेरुमल, काला, आर्टिकल १५ किंवा मराठीतील सैराट हे सिनेमे सामाजिक आशय घेऊन पण नाविन्यपूर्ण बंधनातून लोकांसमोर आणले गेले ज्यात कथेपेक्षा जास्त ते रूपकांमधून संवाद साधतात. तामिळ सिनेविश्वात पा. रंजिथ, मारी सेल्वराज यांनी पारंपरिक सिनेमा तंत्राला छेद देऊन आपली वेगळी शैली लोकांसमोर आणली आहे, मराठीत हा प्रयोग नागराज मंजुळे, जब्बार पटेल करताना दिसतात.
– पार्श्वभूमी
एन.सी.आर.बी. च्या एका अहवालानुसार देशात वर्षाला ५०००० दलित अत्याचाराच्या घटना घडतात म्हणजे देशात एका दिवसाला १३६ ठिकाणी दलितांवर अत्याचार होत असतो, सरासरी प्रत्येक तासाला ६ दलित ऍट्रॉसिटी च्या घटना देशात होत असतात. तामिळनाडू राज्य जातीय अत्याचारात अग्रेसर आहे आहे, उत्तर प्रदेश आणि बिहार चा रेकॉर्ड तामिळनाडू लवकरच मॉडेल असं चित्र असताना तेथील सामाजिक विषमतेवर ठळकपणे बोलणारे चित्रपट काढणे सोपे काम नाही. द वायर, किंवा कारवाँ मधील नुकतेच छापून आलेले जाती अत्याचाराचे आकडे डोकं सुन्न करणारे आहेत.
तामिळनाडू राज्याला जातीय हत्याकांड, दंगली, जाळपोळ अशी पार्श्वभूमी आहे, १९५७ साली इमॅनुअल सेकरन या दलित लीडर ची जातीय विद्वेषातून हत्या करण्यात आली होती, त्यानंतर तामिळनाडू मधील गावागावात दंगली उसळल्या, कित्येक निरपराध दलित तरुणांची, स्त्रियांची हत्या करण्यात आली होती, यात सर्वात महत्वाचं कारण होतं ते म्हणजे दलित समाजातील तरुणांची प्रगती, हि प्रगती सामाजिक उतरंडीत उच्चजातीय समाजाला पहावत नसे, तामिळनाडू मधील खेड्यांमध्ये बऱ्याच विकृत परंपरा होत्या, मिशी न ठेवणे, तथाकथित उच्च जातीच्या व्यक्ती समोर न बसणे किंवा डोक्यावर पागोटे न घेणे, घोड्यावर, हत्तीवरून मिरवणूक न काढणे वगैरे यातून जितकी अवहेलना आणि विटंबना करता येईल तितकी केली जात असे. या जातीय अत्याचाराचे गांभीर्य समजून घेण्यासाठी रामानाद दंगल, परमकुडी दंगलींचा दाखल देता येईल
कर्णन सिनेमा साधारणपणे तामिळनाडूतील या अशा जातीय अत्याचाराच्या घटनेला मध्यवर्ती ठेऊन तयार केला गेला आहे
३१ ऑगस्ट १९९५ साली तामिळनाडूमधील थूथुकुडी जिल्ह्यातील कोडियानकुलम या पल्लारं समाजातील दलित बहुल गावात ६०० पोलिसांच्या ताफ्याने धुडगूस घातला होता
२८७ घरादाराची राख रांगोळी, लाखाच्यावर दागिने आणि रोकड पोलिसांनी लंपास केली होती, या पोलीस मारहाणीत १८ लोकांचा मृत्यू झाला तर कित्येक अपंग झाले होते. बस मधील एका लहानश्या वादावरून पल्लार दलित आणि मेरवार उच्चं जातीतील लोकांमध्ये हे युद्ध सुरु झालं होतं, तब्बल एक आठवडा या गावात मारहाण, बलात्कार, किडन्याप अशा घटना घडत होत्या, या सर्व प्रकारांना प्रखर प्रतिकार सुद्धा कोडियानकुलम गावातील दलितांनी एकत्र येऊन केला होता परंतु याचा बदला म्हणून ६०० पोलिसांनी विस्फोटक आणि हत्यार बाळगल्याच्या आरोपावरून अक्ख्या गावाला बदडून काढले, हा प्रकार सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु