चित्रपट कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात पारशी व मारवाडी समाजाकडे पैसा असे त्यामुळे साहजिकच या व्यवसायात त्यांची गरज प्रत्येकाला पडत असे. जमशेदजी मदन या पारशी गृहस्थाची ‘मदन थिएटर्स’ ही नाटक कंपनी होती व त्यांनी जवळपास १० चित्रपटांची निर्मिती केली. अनेक सामाजिक समस्या चित्रपटातुन हाताळल्या जाऊ लागल्या. हा काळ साम्यवादी विचाराचा प्रभाव असणारा होता त्यामुळे चित्रपटातुन गरीब श्रीमंत हा भेद ठळकपणे दिसू लागला. हिंदी व प्रादेशिक चित्रपटातुनही हे स्पष्टपणे दिसून येऊ लागला.
महाराष्ट्रात १९२९ मध्ये व्ही. शांताराम, दामले,फत्तेलाल व धायबर यांनी ‘प्रभात’ ची तुतारी फुंकून दर्जेदार मराठी चित्रपट परंपंरा सुरू केली. तर मुंबईत १९३४ मध्ये ‘बॉम्बे टॉकिज’ व नंतर ‘आर.के.’ तर कलकत्त्यातील ‘मिनर्व्ह मुव्हीटोन’, दक्षिण भारतातील ‘जेमिनी’, ‘प्रसाद’, ‘ए.व्ही.एम.’ अशा मातब्बर कंपन्यानी भारतीय चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटविण्यास सुरूवात केली.
काही उल्लेखनीय चित्रपट
सावकारी पाश (१९२५): बाबूराव पेंटर यांचा हा सामाजिक मूकपट.परदेशात पाठविला गेलेला पहिला चित्रपट म्हणून याची ओळख करून देण्यात येते. खरेतर बहुतांशी ग्रामीण दलित कुटूंब सावकारी पाशात अडकले जातात.मात्र तरीही त्यांचे चित्रण येत नाही. मग संघर्ष गरीब विरूद्ध श्रीमंत असाच रंगतो.
चंडीदास (१९३४): दिग्दर्शक नितीन बोस यांनी बंगाली भाषेत याच नावाच्या चित्रपटावरून रिमेक केला.
१५व्या शतकातील संत चंडीदास यांच्या जीवनावर हा बेतलेला होता.समाजातील जाती प्रथेवर या संताने आसूड ओढले होते.
धेाब्याच्या मुलीवर चंडीदासचे प्रेम असते.सैगलने यात चंडीदासची भूमिका केली असल्यामुळे याला लोकप्रियता मिळाली.
धर्मात्मा (१९३५): व्ही. शांताराम दिग्दर्शीत या चित्रपटात संत एकनाथाचे चरीत्र मांडले आहे.
यातील जात वास्तव म्हणजे भूतदया या पलिकडे जाऊ शकले नाही.
महाराष्ट्रतील बहूतेक संताची (अपवाद वगळता) भूमिका जात वा शोषण व्यवस्थेवर आघात करणारी जाणवत नाही.
असे चित्रपट त्यातील गाणी वा कलावंताच्या अभिनया भोवतीच घुटमळत राहतात.
पूढे त्यांनी पिजंरा (१९७०) मध्ये तमासगीर व सवर्ण नायक असा संघर्ष रंगविला. या प्रेमकथेत जात वास्तवा ऐवजी मूल्यांची चर्चा केली गेली. यातील सवर्ण गुरूजी चारीत्र्य या मूल्यासाठी प्राण देतो.नायिका तमासगीर आहे व तिच्याशी प्रेम हे चारीत्र्य हनन असल्या सारखे भाबडे विचार यात मांडले गेले. यात नायिका ज्या समूहाची आहे त्याचा संघर्ष कुठेच दिसत नाही.१९७५ मधील ‘झूंज’ या चित्रपटात अस्पृश्यतेचा विषय हाताळला आहे पण इथेही नायिका अस्पृश्य व नायक सवर्ण असेच दाखविले गेले.
