लोकसभा निवडणुकीपूर्वी बाळासाहेब आंबेडकर यांनी येथील बारा अलुतेदार बलुतेदार वंचितांना, शोषितांना घेऊन वंचित बहुजन आघाडी हा एक राजकीय पर्याय उभा केला. सर्व जाती-धर्मातील लोकांना निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व देणारा आणि एकजातीय राजकारणाला छेद देणारा हा संपूर्ण भारतातील पहिलाच राज्य पातळीवरील प्रयोग होता. काहीसा समान प्रयोग (अकोला पॅटर्न) हा बाळासाहेब आंबेडकर अकोला जिल्ह्यात गेल्या २० पेक्षा अधिक वर्षपासून यशस्वीपणे राबवत आले आहेत पण दुर्देवाने याची चर्चा कधी होत नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादीकडे १२ जागा मागितल्या होत्या
वंचित बहुजन आघाडी चा प्रमुख विरोध हा भाजपच्या धर्मांध राजकारणाला होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप बरोबर आम्ही जाणार नाही, आम्ही काँग्रेस बरोबर युतीसाठी तयार आहोत हीच वंचितची पहिल्यापासून भूमिका राहिली होती. भाजप ला कडाडून विरोध करणारे काँग्रेस-राष्ट्रवादी, इथले पुरोगामी, समाजवादी , बुद्धिजीवी, डावे आणि तथाकथित पुरोगामी पत्रकार यांनी भाजपलाच विरोध करणाऱ्या वंचितच्या झंझावाताला थोपवण्यासाठी कसे एकमेकांना पूरक काम केले याचा शोध घेण्यासाठी हा लेखनप्रपंच. तसेच पुरोगामी, समाजवादी , बुद्धिजीवी ,डावे, काँग्रेसी यांची वंचितांना, शोषितांना न्याय देण्याची भूमिका खरंच प्रामाणिक आहे का याचासुद्धा येथे यानिमित्ताने उलगडा होईल.
बाळासाहेबांनी लोकसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीकडे १२ जागा मागितल्या होत्या तेव्हापासूनच वंचित बहुजन आघाडी ला खूप मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. परंतु महाराष्ट्रातील जनतेला त्या १२ जागा कोणत्या आणि कोणासाठी मागितल्या हे शेवटपर्यंत समजून न देण्यामागे काँग्रेस-राष्ट्रवादी, मिडिया आणि बुद्धिजीवी यांचे अतिशय काळजीपूर्वक आखलेले षडयंत्र सगळ्यांपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे.
हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचू दिला नाही
वास्तविक पाहता बाळासाहेबांनी १२ जागा अशा मागितल्या कि ज्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने मागच्या सलग ३ निवडणुकांमध्ये गमावल्या आहेत. तसेच या १२ जागांवर वंचित २ धनगर , २ माळी , २ मायक्रो ओबीसी , २ भटके विमुक्त आणि २ मुसलमान उमेदवार उभे करेल असा प्रस्ताव बाळासाहेबांनी ठेवला होता. आणि हा प्रस्ताव काही गुपित नाही तर मिडिया समोर बाळासाहेबांनी अनेक वेळा बोलून हि दाखवला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीने आणि मीडियाने फार चलाखीने १२ जागा ज्या मागील ३ निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी हारली आहेत या मुद्यावर आणि त्या जागा कोणाला देणार या मुद्यावर कुठल्याही प्रकारे चर्चा घडवून आणली नाही कि हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचू दिला नाही.
आज महाराष्ट्राचे चित्र खूप वेगळे दिसले असते
वर्तमानपत्र, मुलाखती यांचा सगळं फोकस हा फक्त १२ जागा हा आकडा किती मोठा आहे, बाळासाहेबांची तेवढी ताकद आहे का ? बाळासाहेब अव्वाच्या सव्वा मागणी करत आहे, किंबहुना बाळासाहेबांना युती करायचीच नाही आहे म्हणूनच ते एवढ्या जागा मागतायेत याच्यावर राहिला. जर दुसऱ्या दोन मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली गेली असती तर आज महाराष्ट्राचे चित्र खूप वेगळे दिसले असते. बरं बाळासाहेबांची या १२ जागा या वेगवेगळ्या समूहांना देण्याची भूमिका का आहे याचा ठाव घेण्याचाही कोणी प्रयत्न केला नाही.
