डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 13 आॅक्टोबर 1935 रोजी नाशिक येथील येवला येथे धर्मांतर करण्याची घोषणा केली. त्या घटनेला 86 वर्षे झाली.बाबासाहेब 35 साली घोषणा करतात,आणि त्यानंतर तब्बल 21 वर्षांनी धर्मांतर करतात.
13 तारखेला घोषणा केली,14 तारखेला धर्मांतर केलं असं झालेलं नाही.घोषणा केल्यानंतर धर्मांतर का गरजेचं आहे हेही बाबासाहेब आपल्या भाषणांमधून लेखन साहित्यामधून सांगत होते,पटवून देत होते.लोकांची मानसिकता तयार करत होते.त्यानंतर धर्मांतर झालेलं आहे.
हजारो वर्षे लोक विषमतावादी हिंदू धर्मात होते,त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला,ते करताना डॉक्टर बाबासाहेबांनी जगातील इतर धर्मांचा अभ्यास केला. इस्लाम,शीख,ख्रिश्चन.या धर्मांचा अभ्यास केला.
अनेक धर्मातील धर्मगुरूंची त्यांचा धर्म स्वीकारण्याची विनंती
धर्मांतराची घोषणा केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद देश विदेशात उमटले होते.अनेकांनी त्याचे स्वागत केले तर काहींनी नाके मुरडली.देश विदेशतातून बाबासाहेबांना पत्र तार राजगृहावर येत असत.बाबासाहेबांनी इस्लाम धर्म स्वीकारला तर अस्पृश्यांच्या हितासाठी त्याकाळी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा हैदराबादच्या निझामाने केली होती.ख्रिस्ती धर्मगुरू बिशप ब्रेन्टन थॉबर्न ब्रॅडले व मुंबईच्या मेथॉडिस्ट एपिस्कोपल चर्चचे बाबासाहेबांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची विनंती केली,मिशीनऱ्यांकडे असणारा अमाप पैसा दलितांसाठी उद्धारासाठी दिला जाईल असे सांगितले गेले.शीख धर्म गुरूंनी शीख धर्म स्वीकारण्याची विनंती केली.शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी मुलगा यशवंत आंबेडकर व पुतण्या मुकंद याना डॉ.बाबासाहेबांनी, अमृतसर येथील सुवर्ण मंदिर गुरुद्वारात वास्तव्यास पाठविले होते.
धर्मांतरामागे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भुमिका काय होती
डॉ.बाबासाहेबांनी हे धर्म स्वीकारले नाहीत.धर्मांतरामागे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भुमिका काय होती याचा शोध वारंवार घेणे आवश्यक आहे.असं आजच्या लेखात माझे मित्र सहकारी साक्य नितीन यांनी मांडले आहे.त्यांचा आजचा लेख जरूर वाचा,महत्वाचा आहे.
धर्मांतरचा मुद्दा मानसिक बौद्धिक स्वातंत्र्याशी निगडीत आहे.व्यक्तीच्या विकास अन प्रगतीशी निगडीत आहे.असं आपल्याला दिसून येईल,धर्मांतर केल्यानंतर एका रात्रीत पूर्वास्पृश्य समाजाचे आयुष्य बदलेलं नाही.जादू झाली आणि समाज प्रगतिपथावर आला असं झालं नाही.त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार नियम अटी याची पूर्तता या वर्गाला प्रामाणिकपणे करावी लागली आहे.
21 वि प्रतिज्ञा लक्षात घेणे इथं गरजेचं.(22 प्रतिज्ञा आजही महत्वाच्या आहेत.आणि त्याचे पालन सर्वांनी केले पाहिजे) हा विषय समजून घेण्यासाठी 21 व्या प्रतीज्ञेत म्हटल्या प्रमाणे आज माझा नवा जन्म होत आहे असे मानणे.नव्याने जन्म म्हणजे अगोदर मृत्यू,म्हणजे तुम्ही अगोदर ज्या अवस्थेत होता,ज्या परिस्थितीत होता त्याचा आणि त्याच्याशी निगडीत सर्वच गोष्टींचा मृत्यू झाला आहे.त्यानंतर तुमचा नवा जन्म झाला आहे.म्हणजे इथून तुमची नवी सुरुवात सुरू होते.(पुनर्जन्म हा शब्द जाणीवपूर्वक टाळला आहे.) (पुनर्जन्माची व्याख्या आणखी वेगळी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म मध्ये बुद्धांनी सांगितली आहे.)
