कॉंग्रेस हा देशातील एक मोठा प्रमुख पक्ष आहे.कॉंग्रेस स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशात पुरोगामित्वासाठी कटिबद्ध आहे.कॉँग्रेसने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आहे.कॉँग्रेस धर्म निरपेक्ष वगैरे कॉंग्रेस अशी आणि कॉँग्रेस तशी हे सगळं छान आहे.सुभाषिते ऐकायला छानच असतात.प्रत्यक्ष व्यवहारात ती राबवताना नाकीनऊ येते.शिवाय चरित्र आणि चारित्र्य यातही फरक असतो.
देशातील नागरिक कॉंग्रेस ला नाकारत आहेत
कॉँग्रेस स्वातंत्र्योत्तर देशातील मोठा पक्ष होता.सत्ताधारी होता.पूर्वी लोकाना इतर पक्षच माहीत नव्हता. त्यावेळी इंग्रज विरुद्ध कॉँग्रेस असं एक समीकरण होतं.(खरतर कॉँग्रेसची स्थापना हाच एक रोचक विषय आहे. ते इथ नको) त्यामुळे अनेक निवडणूका तशा लढवल्या गेल्या.लोकाना हात का पंजा ही एकच निशाणी ठाऊक होती.कॉँग्रेस मध्ये त्याकाळी बुजगावणी उभी केली तरी निवडून येतील असे गमतीने म्हणले जायचे.कॉँग्रेसने जेव्हढा काही त्याग केला.संघर्ष केला असा दावा केला जातो. तेवढे लोकानी त्यांना सत्ता देवून उपकृत सुद्धा केले आहे.त्यामुळे कॉँग्रेसला यावत् चंद्र दिवाकरौ सत्ता उपभोगायला दिली पाहिजे असं काही होणार नाही.तसे घडून यायला कॉँग्रेसने देशातील नागरिकांच्या मनात विश्वास देखील निर्माण केला पाहिजे.देशातील नागरिक कॉँग्रेसला नाकारत आहेत.हे वास्तव स्विकारण्यास काही कमीपणा नाही.त्यातून आत्मपरीक्षण करून चुका सुधारता येतील.
भाजप नाहीतर कोण?
चुका सुधारायची तयारी आहे का? हाही खरा प्रश्न आहे.कारण गेली सहा वर्षे कॉँग्रेसने विरोधी पक्ष म्हणूनही नालायक कामगिरी केलेली आहे.असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी या उक्तीप्रमाणे कॉँग्रेस वागत राहिली असे दिसून येते.गेल्या सहा वर्षात कॉँग्रेसने देशात एकही जनआंदोलन उभे केले नाही.ही वस्तुस्थिती आहे.देशातील नागरिकांना पर्याय हवा आहे.मोदी नाहीतर कोण? हा प्रश्न जसा भाजप संघ विचारतात तसे भाजप नाहीतर कोण? असा प्रश्न जनतेला देखील पडताना दिसतो.त्यामुळे 2014 पासून जनतेने निर्णायक बहुमत कोणत्याच पक्षाला दिलेलं नाही.याशिवाय कॉँग्रेसला देखील पर्याय म्हणून स्विकारलेलं नाही असेही दिसून येते.
कॉंग्रेस ने जमिनी स्तरावर लोकांपर्यंत जाण्यास टाळाटाळ केली
अनुमान,मतं काही असू शकतात.ती संभ्रम करणारी किंवा माइंड सेट बनवणारी असू शकतात मात्र डेटा कधीही खोटं बोलत नाही.आकडे बोलतात आणि सत्य परिस्थिती दाखवतात.आकडेवारी कॉँग्रेसला जनता नाकारते हेच दर्शवीत आहे.बिहारच्या निवडणुकीत कॉँग्रेसने अत्यंत खराब प्रदर्शन केले आहे.याचा अर्थ जनतेने कॉँग्रेसला नाकारले आहे.हे सगळं नोटबंदीचे अपयश.सीएए एनआरसी,दिल्ली दंगल, बेरोजगारी,प्रचंड वाढलेली महागाई,कृषी विधेयक आणि सर्वात जास्त संवेदनशील अन कळीचा मुद्दा हा बिहारी असंघटीत कामगारांचा जे महाराष्ट्रातून बिहार मध्ये पायी चालत गेले.काही रस्त्यातच जीवाला मुकले. ज्यांचा डेटा देखील सरकारकडे नाही असे जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य भाजपकडून करण्यात आलेले.या मुद्यावर कॉँग्रेसने जमिनी स्तरावर लोकांपर्यंत जाण्यास टाळाटाळ केली.जनमाणसांत हे मुद्दे पोहोचलेच नाहीत.असे दिसते.
