“एक तरूण गणपत आबांकडे त्यांच्या अॉफिस मध्ये गेला आणि बराच वेळ ताटकळत उभारला. आबांसमोर सगळ्या फाईली, भरपूर कामं, शेतकऱ्यांची गाऱ्हाणी, व्यापारी असा सगळा सकाळ सकाळचा जनतेचा दरबारच भरलेला. शांतपणे एक एक काम (गणपतराव देशमुख) आबा समजावून घेत आहेत, सूचना करत आहेत आणि बराच वेळ तो तरूण उभारलेला त्यांच्या अचानक लक्षात आले, त्यांनी त्याला समोर बोलावले आणि विचारले.
” काय काम आहे तुझं.?” “आबा,माझे वडील सार्वजनिक बांधकाम खात्यातून मैल मजूर म्हणून सेवानिवृत्त झाले आणि दोन वर्षे होत आली अजून पेन्शन मिळाली नाही. त्यांच्या उपचारावर खर्च होत आहे.”
त्याचं बोलणं अर्धवट तोडत आबा म्हणाले, “पण कुठं आहेत तुझे वडील?” “आबा, ते बाहेर टमटममध्ये बसले आहेत, त्यांचा अपघात झाला होता, आणि पाठीला मार लागल्याने त्यांना चालता येत नाही.” असं म्हणताच तेव्हा नव्वदीत पोचलेले आबासाहेब, ज्यांना स्वतःला धड चालता येत नव्हते अशा अवस्थेत ते बाहेर आले आणि टमटममध्ये जाऊन त्या व्यक्तीचं गाऱ्हाणं ऐकलं आणि तिथूनच तात्काळ पुण्यातल्या अधिकाऱ्याला फोन लावला.

तो टमटममध्ये बसलेला व्यक्ती म्हणजे सांगोला तालुक्यातील संगेवाडी गावचे माझे भाऊजी मोहन नामदेव वाघमारे व तो तरूण त्यांचा मुलगा विकास.
स्वातंत्र्यानंतर कॉग्रेसवर भांडवलदारधार्जिणं असल्याचा सरळासरळ आरोप करून, सोलापूरच्या मॅकेनिकी चौकात ज्यांच्यावर ब्रिटिशांनी लाठीचार्ज केला ते कॉग्रेसमधूनच फुटून बाहेर आलेले दहिटण्याचे तुळशीदास दादा जाधव, सत्यशोधक केशवराव जेधे, खासदार शंकरराव मोरे, भाऊसाहेब राऊत, दत्ता देशमुख या तरूणांनी एकत्र येऊन ३ अॉगस्ट १९४७ रोजी आळंदी येथे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली.
कास्तकार बापाच्या पोटी जन्मलेले,बांधावरून आलेले ते जैविक बुद्धीजीवी तरुण
शेतकरी जातवर्गीय भान व नेणीव याचे चांगलेच भान असल्याने किंबहुना कास्तकार बापाच्या पोटी जन्मलेले,बांधावरून आलेले ते जैविक बुद्धीजीवी तरुण होते म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक रूप धारण करून जो दबदबा निर्माण केला तो महाराष्ट्रातील बहुजनांस अजूनही प्रेरणादायी आहे.
१९५२ साली शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभेत २८ आमदार होते.शेतकरी जातवर्गीय तरूणांना उभे करण्यासाठी शेकापने पाच पाच दिवसांचे कॅडर कॅम्प खेड्यापाड्यात घेतले आहेत.
सोलापूर जिल्हा तर शेकापच्या विचाराने भारलेला जिल्हा होता. माळशिरस मधून तुकाराम मोरे आमदार निवडून आले. मोहोळ मधून बाबुराव अण्णा तर शेकापच्या संस्थापक सदस्यातून होते, बार्शीतून दहिटणे तर खुद्द तुळशीदास जाधवांचे गाव, वैरागमधून निंबाळकर, डिसले, माढ्यातून निवडून आलेले भाई एस.एम तात्या व सांगोल्यातून गणपत आबा म्हणजेच गणपतराव देशमुख.
उस्मानाबादच्या परांड्यातून भाई उद्धवराव पाटिल असेच कित्येक ग्रेट लोक ज्यांच्या नावाची दखल घेणं या लेखाच्या आवाक्याबाहेर आहे.
समाजाला त्यागाचं आकर्षण मोठं असतं,भोगाचं नाही.