१२ जागा वेगवेगळ्या जातसमूहांना देण्याची बाळासाहेबांची भूमिका होती
गेल्या ७० वर्षाच्या लोकशाहीत या जातसमूहांच्या खऱ्या लोकप्रधिना संसदीय राजकारण म्हणजे काय याची माहितीही इथल्या प्रमुख राजकारणी पक्षांनी होऊन दिली नाही, त्यांना त्यांचे हक्क मागता येतील , प्रश्न सोडवून घेता येतील अशा सभागृहात कधी पायही ठेवू दिला नाही. या लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी ,त्याची जाणीव करून देण्यासाठी या १२ जागा वेगवेगळ्या जातसमूहांना देण्याची बाळासाहेबांची भूमिका होती. इथल्या प्रमुख पक्षांची जर खरंच सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका असती तर संख्येने एवढा मोठ्या असणाऱ्या धनगर समाजाचे लोकप्रतिनिधी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषदेपेक्षा मोठ्या सभागृहात पण दिसले असते, बाकी लहान समूहांबाबत तर न बोललेले बरं. निवडणुकांचे निकाल बघता बाळासाहेबांची तेवढी ताकद आहे का या मुद्याला लोकसभा निवडणुकांनंतर पूर्णविराम मिळाला, म्हणजे मिडिया आणि राजकारण्यांनी जो मुद्दा लावून धरला आणि युती न होण्याचे कारण सांगितले तो पण बाद झाला.
एकजातीय सरंजामी राजकारणाला अजिबात पर्याय उभा राहू द्यायचा नाहीए
वास्तविक पाहता जे लोकसभा मतदारसंघ या पक्षांनी मागच्या ३ निवडणुकीत हरले आहेत त्या वंचित बहुजन आघाडी ला सोडायला काहीच हरकत नसायला हवी होती. तपशीलवार सांगायचे झाल्यास धुळे, जळगाव, रावेर, अकोला, जालना, रायगड, मावळ, कल्याण, औरंगाबाद, अमरावती आणि बुलढाणा या लोकसभा मतदारसंघात २०१४ आणि २००९ साली झालेल्या निवडणुकीत भाजप- सेना निवडून गेली होती. हे मतदारसंघ वंचितला सोडण्यास काहीच हरकत नव्हती , आणि मजेशीर गोष्ट म्हणजे २०१९ च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी परत एकदा भाजप-सेनाच निवडून गेली.
वंचित बहुजन आघाडी ला या जागा सोडल्या असत्या तर खूप मोठा फरक पडला असता, या आणि उर्वरित महाराष्ट्राच्या लोकसभा मतदारसंघात एकदम वेगळे निकाल लागले असते. भाजपचा झंजावातसमोर, दोन्ही पक्षातील नेत्यांच्या पक्षांतरामुळे दोन्ही पक्ष हे गलितगात्र होते, तरीही हे पक्ष एका नवीन, बऱ्यापैकी ताकत असणाऱ्या पक्षाला, वंचितला जागा का सोडत नसावेत हे समजण्यासाठी इथलं एकजातीय राजकारण समजून घेणे महत्वाचे आहे. खूप बारकाईने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे बघितल्यावर कळते कि या पक्षांना आपली एकजातीय सरंजामी राजकारणाला अजिबात पर्याय उभा राहू द्यायचा नाहीए.
जातवास्तव दाखवून दिल्याबद्दल बाळासाहेब धन्यवाद
पक्ष कुठलाही असो जास्तीत जास्त एका प्रबळ जातीचे खासदार निवडून यावेत आणि ज्यामुळे लोकशाही निवडक सरंजामी कुटुंबातच राहील याची काळजी या नेत्यांनी घेतलेली दिसते. वंचितबरोबर जर युती केली असती तर वंचितांच्या वाढलेल्या ताकतीमुळे ओबीसी, भटके विमुक्त , अल्पसंख्यांक आणि मायक्रो ओबीसी यांचे प्रतिनिधी संसदेत पोहोचतील आणि स्वतःचे प्रश्न स्वतः मांडून सोडवतील आणि यांच्या वर्चस्वाला धक्का पोहोचेल हे यांना भिती. हे पक्ष यशवंतराव चव्हाणांना आपले आदर्श मानतात आणि एक नेते तर मानसपुत्र म्हणवतात, याच्याइतका दुसरा मोठा विनोद नाही. सरंजामी राजकारण्यांचा एकंदरीत इथल्या ओबीसी, भटके विमुक्त , अल्पसंख्यांक आणि मायक्रो ओबीसी यांच्याशी सत्ता वाटुन घेण्यास किती आक्षेप आहे हे जातवास्तव दाखवून दिल्याबद्दल बाळासाहेब धन्यवाद !
