राजकारण कोणासाठी ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३० सप्टेंबर १९५६ रोजी दिल्ली तत्कालीन शेकाफेच्या कार्यकारणीच्या बैठकीत, एक जातीय राजकारण संपुष्टात आणून सर्वसमावेशक अशा रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली अन् डॉ.बाबासाहेबांच्या पश्चात ६३ वर्षापुर्वी म्हणजेचं, ३ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ची स्थापना करण्यात आली. तत्पुर्वी, प्रबुद्ध भारत’मध्ये बाबासाहेबांचे १ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतीय जनतेला उद्देशून खुले पत्र प्रकाशीत झाले होते. हे पत्रचं रिपब्लिकन पक्षाचा आराखडा मानला जातो.
सामर्थ्यवान विरोधी पक्ष
दोन लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने सामान्य उमेदवारांकडून बाबासाहेबांचा पराभव केला होता. कर्तृत्वापेक्षा पक्षाला महत्त्व आले होते. अन् या पक्षाचे असेचं प्राबल्य राहिले तर, बाबासाहेबांनी महत् प्रयासाने उभारलेला लोकशाहीचा डोलारा उध्वस्त व्हायला वेळ लागणार नव्हता. तसे झाले असते तर, एकाचं पक्षाला महत्त्व प्राप्त झाले असते. अन् हा पक्ष आपल्या पाशवी बळाच्या आधारे अभूतपूर्व अशी अंधाधुदी माजवू शकला असता.
देशहिताच्या दृष्टिने यावर एकचं पर्याय म्हणून त्यांनी सामर्थ्यवान विरोधी पक्ष निर्माण करण्याच्या व्यापक, सर्वसमावेशक दृष्टिकोणातून काही नेत्यांना पत्रे पाठवून, भारतीय जनतेला उद्देशून खुले पत्र लिहून रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. त्यात बाबासाहेब म्हणतात, न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हि पक्षाची ध्येय असतील, पक्षाचं स्वरुप प्रादेशिक न राहता ते देशव्यापी असेल असे स्पष्ट करुन बाबासाहेब आपल्या अनुयायांना लिहितात, हा पक्ष देशातील सर्व दलित, पिडीत आणि शोषीत जनतेच्या हिताचा रक्षणकर्ता असेल.
अशोक चक्रांकीत निळा झेंडा
शासनकर्ती जमात बनतांना जो पक्ष आपलं कल्याण करील, त्यांच्याशी हातमिळवणी करा. दुसऱ्या पक्षांशा सहकार्य करतांना आपला पक्ष, त्याचे तत्त्वज्ञान, ध्येय यांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. नेता एकचं असावा, पक्षाचं चिन्ह हत्ती हे बुध्दकालीन संस्कृतीमधील प्रतीक तर, अशोक चक्रांकीत निळा झेंडा हे निशाण असाव असे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या पक्षाबद्दलचे मत स्पष्ट, व्यापक, प्रभावशाली सर्वसमावेशक अन् देशहिताचे होते.
३ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर मुक्कामी लाखो आंबेडकर अनुयायी, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या स्थापनेसाठी उपस्थित होते. नेत्यांमध्ये मतभेद होते तरी, रिपब्लिकन पक्ष स्थापनेचा संमत ठराव ऍड. बी. सी. कांबळेंनी मांडला त्याचा काही भाग, – ‘हा नवनिर्मित पक्ष साम्यवाद, समाजवाद, गांधीवाद किंवा आणखी कोणत्याही तत्सम वादाला बांधून घेणार नाही. भारतीय जनतेच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व नैतीक प्रगतीसाठी हा पक्ष बुध्दीवादी आणि आधुनिक दृष्टीने काम करेल.
रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेपुर्वीचं वादविवाद अन् गट
काँग्रेसच्या प्रतिगामी शक्तीला पर्यायी विरोधी पक्ष म्हणून उभा राहिल.’ मात्र, रिपब्लिकन पक्षाची स्थापना ३ ऑक्टोबर १९५७ ची प्रेसिडीयमच्या सर्व सदस्यांनी ठरविल्याप्रमाणे हा पक्ष, ३ ऑक्टोबर १९५८ पर्यंतचं टिकला. वर्षभरात या पक्षाच्या धुरीणांनी विशेषतः एन. शिवराज, दादासाहेब गायकवाड आदी मंडळींनी या काळात पक्षाचा जाहिरनामा, घटना, राज्य, केंद्रिय कार्यकारीण्यांच्या परिपुर्तता न केल्याचे कारण सांगून ऍड. बी. सी. कांबळे, आवळे बाबू, दादासाहेब रुपवते यांनी नवा रिपब्लिकन पक्ष स्थापन करुन, दादासाहेब गायकवाड, एन. शिवराज, बॅ. खोब्रागडे यांच्यावर मात केली. हा नव्याने स्थापन झालेला रिपब्लिकन पक्ष म्हणजे दुरुस्त रिपब्लिकन पक्ष तर जुना, नादुरुस्त रिपब्लिकन पक्ष. म्हणजे, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेपुर्वीचं वादविवाद अन् गट होते दुर्लक्षित करता येणार नाहित, अन् त्यानंतरची वाटचाल कोणत्या दिशेनी चालली हे समोरचं आहे.