जुनं टाकून नव्याने सगळं सुरू करावं
थोडक्यात जुनं टाकून नव्याने सगळं सुरू करावं लागलं..आणि म्हणून आज जी प्रगती दिसते ती या प्रामाणिकतेचे फलित आहे.आज धर्मांतर केलेले बौध्द ज्यांना काल गाडीत बसले म्हणून विटाळ होत होता,आज स्वत: च्या कर्तुत्वाने विमान निर्मिती करत आहेत.ज्याना काल पिण्यास पाणी देण्याची बंदी घालण्यात आली होती,तो समाज आज पेट्रोल पंप उभारून विकतोय.बाटली बंद बिसलेरी पाणी विकतोय,आणि आज इतर समाज ते विकत घेत आहे.ही प्रगती निश्चित धर्मांतर केल्याने आणि त्याच्याशी प्रामाणिक राहिल्याने झालेली आहे,
परंतु केवळ धर्मांतर हा त्यातला मुद्दा नाहीये.धम्म हा एक मार्ग आहे टुल आहे.जसं बुद्ध म्हणतात की माझा धम्म साधा,सरळ व सोपा आहे.
तो नदी पार करण्यासाठी असणा-या नौके प्रमाणे आहे.जीवनातील दु:खांच्या नद्या पार करण्यासाठी नौकेप्रमाणे माझ्या धर्माचा उपयोग करा.
ज्याप्रमाणे नदी पार केल्यानंतर आपण नौका तीथेच टाकून देतो व तीचे ओझे आपण डोक्यावर घेऊन पुढील प्रवास करीत नाही,
त्याचप्रमाणे माझ्या धर्माचे ओझे वाहत जिवन जगू नका.
आपण बौद्ध झालो म्हणजे नेमकं काय झालं? याचा विचार केला पाहिजे.बौद्ध झालो म्हणजे आपण एका धर्मातून दुसऱ्या धर्मात आलो का? आपण एक चौकट मोडून दुसऱ्या चौकटीत बंदिस्त झालोय का? तसं होत आहे का? तशा पद्धतीने लोक वर्तन करत आहेत का? या प्रश्नांची उत्तरे सतत तपासत राहणे गरजेचं आहे.
धम्म अंगीकारणे म्हणजे सत्याला कवटाळणे,नीतीमान विवेकी विचारी आयुष्य जगणे,बौद्ध धम्म ही जगण्याची आदर्श पद्धत आहे.
बौद्ध असणारी व्यक्ती तीचं दुसऱ्यांच्याप्रती असणारं वर्तन व्यवहार हे आदर्शवत असतं आहे.
आणि असलं पाहिजे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतावादी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर
ज्या लोकांचा पुन्हा नव्याने जन्म झाला आहे.जुन्या धर्माचा मृत्यू झाला अशा लोकांसाठी
पुढे मार्गक्रमण करण्यासाठी दिशा देण्यासाठी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत.
बुद्ध धम्मात नीती ला सर्वोच्च स्थान
परंतु या केवळ 22 प्रतिज्ञा तेवढ्याच पाळून तुम्ही आदर्श बौद्ध म्हणून जगू शकता का? त्या तेवढ्याच पाळायच्या आहेत का? तर नाही.याचं उत्तर थोडं विस्तृत आहे.परंतु लेखाचा विस्तार होऊ नये म्हणून थोडक्यात असं की,22 प्रतिज्ञा सोबत सदधम्म काय याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे.सम्यक विचार सम्यक वाचा सम्यक व्यायाम याबद्दल सुद्धा आचरण करण्यास सांगितलं आहे.बुद्ध धम्मात नीती ला सर्वोच्च स्थान आहे.एवढं की धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजेच धम्म अशी मांडणी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात करण्यात आली आहे.
यांचा विचार केला असता असं लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक आदर्श आणि नीतीमान समाज उभारण्याचा संकल्प केला होता.आणखी एक इथं विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे.ती मला जाणवते की जसं मुस्लिम धर्मात विशिष्ट पेहराव पद्धती आहे.काही दृश्य भेद आहेत.तसे शीख धर्मात सुद्धा आहेत,आणि काहीसे ख्रिश्चन धर्मात सुद्धा आहेत.परंतु 22 प्रतिज्ञा देताना समाजाला आणखी विशिष्ट पेहराव आणि दृश्यभेद यांचे नियम सूचना द्याव्यात असे डॉक्टर आंबेडकर यांना का वाटले नसावे? तशा त्या का दिल्या गेल्या नसतील?