आता दुसरे एक उदाहरण घेऊयात,यात येतात नेहमी प्रत्येक चॅनेल वर वादविवाद करण्यात प्रसिद्ध असणारे, अण्णा हजारे यांचे चाहते, थोर गांधीवादी, पुण्याचे चाचा. वर्तमानपत्रातील स्तंभातून आणि सोशल मीडियावर हे पोटतिडकीने नेहमी लिहीत असतात त्यामध्ये पर्यावरण, राजकारण, समाजकारण, संस्कृती, कुटुंब, विकास, परदेशातील शिक्षन पद्धती, विज्ञान, आंतराष्ट्रीय व्यापार यापासून ते विम्बल्डन मधील प्रेक्षकांचे समजुतदार वर्तन, पुण्यातील स्मशानभुमीवर कशा प्रकारच्या चिमण्या बसवल्या पाहिजेत अशा विविध विषयांवर उहापोह असतो.
विरोधाभासी राजकारणावर यांची लेखणी कधी चालत नाही
गांधीवादी सरांचा चाहता वर्गही ही मोठा असण्यामुळे हे लेख प्रचंड प्रमाणात वाचले आणि शेअर केले जातात. हे महाशय सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांवर प्रखर (?) टीका आपल्या वर्तमानपत्र, सोशल मीडिया आणि चॅनेल वरील ज्ञान वाटण्याच्या कार्क्रमातून भक्तिभावाने एकही दिवस खंड पडू ने देता करत असतात. त्यांतल्या त्यात राजू शेट्टी यांचे हे चाहते आहेत, तेच राजू शेट्टी जे एकदा भाजप आणि एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने खासदारकीची निवडणूक लढवून बसले आहेत आणि आता परत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर विधानपरिषदेवर जाण्यास बाशिंद बांधून तयार आहेत. पण राजू शेट्टीच्या या विरोधाभासी राजकारणावर यांची लेखणी कधी चालत नाही.
सगळ्या पक्षांवर टीका करणारे हे गांधीवादी साहेब वंचित बहुजन आघाडी ला अनुल्लेखाने मारत आले आहेत, याचे कारण शोधण्यासाठी फार सूक्ष्म अवलोकन करण्याची गरज आहे. वास्तविक पाहता हे बाळासाहेबांची अधून मधून स्तुती करत असतात, लवासा केस लढण्यासाठी बाळासाहेबांची मदत घेणे याना वर्ज्य नाही, कुठलाही सामाजिक आंदोलनात बाळासाहेबांच्या भमिकेला यांचा पाठिंबा असतो, बाळासाहेब म्हणाले कि इंदू मिल मध्ये या घडीला बाबासाहेबांचा पुतळा बसवू नका तर तो निधी कोव्हीडसाठी वापरा, तर यांनी लगेच कौतुक करून बाळासाहेब कसे बाबासाहेबांचे फक्त रक्ताचे नाहीत तर विचारांचे वारस आहेत हे दर्शवणारी पोस्ट खरडली.
तुम्हाला यांचा कावा समजून घेतला पाहिजे
खरं म्हणजे असल्या लोकांचा स्मारकालाच विरोध आहे पण उघड विरोध करायला हिम्मत नाही आणि केला तर आपले खरे रूप सगळ्यांना समजून आपला पुरोगामीपणाचा बुरखा फाटेल याची भिती. इथे तुम्हाला यांचा कावा समजून घेतला पाहिजे, आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्मारक लांबणीवर टाका हा अजेंडा हे पसरवतात पण वंचितला कसल्याहीप्रकारे आपल्या पेजवरून प्रसिद्धी देत नाहीत. अशा लोकांना पक्के माहित आहे कि समाजातील मोठ्या घटकावर हे प्रभाव पडू शकतात त्यामुळे यांनी गोल गोल चर्चा फक्त काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-सेना या चार पक्षांवर ठेवण्यात मोठी भूमिका निभावली आणि वंचितची भूमिका न पोहोचवण्यात हातभार लावला.
हे महाशय तर एकदा राजकीय पर्याय देण्याचा पण विचार करत होते पण वंचितांचा नवीन राजकीय पर्याय उभा राहत असताना, त्या पर्यायाचा प्रमुख निष्कलंक असताना , सर्व जातीधर्मातील लोकांना निवडणुकीत उमेदवारी देणाऱ्या त्या पर्यायाला हे महाशय अनुल्लेखाने मारतात, वंचितबद्दल काही बोलत आणि लिहीत नाहित. सगळ्या राजकारण्यांना भ्रष्टाचारी म्हणनारे, बाळासाहेबांची स्तुती करणारे गांधीवादी, त्याच बाळासाहेबांच्या नेतृत्वात पुढे येणाऱ्या वंचित बद्दल काही लिहीत किंवा बोलत का नाही हा प्रश्न जेव्हा माझ्यासारख्या सामान्य तरुणाला पडतो तेव्हा मला इथले पुरोगामी गांधीवादी कसे जातीयवादी आहेत आणि कसे जातवर्गव्यवस्था सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून पाळतात हे लक्षात आले.
