सावित्रीबाई फुले- सावित्रीमाई, तुला मारलेल्या शेण,गोट्यांची सुंदर फुलं झाली आहेत. तुझ्या वाटेवर पसरलेल्या अनेक यातनांचे डोंगर आज भुईसपाट झाले आहेत तुझी खाच खळग्याची वाट आज हमरस्ता झाली आहे चालत आहेत तुझ्याच लेकी त्याच हमरस्त्यावरुन अविरत तुझ्यावरच्या प्रेमाची गाणी गात आईच्या मायेची सावली तु कमी पडू देत नाहीस कधीच तुझ्या वाटेवरचे काटेही आज नतमस्तक होत आहेत तुझ्या लेकींचे श्वास आत्मविश्वासानं भारलेत जितके कष्ट तु घेतले शिक्षणाचा मळा फुलवायला तो मळा बहरलाय खुपसा क्रांतीबाच्या साथीनं पाहीलेल्या अचाट स्वप्नांचे मळे आज तुडुंब पिक देतायत अनाथांची माय तु बनलीस आज तेच अनाथ सर करतायत शिखरे नवनवीन उत्तुंग हिमालयाची जीवनातील ध्येये गाठत आहेत तुझ्या स्वप्नांच्या साथीनं – सतिश भारतवासी कोल्हापूर
साउचा वसा
सावुमाय, तुला सगळ्यात जास्त छळणाऱ्या भटा-बामणांच्या, आम्ही पोरी सगळ्यात जास्त शिकतो. आमच्या शिक्षणाचा आम्हाला माज चढेल इतक्या शिकतो.सगळी धार्मिक बंधनं झुगारुन देऊन जगतो पण माझ्या बहुजन मैत्रिणी,आज ही जास्त शिकलं तर लग्न होणार नाही, आपल्या मर्जीने शिक्षण घेतलं तर जात नावं ठेवेल, घरदार वाळीत टाकेल म्हणून शिकत नाहीत.शिकल्या तरी रितीभातीच्या जोखडातून स्वतःला मोकळं करून शकत नाहीत. त्यांना यातून मुक्त करायला हवंय गं. तू पुन्हा एकदा जन्माला ये. फक्त जोतीराव नाही आम्हीसुद्धा तुझ्यासोबत ठाम उभ्या राहू. आपण या बहिणींना या धर्माच्या, जातीच्या जोखडातून मुक्त माणूस म्हणून जगायला शिकवू. सावुमाय,तू परत ये गं… #सावित्रीची_लेक_गंगव्वा– Gayatrie Joshi
कांकण हाती |आली लेखणी || जागवला मनी | स्वाभिमान || बाई शिकली | राष्ट्र शिकले || बहु उद्धारले | खानदान || विद्येचा देव | गणेश नाही || सरस्वती नाही | ठेवाभान || तुटल्या बेड्या | झाली प्रगती || जुन्या रीतीभाती | दाणादाण || समान संधी | ध्येय साऊचे || करू माइचे | गुणगान || साउचा वसा | फुलवी आशा || बनवूया देशा | बलवान || तयार रहा | नायकाखल || म्हणे अमोल | सावधान || – Amol Gaikwad (प्रकार – अभंग)
मारेकर्यांचेही मनपरिवर्तन
पुण्यातल्या कर्मठ-सनातनी ब्रम्हव्रृदांच्या दहशतीला भिक न घालणार्या, प्रसंगी त्यांनी पाठवलेल्या मारेकर्यांचेही मनपरिवर्तन करणार्या, बहुजनांच्या व स्त्रिशिक्षणासाठी शेणगोळेही खाण्याची तयारी ठेवणार्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहचारिणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र ! –साक्षी सप्तसागर