काही उल्लेखनीय चित्रपट
अछुत कन्या (१९३६): अशोक कुमार(ब्राह्मण नायक) आणि देविका रणी(अस्पृश्य नायिका)दिग्दर्शन फ्रॅन्ज ऑस्टेन. संपूर्ण चित्रपट एका सुधारणावादी ब्राह्मण दृष्टीकोणातून आहे. अर्थात कालखंड बघता हे एक धाडस होते.यात अस्पृश्य समाज किती वाईट पद्धतीने जगतो याचे चित्रण आहे.सवर्णास स्पर्श करणे हे पाप समजले जाई असे स्वत: अस्पृश्यानां वाटत असे.सामाजिक नियमांचे पालन न केल्यास शिक्षा स्त्रीयानाच मिळत असे.
अछुत (१९४०): मध्ये चंदूलाल शहा या निर्माता-दिग्दर्शकाचा चित्रपट promote Gandhi’s movement against untouchability” या प्रेरणेतुन निर्मित झाला.माेतीलाल आणि गोहर हे मूख्य भूमिकेत होते. यातील दलित नायिकेस एक धनाढ्य दत्तक घेतो व स्वत:च्या मुली बरोबर संगोपन करतो. पूढे त्या दोघीही एकाच सवर्ण व्यक्तीवर प्रेम करतात मात्र जहागिरदार आपल्या मुलीचे लग्न त्या बरोबर लावुन देतो व दलित मुलीस हाकलून देतो. शेवटी ती मुलगी ज्याचे बरोबर लहानपणी लग्न ठरले त्या सोबत मिळून हरीजन उद्धाराचे काम करते. हा चित्रपट देखिल सवर्ण दृष्टीकोणातूनच लिहीला गेला. गांधीना चित्रपट माध्यमा विषयी अजिबात प्रेम नव्हते. ते याला विदेशी पतनशील संस्कृतीचे प्रतिक मानत.
महाराची पोर (१९३६): हा चित्रपट नानासाहेब सरपोतदारांनी लिहून दिग्दर्शित केला होता.
अंबू ऊर्फ ललिता पवारने महाराच्या मुलीची भूमिका केली होती.
हा चित्रपट पहायला सरोजिनी नायडू गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमात आल्या होत्या.
या चित्रपटाची महात्मा गांधी,मौलाना शौकत अली,बॅरिस्टर बाप्टीस्टा,अच्युत बळवंत कोल्हटकर आदींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती.
मद्रासच्या हिंदू, जस्टीस वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहून सरपोतदारांचे कौतुक केले होते.
औरत (१९४०): मेहबूब खान निर्मित दिग्दर्शीत या चित्रपटा वरवरजाती व्यवस्थेचे चित्रण दिसत नसले तरी
ग्रामीण नायीका राधा ही खालच्या जातीचे प्रतिनिधीत्व करते.कर्जाचा डोंगर, सावकारी पाश
आणि नवऱ्याचे घर सोडून निघून जाणे याला समर्थपणे तोंड देत मुलांचे संगोपन करते.
यातील नायक बीरजू आपल्या आईच्या सावकाराकडे असलेल्या बांगड्यासाठी आपले आयुष्य पणाला लावतो.
प्रेमचंद यांच्या साहित्याशी या चित्रपटातील नाळ जोडलेली दिसते.या चित्रपटाचा रीमेक मदर इंडिया अधिक प्रभावी ठरला.
हिंदी चित्रपटांमधून जास्तवास्तव प्रभावीपणे मांडले गेले नाही
सुजाता (१९५९): मध्ये बिमल रॉय दिग्दर्शीत या चित्रपटात मात्र एक पावूल पूढे टाकले गेले.यातील नूतनने साकार केलेली सुजाता बरीच बंडखोर होती. ती जरी अस्पृश्य असली तरी एक स्त्री म्हणून तिची सर्वस्वी ओळख देण्याचा यात प्रयत्न आहे.शेवटी स्वत:चे रक्त देवून सुजाता आपल्या पालनकर्त्या आईला वाचवते.इथे रक्तगट महत्वाचा मानला गेला.बिमल रॉयने या अस्पृश्य मुलीचे लग्न सवर्ण नायकाशी लावून दिले हाही धाडशी प्रयोग होता.
