सध्या इम्पिरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या नावानं नागीण डान्स करत आहेत.आघाडी सरकारच्या नावानं खापर फोडत आहेत ! बावनकुळे वगैरे लोक मस्त पुंगी वाजवत आहेत. प्रा. हरी नरके यांनी तर फडणवीस यांना खुलं चॅलेंज दिलं आहे. पण त्याचवेळी पंकजा मुंडे यांना देखील त्यांनी जाब विचारायला हवा. केवळ जात पाहून कुणालाही चोर ठरवता कामा नये. किंवा दुसऱ्याला क्लिनचीट देवू नये ! मुंडे त्या विषयावर का चूप आहेत ? त्यांनी दिल्लीला पत्र वगैरे लिहिलं होतं, ते कुणी केराच्या पेटीत टाकलं हे मुंडे यांनी जाहीरपणे सांगायला हवं ! म्हणजे जनतेलाही खरे चोर कळायला मदत होईल.
पाच वर्षे फडणवीस सत्तेत होते. त्यांना ओबीसींचा एवढाच कळवळा होता, तर त्यावेळी यांनी काय केलं. एकतर दिल्लीतून डाटा मागवून घ्यायचा होता किंवा नवी माहिती गोळा करायची होती. या केसमध्ये फडणवीस हेच मुख्य व्हीलन आहेत. पण स्वतःला ओबीसी नेते म्हणून मिरवणारे एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, त्यांची खासदार बहीण, चंद्रशेखर बावनकुळे हे लोक तेव्हा काय करत होते ? यांनी आवाज का उठवला नाही ? कार्यकर्त्यांना राजीनामे द्यायला तेव्हा का सांगितलं नाही ? की यांना पद मिळाले नाही, तेव्हा ओरडण्यासाठीच फक्त समाज आठवतो ?
हीच अवस्था काँग्रेस, राष्ट्रवादी यांची देखील आहे. २०१० ते २०१४ या काळात त्यांचंही सरकार महाराष्ट्रात होतं. त्यांनी काय केलं ? ते का चूप बसले ? त्यांनी का नाही पुढाकार घेवून इम्पिरिकल डाटा गोळा केला ? त्या पक्षातील छगन भुजबळ हे तर ओबीसींचे ज्येष्ठ नेते आहेत ! किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी मधील इतर ओबीसी नेते काय करत होते ? प्रश्न राहिला शिवसेनेचा.. तर सेना आधीपासून आरक्षण विरोधी भूमिकेतच आहे. त्यामुळे त्यातील ओबीसी नेत्याकडून अपेक्षा करण्याचा प्रश्नच नाही.
मात्र सत्ता गेली की, प्रत्येक पक्षातील राखीव ओबीसी नेत्यांना अचानक पंख फुटतात. फडफडू लागतात. पक्षही त्यांना नटवून सजवून मैदानात उतरवतो ! मेळावे घेतात. मीटिंगा घेतात. ओबीसी समोर गारुड्याचे प्रयोग सुरू होतात. साप मुंगूस यांच्या लढाईच्या नावावर जनतेला उल्लू बनवतात. प्रत्यक्षात मात्र ना लढाई होत..ना मुंगूस सापाचे तुकडे करत. गारुडी असो, साप असो की मुंगूस असो, तिघांचेही हितसंबंध गुंतलेले असतात.
ह्या प्रस्थापित राजकीय पक्षांचे ओबीसी सेल सुद्धा असतात. हे सेल नेहमीच कंडम झालेले असतात. कोणत्याही कामाचे नसतात. लेटर हेड छापायची सोय, एवढाच यांचा उपयोग असतो. पण तरीही हे लोक ओबीसींच्या नावावर भोळ्या भाबड्या करकर्त्यांना गोळा करत असतात. समाजाची दिशाभूल करत असतात. समाज देखील विचार न करता यांची पाठराखण करत असतो. आणि शेवटी असा खड्ड्यात जाऊन पडतो.
लक्षात ठेवा, गब्बरसिंगच्या टोळीत असलेले कालिया, सांभा देखील तेवढेच जबाबदार असतात. त्यांना सहानुभूती म्हणजे गब्बरलाच अप्रत्यक्ष सपोर्ट असतो.
तेव्हा..कुणाचीही जात पाहून डाकू ठरवू नका. चोराला चोर म्हणा, डाकूला डाकू म्हणा, सावाला साव म्हणा ! स्वतःही फसू नका, समाजालाही फसवू नका !
तूर्तास एवढंच..
–
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान
9822278988
बहुजन म्हणजे कोण : नवे संदर्भ, नवे अर्थ
First Published on JULY 12, 2021 19 : 21 PM
WebTitle – Imperial data: Fadnavis, Khadse, Pankaja Munde .. all responsible! 2021-07-12