कॉंग्रेस ला वाटते निवडणुका आल्या कीच जनतेत जायचं, प्रचार रॅली करायच्या जनतेला सत्ताधारी पक्षाच्या चुकांच्या दोनचार गोष्टी सांगायच्या,आणि मतदान पदरात पाडून घ्यायचं,लोक निवडणुकांची भाषणे ऐकून मतदान करतील. सत्तेवर बसवतील.हे लोकाना गृहीत धरणे कॉँग्रेसला महागात पडले आहे.मागील सहा वर्षातील निरीक्षण केले तर देशात विरोधी पक्षच अस्तित्वात नाही असे दिसून येते.जो काही विरोध सत्ताधारी भाजपला होतो तो सामान्य जनतेच्या पातळीवर होतो.विरोधी पक्षाची भूमिका जनतेनेच निभवावी आणि आम्हाला सत्तेच्या गादीवर लोळण्यास संधि द्यावी अशी मानसिकता कॉँग्रेसची झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.याशिवाय स्वत: काहीच न करता पूर्वाश्रमीच्या पुण्याईवर प्रादेशिक पक्षाच्या मानगुटीवर बैठक मारून सत्तेचं जांभूळ अलगद तोंडात पडेल याची वाट पाहत त्याचाही खेळ बिघडून टाकणे हा प्रकार सुरू केला आहे.
कॉंग्रेसआपलं अस्तित्व शोधत आहे
मागील निवडणुकीत म्हणजे 2015 मध्ये कॉंग्रेस ने 41 जागा लढवल्या त्यातील फक्त 27 जागांवर विजय प्राप्त केला होता. यावेळी मात्र त्यांनी 70 जागा मागीतल्या. आणि फक्त 19 ठिकाणी विजय मिळवला,2010 च्या निवडणूकीत कॉँग्रेसने सर्वच्या सर्व 243 जागांवर उमेदवार उभे केले होते.त्यापैकी फक्त 4 ठिकाणी कॉंग्रेस ला विजय मिळवता आला.2005 मध्ये बिहारमध्ये दोनदा निवडणुका घेण्यात आल्या. विधानसभा बरखास्त झाल्यामुळे एकदा फेब्रुवारीमध्ये आणि पुन्हा ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्यात आल्या.
फेब्रुवारीमध्ये कॉंग्रेस ने 84 जागा लढवल्या आणि केवळ 10 जिंकल्या, तर ऑक्टोबरमध्ये 51 जागांवर उमेदवार देऊन केवळ 9 जागा जिंकल्या.2000 च्या निवडणुकांत बिहार अविभाजित होता आणि सध्याचा झारखंडदेखील त्याचाच एक भाग होता, त्यानंतर कॉंग्रेसने तब्बल 324 जागा लढवत 23 जागा जिंकल्या होत्या.तर 1995 च्या विधानसभा निवडणूकीत 320 जागांवर उमेदवार उभे केले.पैकी 28 जागा जिंकल्या.1990 च्या विधानसभा निवडणूकीत 323 जागांवर निवडणूक लढवली त्यापैकी 71 जागांवर विजय मिळवला.1985 साली विधानसभा निवडणूकीत 323 जागांवर उमेदवार उभे केले पैकी 196 जागा जिंकल्या होत्या.केवळ ही एकच वेळ कॉँग्रेसने चांगली कामगिरी केली असे म्हणता येते.त्या गोष्टीला 35 वर्षे झाली.तेव्हापासून कॉंग्रेस आपलं अस्तित्व शोधत आहे.
विश्लेषकांच्या मते विरोधकांना उच्चजातीय मते वळविण्यास अपयश आल्याचा हा परिणाम आहे.
2020 च्या निवडणूकीत कॉंग्रेस ने 70 जागा मागीतल्या मात्र 40 जागांवर उमेदवार देताना त्यांच्या नाकीनऊ आले होते.
इतर ठिकाणी आपण विचार करू शकतो की काय झालं असेल.
फक्त अहंकारयुक्त अस्मिता जपण्यासाठी कॉँग्रेसने एवढ्या सीटची माती केली हे उघड आहे.
अन्यथा राजदच्या नियोजित पारड्यात या जागा निघू शकल्या असत्या.असं लेखक पत्रकार पुष्यमित्र यांचे म्हणने आहे.
बिहार मध्ये कॉँग्रेसला उमेदवार मिळत नाही.तर 70 पैकी बहुसंख्य ठिकाणी
कॉँग्रेसने तथाकथित उच्चजातीय (तथाकथित सवर्ण) उमेदवार उभे केले होते.
मात्र बिहारमध्ये तथाकथित उच्च जातीयांनी भाजपकडेच आपले मत वळवले असल्याचे दिसून येते.