होता, यात पोलिसांनी लोखंडी रॉड, कुर्हाड, दगड, दंडुके जे मिळेल त्याने लोकांना मारलं, तसेच टीव्ही, टेप रेकॉर्ड्स, शिलाई मशीन, मोटरसायकल, मशीन, धान्याची कोठारे, शेतीची उपकरणे सर्वांची नासधूस केली, दलित तरुणांचे पासपोर्ट, शिक्षणाचे दाखले आग लावून नष्ट केले गेले, मेटल डिटेक्टर च्या साह्याने सोने चांदी घराघरात जाऊन शोधले आणि लंपास केले, स्त्रियांची तसेच वृद्धांची विटंबना केली (https://en.wikipedia.org/wiki/1995_Kodiyankulam_violence )
नुकताच प्रदर्शित झालेला मारी सिल्वराज यांचा आणि धनुष अभिनित “कर्णन” प्रसिद्ध झाला त्यावर बोलू काही …
महाभारत आणि कर्णन
महाभारतातील “कर्ण ” किंवा “एकलव्य” हे तसे सिनेविश्वाला नेहमी भुरळ घालणारं पात्र राहिलं आहे.
सर्वगुणसंपन्न असूनही अन्याय ग्रस्त,उपेक्षित असा कर्ण आणि तरीही सरस ठरलेलं हे पात्र,
श्याम बेनेगल यांचा कलियुग, मणी रत्नम यांचा थलपती यातून दर्शवलं गेलंय.
तसेच सिवाजी गणेशन यांनी सुद्धा कर्णन नावाने सिनेमा काढला होता.
पण त्यांचा आशय आणि मांडणी वेगळी होती.
रजनीकांत अभिनित थलपती मध्ये थोडंफार समाजवास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला गेला.
परंतु तो मारी च्या कर्णन इतका प्रभावी नव्हता.
सिनेमामध्ये मात्र धनुष च्या अंगावर थलपती (रजनीकांत) चे पोस्टर असलेले टी- शर्ट दाखवायला मारी विसरला नाही
कर्णन सिनेमा कथेसोबत महाभारत या महाकाव्याचा अस्पष्ट संदर्भ देत इथला सांस्कृतिक दहशतवाद मांडत राहतो. महाभारत किंवा रामायण या कथांचं नॅरेटिव्ह पूर्वापार पासून, टीव्ही, लिखाण, चित्रपट, शालेय साहित्य, कादंबऱ्या अशा माध्यमातून आपल्या समाजात पाझरत ठेवण्याचं काम सतत होत आलं आहे, या कथेत सांगितले गेलेले नायक खलनायक मनामनात कोरले गेल्याने तसेच त्याचा संबंध थेट धर्माशी लावल्याने ते अधिक ठळक होत गेले आणि त्यावर कुणी प्रश्न उभे करण्याचे धाडस केले नाही, ते धाडस मारी सेल्वराज ने केले आहे, महाभारतात वाईट ठरवले गेलेले कौरव, अर्थात दुर्योधन, कर्ण, द्रौपदी, इत्यादी पात्रांना त्याने आपल्या सिनेमात नायक म्हणून समोर आणले आहे तसेच महाभारतातील हिरो कृष्णाला त्याने खलनायक म्हणून मांडले आहे, धमक लागते, अभ्यास लागतो, या सर्व पारंपरिक मानसिकतांना सुरुंग लावताना
महाभारत असो कि रामायण, काल्पनिक कि सत्य या वादाच्या वर जाऊन जर इथले सनातनी लोक त्यांचे आदर्श म्हणून अर्जुनं, कृष्ण आणि रामाला आदर्श मानत असतील तर अभिमन्यू, एकलव्य, कर्ण, दुर्योधन किंवा रावण हि उपेक्षित राहिलेली पात्र जर ज्यांना जवळची वाटत असतील तर त्यांची नावे का धारण करू नये असा रोकडा सवाल मारी करतो . महाभारतातल्या हिरोला म्हणजेच कृष्णाला सरळ सरळ मारी ने कर्णन मध्ये खलनायक म्हणून समोर आणलं आहे, होय ! सिनेमातील जात्यंध पोलीस अधिकारी कन्नबिरन हा मारी च्या कथेतील अघोषित कृष्ण आहे, कन्नाबिरन हे कृष्णाचं नाव आहे !