भांडवल आमच्याकडे नव्हतेच. शिक्षण हेच आमचे भांडवल. जीवनाचा सारा खेळ आम्ही ह्या शिक्षणाच्या जीवावर खेळतो आहोत. आमच्यासाठी कैक पिढ्याआधी तू याची रुजवात करून ठेवलीस, कष्ट उपसलेस, राबराब राबलीस. तुझ्यामुळेच आमच्या लेकी-बाळी, आया-बहिणी, आम्ही सारे शिकत आहोत. आजच्या दिवशी तुला मनःपूर्वक अभिवादन. सावित्रीमाई, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याप्रती अन तुझ्या कार्याप्रती कृतज्ञ राहू. –Nilesh Abhang
शोषक वर्गाच्या कोणत्याच व्याख्येत न बसणं
“सावित्रीमाईंनी मुलींच्या शिक्षणा करता दगड शेण अंगावर झेलले” नाही रं बाळ्या. तसं नसतयं. अंगावर झेलायला दगड शेण काय आकाशातून पडत नसतोय. शूद्रा-अतीशूद्रांची लेकरं शिकवायला साऊ घरा बाहेर पडे पासून तिच्यावर दगडशेणाचा मारा होतोय म्हणजे कुणीतरी फेकणारं असलं पाहिजेत. कोणत्या वर्गाच्या हितसंबंधाला, कोणत्या वर्गाच्या हेजेमोनी मक्तेदारीला शह देत फुले दाम्पत्यांनी मानव मुक्तीचा हा लढा उभारलं हे समजून घ्यायचं. त्यामुळं, “एक शूद्र समूहातली स्त्री, मुलींना शिकवतेय, धर्मद्रोह करतेय शिक्षणावरच्या आमच्या जातीय वर्चस्वाला शह देतेत म्हणून भटाब्राह्मणांनी सावित्रीमाईंवर दगड शेण फेकले”
किंवा अजून सोपं, “ब्राह्मण पुरुषांनी फक्त त्यांच्या सोयीनुसार धार्मिक अधिष्ठानाच्या बळावर इतरांना कमी दर्जाचे थेट सबह्युमन मानून आयडीयलाईझ केलेल्या जगात कुणीतरी आपलं माणूसपण असर्ट करण्याचा अक्षम्य गुन्हा करतंय म्हणून भटा ब्राह्मणानी सावित्रीमाईवर जाता येता दगड शेणाचा मारा केला, त्यांचा अनन्वित छळ केला” असं असतंय ते. शोषक वर्गाला अधोरेखित करायचं असतं! उगाच शोषक वर्गाला मोकाट सोडून शोषितांच्या माणूसपणाच्या लढाईलाचं फेटिश करण्यातून काहीच हाशील नाही. ते काम इथल्या दांभिक अकॅडमीया, पत्रकारं, विचारवंत, लेखकरावांचं. आपलं नाही. आपलं काम ह्या जातीय वर्चस्वावर, पावर डायनामिक्स वर बोलणं. शोषक वर्गाच्या कोणत्याच व्याख्येत न बसणं. सावित्रीमाईंना हीच सर्वात मोठी आदरांजली असेल! – Gunvant Sarpate
ब्राम्हणीव्यवस्थेचे जोपासन
तुझ्या जन्माआधी अंधार उपसणाऱ्या आम्ही आज लख्ख उजेडाची तिरीप होऊन झगमगलो आहोत.. हाती वीणाघेऊन टाळ कुटणारी सरस्वती ही विद्येची देवता नसून इथल्या मातीचा वास अंगाखांद्यावर मिरवणारी आन आमच्या हाती लेखणी परजून देणारी सावित्रीबाई फुले हीच आमची आद्य राष्ट्रमाता होय। सावित्रीबाई जयंती करायची आन विद्येची देवता म्हणून शाळा, सरकारी कार्यालये आणि घरीसुद्धा काल्पनिक विणेंधरी सरस्वतीचे पूजन सुरू ठेवायचे हा दुटप्पीपणा आजही आहेच की..