राजकीय विश्लेषकांच्या मते विरोधकांना उच्च जातीय मते वळविण्यास अपयश आल्याचा हा परिणाम आहे.
प्रादेशिक पक्षांच्या राजकारणात आपला “हात” आजमावणाऱ्या कॉँग्रेसला भाजपची बीटीम म्हणता येणे शक्य आहे.परंतु आम्हाला वाटतं राजकारणात कुणी कुणाचे टीम नसते.प्रत्येकाला आपला पक्ष उभा करायचा असतो.राजकारण करायचं असतं. त्यात युती आघाड्या होत राहतात किंवा काही स्वतंत्र लढतात.लोकसभा विधानसभा निवडणूकीत स्वतंत्र लढणारे एकमेकांच्या विरोधात लढणारे भाजप कॉँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि इतर पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था महापौर इत्यादी निवडणूकीत मात्र एकमेकांना मदत करत असल्याचे दिसून येते.
प्रादेशिक पक्षांना आदर सन्मान दिला पाहिजे.
स्वत:चा पक्ष न वाढवता भाजपला दूर ठेवणे हाच एकमेव अजेंडा असता तर
कॉँग्रेसने मागच्या निवडणुकीचा निकाल समोर ठेवून त्यातून धडा घेत
आपल्या ताकदीपेक्षा जास्त जागांवर लढण्याची चूक केली नसती.
भाजप जसे प्रादेशिक पक्षांच्या सोबत युती करत पक्ष ताकद वाढवत आहे तसेच कॉँग्रेस देखील वाढवत आहे.
यात तुलनात्मक फरक कुठे आहे? मात्र भाजप हा प्रतिगामी मनुवादी पक्ष म्हणून मान्यता असल्याने
आणि कॉँग्रेस हा पुरोगामी समजला जात असल्याने भाजपच्या ब्राह्मणी सोवळ्यापेक्षा
कॉँग्रेसचे पुरोगामित्वाचे सोवळे देशाला परवडणारे नाही.ते देशाने आणखी किती वर्षे वागवायचे?
कॉँग्रेसला देशाची काळजी असेल तर त्यांनी प्रादेशिक पक्षांना आदर सन्मान दिला पाहिजे.
त्यांच्या वाट्यात वाटमारी न करता आपल्या मर्यादा ओळखून जागा लढवल्या पाहिजेत.
अगोदर कॉंग्रेस ला बदलावे लागेल
आता मुद्दा जर पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असेल तर अशा पक्षांनी आपल्या मर्यादा आणि आपली ताकद ओळखणे गरजेचे आहे.
जे भाजपला जमते ते इतर पक्षांना का जमत नसेल? किंबहुना का जमू नये?
आणि मुळात पुरोगामित्व काय असू शकतं जेव्हा एखाद्या राज्यात आपली सत्ता येते
तेव्हा आपण नेमकं कोणत्या विचारांचे राजकारण करतो?
मध्यप्रदेशातील कॉँग्रेस सरकारने सत्तेवर येताच गोहत्या बंदी कायद्याला रासुका लावला.
देशात अशा कायद्याला रासुका लावणारा कॉँग्रेस हा एकमेव पक्ष हे काम भाजपने सुद्धा केलेलं नाही.
याचा अर्थ कॉँग्रेस हा भाजपपेक्षा एक पायरी वरचा हिंदुत्ववादी पक्ष ठरवता येईल.
गंभीर बाब म्हणजे या कायद्याअंतर्गत अनेक मुस्लिम तुरुंगात खितपत पडले आहेत.
मुस्लिम तुष्टीकरणाचा सतत आरोप असणाऱ्या कॉँग्रेसचं हे नवं रूप आहे.
आणि तरीही कॉँग्रेस पुरोगामी म्हणवून घ्यायची असेल
आणि पक्ष भेदापलिकडे देशासाठी काही निर्णय घ्यायचे असतील तर अगोदर कॉँग्रेसला बदलावे लागेल.
हस्तिदंती पुरोगामी सोवळे
फक्त भाषणात आम्ही पुरोगामी आहोत असे म्हणून आजच्या पिढीला ते पटणार नाही. आजची पिढी वाचते कमी अनुभवते जास्त.तिला जो अनुभव येतो त्यावर ती निर्णय घेतेय.भाजपला पर्याय नाही एवढा एकच मुद्दा कॉँग्रेससाठी फायद्याचा ठरत आहे.अन्यथा सहा वर्षे विरोधी पक्ष म्हणून नालायक ठरलेली कॉँग्रेस कुणीही नाव घेण्याइतपत दखलपात्र राहणार नाही.