बाळासाहेबांनी एकदाही कोंडीत पकडण्याची संधी दिली नाही
आता पुढचे उदाहरण घेऊयात, कायम आंतराष्ट्रीय विषयांवर संपादकीय खरडणारे संपादक महाशय. या संपादकांनी दुसऱ्या चॅनेलच्या मिशीवाल्या संपादकांबरोबर बाळासाहेब आणि अंजलीताई आंबेडकर यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी एकत्र मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये बाळासाहेबांनी अतिशय अभ्यासपूर्वक पद्धतीने वंचितची भूमिका स्पष्ट केली. मुलाखतकारांना बाळासाहेबांनी एकदाही कोंडीत पकडण्याची संधी दिली नाही, एकंदरीत वंचित ची भूमिका पारदर्शी आणि चालू शोषक समाजव्यवस्तेला बदलवणारी असल्यामुळे दोन्ही संपादकाना मनात नसूनही वंचित च्या भूमिकेची स्तुतीच करावी लागली.
हे स्तुती करताना वृत्तपत्राचे संपादक महाशय म्हणाले कि,”निवडणुकीचे काय होवो ते होवो पण चर्चेचा सार म्हणून मला असे वाटते कि मर्ढेकरांच्या कवितेत म्हंटल्याप्रमाणे आम्हास आम्ही पुन्हा पाहावे काढुनी चष्मा डोळ्यवारचा अशी वेळ आली तरी ते सुद्धा वंचित बहुजन आघाडी चे एक मोठे यश असेल असे मला वाटते.” पण हेच संपादक महाशय पुढच्या एका स्वतःच्याच ब्लॉग मध्ये बाळासाहेबांची भूमिका कशी चुकीची आहे आणि महाराष्ट्राचे नुकसान करणारी आहे असे म्हणतात तेव्हा परत माझ्यासारख्यांची मती गुंग होते. एवढी परस्परविरुद्ध भूमिका एका आठवड्याच्या कालावधीत घेण्यासाठी प्रचंड वैचारिक कोडगेपणा असावा लागतो , त्यासाठी तरी या संपादकांना नमन केले पाहिजे.
‘आहो तुम्ही “दादा” आहात
अनेक चॅनेलभ्रमण करून शेवटी युट्युब पोर्टलवर सेटल झालेल्या अजून एका समाजवादी संपादकाने तर बाळासाहेबांनी किती कोटीची रक्कम भाजप कडून घेतली आहे हा आकडाच प्रसिद्ध केला. बरं या आरोपांचे नॅरेटिव्ह हे कि, बाळासाहेबांनी भाजप कडून पैसे घेऊन स्वतंत्र निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नुकसान होऊन भाजपा चा फायदा होईल. परंतु हेच संपादक पुढे पहाटे शपथविधी करणाऱ्या अजितदादांच्या सरळसरळ भाजप पूरक भूमिकेला एवढ्या टोकाचा विरोध करताना नाही दिसले,
किंबहुना एका मुलाखतीमध्ये हे चक्क अजितदादांना म्हणाले ‘आहो तुम्ही “दादा” आहात अशा ब्लॅकमेलिंग ला कसे घाबरता’. म्हणजे सरळ जाऊन मिळाणाऱ्यासोबत एवढा लाळघोटेपणा तर एक वैचारिक भूमिका घेऊन सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका घेणाऱ्या बाळासाहेबांना लाचखोर आणि तोडपाणी करणारे नेते असे आरोप. वास्तविक पाहता आतापर्यंत कुठल्याच नेत्याची बाळासाहेबांनवर भ्रष्टाचार केल्याचा साधा आरोप करायची हिम्मत झाली नाही, मग तो नेता कितीही मोठा, जाणता असला तरीही.
सामान्य जनताही त्याला बळी पडली
बाळासाहेबांनी आतापर्यंत कसोशीने आपले चारित्र्य जपले आहे. त्या संपादक साहेबाना आमची विनंती आहे कि जरा तरी चाड असेल तर केलेल्या आरोपांचा एक तरी पुरावा समोर ठेवा. इथे वंचित आणि तमाम शोषित पिडीतांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे कि आपण नेहमी उजव्या विचारसरणीच्या पत्रकार आणि संपादकांना कडाडून विरोध करतो आणि तथाकथित पुरोगामी पत्रकार आणि संपादकांना डोक्यावर बसवतो, पण वास्तविक पाहता हे तथाकथित पुरोगामी संपादक हे उजव्या विचारसरणीच्या विषारी पत्रकारांहून वेगळे नाहीत, यांचे मुखवटे ओळखायला आपल्या सर्वाना शिकले पाहिजे. अशा संपादकांचे वंचितविरोधी लिखाण, व्हिडीओ हे काँग्रेस-राष्ट्रवादी कडून मोठ्या प्रमाणात पसरवले गेले आणि अशा संपादकांना आधीच डोक्यावर घेतल्यामुळे सामान्य जनताही त्याला बळी पडली.