कष्णाच्या मृत्यूने महाभारत समाप्त होतं, इथे कन्नाबिरन च्या मृत्यूने सिनेमा संपतो, महाभारतातील भीष्म नाईलाजाने स्वतःच मृत्यूला कवटाळतो, मारी ने यमन (मृत्यूचा देवता) च्या रूपाने कर्णन च्या नेहमी सोबत असणारा एक चांगला मित्र म्हणून त्याला असे मरण दिले आहे, तो गावातील हाहाकार थांबावा म्हणून स्वतःला जाळून घेतो, एका ठिकाणी शाळेच्या भिंतीवर गावकरी काढत असलेलं अर्धवट रंगवलेलं चे गव्हेरा चं चित्र यमन कबड्डी च्या खेळासाठी थांबवतो पण त्याच्या मृत्यूनंतर त्या चित्रातील धडावर त्याचा चेहरा आपल्याला दिसतो.
महाभारत अथवा रामायण हे दोन्ही तसे ब्राह्मणी साहित्यातील मेरुमणी, अँटी स्त्री लिखाण असलेल्या या दोन्ही महाकाव्यात एकही स्त्री सुखी असलेली आढळून येत नाही, द्रौपदी, गांधारी, कुंती, उर्मिला, सीता, शूर्पणखा, शबरी अगदी कुठलही पात्र घ्या वस्तुसदृश्य मानून एकांगी लिखाण केलेलं आहे परंतु मारी मात्र सिनेमात द्रौपदी, कुंती या स्त्रीपात्रांना उचित न्याय देतो, सन्मान देतो.
महाभारतातील कर्णाला द्रौपदी स्वयंवरात माशाचा डोळा फोडण्याची संधी मिळत नाही मारी मात्र आपल्या कर्णाला माशाचे एका घावात दोन तुकडे करण्याची संधी देतो पण हे स्वयंवर लग्नासाठीचं नसतं तर सामाजिक संघर्षात नेतृत्व करण्यासाठी असतं. कर्णन आणि द्रौपदी यांच्या प्रेमप्रकरणाला सुद्धा महाभारतीय वलय आहे, महाभारतात सतत विटंबना सहन करत आलेली स्त्री म्हणजे द्रौपदी आणि दुसरा म्हणजे कर्ण, असं म्हणतात कि द्रौपदीला कर्णात जास्त इंटरेस्ट होता, म्हणजे तीच छुपं प्रेम कर्णावर होतं पण द्रोणाचार्य , भीष्म यांचं माप अर्जुनाकडे झुकलेलं होतं. हे दुर्लक्षित राहिलेल्या द्रौपदी – कर्ण प्रेमाला कर्णन मध्ये मारी खुलेपणाने सादर करतो.
कथानक आणि रूपके (सिम्बॉलिक)
लेखाच्या सुरवातीला मांडलं कि मारी,पा रंजिथ किंवा नागराज हे आपल्या सिनेमांमध्ये संवादासोबत रूपकांचा वापर करतात.