अशा ध्येयवादी व समर्पित भावनेने जगणं शेतकरी कामगार, कष्टकरी या सर्वहारांसाठी अर्पण केलेल्या पिढ्यातून आबासाहेबांच्या नेतृत्वाचा जन्म झालेला होता.समाजाला त्यागाचं आकर्षण मोठं असतं,भोगाचं नाही.यामुळेच अक्ख्या सांगोल्याने आबासाहेबांवर,त्यांच्या ऋजू स्वभावावर भरपूर प्रेम केलं व त्यांना रेकॉर्डब्रेक आमदार केलं.शेकापचं अधिकृत चिन्ह बैलगाडी जेव्हा निवडणूक आयोगाने गोठवलं तेव्हा सांगोल्याच्या रस्त्यावर अश्रू, संतापाची लहर मी बघितली आहे.
आबासाहेब, जेव्हा जेव्हा विधानसभेत बोलायला उभे राहत तेव्हा विरोधकसुद्धा शांतपणे त्यांचं अभ्यासपूर्ण बोलणं ऐकत असत. सांगोला तालुक्यातील त्यांच्या राजकीय विरोधकांनासुद्धा त्यांच्या धवल चारित्र्याची भीती वाटत असे.उभ्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आपल्या स्त्रियांच्या रोजगारासाठी महिला सूतगिरणी उभी केली.
सांगोला सारख्या दुष्काळी तालुक्याला जगाच्या नकाशावर जिओ टॅगिंग सहीत पोचवणारे आबासाहेब
सांगोला सारख्या दुष्काळी तालुक्याला जगाच्या नकाशावर जिओ टॅगिंग सहीत पोचवणारे आबासाहेब होते.
अजनाळे म्हणून एक सांगोला तालुक्यात गाव आहे
तिथले लोक तेव्हा वीस पंचवीस वर्षांपूर्वी रोजगार हमीच्या कामावर खडी फोडायला जात असत,
आज तिथं जाऊन बघा तेही ड्रोन कॅमेऱ्यांच्या डोळ्यातून बघा
हजारो भली मोठी शेततळी दिसतील, डाळींबाचे मळेच्या मळे दिसतील,
प्रत्येक बागायतीत भलेमोठे बंगले दिसतील आणि त्या बंगल्यासमोर लाखो रूपयांच्या अलिशान गाड्या दिसतील.
एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा तनमनधनाच्या समर्पनभावाने काम करतो म्हणजे काय होतं त्याचं हे उदाहरण आहे.
कर्तव्य , कष्ट, निष्ठा याबाबत ते कर्मठ व कठोर होते. अत्यंत साधी राहणी होती त्यांची.जुन्या काळातील ते लॉ ग्रॅज्युएट होते.
आमचे भाई एस एम तात्या वारले तेव्हा त्यांच्या अंत्यविधीला गणपतराव देशमुख आबा आले होते
तेव्हा म्हणजे साधारण पाचसहा वर्षापूर्वी मी त्यांना शेवटचे पाहिले होते.
दोन धोतर जोडीवर वर्षानुवर्षे काढणारे जसे एसएम तात्या होते तसेच आबाही.
आबा जोवर आहेत तोवर कुणी सांगोला तालुक्यात काड्या करायची हिंमत केली नाही.
करूणानिधी हे भारतात टॉपमोस्ट आमदारकी करायचं उदाहरण आहे म्हणजे
तब्बल ११ वेळा ते निवडून आलेले आमदार
तब्बल ११ वेळा ते निवडून आले होते त्यानंतर भारतातलं दुसरं उदाहरण हे आबासाहेबांचंच होतं.
अशा लोकांनी महाराष्ट्रात काम केलं आहे यावर भावी पिढ्याच विश्वास ठेवतील कि नाही सांगता येणार नाही.
थकले होते, काल रात्री शांत झाले. शेवटचे बुरूज ढासळू लागले.ध्येयवादी,
व कल्याणकारी राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद झाल्याचे हे दिवस आहेत.
त्यांच्यानंतरच्या लोकांना पुनश्च सुरूवात करत, पुनरूज्जीवनाची गरज आहे.
अॅड. गणपतराव देशमुख यांना सादर क्रांतिकारी अभिवादन !!! स्मृतीस भावपूर्ण आदरांजली.
हेही वाचा.. सयाजीराव गायकवाड: आधुनिक भारतातील ‘शैक्षणिक क्रांती’चा दस्ताऐवज
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 31, 2021 22:00 PM
WebTitle – financial-fraud-of-unemployed-youth-under-cm-employment-scheme