भारतातील मागासवर्गीय महिलांच्यावर होणारे अन्याय अत्याचार हे देशाला नवीन नाहीत. मागासवर्गीय महिलेवर बलात्कार झालाय ना? मग ठीक आहे फार काही बिघडले नाही. अशी एक विकृत मानसिकता तथाकथित सवर्ण आणि उच्चवर्णीयांमध्ये आहे.दलित अत्याचार आणि तथाकथित उच्चजातीयांची मानसिकता.
मागासवर्गीयांना धर्माचे मानत नाहीत
मागासवर्गीय हे लोक अन्याय आणि अत्याचार सहन करण्यासाठी जन्माला आलेले आहेत अशी तथाकथित सवर्ण आणि उच्चवर्णीयांची समजूत आहे,आणि ती काही अंशी त्यांच्या दृष्टिकोनातून खरी आहे. त्यांच्यावरती आजवर जे झालेले संस्कार आहेत ते संस्कार म्हणजे पोथीपुराणातून आलेले संस्कार आहेत.जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा धर्माचे उत्थान करण्यासाठी देव अवतार घेतो अशा अर्थाचा एक श्लोक आहे.मागासवर्गीय लोक म्हणजे धर्माला आलेली ग्लानी आहे हे त्यांना वाटत असावे.
उच्चवर्णीयांच्या धर्मामध्ये मागासवर्गीयांना काहीएक अधिकार नाही त्यांना हीन दर्जाचे स्थान आहे. भले ते आपल्याच धर्मातील का असेनात परंतु अशा लोकांना ते आपल्या धर्माचे मानत नाहीत मागासवर्गीय म्हणजे केवळ एक कामगार, गुलाम , आणि पिळवणूक करू शकू असा घटक आहे. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेश मधल्या हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेबद्दल आहे.
धर्म व्यवस्थेकडे त्यांना न्याय मागण्याची मुभा नाही
भारतामध्ये प्रचलित जी समाज व्यवस्था आहे त्यामध्ये धर्माचा फार मोठा वाटा आहे.आणि या प्रमुख धर्मांमध्ये हिंदू धर्म खूप मोठा आहे.
हिंदू धर्मामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे.या व्यवस्थेमध्ये पहिले दोन घटक सोडले तर बाकीचे दोन घटक
म्हणजेच ओबीसी आणि अनुसूचित जाती जमाती हे आहेत.
पहिल्या दोन घटका इतके नसेल पण धर्मसंरक्षण ओबीसीनांही आहे. आता हे धर्मसंरक्षण म्हणजे काय पाहूया.
जात उतरंडीवरच्या वरील तीन उतरंडीवर असलेल्या जात समुदायांना त्यांच्या लोकसंख्येच्या नुसार आणि त्यांच्या अधिकारानुसार धर्माचे संरक्षण पिढीजात प्राप्त झाले आहे. आणि याच धर्म संरक्षणामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा उद्दामपणा,माज निर्माण झाला आहे. अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना अशा प्रकारचे कोणतेही धर्म संरक्षण नाही .जात उतरंडीच्या वरील तीन वर्गांची फक्त सेवा करणे हाच एक धर्म त्यांचा आहे .त्यामुळे त्यांनी जरी अन्याय केला, अत्याचार केला ,बलात्कार केला ,खून केला ,मारामाऱ्या केल्या, घरं जाळली ,शेती काढून घेतली, नोकरीवरून काढून टाकले ,शिक्षण बंदी केली, व्यवसाय बंदी केली, असे काहीही केले तरी धर्म व्यवस्थेकडे त्यांना न्याय मागण्याची मुभा नाही.
आरोपींना वाचवण्यासाठी सवर्ण परिषद
धर्म व्यवस्थेमध्ये वरील तीन उच्चवर्गीयांना शिक्षा देण्याची तरतूद जी आहे ती अत्यंत तकलादू आहे .हीच जातीव्यवस्था भारतामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुसाट वेगाने वाढली आहे.आणि याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हाथरस मध्ये घडलेली घटना आहे त्या आरोपींना वाचवण्यासाठी सवर्ण परिषद नावाची संघटना आरोपीच्या मागे आहेʼत्याला कारणे अनेक आहेत याची प्रमुख कारणे म्हणजे
- अमर्याद असणारा धर्मभोळेपणा आणि धर्मांधता.आपण काहीही करू आपले कुणी वाकडे करू शकत नाही कारण माझी जात उच्च आहे मी उच्चकुलीन असल्याने माझ्या जातीतील माझे जात बंधू मला संरक्षण देतील माझ्या घराला संरक्षण देतील हा विश्वास आहे.
- मागासवर्गीय महिला ह्या केवळ आणि केवळ उपभोगासाठीच असतात. त्या त्यासाठीच बनलेल्या असतात. त्यांच्यामध्ये लैंगिक आकर्षण जास्त असते. त्यांना पैशांची गरज असते .त्यांना कामधंद्याची गरज असते. त्यांच्यावर लैंगिक अन्याय-अत्याचार जरी केले तर त्या कुठेही वाच्यता करणार नाहीत,आणि जरी केली तर माझे घर, माझा परिवार, माझा समाज यातून मला सहीसलामत बाहेर काढेल हा एक ठाम विश्वास असतो.