आशीर्वाद (१९६८): हृषिकेश मुखर्जीच्या या चित्रपटात हरीन्द्रनाथ चटोपाध्याय यांनी बैजू ढोलकवाला हे दलित पात्र चांगले रंगविले होते. जोगी ठाकूरला असलेला संगीत वादनाचा नाद त्याला दलितवस्ती मध्ये घेऊन जातो. या बैजूला जोगी ठाकूर आपला वादन गुरू मानतो. आणि त्याच्या मुलीवर बलत्कार होताना त्याला ठार मारून तुरूंगातही जातो. अर्थात यात दलिताच्या प्रश्नांवर जरी काही भाष्य नसले तरी ठाकूर आणि अस्पृश्य यांच्या मैत्रीतला धाग्याचे चित्रण आहे. ६० ते ८० या कालावधीत जवळपास ९५ टक्के हिंदी चित्रपट फक्त् मनोरजंनाच्या चक्रव्यूहातच अडकलेले दिसतात.
नया रास्ता हा चित्रपट प्रदर्शीत झाला.चित्रपटाच्या टायटल्सच्या पार्श्वभागी डॉ. बाबासाहेबांचा पुतळा होता
नया रास्ता (१९७०) : नडीयादवाला या मोठ्या बॅनरचा ‘नया रास्ता’ हा चित्रपट प्रदर्शीत झाला.चित्रपटाच्या टायटल्सच्या पार्श्वभागी डॉ. बाबासाहेबांचा पुतळा होता. चित्रपटाच्या पडद्यावर पहिल्यांदाच या महामानवास दाखविले गेले. खरं तर तर चित्रपट टिपीकल हिंदीत असतो तसा.नायक सर्वण अन् नायीका अस्पृश्य.हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील फारच कमी चित्रपटात ही जोडी उलट दिसली असेल.पण नंतर पार्श्वभगातील पुतळा वजा करण्यात आला. चित्रपटातील असो वा वास्तवातील.अनेकदा नायकांची प्रतिमा चौकटीत बंदीस्त केली जाते.विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक.प्रतिमेचा हा मारा धोकादायक पातळी पर्यंत पोहचविला जातो.लोकही हळूहळू स्विकारायला लागतात.या सर्व धोक्याच्या घंटा कानाला ऐकू येऊन सुद्धा तिकडे दुर्लक्ष केले जाते.
अंकूर, निशांत, मंथन श्याम बेनेगल यानी हिंदी चित्रपटाच्या मूख्य प्रवाहा सोबत समातंर प्रवाह निर्माण केला. १९७४ मधील अंकूर आणि १९७५ मधील निशांत, १९७६ मधील मंथन म्हणून वेगळे वाटतात. यात ठसठशीतपणे जात व्यवस्थ्ेतील सांस्कृतिक पदरही उलगडून दाखविले आहेत. मात्र जात व्यवस्थेचसाठी संघर्ष करणारा नायक दलित दाखविला गेला नाही.
आक्रोश (१९८०) : गोविंद निहलानी यांनी मात्र अत्यंत समर्थ आणि समर्पकपणे आदिवासी नायक दाखविला.
आदिवासी जरी अस्पृश्य नसले तरी त्यांचे शोषण सर्वांगानी होते व आजही होत आहे.
ओम पूरीने साकारलेला लहान्या भिकू हा अप्रतिम होता.संवाद नसलेल्या या भिकूने फक्त अभिनयाने त्याचा आक्रोश साकार केला.
इतर हिंदी चित्रपट
सद् गती (१९८१) : स्मीता पाटील व ओम पूरी यांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेल्या या टेलीफिल्मचे दिग्दर्शन सत्यजीत रे यांनी केले होते.