बाबासाहेबांच्या पश्चात त्यांची पोलादी, प्रभावशाली, बलाढ्य एकसंघ असलेली संघटना, त्यांना अभिप्रेत असलेली रिपब्लिकन पक्षाची राजकिय चळवळ सामाजिक, राजकीयदृष्टया सक्षम नेतृत्वाअभावी, मतभेद, अहंकार, स्वार्थी राजकिय आकांक्षेपोटी एकसंघ न राहता, गटा तटात विभागला जाऊन दिशाहीन, भरकटत गेली. बाबासाहेबांच्या पश्चात त्यांना अभिप्रेत असलेल्या बलाढ्य संघटनेचा राजकिय पाया अधिक व्यापक, बळकट करण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. मात्र, गटा तटाच्या नेत्यांनी स्वतःचे अस्तित्व जीवंत ठेवण्यासाठी इतर राजकीय पक्षांशी तडजोड केली.
वाढत्या अन्याय अत्याचार प्रकरणी आपल्याला किती प्रकरणी न्याय मिळाला ?
एवढे गटा तटाचे नेतृत्व बेफिकीर, दिशाहीन का बनावं ?
सामाजिक, राजकीयदृष्टया आपणचं एकसंघ, कार्यान्वित, दिशादिग्दर्शित नसू तर,
बहुजन समाजासह इतर समाज आपल्याकडे कसा आकर्षित होणार ?
अन् आपण शासनकर्ती जमात बनून, सर्वसमावेशक नेतृत्व कसे देणार ?
आपल्या समाजाच्या मतांवर आपल्याला निवडणूका जिंकता येणं शक्य नसले तरी,
इतर पक्षांबरोबर अथवा समाजाबरोबर जातांना,त्यांना एकत्र करतांना आपल्या समाजाला गृहित किंवा दुर्लक्षित करता येईल का ?
इतर पक्ष किंवा इतर समाजाचे नेते आपल्या सोबत असले तरी,
त्यांचा मतदार अन् समाज आपल्या सोबत येण्याइतपत अजून त्यांचे मानसिक परिवर्तन झाले आहे का ?
त्यामुळे त्यांच्यावर पुर्णपणे अवलंबून राहता येणार नाही.राजकारण हे फक्त निवडणूका लढविणे एवढेचं मर्यादित नसून, ते सत्ता अन् कायदे निर्माण करण्याची शक्ती निर्मितीचे केंद्र असल्यांने गेल्या अनेक वर्षांपासून वाढत्या अन्याय अत्याचार प्रकरणी आपल्याला किती प्रकरणी न्याय मिळाला ?
गटा तटाचे नेते मंडळी जेवढे जबाबदार असतील तेवढा समाजही जबाबदार
राजकारणांत बेरजेचे राजकारण चालते पण, आपले राजकारण गटा तटाच्या बेरजेत वाढले. अशांने आपले गटा तटाच्या माध्यमातून क्षणाक्षणाला कणांकणांने होत चाललेले राजकीय पतन आपल्याला अभिमानास्पद आहे का ? डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या सदस्थितीला सर्वस्वी जबाबदार गटा तटाचे नेते मंडळी जेवढे जबाबदार असतील तेवढा समाजही जबाबदार आहे. आपणचं, नेत्यांच्या मागे गेलोचं नसतो तर एवढे गट तट निर्माण झालेचं नसते. अन् समाजाचा अंकुश असता तर, अनेकवेळा झालेली ऐक्ये क्षणभंगूर ठरली नसती. अहंकार, मतभेदापायी आंबेडकरी सामाजिक, राजकिय निष्ठा गौण ठरली. बाबासाहेबांच्या पश्चात आज आपला राजकीय पाया काय आहे ?
राजकारण कोणासाठी?
डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक, राजकीय व इतर प्रश्नांबाबत आपण उपेक्षित का ?
ज्या क्रांतीकारी चळवळीला तत्वज्ञान आहे, क्रांतीकारी सामाजिक बांधिलकी आहे.
त्याचं चळवळीसमोर पर्याय नसल्यांने आज अनेक प्रश्नचिन्ह आहेत.
अन्याय, अत्याचार अन् भावनिक प्रश्नांपुरती चळवळ लढते आहे.
राजकीय प्रवाहात स्वतःचे वेगळे निर्णायक, शक्तीशाली स्थान कधी निर्माण केले नाही तर,
मतलबी आंबेडकरव्देषी लबाड लांडगे आपल्याला राजकिय प्रवाहात गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाहित.
सर्व राजकीय पक्षांनी आजपर्यंत नुसता आपला फायदाचं करुन घेतला आहे. राजकीय क्षेत्राबद्दल समाजात नैराश्य आहे.
त्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे आपल्या राजकिय गटा तटांचा फायदा
इतर राजकिय पक्षांनाचं होणार असेल तर राजकारण का,कशासाठी अन् कोणासाठी हा प्रश्न उपस्थित राहतो.
बाबासाहेब ज्या ध्येय धोरणांशी उभे ठाकले होते अन् ज्यासाठी त्यांनी अक्षरशः आपले जीवन कुर्बान केले होते,
त्यांच्या ध्येय धोरणांशी, कार्याशी आपण प्रामाणिक राहिलो असतो तर,
देशाच्या राजकारणात रिपब्लिकन पक्षाचे निश्चितचं वेगळे अढळ स्थान निर्माण झाले असते
अन् आज आपण ६३ वा वर्धापनदिन जल्लोषात साजरा केला असता.
रिपब्लिकन पक्ष आणि त्याची शोकांतिका
दुर्गाबाई भागवत यांच्या वेश्यासंबंधीत मतावर समाचार घेणारे राजा ढाले
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)