- आरोपी च्या मागे घर परिवार तर असतोच तसेच त्या आरोपीचा समाजही त्याच्या मागे असतो.
- वरील उच्चकुलीन वर्गामध्ये सत्ता, संपत्ती प्रशासन याचे विभाजन झाले असल्याने मागासवर्गीय लोकांना न्याय मिळणे दुरापास्त असते.
- न्यायव्यवस्था प्रशासन राजकारण समाजकारण आवाज उठवणाऱ्या विविध संस्था या वरील तीनही उच्चवर्णीयांच्या ताब्यात असल्याने या मागासवर्गीयांच्या अन्याय अत्याचारा बद्दल फारसे कोणी बोलत नाही.
उत्तर प्रदेशामधल्या हाथरसमध्ये घडलेली घटना ही अशाच कारणांचा परिपाक आहे.
जे आरोपी आहेत ते तथाकथित उच्चवर्णीय ठाकूर समाजातील आहेत आणि पीडिता आहे ती हिंदू-वाल्मिकी समाजातील आहे.
गुन्ह्याच्या अगोदरही आरोपींनी पीडितेला लैंगिकदृष्ट्या छळले होते
पीडितेच्या गावांमध्ये वाल्मिकी समाजाची लोकसंख्या खूप कमी आहे.
केवळ चार घरं असलेली वाल्मिकी समाजाची ती तरुणी आहे.
या घटनेमागे जातीय माज
या घटनेमागे जातीय माज हाच एक मोठा फॅक्टर आहे. मी ठाकूर आहे, मी काहीही करू शकतो हा जो माज आहे. त्या माजामुळे सदरची घटना घडली आहे. सदरचा बलात्कार हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे .सामूहिक बलात्कार करून त्या तरुणीची जीभ कापली जाते, तिचे मणक्याचे हाड मोडले जाते ,तिच्यावर अनन्वित अत्याचार केले जातात आणि जेव्हा तिची आई येते तेव्हा तिला तशाच अवस्थेत टाकून ते आरोपी पळून जातात .14 तारखेला घडलेली घटना त्यानंतर ती तरुणी दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत राहते पण त्यात तिला अपयश येते ती मरण पावते.
यापुढे होते ते केवळ आणि केवळ राजकारण.उत्तर प्रदेश हा राजकारणासाठी प्रसिद्ध आहे.
या उत्तर प्रदेशांमध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत ज्यामध्ये बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष ,
काँग्रेस, राजद, आणि सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष हे प्रमुख पक्ष आहेत.
सत्तेचे राजकारण जी आहे ते आजवर ठाकूर आणि ब्राम्हण बनिया यांच्या आजूबाजूला फिरले आहे.
काही वर्षे बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या सत्ता होत्या.
मागासवर्गीय लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व नेत्यांना जाब विचारला पाहिजे
समाजवादी पक्ष हा मुस्लिम समर्थक आहे तसेच बहुजन समाज पक्ष हा मागासवर्गीयांचे नेतृत्व करतो असा एक समज आहे. पण या दोन्ही पक्षांमध्ये ब्राह्मण बनिया आणि ठाकूर यांचे नेते आहेत. आता जे चालू आहे ते केवळ राजकारण चालू आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार अडचणीत येऊ नये म्हणून तिथल्या पोलीस प्रशासनाने त्या पीडितेचा मृतदेह कालच रात्री अडीच वाजता तिच्या घरच्यांना माहित न होता त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिसांनी हे कृत्य केले आहे हे अगदी स्पष्ट आहे पुरावे नष्ट केले म्हणून अगोदर पोलिसांच्या वरती केस झाली पाहिजे. पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत संशयास्पद आणि संदिग्ध आहे.
या घटनेवर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातमी आलेली नाही फक्त एनडीटीव्ही इंडिया सोडला तर.
या घटनेद्वारे भारतीय जनता पक्षाचे योगी सरकार अडचणीत येऊ शकते
आणि त्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून ही खबरदारी तथाकथित भारतीय इलेक्ट्रॉनिक मीडिया घेत आहे.
यापुढचा टप्पा म्हणजे आपण सर्वांनी या घटनेवर आवाज उठवला पाहिजे.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जाब विचारला पाहिजे सत्तेत असणाऱ्या केंद्र सरकारला
तसेच मागासवर्गीय लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व नेत्यांना जाब विचारला पाहिजे.
by – सतिश भारतवासी (कोल्हापूर)
लेखक साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळ अभ्यासक आहेत.
हिंदू स्त्रियांच्या मालमत्ता संदर्भात ; हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी भाग 2
पुरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात; शालेय वस्तूंचे वाटप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)