अस्पृश्यता हाच याचा गााभा.खूप प्रभावीपणे एक लहानशी गोष्ट यात सादर केली आहे जी नक्कीच प्रसंशनीय आहे.
सौतन (१९८३) : सावनकूमार टाक नावाच्या नितांत टाकावू दिग्दर्शकाने यातील नायिका दलित दाखविलीय जी अख्ख्या चित्रपटभर काखेत श्रीकृष्णाची मूर्ती घेवून वावरते. चित्रपटातील सवर्ण नायकासाठी त्याग करते. तिचे वडील(श्रीराम लागू) काळाभोर मेकअप करून गलीतगात्र संवाद म्हणत राहतात. चित्रपटाचा काळ १९८३ तील आहे. दलित पात्र दाखवायचे असेल तर ते काळे दाखविले पाहिजे हे अजब तर्कट दिग्दर्शकाच्या अडाणचोटपणाचे लक्षण आहे.जात वास्तवाचा चिमूटभरही अभ्यास व माहिती नसलेला हा चित्रपट मात्र राजेश खन् आणि गाण्यांसाठी बघितला गेला.
दामूल (१९८५) : प्रकाश झा यांनी ग्रामीण दलित स्त्रीयांचा संघर्ष पहिल्यांदाच बऱ्यापैकी सादर केला.याला राजकारणाचीही झालर होती.
नंतर पूढे त्यांनी ‘आरक्षण’ याच नावाचा सोशीओ-पॉलिटीकल चित्रपट निर्माण केला.
यात मूळ गाभा राजकारण हाच होता.यात दलित नायक तर होता
मात्र त्याच्या मूळ समस्येला बगल देत राजकारणी कसा वापर करून घेतात असे मांडले गेले.
चमेली की शादी (१९८६) : बासू चटर्जी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात
सवर्ण रेस्लर नायक खालच्या जातीच्या मुलीच्या प्रेमात पडतो.तिच्याशी लग्न करण्याची इच्छा असते
पण नंतर हा चित्रपट एक प्रेमकथा बनून राहतो.
नव्वदच्या दशकानंतरचे चित्रपट
बॅन्डीट क्वीन (१९९४) : जात वास्तवाची भयावता, भोवतालचा संवेदनहीन समाज, झोपलेली शासन व्यवस्था व त्यातील विकृत चेहरे, डाकू बनण्याची प्रक्रिया आणि त्यातील संघर्ष.असा अत्यंत जळजळीत वास्तववादाला थेट सामोरा जाणारा चित्रपट. दिग्दर्शक शेखर कपूरने थेट गावातील पार्श्वभूमी त्यातील सर्व घाणीसह दाखविली आहे. अनेकदा किळसवाणे वाटावे असेही प्रसंग यात आहेत पण हे वास्तव दिग्दर्शकाने स्विकारायला भाग पाडले.
समर (१९९९) : श्याम बेनेगल यांच्या या चित्रपटात प्रथमच नायक दलित सादर करण्यात आला.
मध्य प्रदेशात घडलेल्या एका सत्य घटनेवर हा चित्रपट आधारीत आहे.
रघुवीर यादव, रजीत कपूर, किशोर कदम यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने नॅशनल अॅवार्ड मिळवले.
९० नंतर जात वास्तवाकडे हिंदी चित्रपट निर्मात्याचे बऱ्यापैकी लक्ष जाऊ लागले.
जातवास्तव हातळणारे काही मोजके चित्रपट
२००० नंतर अनेजजण पूढे येत गेले व हा विषय हाताळू लागले.यातील काही चित्रपट.चौरंगा,खाप,आर्टीकल १५,धडक (सैराटचा रीमेक),मसान,मांझी, शुद्रा द रायझिंग, फॅन्ड्री, कोट, कोर्ट, एकलव्य (विधू विनोद चोप्रा) मुक्काबाज (अनुराग कश्यप) वगेरे.