मध्यंतरी काही घटना घडून गेल्या. महाराष्ट्रात दलित हत्याकांड झाले.मनुस्मृती जाळण्याच्या प्रश्नावरून राज्यात वातावरण तापले. मात्र कॉँग्रेस पक्ष,कॉँग्रेस प्रवक्ते कुणीही याबद्दल भूमिका घेतल्याचे दिसले नाही.हे वगळून पुरोगामित्व असेल तर मग काही बोलणेच नाही.मात्र असले हस्तिदंती पुरोगामी सोवळे देशाने किती वर्षे वागवायचे यालाही काही मर्यादा असायला हवी.आपल्या विचारात स्पष्टता असण्यास काही नुकसान होणार नाही.आता जिथे आहात त्या नुकसानापेक्षा वेगळं काही संभवते काय?
भ्रष्टाचाराचे आरोप झाले की कॉँग्रेस बॅकफुटवर जाते
कॉँग्रेसने याचा विचार केला पाहीजे,हा लेख लिहीत असेपर्यंत कॉँग्रेसने पक्षाला अध्यक्ष नेमलेला नाही. हा प्रश्नही काश्मीर प्रश्नासारखा भिजत राहणार असे दिसते आहे.कॉँग्रेसची निवडणूक लढविण्याची पारंपारिक पद्धत विचारसणी राजकीय विश्लेषक सुद्धा अधोरेखित करत आहेत.बिहारच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुशांतसिंह राजपूत आणि अनुक्रमे कंगणा अर्नब गोस्वामी या सर्व प्रकरणात भाजपने कॉँग्रेस आणि गांधी परिवाराला टार्गेट केले.रोचक बाब अशी की राज्यात मोठा पक्ष शिवसेना आहे.मुख्यमंत्री सेनेचा आहे.मात्र टार्गेट केले गेले गांधी परिवाराला.कारण भाजपने गांधी परिवाराची एवढी बदनामी केली आहे. की देशातील जनमानसात एक मोठा वर्ग त्याच्या विरोधात गेलेला आहे.हे वास्तव आहे.कॉँग्रेसचा पारंपारिक मतदार सोडला तर खूप मोठा वर्ग आहे देशात जो परिवार नाकारत आहे.याशिवाय वाड्रा यांच्यावर असणारे भ्रष्टाचाराचे आरोप.ज्यामुळे कॉँग्रेस बॅकफुटवर जाते.हा मुद्दा मागच्या निवडणूकीत शेवटी शेवटी काढला गेला.आणि कॉँग्रेसचा प्रचार अचानक म्यान झाल्याचे दिसले.
याशिवाय अंतर्गत असणारे मतभेद नेत्यांमध्ये नसलेली एक वाक्यता,बिहार मधिल निवडणूकीतच त्याचा प्रत्यय आला.कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की बिहार निवडणुकीत आपण किती फसवणूक बघणार आहोत? किशनगंजमधील कॉंग्रेसचे उमेदवार 1,266 मतांनी विजयी झाले परंतु त्यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. लोकशाहीची हत्या केली गेली.त्याच्या विरोधात पी चिदंबरम यांचे पुत्र म्हणतात कोणत्याही निवडणुकांचे परिणाम काहीही असो, ईव्हीएमने दोष देणे बंद केले पाहिजे. माझ्या अनुभवाप्रमाणे ईव्हीएम सिस्टम मजबूत, अचूक आणि विश्वासार्ह आहे. ” तर दुसरीकडे मध्यप्रदेशातही कॉँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यातील मतभेद समोर आले आहेत.
परिवार,पक्ष की देश हा पेच आहे
या सगळ्यातून कॉँग्रेसने आत्मपरीक्षण करणे गरजेचे झाले आहे.2024 ला भाजपला दूर ठेवायचे असेल तर एक निवडणूक तरी गांधी परिवार कॉँग्रेसच्या नियंत्रणातून दूर ठेवला पाहिजे.अन्यथा भाजपला तो संजीवनी देत राहील.किमान एकदा तरी हा प्रयोग देश हितासाठी करण्यासाठी विचार केला गेला पाहिजे.कॉँग्रेस मध्ये अंतर्गत अनेक मतप्रवाह आहेत.जातींचे सेल आहेत.तसे विचारांचे देखील सेल आहेत.याशिवाय परिवारवाद पातळीवरील एक सेल आहे.कॉँग्रेसने जेष्ठ नेत्याना आता मार्गदर्शक मंडळ म्हणूनच ठेवून तरुणांना पुढाकार दिला पाहिजे.परिवार नसेल तर आम्ही काम करणार नाही अशी मानसिकता पक्षासाठी घातक ठरली आहे. इथं परिवार,पक्ष की देश हा पेच आहे.त्यामुळे 2024 साठी एक प्रयोग म्हणून याकडे पाहण्यास हरकत नसावी.
कारण अजूनही वेळ गेलेली नाही.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)