म्हणजे जर एखाद्या मोठ्या हॉल मध्ये गर्दीच्या ठिकाणी किंवा रेल्वेच्या डब्यात असणाऱ्या गर्दीत एखादी मुस्लिम व्यक्ती,शीख व्यक्ती तुम्ही सहज ओळखू शकता तसे बौद्ध व्यक्ती पाहून ओळखता येत नाही.ती जनरल म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती प्रमाणेच असते.तीला विशिष्ट ओळख दिलेली नाही.दाढी वाढवणे मिशा ठेवणे किंवा पगडी टोपी इत्यादी पेहराव देण्यात आलेले नाहीत.
त्याचं कारण मला असं वाटतं की जो सामाजिक वर्ग हजारो वर्षे सामाजिक परीप्रेक्षातून बाहेर फेकला गेला होता त्याला पुन्हा मेनस्ट्रीम मध्ये आणण्याचे त्यांचे प्रयत्न होते,आणि ते खऱ्या अर्थाने त्यात सफल झाले असे म्हणावं लागेल.20 जुलै 1942 च्या भाषणात चवदार तळे सत्याग्रह आंदोलन झाले त्यावेळच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अनुषंगाने आणखी स्पष्टता दिलेली आहे.
एखादी बौद्ध व्यक्ती कशी ओळखली गेली पाहिजे
बौद्ध असणं म्हणजे नेमकं काय? म्हणजे एखादी बौद्ध व्यक्ती कशी ओळखली गेली पाहिजे.महापुरुषांचे विचार तत्वज्ञान केवळ वाचून तेवढेच घेऊन जायचं नसतं तर आपण त्याचा काळानुरूप आपल्या सदसद्विवेकबुद्धीनुसार अन्वयार्थ लावायचा असतो.बौद्ध असणे म्हणजे आदर्श व्यक्ती असणे तत्वनिष्ठ, विज्ञानवादी, वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासणारी, मानवी मूल्ये मानवी स्वातंत्र्य याचा पुरस्कार करणारी वैश्विक बंधुभाव जपणारी सम्यक मार्गावर चालणारी स्वच्छ प्रेमळ मंगल मैत्रीची भाषा असणारी आदर्श व्यक्ती निर्माण करणे हे धम्माचे उद्दिष्ट आहे.हाच सद् धम्म आहे.
थोडक्यात बौद्ध असणे म्हणजे एक प्रगल्भ प्रबुद्ध मानव असणे.
आणि हे कुणालाही जात धर्म पंथ भिन्न लिंग असणाऱ्या व्यक्तीस बनता येऊ शकते.
धर्म व्यक्तीला एका ठराविक कालावधी पर्यंत धारण करावा लागतो,पाळावा लागतो.
आचरण करावं लागत,तो कालावधी पार केल्यानंतर धर्माची उपयोगिता संपुष्टात येते.
अर्थातच ही गोष्ट व्यक्तीपरत्वे भिन्न आहे.धर्माची उपयोगिता त्याला किती कालावधी पर्यंत आहे असेल हे सांगणे कठीण आहे.
काही लोकाना ती मरेपर्यंत धारण करावी लागते.
धम्मा मध्ये ही गोष्ट लवकर आत्मसात होते.तो कालावधी म्हणजे व्यक्ती प्रगल्भ होण्याचा प्रबुद्ध होण्याचा.
एकदा हा कलावधी ही फेज पार गेल्यानंतर व्यक्तीला कोणत्याही धर्माची गरज उरत नाही.
व्यक्ती स्वतंत्र होतो,ही दृष्टी हा विचार त्याला फक्त बुद्ध धम्मात बुद्ध तत्वज्ञात मिळतो.
बुद्धाच्या धम्माकडे आकर्षित होऊन धर्मांतर करणारे धम्म धारण करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे.
भविष्यात अधिकाधिक वाढत जाणार आहे.मात्र दीक्षांत आणि अगोदरच्या बौद्ध लोकांची जबाबदारी वाढणार आहे.
बुद्ध धम्माकडे वळणाऱ्या लोकांचा ओढा मोठा आहे.अशा लोकांशी आणि इतरही बौद्धेतर लोकांची तुमचे सार्वजनिक जीवनात असणारे व्यवहार
आणि संवाद बौद्ध धम्माला वेगळ्या उंचीवर घेऊन जात असतात,त्यामुळे जबाबदारी वाढलेली आहे.
धर्मांतराने काय मिळाले आणि काय मिळवले ?
दलित धर्मांतर:दलितांना सन्मान द्यायला कमी पडतो म्हणून ते धर्मांतर करतात
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 15, 2021 23:10 PM
WebTitle – conversion to buddhism