बरं या आणि यांच्यासारख्या तथाकथित बुद्धिवाद्यांनी एकदाही वंचितच्या जाहीरनाम्यावर टिपण्णी केली नाही,
वास्तविक पाहता केजी तो पीजी मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन फक्त वंचितानेच दिले होते.
नेहमी इथल्या शिक्षणव्यवस्थेवर आक्षेप नोंदवणार बुद्धिजीवी
आणि परदेशातील शिक्षणव्यवस्थेशी तुलना करणारे संपादक याना कधीच बाळासाहेब
आणि वंचितांच्या प्रवक्त्याना विचारावेसे वाटले नाही कि हे खरेच शक्य आहे का ?
असेल तर तुम्ही यासाठी निधी कसा उपलब्ध करणार?
याचा फायदा फक्त राखीव जागेतील मुलांना होणार कि सवर्ण विद्याथ्यांना सुद्धा ?
पण असे प्रश्न विचारले कि वंचितची भूमिका सर्वसामान्य लोकांना कळेल
आणि तेच अडचणीचे होते यांच्यासाठी आणि यांच्या पोशिंद्यांसाठी.
पाणीप्रश्न
वंचित बहुजन आघाडी च्या जाहीरनाम्यातील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील धरणातून पाण्याचे समान वाटप करण्याचा कार्यक्रम. वास्तविक पाहता वंचितने इथे खूप मोठ्या प्रश्नाला वाचा फोडली होती. मराठवाड्यावर कायम पाण्याच्या असमान वाटपामुळे अन्याय झालेला आहे, यामुळे मराठवाड्यात शेती, उद्योग , रोजगार काहीही विकसित होऊ शकले नाही.
मराठवाड्यातून मुंबई पुण्याला शिक्षण आणि नोकरीसाठी होणारे मोठे स्थलांतर, मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सगळ्यांच्या मागे पाण्याचे असमान वाटप हे एक प्रमुख कारण आहे. बाळासाहेबांनी अनेक वेळा या प्रश्नाचा जाहीर सभांतून उल्लेखही केला, वंचितच्या प्रचारामध्ये या मुद्यासाठी एक स्वतंत्र चित्रफितीही प्रसिद्ध करण्यात आली.
या चित्रफितीमध्ये हा पाणीप्रश्न कसा सोडवला जाईल याचे अभ्यासपूर्ण प्रेझेंटेशन होते. इतर कुठल्याही राजकीय पक्षाने या विषयाकडे एव्हडे गांभीर्यपूर्वक पहिले नाही. वरती नमूद केलेल्या एकही गांधीवादी, पुरोगामी, डावे, समाजवादी विचारवंतांना किंवा राजकीय नेत्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. गम्मत म्हणजे वरती नमूद केलेले गांधीवादी चाचा हे याच मराठवाड्यातील आहेत, आणि मराठवाड्याच्या विकासाबद्दल बरेच काही लिहीत आणि बोलत असतात, पण या मुद्यावर त्यांनी मिठाची गुळणी धरली.
तुम्हाला विचारवंत तरी कसे म्हणायचे हो ?
वास्तविक पाहता कमीतकमी मराठवाड्यातील विचारवंतांनी समाजसेवकांनी याचे कौतुक करायला हवे होते,
तसे नाही तर निदान हे शक्य आहे कि नाही, यांच्यातील त्रुटी काय,
पाण्याचे सामान वाटप झाल्यास मराठवाड्यावर आणि पश्चिम महाराष्ट्रावर
काय आर्थिक, सामाजिक बदल परिणाम होईल हे तरी दाखवून द्यायला हवे होते
पण असे केल्यास वंचितला प्रसिद्धी मिळेल, लोकांपर्यंत वंचितचि खरी भूमिका पोहोचेल
आणि सरतेशेवटी आपल्या जातवर्गव्यवस्थेला धक्का पोहोचेल यामुळे
सगळ्यांनी एवढ्या महत्वाच्या मुद्याला दुर्लक्ष करून अनुल्लेखाने मारले.
अजुन एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहबांनी त्याच्या उमेदवारांची यादी ही जातीसकट प्रसिद्ध केली.
वास्तविक याची गरज का पडली ? बाळासाहेब कुठल्या वंचित घटकांना उमेदवारी देत आहेत?
आजपर्यंत यांना प्रमुख पक्षांनी का उमेदवारी दिली नाही ? यांचे प्रतिनिधित्व जवळजवळ शून्य कसे ?