प्रत्येक फ्रेम मध्ये काहीतरी असे चिन्हांकित संवाद असतात कि जे चोखंदळ प्रेक्षकांना बरोब्बर समजतात
कर्णन सिनेमात सुद्धा मारी अशा रूपकांना वापरतो जेणेकरून कथानकाला आणखी जास्त प्रभावीपणे मांडता येते, कर्णन मध्ये एक मुंडके नसलेली बुद्धमूर्ती, तलवार, पाय बांधलेले गाढव, उंच भरारी मारणारी घार, दैवी शक्ती वाटाव्यात अशा बाहुल्या, घोड्यांच्या टापा, अडकलेले फुलपाखरू, पोलीस स्टेशन मध्ये वाकडी झालेली डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा या आणि अशा काही रूपकांमधून बरेच संदेश देण्याचा प्रयत्न मारी आपल्या कर्णन मध्ये करतो, अर्थात या प्रत्येक रूपकांना आणि ज्या वेळी हि रूपके पडद्यावर येतात त्या वेळेला गंभीर आशय आहे.
सिनेमाचे सरधोपट दोन भाग आहेत, पहिला भाग ज्यात अन्यायाची ठिणगी
आणि दुसऱ्या भागात विद्रोह आणि संघर्ष अतिशय योग्य ठिकाणी मध्यंतर घेतल्याने सिनेमाची उत्कंठा वाढत राहते.
बरोबर मध्यंतरापूरी गावभर बांधलेले पाय घेऊन लंगडत चालणाऱ्या गाढवाला कर्णन मोकळा करतो,तसं पाहिलं तर मुर्खात गिनती केलेला प्राणी, परंतु गाढव अगदी मेहनती, हुशार, शांत प्राणी आहे, पाय सुटल्याबरोबर तो धावत जाऊन डोंगरकडा गाठतो, यातून मारी हेच दर्शवू पाहतो कि पूर्वापार चालत आलेल्या सामाजिक जोखडातून मुक्त होत नाही तोपर्यंत प्रगतीच्या उंच शिखरावर आपण पोहोचू शकत नाही.
कर्णन सिनेमाच्या सुरवातीला आपल्याला मुंडके नसलेली बुद्धमूर्ती दिसते आणि नंतर वेगवेगळ्या फ्रेम्स मधून हि बोधिसत्व मूर्ती काहीतरी संदेश देऊ पाहते.
(तामिळनाडू मध्ये उत्खननात असंख्य बुद्धमूर्ती सापडल्या आणि विटंबना केल्या गेल्या आहेत)
मूर्तीला जरी मुंडके म्हणजे डोके नसले तरी बुद्धाची सम्यक बुद्धी आपल्या सर्वांमध्ये असायला हवी असं काहीसंतर मारीला सांगायचे नसेल ना ?
கர்ணனும் புத்தனும் இந்த மண்ணில் புதைக்கப்பட்ட வரலாறு #Karnan pic.twitter.com/MsKnjZH0Eh
— Babu Ravindhar (@AnAmbedkarite) March 23, 2021
पुढे ज्या वेळी गावाची परंपरा म्हणून कर्णन उडत्या माशाचे मधोमध दोन तुकडे करतो
आणि नायकत्व स्वीकारतो तेव्हासुद्धा हि बुद्धमूर्ती ओझरती आपल्याला दिसते
जणू काही स्वसंरक्षणासाठी बुद्ध प्रतिहल्ला करण्याची मुभा देतो हेच अधोरेखित होते.
काही समीक्षकांनी कर्णन आणि तलवारीला राजा आर्थर आणि त्याच्या तलवारीच्या कथेशी जोडले आहे,
आर्थर राजाची तलवार एक्सकॅलिबर मुळे त्याला ब्रिटनवर राज्य करण्याचा अधिकार मिळतो
आणि इथे कर्णन ला ती तलवार बाळगण्याचा आणि गावाचं नेतृत्व करण्याचा अधिकार मिळतो
कदाचित हा संदर्भ देखील असू शकतो.
सिनेमात आपल्यासर्वांना अचंभित करणारं पात्र म्हणजे दैवी शक्ती सदृश्य बाहुली.
