आंबेडकरी चळवळीचा अभ्यासू शिलेदार प्रा.रमाकांत यादव : आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत, मनस्वी मार्गदर्शक, इतिहासाचे गाढे अभ्यासक, सिध्दार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, बौद्धजन पंचायत समितीचे माजी सभापती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कणकवली परिषद अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष, सिंपन प्रतिष्ठापन मुंबईचे सल्लागार, कुसूर विकास बौद्ध मंडळाचे जेष्ठ सल्लागार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध समाजातील पहिले प्राध्यापक अन् आदर्श, संयमी, अजातशत्रू, प्रेरणादायी सुप्रसिध्द व्यक्तिमत्व ॲड. प्रा. रमाकांत यादव सरांचे गेल्यावर्षी १८ नोव्हेंबर २०२० रोजी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निधन झाले. त्यांच्या रुपांने आंबेडकरी चळवळीचा कृतिशील अभ्यासू शिलेदार, अष्टपैलू व्यक्तीमत्व कायस्वरुपी काळाच्या पडद्याआड गेल्यांने चळवळीची फारचं मोठी अपरिमीत हानी झाली आहे. यादव सर म्हणून ते सर्वत्र परिचित होते.
शिक्षण
ॲड. प्रा. रमाकांत यादव सरांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्हा, वैभववाडी तालुक्यातील कुसूर गांवी २३ मार्च १९३९ रोजी सर्वसामान्य कुटुंबात झाला.
व्हिक्टोरिया गार्डन म्युनिसिपल स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण, आर. एम. भट हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण
तर, सिध्दार्थ महाविद्यालयातून बी. ए. ची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी मध्य रेल्वेमध्ये नोकरीला सुरुवात केली.
सिध्दार्थ कला व विज्ञान महाविद्यालय येथून एम. ए. (इतिहास व राज्यशास्त्र) एल्. एल्. बी. पदव्या संपादन करुन
१९६८ पासून एल. यु. एम. व्ही. कॉलेज अंधेरी व नंतर सिध्दार्थ महाविद्यालयामध्ये अद्यपन सुरु केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड येथेही त्यांनी एम्. ए. चे वर्ग घेतले.
सिध्दार्थ महाविद्यालयात त्यांनी इतिहास विभाग प्रमुख व उपप्राचार्य म्हणून जबाबदारी अन् तिथूनचं ते निवृत्तही झाले.
वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी कायद्याची (एल्.एल्.बी.) पदवी सुध्दा संपादन केली.
सामाजिक, राजकीय चळवळीचा कोणताही कौटुंबिक वारसा नसतांना त्यांच्यातील सामाजिक अविष्कार अन् आंतरीक तळमळीमुळे ते आंबेडकरी चळवळीत ओढले गेले.
चळवळ
१९६८ साली कर्मवीर दादासाहेब गायकवाड व भय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या
भारतीय बौद्ध महासभेच्या अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेत प्रा. रमाकांत यादव यांचा सहभाग होताचं.
पण, भय्यासाहेबांनी १९७० साली भारतीय बौध्द महासभा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली.
१९७२ साली भय्यासाहेबांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय बौध्द महासभेच्यावतीने
कोलंबो श्रीलंका येथील जागतिक बौद्ध धम्म परिषदेला बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे, घनःश्याम तळवटकर,
तत्कालीन आमदार सुमंतराव गायकवाड, भदंत शांतरक्षक व युवा प्रतिनिधी म्हणून प्रा. यादव सर उपस्थित होते.
पुढे १९७४ साली घनःश्याम तळवटकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बौद्धजन पंचायत समितीमध्ये प्रवेश केला
अन् शिक्षण समिती चिटणीस पदापासून सर्वोच्च सभापती पदापर्यंत त्यांचा चढता प्रवास झाला.
आंबेडकरी चळवळीतील योगदानाबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून
त्यांना अनेक पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले अन् यथोचित सत्कारही झाले.