आणि सगळे निवडून येणारे आजपर्यंत एकजातीय कसे ?
याच्यावर सुद्धा या विचारवंतांची लेखणी किंवा तोंड चालले नाहीं.
कदाचित हीच एकजातीय लोकशाही यांना मान्य असावी जी यांच्यासारख्यांचे हित जोपासते.तुम्हाला विचारवंत तरी कसे म्हणायचे हो?
एकजातीय तथाकथित बुद्धिजीवी लोकांचे खरे चेहरे
वंचितच्या जाहीरनाम्यावर, जातीनुसार उमेदवारी देण्याच्या भूमिकेवर बोलण्यापेक्षा या सर्व तथाकथित विद्वानांनी वंचित बहुजन आघाडी मुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे कसे नुकसान होणार आहे आणि वंचित ही बी टीम आहे असा अपप्रचार केला, परिणामी वंचितांची खरी भूमिका जनतेसमोर प्रभावीपणे पोहोचली नाही आणि वंचितची बरीचशी ताकद या अपप्रचाराला तोंड देण्यात खर्च झाली. तसेही हे सगळे विचारण्यासाठी, जाहीरनाम्याचा चिकित्सा करण्यासाठी मुळात एक वैचारिक प्रामाणिकपणा लागतो आणि त्याचा आणि तुमच्यासारख्या लोकांचा दूरदूरपर्यंत काही संबंध नाही याची जाणीव करून दिल्याबद्दल बाळासाहेब धन्यवाद.
वास्तविक पाहता या लोकांची दखल घेणे गरजेचे आहे का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडेल परंतु हे लोक काही अंशी ओपिनियन मेकर्स आहेत आणि यांच्या लिखाणाचा सामान्य लोकांवर बऱ्याच अर्थी प्रभाव पडत असतो. त्यामुळे यांची वैचारिक दांभिकता सामान्य लोकांना दाखवून देणे मला महत्वाचे वाटते. तसेच आपला शत्रू हा फक्त काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना-भाजप नसून कोडगे समाजवादी, काही भंपक पुरोगामी आणि संपादक वर्ग सुद्धा आहे याची जाणीव वंचित समर्थकांना करून देणे नितांत गरजेचे आहे. यामुळे वंचित ला किती फ्रंट वर लढाया करायच्या आहेत याची उमग होण्यास मदतच होईल. अशा एकजातीय तथाकथित बुद्धिजीवी लोकांचे खरे चेहरे समोर आणल्याबद्दल बाळासाहेब तुमचे आभार.
डाव्या चळवळीनेही वंचितचे,आंबेडकरी चळवळीचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले
इथल्या डाव्या चळवळीनेही वंचितचे, आंबेडकरी चळवळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. रस्त्यावरील आंदोलनात नेहमी बरोबर असणारे काही डावे पक्ष ऐन निवडणुकीच्या वेळेस आंबेडकरी विचारधारेशी फारकत घेताना आपण नेहमी बघतो. काही डावे नेते हे बाळासाहेबांनी चक्क पोसले आहेत, आंबेडकरी लोकांशिवाय यांचे एक तरी आंदोलन, मोर्चा महाराष्ट्रात यशस्वी होऊ शकतो का याचे डाव्यांनी नक्कीच आत्मपरीक्षण केले पाहिजे. पण एक चांगले झाले यानिमित्ताने तुमचा खरा चेहरा अधिक ठळकपणे पुढे आला, शोषकांची सत्ता संपवायची म्हणता, वर्गव्यवस्थेविरुद्ध लढण्याची भाषा करता आणि त्याच शोषणाविरुद्ध लढणाऱ्या पक्षाला सोडून भांडवलदारांबरोबर युती करता ?
कॉम्रेड तुमच्या दांभिकपणाला सलाम. या पोथीबाज लोकांना इथला समाज, इथली व्यवस्था समजली आहे का अशी कायम शंका यावी असे या सगळ्यांचे बाळबोध आकलन आहे, यांचे तत्वज्ञान भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात कशी यशस्वी होईल याचे उत्तर त्यांनाच माहित. तुमच्या तत्वज्ञानातील बाळबोधपणा समजून घ्यायला खूप अभ्यास करण्याची काहीच गरज नाही बाबासाहेबांचे “बुद्ध अँड कार्ल मार्क्स” इन-बिटवीन द लाईन्स वाचले किंवा “एंनेमी ऑफ द गेट्स” नावाच्या सिनेमातील शेवटचा मोनोलॉग लक्षपूर्वक पहिला तरी तुमच्या तत्वज्ञानाची खोली रुंदी कळते.