तामिळनाडू मध्ये उपवर मृत पावलेल्या स्त्रिया दैवी शक्ती धारण करतात
आणि आपल्या सोबत राहतात असं समज आहे.
याच अंधश्रद्धेला मारी वेगळ्या पद्धतीने मांडतो.
सिनेमाच्या सुरवातीला फिट येऊन रस्त्याच्या मधोमध पडलेल्या कर्णन च्या बहिणीकडे कुणीही लक्ष देत नाही.
कुत्र्या मांजरासारखी दलितांची अवस्था,त्यांचं वस्त्यांची असते हे भयानक सत्य मांडतानाच मारी या बाहुल्यांना, देवतांना विचारांचे,आठवणींचे रूप देतो, ज्या ज्या वेळेस कर्णन किंवा गावकरी संघर्षाचा, विद्रोहाचा, न्यायासाठी लढण्याचा विचार किंवा कृती करतात तेव्हा तेव्हा हि बाहुली फार्म मध्ये येऊन टाळ्या वाजवते आनंदी होते.
म्हणजेच अशा कित्येक अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त मृत्यू पावलेल्या आपल्याच आया बहिणींची आठवण त्या प्रसंगी आपण काढतो हेच मारीला अपेक्षित असावं, किंवा त्यांच्या स्मृतींना आपण आपल्या कार्यातून उजाळा देत असतो असं काहीतरी मारीला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं असावं असं मला वाटतं.
according to the native tradition that exists in southern rural parts of tamil nadu, young girls or women who lose their life before getting married are considered equal to god.
the masked girl seen in various parts of the movie is one such representation 🌻 #XrayOnPrime pic.twitter.com/aRVnSlY5xA— prime video IN (@PrimeVideoIN) May 20, 2021
सिनेमात काही तरल, नाजूक दृश्य आहेत, रणरणत्या उन्हात गारवा भासावा तसे ते आहेत, द्रौपदी आणि कर्णाची रासलीला असो, दोघांचे भावनिक गुंतागुंतीचे काही क्षण असो, यमन आणि त्याची म्हातारी मेहुणी यांमधील गोड संवाद, किंवा १० रुपयांच्या बदल्यात तिने मागितलेलं गोड चुंबन असो, दोघे पाण्यात पाय टाकून बसलेले असताना कॅमेरा टॉप व्ह्यूव मधून बदामाच्या आकाराचे पाण्याचे डबकं असो, चोरून चोरून कर्णन चे द्रौपदीला भेटणे असो व दोघातला रुसवा फुगवा, एकमेकांबद्दलची ओढ मारी इतक्या सोप्या आणि सहज पद्धतीने धनुष आणि राजीशा यांच्यावर चित्रित करतो कि प्रत्येक आपल्या आयुष्यात घडून गेलेले क्षण वाटावेत.
उत्तरार्ध – कृष्णवध
एक तो कर्ण होता जो कलागुणांनी प्रवीण असून सुद्धा प्रत्येक वेळी डावलला गेला.
उपेक्षित ठेवला गेला त्याला राजघराण्यात त्याची उचित जागा मिळाली नाही.
पण जातीय उतरंडीत काय असते हि उचित जागा ?
असा सवाल मारी सेल्वीराज विचारतो.
याचा अर्थ इतरांना खाली ढकलून तुम्ही तुमची जागा कायम ठेवणार ?
मारी म्हणतो, “माझा कर्ण असा नाही, त्याला कुठल्या घराण्याचा,पदाचा मोह नाही तो समाजासाठी लढतो तो अस्तित्वासाठी लढतो.”
उंच उडणारी घार कोंबडीच्या पिल्लांना पळवून नेते तेव्हा कर्णन त्याच्या आईला म्हणतो, “किती दिवस अशी त्याच्या दयेवर जीवन जगणार ? किती दिवस असंच रडत राहणार, हळहळणार ?”