१९२७ ते १९४७ या कालखंडात डॉ. बाबासाहेबानी जो अस्पृश्यते विरूद्धचा प्रचंड लढा उभारला
त्याचे पडसाद जगातल्या आमच्या महान बॉलिवुड चित्रपटसृष्टीवर का उमटू शकले नसावेत?
या कालखंडात अनेक दिग्गज हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कथाकार, कवीची फौज असतानांही या चळवळीचा मागोवा आपल्या चित्रपटातुन का घ्यावासा वाटला नसेल? वर्णव्यवस्थेच्या चौकटीनी यानां बदीस्त करून ठेवले असेल का?
की सवर्ण मानसिकतेच्या गुलामीतुन बाहेर यावेसे वाटत नव्हते? खरे तर आत्ताही या मानसिकतेतून ते बाहेर पडलेले नाहीत.
पंडित और पठान (१९७७) , राजपूत (१९८२), जस्टिस चौधरी (१९८३), क्षत्रिय (१९९३),
अर्जुन पंडित (१९९९) भाई ठाकुर (२०००), मंगल पांडे (२००५),
सिंग इज किंग (२००८), रॉकेट सिंह सेल्स मैन ऑफ द इयर (२००९) मि. सिंह vs मिसेज मित्तल (२०१०)
मग दुसाध, मंडल, पासवान, कोदूराम,बरडिया, होता,बसरा,धस, धिरना,तंडी, चिकवा,बसान वगैरे नावाचे नायक पडदयावर का येऊ शकत नाहीत?
चित्रपटसृष्टीत नेहमीच उच्चवर्णीयांचे वर्चस्व राहिले आहे.
चित्रपटाचे व्यावसायिक गणित अग्रक्रमाने असल्यामुळे जात वास्तवाच्या समस्या दाखवितानां
व्यवसायात बाधा येते व मग ते सोयिस्करपणे सर्वजण टाळतात.
सुपरस्टार लोकांनी दलित व्यक्तिरेखा साकारली नाही
विशेषत: कायम अग्रणी असलेले व चर्चीत नायकांनी कधीही दलित व्यक्तीरेखा रंगविलेली आढळत नाही.
कोणत्याही सुपरस्टारने उदा: अशोक कुमार, दिलिप कुमार, राजकुमार, राजेश खन्ना, मनोज कुमार अथवा आजच्या काळातील सुपरस्टार सलमान, आमिर, अमिताभ, धर्मेंद्र पैकी कुणीही जाती व्यवेस्थेतील सर्वात खालच्या स्तरातील वर्गाचा नायक रंगविला नाही. मुळात जात वास्तवाच्या प्रश्नांकडे गंभीरतेने घ्यावे असे मूख्य चित्रपट प्रवाहातील मंडळीना वाटत नाही.राजकिय व्यवस्था फक्त मतदार म्हणून यांच्याकडे कायम बघत असते.
या वर्ग समूहाच्या जगण्याचे प्रश्न दूहेरी आहेत.गरीबी व दारीद्र्य तर आहेच पण जातवास्तवाने त्यांना भयानक खाईत लोटून दिले आहे.खरे तर गुंड असलेल्या नायकाचे ग्लोरीफिकेशन करण्यात येते.ते चित्रपटाचे नायकही होऊ शकतात मात्र चित्रपटाच्या कथेत त्याची जात सहसा सांगितली जात नाही.
सामाजिक चित्रपटांची प्रचंड संख्या असतानां जात वास्तव हा मुद्दा मात्र सामाजिक वाटत नाही. तुलनेने दक्षिणेत मात्र या विषयाची पूर्वी पासून दखल घेतली गेली.आजही ठसठशीतपणे व उघडपणे दाक्षिणात्य चित्रपट या विषयावर गंभीरपणे चित्रपट निर्मिती करत आहेत हीच काय ती जमेची बाजू. मात्र हिंदी चित्रपटसृष्टी आजही अपवाद वगळता दबकत आहे.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
हेही वाचा… दिलीप कुमार ; भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – भाग – 5
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 26, 2021 19:50 PM
WebTitle – caste reality in indian hindi film industry 2021-07-26