अनेक पुरस्कार मिळवून अगोदरच प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवलेला कॉपी हा चित्रपट काल अखेर अपेक्षित हाऊसफुल घेत रिलीज झाला.अलीकडे मराठीत शालेय जीवनावर आधारित काही मोजके चित्रपट येवून गेले.काही प्रमाणात शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आपण पाहिले.नावातच शाळा म्हणून पाहिलेला चित्रपट काही तद्दन मसाला असलेले व्यावसायिक गणिते सांभाळत केलेली कसरत.
या सर्वांचेच मूळ इथली व्यवस्था
कॉपी या सर्वांना छेद देत एक वेगळं विश्व उभं करतो. वीट भट्टी कामगारांच्या मुलांचं शिक्षण ज्याचा आपण स्वप्नात देखील कधी विचार केलेला नसतो.त्यांच्या समस्या.त्यांची स्वप्ने.शिक्षणसम्राटांची पिळवणूक.अनुदानित शाळांचा आणि शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न त्यातून कुटुंबाची होणारी ओढताण.अपरिहार्यतेतून प्राथमिक शिक्षकांनी उचललेली पाउले.शिक्षणाचे बाजारीकरण आणि या सर्वांचेच मूळ इथली व्यवस्था.
मध्यंतरी ऐंशी हजार मराठी शाळा बंद केल्याच्या बातम्या येत होत्या तेव्हा हा चित्रपट निर्मितीप्रक्रियेत होता.त्यानंतर अनेक फिल्मफेस्टिवल गाजवत होता.हा योगायोग असेलही परंतु एक शाळा बंद झाल्यानंतर किती लोकांची आयुष्य उध्वस्त होतात हे पाहणं अंगावर येतं.अशा एकूणच अतिशय गंभीर विषयावर चित्रपटाचे कथानक बेतलेलं आहे. चित्रपटातील कलाकार निवड अतिशय उत्तम झाली आहे.मिलिंद शिंदे यांचा अभिनय एक वेगळी मेजवानी आहे.प्राथमिक शिक्षक अन खाजगी शिकवणी घेणारा शिक्षक अशा दोन्ही भूमिका चोख अन इरसालपणे रंगवल्या आहेत.
अभिनय
ख्वाडा मध्ये ताणून मारीन हा संवादफेम अनिल नगरकर यांनी उभा केलेला शिक्षणसम्राट तंतोतत वठला आहे.बेरकी आणि बेफिकीरवृत्ती ठळकपणे लक्षात राहते. विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेला अंशुमन विचारे यात आपल्याला प्राथमिक शिक्षकाच्या रुपात त्याच्या विनोदी प्रतिमेला छेद देत वेगळ्या भूमिकेत भेटीला येतो आहे.जगन्नाथ निवंगुणे हा एक वेगळ्या पठडीतला अभिनेता.पोलीस अधिकारी म्हणून कायम लक्षात राहणारा यात प्राथमिक शिक्षक म्हणून यशस्वीरीत्या भूमिका निभावतो.
काहीवेळेस केवळ मुद्राभिनयातच बरेच अव्यक्त संवाद बोलून प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झालाय असं मला वाटतं.शालेय मुलांची भूमिका केलेले तीनही बालकलाकार श्रद्धा सावंत , प्रतीक लाड़, अदनेश मूडशिंगकर या चित्रपटाचे युएसपी आहेत.त्यांचा अभिनय पाहताना कुठेही हे कृत्रिमता जाणवतं नाही.याउलट चित्रपट आपल्यासोबतच घडत जातो की आपण त्याच्यासोबत समरसून जातोय असं होतं. कमलेश सावंत यांनी उत्तमप्रकारे शासकीय अधिकारी रंगवले आहेत.सुरेश विश्वकर्मा यांनी पाटलांची भूमिका नेहमीप्रमाणे सहज आणि चोख वठवली.हे सगळेच कलाकार तुम्हाला वेगळा अनुभव देवून जातात.
अंतर्मुख करणारं वास्तव
चित्रपटाचा मध्यंतर झाला तरी आम्ही बराच वेळ शांत बसुन होतो.आपलं सबकॉन्शस माइंड त्यातून लवकर बाहेरच पडत नाही.
असा काहीसा कॉपीचा अनुभव आहे.सिनेमातील काही प्रसंग, विषय ठळक होऊन तरळत राहतात.
अभिनेत्यांकडून हवं तसं काम करून घेण्याचं कसब दिग्दर्शकाकडे असावं लागतं
आणि यात काही अभिनेत्यांना त्यांच्या आजवरच्या अभिनय चौकटीला तोडून
वेगळ्या भुमिकेत त्या भुमिकेला न्याय देताना पाहीलं या साठी त्यांची आणि दिग्दर्शकाची मेहनत आहे हे नाकारून चालणार नाही.
उत्तम पार्श्वसंगित, सिनेमाचा चढता आलेख, कसदार अभिनय, दमदार संवाद
आणि महत्वाचं म्हणजे सिनेमॅटोग्राफी, सिंम्बाॅलिक फ्रेम्स, लाईट इफेक्ट्स सिनेमाला एका उंचीवर घेऊन जातात.
मी याठिकाणी आग्रहाने विनंती करेन हा चित्रपट तुम्ही अनुभवला पाहिजे.एक अंतर्मुख करणारं वास्तव चुकवू नका.
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)