इथून मारी संघर्षाच्या बॉम्ब ची वाट पेटवतो आणि भडका उडतो शेवटी, कन्नाबिरम च्या मृत्यूने
बुद्ध आपली ऐषोआरामाचं, राजकुमाराचे आयुष्य सोडून आपला घोडा घेऊन लोककल्याणासाठी जातो तोच कर्णन लोककल्याणासाठी आपली भारतीय सैन्यातील नोकरीवर लाथ मारून घोड्यावर पुन्हा गावात येतो, माहित नाही पण मला बुद्धाच्या तत्वांशी आणि आयुष्याशी निगडित वाटल्या काही फ्रेम्स, नसतीलही तशा, घोड्यावर कर्णन चे पुन्हा येणे याला काहीतरी महत्व आहे, एकतर महाभारतातील शेवटची लढाई घोड्यावर झाली किंवा गाढवासारखे गणले गेलेले माणसं घोड्यावर बसतात तेव्हा चित्र बदललेलं असतं असा काहीसं निष्कर्ष सुद्धा काढता येऊ शकतो.
कन्नाबिरम हे कृष्णाचे दुसरे नाव, हाच कन्नाबिरम म्हणजे सिनेमातील क्रूरकर्मा पोलीस अधिकारी ज्याला त्याच्या समोर बसलेले, त्याला स्पर्श केलेले, त्याच्या समोर डोक्यावर पगडी घातलेले आणि सर्वात महत्वाचे महाभारतातील पात्रांची नावे दलित समाजातील लोकांनी ठेवलेले आवडत नसे, हा त्याला अपमान वाटतो, या रागातून तो संपूर्ण गावावर अत्याचार सुरु ठेवतो, त्या कन्नाबिरम चा शेवट मारीचा कर्ण करतो. एकाच वेळी कथानकाचा आणि सांस्कृतिक दहशतवादाचा गळा याठिकाणी चिरला जातो
मारी किंवा पा रंजीथ किंवा नागराज आपल्या सिनेमातील पात्रांना अचाट ताकद असलेला नायक कधीच दर्शवत नाहीत, त्यांचा नायक आपल्यातलाच वाटावा इतका साधा सिम्पल असतो, मिलिटरीतील धावण्याच्या परीक्षेत सुद्धा मारी चा हिरो लोकांना रेटत पुढे येत नाही, सर्वसामान्य लोकांसारखा तो ताटकळत उन्हात उभा राहतो, अनवाणी पायाने धावतो आणि कसातरी रेषा पार करतो पण असं असूनही कॅमेरा फक्त धनुष्य वर न राहता प्रयत्न करूनही हरलेल्या युवकावर खिळतो, तिथे जीवाची घालमेल होते. प्रश्न स्पर्धेत जिंकण्याचा हरण्याचा नाही प्रश्न आहे स्पर्धेच्या आधीच स्पर्धेतून बाहेर ठेवण्याचा आहे हे इथे मारी अधोरेखित करतो.
सिनेमा हा निव्वळ मनोरंजनासाठी असतो या अंधश्रद्धेतून भारतीयांनी आतातरी बाहेर यायला हवं.
गरीब श्रीमंत, जेम्सबॉन्ड, गरिबांचा मसीहा, चोर पोलीस आणि प्रेमाचे त्रिकोण चौकोन झाले असतील तर समाजातील वाईट परंपरा, जातीय धर्मांध अत्याचार, उपेक्षित राहिलेला समाज, अजूनही बळावत चाललेली बुरसटलेली मानसिकता, लैंगिक भेदाभेद यावर बोलूया न काही .. सिनेमा नावाच्या नव्या आयुधांतून ..
नाहीतर बस थांबत नाही म्हणून दगड मारणारे हजारो हाथ या समाजात तयार होतील !!
लेखन – अमोल गायकवाड
(लेखक सिने नाट्य समीक्षक आहेत)
भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने -1
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 21 , 2021 08 : 02 AM
WebTitle – karnan cinema review in marathi 2021-05-21
सविस्तर विस्तृत लेख लिहला ….धन्यवाद