कोणताही बायोपिक बनवताना अत्यंत काटेकोरपणे अभ्यास करून त्याला कथानकाचं स्वरूप द्यावं लागतं, त्यानंतर च्या प्रक्रियेत पात्र, संवाद, लोकेशन, भाषा आणि दिग्दर्शन या गोष्टी व्यक्तिरेखेला आणि त्या काळाला अनुरूप अश्या असाव्या लागतात, इतर कुठल्याही सिनेमापेक्षा बायोपिक वर जास्त मेहनत घ्यावी लागते कारण सदर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला तितक्या प्रभावीपणे साकारता आलं नाही तर लोकांच्या भावना दुखावू शकतात, बायोपिक असेल किंवा बायोसिरिअल तयार करताना कन्टेन्ट महत्वाची भूमिका बजावते.
सिनेमॅटिक लिबर्टी
यात दिग्दर्शक /लेखक “सिनेमॅटिक लिबर्टी” च्या नावाखाली घडून गेलेल्या काही गोष्टींचा संदर्भ नसेल तर त्या इमॅजिन करून मांडतात,
पण यात खूप मोठी रिस्क असते, अमुक एखादी गोष्ट, घटना अमुक अशीच घडली असेल याचा तर्क लावताना लेखक आणि दिगदर्शकाची मानसिकता, अनुभव आणि अभ्यासाचा प्रभाव या चित्रीकरणात पडतो.
डॉ आंबेडकर यांचे कार्य सिनेमा किंवा डेली सोप मध्ये मांडणं तसं फार काही जिकरीचे काम नाही , बुद्धकालीन,अशोक सम्राट किंवा शिवकालीन व्यवस्था, परिस्थिती दाखवताना अशी सिनेमॅटिक लिबर्टी घेता येते कारण कालखंड फार जास्त आधीचा आहे त्यांचे काही संदर्भ आता मिळत नाहीत पण डॉ आंबेडकरांच्या बाबतीत असं नाही,जास्तीत जास्त १०० वर्षांपूर्वीचा काळ अभ्यास करून मांडावा लागेल आणि ज्याठिकाणी संदर्भ नाहीत त्या घटनांवर जास्त भर न देता सध्याच्या काळातील प्रेक्षकांना काय माहित पडलं पाहिजे त्यावर भर दिला जावा असं मला वाटतं.
सोकॉल्ड लिबर्टी घेऊन देवीचा साक्षात्कार
डॉ आंबेडकरांचा जन्म हा अत्यंत सामान्य लोकांचा जसा जन्म होतो तसाच झाला होता,प्रत्येक स्त्रीला थोड्या अधिक प्रमाणात ज्या प्रसूती कळा होतात त्याच भीमाईला झाल्या असतील त्यात अजिबात दैवी शक्ती किंवा अगदी अचाट मुलाचा जन्म आणि त्यामुळे जास्त प्रसववेदना असं काही नव्हतं, हे अतिरंजित करून दर्शवलं गेलं त्यात देवीचा साक्षात्कार आणि आशीर्वाद हे तर अगदीच कहर, मान्य आहे कि भिमाई किंवा रमाई किंवा त्याकाळचे अस्पृश्य लोक देवभोळे होते पण याचा अर्थ सोकॉल्ड लिबर्टी घेऊन देवीचा साक्षात्कार वगैरे दाखवण्याची गरज नव्हती, बघणारे प्रेक्षक तेच खरं घेऊन चालतात, रामायण महाभारतात काय घडलं असेल हे लोक रामानंद सागर यांनी सिरिअल मध्ये जे दाखवलं यावरून गृहीत धरून चालतात कारण दृक्श्राव्य माध्यम फार प्रभावीपणे लोकांच्या मनावर बुद्धीवर ताबा मिळवतात आणि त्यामुळे चुकीचा विचार समाजात जाण्याची शक्यता असते, बरं असं काही झालं याचा काही संदर्भ, पत्रव्यवहार आहे का लेखकांकडे ? नसेल तर या गोष्टींवर एपिसोड वाया घालवायची गरज आहे का ?
जन्म झाल्यावर डॉ आंबेडकरांचे वडील म्हणजेच सुभेदार रामजी बाळाचे पाय स्वतःच्या डोक्याला लावतात,असं कुठे घडतं का ?
बाप मुलाच्या पाय पडतोय ? नक्की या सिरिअलला कोण दिशा आणि वळण देतंय आणि त्यांची इच्छा काय आहे हे समजायला हवं !
मुद्दा हा आहे कि डॉ आंबेडकरांनी या देशातील तमाम शोषित वंचित समाजासाठीच नाही तर तमाम भारतीयांसाठी काय केलं,
आधुनिक भारताचे जनक त्यांना का म्हंटलं गेलं यावर जास्तीत जास्त लक्ष देऊन लिखाण व्हायला हवं,
एपिसोड अशा पद्धतीने व्हायला हवेत असं मला वाटतं.
या सिरिअल मधील पात्र आणि त्यांचा अभिनय यावर न बोललेलं बरं
by – अमोल गायकवाड
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)