वंचितचा पराभव हा सर्व शोषकांनी मिळून, ठरवून केला आहे
अजून एक गोष्ट ठळकपणे मला नमूद करावीशी वाटते कि हे संपादक, गांधीवादी, डावे आणि समाजवादी
उठता बसता बाबासाहेबांचे, घटनेचे नाव घेत असतात
आणि त्यांच्याच लढ्याचा पुढचा भाग असलेल्या वंचितला बदनाम करायची एकही संधी सोडत नाहीत.
अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे जातिव्यवस्थेच्या उतरंडीत हे सर्व सगळ्यात वरच्या थरातील शोषक आहेत,
गदी सरंजाम्यांच्याही वरच्या थरातील.
अजून एक गोष्ट ध्यान्यात घेण्यासारखी म्हणजे काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांचा पर्याय उभा राहत होता
तेव्हा ह्या संपादक आणि बुद्धिजीवी यांनी राज ठाकरे यांना
“व्होट कटुवा” किंवा “बी टीम” म्हणून आक्रोश केल्याच्या कोणाच्या लक्षात नाही.
किंबहुना राज ठाकरे यांना मोठे करण्यात मीडियाचाच खूप मोठा हात होता.
बारकाईने विचार केल्यास लक्षात येईल कि राज ठाकरे यांना आक्षेप न घेण्याचे कारण म्हणजे
ते स्वतः शोषक वर्गातून येतात व इथल्या इतर शोषकांच्या हक्कावर गदा आणणारा त्यांच्या पक्षाचा धोरण, जाहीरनामा कधीच नव्हता.
आणि याच्या अगदी विरुद्ध अशी बाळासाहेब आंबेडकर यांचा वर्ग आणि जाहीरनामा !
येथे स्वच्छ चरित्र, अभ्यास वगैरे काही काम करत नाही मित्रानो !
हे सर्व चित्र पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली कि वंचितचा पराभव हा सर्व शोषकांनी मिळून, ठरवून केला आहे.
मुक्तीचा मार्ग
या सर्व शोषकांनी तीन प्रमुख मार्गांनी वंचितचा पराभव घडवला. एक – राजकीय पक्षांनी आणि पत्रकारांनी वंचित म्हणजे बी टीम असा प्रचार केला , दोन – मीडियाने वंचितच्या जाहीरनाम्यावर चर्चा न करता फालतू मुद्यांवर चर्चेचा फोकस ठेवला आणि तीन म्हणजे बुद्धिजीवींनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि वंचितला अनुल्लेखाने मारले. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे वंचितचि खरी व्यापक भूमिका लोकांसमोर न पोहोचता नकारात्मक प्रतिमा जनतेसमोर गेली आणि आधिच साधनांची कमतरता असणाऱ्या आणि तुलनेने नवख्या असणाऱ्या वंचितच्या प्रचार टीमला या सर्व अपप्रचाराला तोंड देण्यात अपयश आले.
आता सगळ्या शोषित पिडीतांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि तुमच्या मुक्तीचा मार्ग असलेल्या वंचितला विरोध म्हणजे तुमच्या मुक्तीला विरोध करणारे कोण आहेत. यापैकी एकही समूहाला वाटत नाही कि ओबीसी, भटके विमुक्त, अल्पसंख्यांक आणि मायक्रो ओबीसी यांची प्रगती व्हावी, यांना सत्ता मिळावी . हे सर्व वर्ग शोषकांची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत राहतात. यांच्यात आणि संघात फार पुसट रेषा आहे, बाळासाहेब ती रेषा दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.
वंचित बहुजन आघाडी ने बिघडवलेला व्होट बॅलन्स
हे सगळे आंबेडकरी चळवळीच्या बाहेरील लोक जे वंचितच्या अपयशासाठी सगळ्या बाजूने लढाया लढत होते,
तर अनेक आंबेडकरी चळवळीतील विचारवंत म्हणवणारे लोकही वंचितच्या अपयशासाठी झटत होते,
त्यांच्याबद्दल परत कधीतरी,पण तूर्तास तुम्ही सगळ्या आंबेडकरी जनतेच्या नजरेतून कायमचे उतरले आहात.
या सर्व अपप्रचाराला परदेशात स्थायिक झालेला अत्यल्प असा आंबेडकरी समाज सुद्धा बळी पडला
आणि या लढाईत पूर्णपणे अलिप्त राहिला.
वास्तविक पाहता हा समूह वंचितला थोड्या प्रमाणात आर्थिक पाठबळ देऊ शकला असता,
आधुनिक तंत्रज्ञान वापरून वंचितचि भूमिका प्रभावीपणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकला असता
पण सगळ्यांचीच मती गुंग करण्यात इथले प्रस्थापित पक्ष, मिडिया आणि बुद्धिजीवी यशस्वी ठरले.
