भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक दिग्गज कलाकार होऊन गेलेत. काही कलाकारांनी आपले स्वतःचे ट्रेंडस निर्माण केलेत. त्या विशिष्ट शैलीमुळे त्यांचे नाव अजरामर झाले. त्या पठडीतील एक मराठी कलाकाराविषयी आज आपण जाणून घेऊया. या कलाकाराच्या कारकीर्दीची सुरुवात एॅक्शनपटांनी झाली होती. या हरहुन्नरी भगवानदादांच्याबाबत आज आपण जाणून घेऊया.ज्यांनी स्टंटबाजी केली, विनोदी भूमिका केली, हिरो म्हणून चंदेरी दुनियेत नाव कमावले.जवळपास तीनशे चित्रपटात काम केले.भगवानदादा मुळचे अमरावतीचे. भगवान आबाजी पालव हे त्यांचे नाव.
जीवनप्रवास
१ आॅगस्ट १९१३ रोजी त्यांचा जन्म झाला.सुरवातीच्या काळात ते खूप गरीब होते. त्यांचे वडील मीलकामगार होते. सर्वसामान्य गरीब कामगाराची मुलं जगतात तसे जीवन बालपणी ते जगले,चाळीत वाढले.त्यांच्या अभिनयाची सुरुवात मूकपटातून झाली. हिरो बनण्यासाठी सुंदर चेहरा, आकर्षक शरीरयष्टी हवी हा समज भगवानदादांनी मोडून काढला. ते फार सुंदर नव्हते पण त्यांच्याकडे कला खूप होती.मुकचित्रपटातुन काम केल्यानंतर स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी १९५१ साली स्वतःच्या बळावर त्यांनी अलबेला या सिनेमाची निवड केली. हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला. पैशांचा अक्षरशः पाऊस पडला. भगवानदादा रातोरात स्टार झाले. स्वतःची वेगळी डान्सिंग स्टाईल आणि विनोदी भूमिका करण्याचे कसब या बळावर चाळीत राहत असलेल्या भगवानदादांनी समुद्र किनारी २५ खोल्या असणारा बंगला खरेदी केला, ७/८ गाड्या घेतल्या.चेंबूरमध्ये स्वतःचा एक स्टुडिओ उभा केला.
“भोली सुरत दिल के खोटे” “शोला जो भडके” ओ अरबोंके हेरफेर करनेवाले रामजी, सवा लाख की लॉटरी भेजो अपने नाम जी” या आणि अशाच अनेक गाण्यांमध्ये त्यांनी जो अप्रतिम डान्स केला आहे त्यामुळे अनेक कलाकारांनी प्रेरणा घेतली. ज्या कलाकारांना नृत्य येत नव्हते ते भगवानदादांनी केलेल्या डान्स स्टेप करायचे. अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती, गोविंदा यासारख्या अनेक कलाकारांनी भगवानदादांनी केलेल्या डान्स स्टेप आपआपल्या सिनेमात केल्या आहेत.
स्टुडिओला आग लागली
१९६० च्या दशकात कॉमेडी चित्रपट चालेनासे झाले. त्यासुमारास रोमँटिक सिनेमांची चलती सुरु झाली.
भगवानदादा हा बदल हेरू शकले नाहीत. दादांचे विनोदी चित्रपट चालले नाहीत.
कलाकारांचा मनमानीपणा, सेटवर न येणे यामुळे भगवान दादांना आर्थिक फटका बसला.
तसेच भगवानदादांचा अवाजवी खर्च, व्यसन यातही बराच पैसा गेला.
अशातच त्यांनी निर्माण केलेल्या स्टुडिओला आग लागली.दादांनी निर्माण केलेल्या सर्व चित्रपटांच्या निगेटिव्हज आगीत जळून गेल्या.
त्यातली एकच निगेटिव्ह वाचली होती ती म्हणजे अलबेला या चित्रपटाची.
कारण ती निगेटिव्ह दादांनी एका सावकाराकडे गहाण ठेवली होती.आगीच्या एका घटनेमुळे होत्याचे नव्हते झाले. कर्जाचा डोंगर वाढला. कर्जापायी गाडी, बंगला सर्व काही गेले आणि ज्या चाळीतून त्यांनी सुरवात केली होती त्याच चाळीत त्यांना परतावे लागले.
मुस्लिम समाजातील अनेक कलाकारांना दादांनी संरक्षण दिले
पैशांसाठी आता त्यांना चरित्र भुमिका कराव्या लागत होत्या.छोटे रोल करावे लागत होते. काही चित्रपटात तर त्यांनी गाण्यात फक्त त्यांची सिग्नेचर स्टेप केली आहे. ६५ सालांच्या प्रदीर्घ कालात त्यांनी खूप सुंदर चित्रपट केले. अनेकांना चित्रपटात लॉंच केले. संगीतकार सी.रामचंद्र (रामचंद्र चितळकर), आनंद बक्षी यासारख्या अनेक दिग्गज कलाकारांना भगवानदादानींच पुढे आणले. राज कपूर यांच्यासोबत भगवान दादांची घनिष्ठ मैत्री होती.ऋषी कपूर यांना भगवान दादांनी डान्स शिकवला.
ललिता पवार आणि भगवानदादा यांच्याबाबत एक घटना प्रसिद्ध आहे. १९४२ सालच्या एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान दादांना ललिता पवार यांना एक थप्पड मारायची होती. दादांनी थप्पड तर मारली पण ललिता पवार यांच्या डोक्यावर लागली. डोळ्यात असलेली एक नस कायमची खराब झाली. ललिता पवार यांच्यावर तीन वर्षे इलाज केला गेला पण त्यांच्या डोळ्याची नस पूर्ववत झाली नाही. नंतर ललिता पवार यांनी अनेक चरित्र भुमिका केल्या. नकारात्मक भूमिका केल्या. नकारात्मक भूमिका असलेले त्यांचे चित्रपट खूप गाजले. ललिता पवार याचे श्रेय दादांना देतात.
१९४७ साली देश स्वतंत्र झाला पण त्याकाळी हिंदू आणि मुस्लिम दंगली झाल्या. मुस्लिम समाजातील अनेक कलाकारांना दादांनी संरक्षण दिले होते. रंकाचा राव आणि रावाचा रंक होण्याचा हा प्रवास भगवान दादांनी केला. अशा या हरहुन्नरी कलाकाराचे निधन ४ फेब्रुवारी २००२ साली ह्रदयविकाराने झाले.
मागील पोस्ट सिरिज साठी खालील लिंकवर क्लिक करा
1 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने -1
2 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 2
3 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 3
4 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 4
5 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 5
6 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 6
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
Comments 1