सावित्रीबाईची तसबीर निव्वळ देखावा म्हणून पूजयची आन मार्गशीर्ष गुरुवार, हळदीकुंकू समारंभ आणि कुळाचार व्रतवैकल्ये, यथासांग करायची हा बेगडीपणा करणाऱ्या स्त्रिया आपल्या आसपास अगदी आपल्या मिञयादीतही आहेच की..सावित्रीबाई फुलेंची वैचारिक पोस्ट टाकायची आन स्त्रीमुक्ती लढ्यातील तिचे योगदान अनुल्लेखाने टाळून महिला दिवस साजरा करायचा….साधं गुगल केलं तरी स्त्रीवादी लढ्याचा आद्यपाया घालणारी स्त्री ही सावित्रीबाईच होती हा निष्कर्ष निघतो। तरी तिला वगळून किंवा हवी तेवढीच सावित्रीबाई तोंडी लावायला घेऊन मांडणी केली जाते।बाकी सावित्रीबाईने सुरुंग लावलेल्या ब्राम्हणीव्यवस्थेचे जोपासन करण्यातच साऱ्या दंग आहेत… सावित्रीची स्वीकार म्हणजे इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेचा नकार हे इथल्या बहुजन स्त्रीच्या कधी लक्षात येणार आहे। माऊली तुला विनम्र अभिवादन। – सुरेखा पैठणे
साऊमाय तुझ्याचमुळे रुजली खोल माझी अक्षरमुळे…
शिक्षण : माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे काढणारे शिक्षण ! शिक्षण : कुटुंब, सामाजिक , आर्थिक , राजकीय मानवी अस्तित्वाच्या सर्व आयामांना एकाचवेळी छेद देणारे शिक्षण ! ज्यावेळी तुमच्या समोर चहुबाजूने घेरलेला एक भलामोठा अभेद्य वाटणारा पहाड/ किल्ला असतो, आपण काही कृती केली नाही तर आपण यातच गुदमरून मरणार हे माहित असते; मीच नाही तर माझ्या आधीच्या पिढ्या तशाच मेल्या आहेत हे माहित असते; माझ्या पुढच्या पिढ्या देखील तशाच मरणार आहेत याची खात्री असते भावनिक प्रतिक्रियांना मर्यादा असतात एव्हढेच नव्हे तर त्या तुमचाच शक्तिपात करत असतात; कितीही डोके आपटले तरी किल्ल्याला ढिम्म काहीही होणार नाही असे वाटत असते;
सावित्रीबाई फुले
त्यावेळी त्या पहाडाच्या पायातील एक भलामोठा दगड चिणायाचा असतो, बाहेर काढायचा असतो ! मग यथावकाश इतरही चिरे हळू लागतात ; चिरे हलत आहेत म्हटल्यावर गलितगात्र केली गेलेली अनेक पुढे येतात कितीही अभेद्य वाटला तरी पहाडाचा / त्या तुरुंग किल्याचा “जीव” त्याच्या पायात असतो ! महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी हेच केले ! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना क्रांतिकारी अभिवादन ! – Sanjeev Chandorkar (३ जानेवारी)
क्रांतिकारी, विद्रोही या संकल्पना अत्यंत बृहद, व्यामिश्र अशा संकल्पना आहेत. त्यांना थेट विचार-व्यवहारात आणण्यासाठी तेवढीच जिगर न् धमक लागते. सावित्रीमाईंचा वारसा पेलणं ही जातायेता सहजपणे करण्याची बाब नव्हे.सावित्रीच्या लेकी म्हणवून घेणाऱ्या माझ्यासह सर्व जणींना त्यांचा हा धगधगता वैचारिक कृतिशील वारसा पेलण्याचं बळ मिळो. समग्राशी डोळा भिडवण्याची ताकद आम्हा सर्वांनाच अर्जित करता येवो. माई, तुला विनम्र अभिवादन ! – Pradnya Daya Pawar
३ जानेवारी सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन
#३जानेवारीसावित्रीबाईफुलेमहिलाशिक्षणदिन– प्लेगयोद्धा सावित्रीबाई – प्रा. हरी नरके #सावित्रीउत्सव सावित्रीबाईंनी डॉक्टर यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.
तरिही त्या जीव धोक्यात घालून प्लेगयोद्धा म्हणून लढत होत्या
१८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं. देशभर प्लेगनं हाहाकार माजवलेला होता. सारे भारतीय दहशतीखाली जगत होते. अनेक नेते स्वत:चा जीव वाचवण्यासाठी दुर रानावनात निघून गेले होते. प्लेग संसर्गजन्य रोग असल्याची व रुग्णाला आपण स्पर्श केला तर आपल्यालाही तो होऊ शकतो याची माहिती त्यांना मुलगा यशवंतकडून मिळालेले होती. तरिही त्या जीव धोक्यात घालून प्लेगयोद्धा म्हणून लढत होत्या.
मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्या या शौर्यांगणेची मात्र हवी तेव्हढी दखल घेतली नाही… राजकीय शहीदांचे पोवाडे गाणारी आमची पाठ्यपुस्तके या सामाजिक शहीदाबद्दल तोंडात मिठाची गुळणी धरून असतात. हा भेदभाव, हा पक्षपात का? उर्वरित लेख वाचण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करावे… https://harinarke.blogspot.com/… – प्रा.Hari Narke
निमित्त- २/३ जाने. २०२१
कुठैत ‘टॉपर’ मुली???
दरवर्षी दहावी बारावीचा रिझल्ट लागला कि जोक्स फिरत राहतात… कुठं जातात या ‘टॉपर मुली’? या अर्थाचा विनोद असतो तो. अगदी पूरुषच नव्हे तर बायकाही यात अग्रेसर असतात… याला मी डार्क ह्युमर पण म्हणु शकत नाही कारण पाठवणाराचा कुचेष्टेचा सुर लगेच दिसतो. मध्यंतरी दहावीच्या रिझल्टनंतर माझ्या विद्यार्थ्यांने wa status ला ठेवलेला हा जोक… इतर ठिकाणी काही बोलत नाही पण माझ्याच विद्यार्थ्यांनं ठेवल्यानं भयंकर गिल्ट आला. जग बिग, समाज बिमाज बदलायचा,पिढी घडवायाची हे असलं काहीही माझ्या डोक्यात नाहिये… पण माझ्यासमोर जी 100-150 टाळकी रोज तासभर बसतात त्यांना नाय बदलु शकले तर जिंदगी बरबाद समझो..त्याला जे बोलले तेच थोडं expand करुन लिहितेय. कुठं जातात या टॉपर मुली? ..
टॉपर मुली
कुठंच नै. कारण त्यांना कुठंही जायला जागा नसते ना स्वातंत्र्य. जास्ती मार्क्स मिळवणं ही त्यांची गरजै. तुम्हा मुलांना मार्क्स कमी पडले, नापास झाले कि लग्न लावून देण्याची धमकी मिळत नाही. असाही एक जौक फिरतच असतो. त्यावरही हसता येत नाही कारण तो पण सिरियस मैटरै. अम्हा मुलींना शिकण्यासाठी जास्त मार्क्स घ्यावैच लागतात कारण कमी मार्क्स पडले कि लग्न लावुन देईन या धमक्या पोकळ नसतात. अगदी खऱ्याखुऱ्या असतात. माझ्या वर्गातल्या अनेक मुलींची शाळेत असतानाच लग्नं झाली. आणि फक्त कमि मार्क्स पडालेल्यांचीच नव्हे तर टॉपर मुलींचीही झालीत.पण जास्त मार्क्स मिळाल्याने घरच्यांना पुढं शिकवा असं बोलायला जरा confidence येतो.. त्यांचे पुढं शिकण्याचे चान्सेस 80% होतात. 20% मात्र आर्थिक परिस्थिती, लांब गावला कॉलेजेस आणि पैरंटल इगो..
म्हणजे ‘आमच्या खानदानीतल्या पोरी बाहेर जाऊन शिकत नैत’ यात बळी जातात. मावशीच्या घराशेजारी मुलगी होती. होम सायन्स करायचं होतं. भयंकर हुशार होती. घरची परिस्थिती गडगंज वगैरे होती. पण बारावीनंतर पोरीनीं कॉलेजला जायचं नसतं. लफडी करतेत शिकलेल्या पोरी म्हणून तिचं लग्न लावण्यात आलं. इथं असतात या टॉपर मुली… तुमच्या आजुबाजुला किंवा तुमच्या घरात. तुमच्या हाताखाली एखाद्या नोकरासारख्या राबत असतात. आणि हा असा नोकर असतो जो हुंडा, रुखवतरुपी संसार, सोन्यारुपी investment घेऊन येतो आणि वर्षाकाठी एखादी साडी,ती पण काही ठिकाणि मिळत नाही असा राबत असतो. आणि काही टॉपर मुली शिकल्याच पुढं, लागल्या नोकरिला तर office politics, eve teasing , सेक्सुअल हैरैशमेंट वगैरेंनी अडवलं जातं.