माझ्या मते वंचितांचे यश म्हणजे वंचितने आपली हक्काची व्होट बँक बनवली
आणि विशेष म्हणजे ती एकजातीय नाही आणि न तुटणारी आहे,
इथून पुढे वंचितला याच्यापेक्षा कमी मते पडणार नाहीत हे नक्की,
आणि याची पक्की जाणीव प्रस्थापित पक्षांना झाली आहे.
महाराष्ट्रातील सध्या जे तीन पायांचे सरकार आहे त्याला मोठ्या प्रमाणात वंचितने बिघडवलेला व्होट बॅलन्स आहे हे नक्की.
आपला लढा हा आपल्याला एकट्यानेच लढायचं आहे
अजुन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि एकजातीय रग्गेल लोकांचा
आणि नेत्यांचा भरणा असणारा पक्ष जेव्हा तुमच्या पक्षाचे २ उमेदवार जे ओबीसी आणि एससी आहेत
याना विधानपरिषदेवर पाठवण्यास तयार होतो तेव्हा तुम्ही दखलपात्र आहेत याचीच ती पावती आहे.
असे असले तरीही वंचितचा मतदार, कार्यकर्ते, काही नेते निवडणुकीतील अपयशामुळे काही प्रमाणात निराश झाले आहेत,
त्यातच काही नेत्यांनी तळ्यातून मळ्यात उड्या मारल्यामुळे या नैराश्यात भर पडत आहे.
परंतु वर सांगितल्या प्रमाणे वंचितांचा लढा हा काँग्रेस-राष्ट्रवादी, सेना -भाजप, डावे, समाजवादी, गांधीवादी, भांडवलदार आणि जातदांडगे
या सगळ्याविरुद्ध होता आणि एव्हडे शत्रू असताना मर्यादित साधनातून मिळालेले हे यश अतिशय उल्लेखनीय आहे.
लक्षात ठेवा यापैकी कोणीही आपला मित्र नाही, तसे असते तर कवाडे
आणि सुरेश माने यांचे डिपॉझिट कधीच जप्त झाले नसते,
त्यामुळे प्रस्थापित बदलतील किंवा साथ देऊन सत्तेत वाटा देतील ही आशा सोडा,आपला लढा हा आपल्याला एकट्यानेच लढायचं आहे.
वंचितचे महत्वाचे यश
वंचितचे दुसरे महत्वाचे यश म्हणजे वंचितने आपले खरे शत्रू आणि मित्र कोण याची ओळख करून दिली. शोषक जाती सत्ताप्राप्तीसाठी कशा एकत्र येतात आणि स्वहित साधतात हे वंचितने दाखविले आणि महाराष्ट्रात जातीयता नाही असे म्हणने किती हास्यास्पद आहे हे समजले. इथून पुढे किती काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील, सोबती निवडावे लागतील आणि विश्वास ठेवावा लागेल याची जाणीव वंचितने करून दिली. तसेच हा लढा किती मोठा आहे, जवळजवळ सगळेच प्रस्थापित आपल्या प्रगतीच्या विरोधात आहेत याची आता सर्व दबलेल्या, पिडलेल्या जनतेला फक्त आणि फक्त वंचितच्या लढ्यामुळे समज आली.
कदाचित हे यश याघडीला निवडणूक जिंकण्यापेक्षा खूप मोठे आहे. या लढ्यात अजून एक दाखल घेण्यासारखी गोष्ट घडली ती म्हणजे अनेक ओबीसी विचारवंतांनी उघडपणे वंचितच प्रचार केला, यापुढे आपल्याला अशा विचारवंत आणि कार्यकर्त्यांना आपल्या चळवळीत अधिक वेगाने सामावून घ्यावे लागेल. एका नवीन बदलाची सुरुवात वंचितने यानिमित्ताने करून दिली आहे, ही सुरुवात आहे शोषण झालेल्या लोकांची न्यायासाठी एकत्र येण्याची आणि यात आज नाहीतर उद्या यश नक्की आहे, आणि आम्ही आमच्या ताकतीनुसार बाळासाहेबांचे हात बळकट करू आणि यश खेचून आणू .
तोपर्यंत बाळासाहेब धन्यवाद इथल्या जातव्यवस्थेचा बुरखा फाडल्याबद्दल…
आम्हाला आमच्या ताकतीची जाणीव करून दिल्याबद्दल…
इथली सत्ता आपण उलथवून लावु शकतो हा आत्मविश्वास दिल्याबद्दल…
आणि हा अभूतपूर्व लढा उभारल्याबद्दल !!
हेही वाचा.. महाविकास आघाडीत घटकपक्ष असूनही सत्तेत वाटा नसल्याने खंत
हेही वाचा.. कॉँग्रेस हा पांढरा हत्ती लोकशाहीला परवडत नाही
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)