राजकीय
धाम्मिक क्षेत्रात कार्यरत असतांनाही त्यांनी बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या आर.पी.आय. रिपब्लिकन युवक संघटनेची मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळून, १९७८ साली ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने काँगेस आर.पी.आय. युतीचे पन्हाळा बावडा मतदार संघातून त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढविली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कोकण विभागाचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. मात्र, प्रा. यादव सरांना वेगवेगळ्या पध्दतीने विरोध झाल्यांने त्यांचे नेतृत्व कोकणात लोकाभिमुख न होता मर्यादितचं राहिले. त्यामुळे, महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांचा विचार करता कोकणात ॲड. प्रा. रमाकांत यादव सरांचं नेतृत्व का स्विकारलं गेलं नाही अन् नविन नेतृत्व का तयार होतं नाही याची मनात नेहमीचं खंत आहे.
सामाजिक प्रश्न
रमामाईनगर हत्याकांड, खैरलांजी भोतमांगे वंश संहार प्रकरण यासारख्या अन्याय अत्याचार प्रकरणी ते नेहमीचं आघाडीवर होते. रिडल्स प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीमध्येही त्यांचा सहभाग होता. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषणे व लिखाण प्रकाशन समितीवर सदस्य म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रातही त्यांचा सहभाग होता. त्यांनी अनेक पदे, जबाबदाऱ्याही सांभाळून नेतृत्वही केले होते.
१९८७ साली प्रा. रमाकांत यादव सरांच्या माध्यमातूनचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऐतिहासिक सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचे पहिले सुतोवाचं मिळाले. माहे ऑक्टो. १९८७ मध्ये बौद्धजन पंचायत समिती सभागृहात एका कार्यक्रमाला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्या कार्यक्रमात त्यांनी कोकण पंचमहाल महार परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर १४/१५ मे १९३८ रोजी उपस्थित राहिलेल्या आठवणींना उजाळा देतांना , बाबासाहेबांनी अस्पृश्य बांधवांमध्ये जागृतीचा अग्नी प्रज्वलीत केला होता.
जागृतीचा अग्नी विझू द्यायचा
तो अग्नी विझू द्यायचा नाही तर तो सतत प्रज्वलीत राहिला पाहिजे म्हणून राजापूर ते गोवा हद्दमधील जनतेच्यावतीने १९३८ च्या ऐतिहासिक घटनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करणे आवश्यक आहे असे सभागृहाला सांगून, दिशाहीन समाजाला संघटीत करुन, प्रा. नारायण वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख अतिथी म्हणून नाम. रा.सु.गवई, विशेष अतिथी म्हणून माजी केंद्रिय अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते, पालकमंत्री प्रभू गांवकर, डॉ. भालचंद्र मुणगेकर, कवी शांताराम नांदगावकर, उर्मिलाताई पवार अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थित सुवर्ण महोत्सव संपन्न केला.
अन् त्याचं ऐतिहासिक परिषदेचा अमृत महोत्सव १३/१४ मे २०१३ रोजी कणकवली येथे अभुतपूर्व स्वरुपांत ऍड. प्रा. रमाकांत यादव यांच्या अध्यक्षतेखाली, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, नारायणराव राणे, तत्कालीन खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित उत्साहात संपन्न झाला. सन २००७ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक संस्थांच्यावतीने त्यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी येथे धम्मदिक्षा शतक महोत्सव संपन्न झाला. संगमेश्वर येथे गाडीला अपघात होऊनही सदर कार्यक्रमात ३५० लोकांना धम्मदिक्षा देण्यात आली. मात्र, त्यांच्या रुपांने कोकणातील आंबेडकरी चळवळीला दिशा देणारा निष्ठावंत, अभ्यासू शिलेदार हरपल्यांने, अशा आधारवडाची पोकळी भरुन निघणे फारचं अवघड आहे.ॲड. प्रा. रमाकांत यादव सरांना प्रथम स्मृतीदिनी विनम्रतापूर्वक अभिवादन !
पोचिराम कांबळे : एका नामांतर शहिदाची अस्वस्थ कहाणी..!
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 18, 2021 12:51 PM
WebTitle – Prof. Ramakant Yadav, a learned stonemason of the Ambedkar movement