Gender politics
Gender politics नावाचा प्रकार फार भयानकै. यात स्त्रिया सुट्टी जास्त घेतात म्हणून नोकरी देताना अडवणुक करणं, संसार आणि जाॉब करताना धावपळ होईल या नावाखाली त्यांना संधी न देणं, एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट त्या कितीही capable असल्या तरी केवळ स्त्री असल्यानं न देणं अशा अनेक गोष्टी समावेशै. मानसिक आणि बौध्दिक खच्चीकरण करण्यात आपला हा टिनपाट समाज भयंकर अग्रेसरै. तरीही काही मुली उरतात… त्या टॉपर असतीलच असं नाही पण जास्त मार्क्स घेऊन शिकण्याचं, जॉबचं, प्रिव्हिलेज मिळवतात.. पुढं शिकतात. जॉब करतात.. काही जणी घर जॉब दोन्ही करतात. काही जणींना घरुन विरोध होतो तिथंही न खचता त्या पुढं येतात.. काहींना घरुन पुर्णतः पाठिंबा मिळतो.. आकाश मोकळं मिळतं वा मिळवतात आणि मग उडतात…
त्या तसल्या फालतु जोक्सच्या शेणगोळ्यांना फाट्यावर मारायाला आम्हाला साऊने शिकवलंय कृतीतुनच
साऊच्या अंगावर शेणाचिखलाचे गोळे पडले तसे यांच्यांही पडतात वाईट चारित्र्य, attitude, ego दाखवते वगैरेंचे.. त्यांना कधी झेलत,कधी टाळत, कधी प्रतिवार करत पुढं जातात… काही आमच्या सारख्या असतात ज्यांना सगळीच प्रिव्हीलेज मिळत जातात… करियरवर फोकस करण्यासंदर्भात असो वा मनसोक्त जगण्याबाबत असो पण सुरुवात त्यांचीही जास्ती मार्क्स मिळवण्यातुनच होते… !! तर इथं असतात या टॉपर मुली.. आपल्याच आजुबाजुला.. साऊच्या सावल्या..!! आणि टॉपर नसलेल्याही असतातच.. साऊच्याच सावल्या…!! शिकण्याचं प्रिव्हिलेज मिळवण्यासाठी टॉपर होणं किंवा जास्ती मार्क्स घेण्याची धडपड करावी लागते त्यांना…!!! जोती-साऊने दारं उघडुन दिलीत… त्यात प्रवेश करण्याचं प्रिव्हीलेज सगळ्यांना मिळो…!!!! टॉपर आणि नॉन-टॉपर मुलींनाही..!! बाकि तुमच्या त्या तसल्या फालतु जोक्सच्या शेणगोळ्यांना फाट्यावर मारायाला आम्हाला साऊने शिकवलंय कृतीतुनच!!! साऊ माये… Happy birthday #You_Go_Girl– Prie Patil
क्रांती ज्योत, पेटविली, इथे, सावित्रीबाईंनी दाखविली, शिक्षणाची, वाट, विद्येची जननी.! मात, करूनी विरोधां, शाळा, स्त्रियांना खोलल्या! पाया, तो स्त्रीशिक्षणाचा, अडचणी, दुर केल्या .! स्त्रिया, त्याकाळी लाचार, रस्ता, होता खडतर ! नशिबात, पुजलेला, कायमचा, अंध:कार ! फुले, दांपत्य महान, शिक्षणाची, कुंजी दिली! विलायती, भाषेचीही, चव, ज्ञानाई चाखली ! कर्मकांड, संपवुनी, अंधश्रद्धा, नाकारली ! सत्यधर्म, पाळताना, जोतिबांना, साथ दिली ! रोष, धर्म मार्तंडांचा, अंगावरी, ओढविला ! प्लेग, रूग्णांच्या सेवेत, प्राणत्याग, त्यांनी केला ! ज्ञान, दिलेस स्त्रियांना, मुढ, मती घालविली ! कसे फेडू, आम्ही पांग, थोर, तुझे उपकार ! जन्मदिनी, सारे करी, दिन, बालिका साजरा! कर्तृत्वांसी, वंदुनीया, आज, तुम्हांसी मुजरा ! पहिल्या स्त्री शिक्षीका ज्ञान ज्योती ” सावित्री माई फुले ” यांच्या जयंती निमित्त त्यांना कोटी दशकोटी प्रणाम ! – Babasaheb Thorat
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)