कोरोनाचे संकट असल्याने शिवाजीपार्कवर होणारा शिवसेनेचा नियोजित दसरा मेळावा बंदिस्त सभागृहात पन्नास लोकांच्या उपस्थितीत पार पडला.शिवसेना अध्यक्ष म्हणून मान.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यातील (पदावर असताना) हे राजकीय पक्षांतर्गत भाषण केलं.
भाजपला देश पातळीवर जी सत्ता मिळाली ती अमानुष पद्धतीची होती
शिवसेना राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस या तीन पक्षांचे सरकार वर्षभरापूर्वी नाट्यमयरित्या सत्तेत आले.
सेनेने भाजप सोबतची युती तोडली.वास्तविक युती तोडण्याची मानसिकता लोकसभेलाच तयार झालेली,
युती होईल की तुटेल याची जोरदार चर्चा होती. मातोश्रीवर जेष्ठ शिवसैनिकांच्या बैठका झाल्या.
या बैठकीतही युती नको असा सुर बहुसंख्य शिवसैनिकांचा होता.असं काही शिवसैनिक खाजगीत सांगतात.
मात्र वरिष्ठ पातळीवर राजकीय युती पुढे चालविण्याचे धोरण ठरले.यामुळे काही शिवसैनिक नाराज देखील होते.
या नाराजीचे कारण उघड होतं. गेल्या पाच वर्षात भाजपला देश पातळीवर जी सत्ता मिळाली
ती अमानुष पद्धतीची होती.त्यामुळे तिचे साईडइफेक्ट दृश्य स्वरूपात दिसणे स्वाभाविक होतं.
त्याचा परिणाम भाजपच्या रिकाम्या डोक्यात आणखी हवा जाण्यात झाला.भाजपचे नेते स्वत:ला थेट परमेश्वरच समजायला लागले.मित्र पक्षांना गिळंकृत करणे हे एक वैशिष्ट्य भाजपचे राहिले आहे.त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे निधन झाल्यानंतर शिवसेना उद्ध्वस्त करण्याची स्वप्ने भाजपला पडू लागली.सत्तेत भागीदारी असतानाही भाजपने सेनेला कायम अस्पृश्यतेची वागणूक दिली.त्यामुळे त्याचा परिणाम सेनेचा स्वाभिमान दुखवण्यात आणि त्यातून सत्तेत असूनही आपल्याच मित्रपक्षाचे निर्णय धोरण यावर टीका करण्यात सेना पाच वर्षे अपमान गिळत व्यस्त राहिली.
शिवसेनाप्रमुख भाजपला “कमळाबाई” म्हणत
दुसरीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या पासून आशीष शेलार विनोद तावडे हे सेनेला घेरत राहिले.
यात सर्वात जास्त जिव्हारी हल्ले किरीट सोमय्या यांनी केले.शिवसेनेची संभावना थेट माफियाशी करण्यापर्यंत त्यांनी मजल गाठली होती.
मुंबई पालिकेत सेनेची सत्ता आहे आणि पालिकेत माफिया राज संपवायचे आहे अशा वल्गना सोमय्या सतत करत राहिले.
भाजपचे मुंबईतील नेते पाहिले तर त्यात अमराठी टक्का आणि त्यातही गुजराती समाज बहुसंख्येने दिसून येईल.
शिवाय कधीकाळी भाजप हा शेटजी भटजींचा पक्ष म्हणून महाराष्ट्रात हेटाळला जात असे.
शिवसेनेचा सुरुवातीचा संघर्ष अमराठी भाषिक लोकांसोबत झाल्याचा इतिहास आहे.
शिवसेनाप्रमुख भाजपला “कमळाबाई” म्हणत असत हे इथं लक्षात घेण्यासारखे आहे.
शिवसेना भाजपची पहिली युती 1984 च्या लोकसभा निवडणुकीत झाली.
परंतु इंदिरा गांधींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर सहनुभूतीच्या लाटेवर कॉँग्रेस जिंकली भाजप सेनेचा पराभव झाला.
या पराभवाची समीक्षा करण्यासाठी एक चिंतन बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत जेष्ठ वकील आणि कायदेतज्ञ राम जेठमलाणी यांनी परभवाचे खापर शिवसेनेवर फोडत सेनेला जबाबदार मानले.
परिणामत: पुढच्याच वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत भाजपने युती तोडली आणि दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले.
या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुखांनी “मार्मिक” फटकारा मारत “कमळाबाई आम्हाला सोडून गेली” अशी टिप्पणी केलेली.त्यांचे हे व्यंगचित्र चर्चेचा विषय बनले.त्यानंतर प्रमोद महाजनांच्या पुढाकाराने पुन्हा दोघांची युती झाली.महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप कायम युती सहकार्य या धोरणावरच सत्तेत स्थान मिळवू शकली आहे.स्वतंत्रपणे भाजपला महाराष्ट्राने कधीही कौल दिलेला नाही.
सत्तेचे शिल्पकार संजय राऊत
शिवसेना भाजपची युती जुनी असली तरी सुरुवातीपासूनच काही मुद्यांवर त्यांच्यात टोकाचे मतभेद राहिले आहेत.
सेनेची स्थापना हिंदुत्व हिंदू धर्म या मुद्यावर झालेली नाही.मराठी भाषिक मराठी माणूस मुद्यावर झाली आहे.
तर भाजपचा मतदार हा परप्रांतीय गुजराती मारवाडी राजस्थानी आणि हिंदी भाषिक राहीला आहे.
आणि याच कारणाने भाजप महाराष्ट्रात रुजायला उशीर लागला. ती अडचण सेनेने दूर केली.
सेनेसोबत युती करून मराठी टक्का भाजपकडे वळू लागला.
शून्य आमदार असणाऱ्या भाजपने महाराष्ट्रात आजघडीला 105 पर्यंत मजल गाठली
तर युतीत कायम आपला वरचष्मा असणारी सेना मात्र 56 जागांवर स्थिरावली.
याचा एक अर्थ सेनेचा मराठी टक्का आणि हिंदुत्ववादी टक्का भाजपकडे वळता झाला असे म्हणता येते.
हे लक्षात आल्यावर भाजपने सेनेला गांभीर्याने घेणे बंद केले,
एवढे की अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद अशी बोलणी झालेली असताना असे कधी बोललेच नाही.
असं प्रसारमध्यमांना सांगण्यात आले.तीस वर्षे युती असतानाही शिवसेनेसोबत बोलले पाहिजे एवढे सौजन्य सुद्धा भाजपने कधी दाखवले नाही.
त्यापेक्षा सगळ्या चर्चा या प्रसारमाध्यमांच्या पातळीवर होत राहिल्या.
याशिवाय सेनेला राज्यात आणि केंद्रातही उपेक्षितच ठेवले गेले होते.
याशिवाय कोणत्याही फाइली पुढे सरकत नव्हत्या.सत्तेत असूनही कामच होत नव्हते.
त्यामुळे सेना युतीतून बाहेर पडली नसती तर आश्चर्य व्यक्त करता आले असते.
आणि अर्थातच तसे न होता सेनेने स्वाभाविकपणे युती तोडत राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापन करणे
ही सेनेची राजकीय अपरिहार्यता आहेच परंतु उपजत समज सुद्धा आहे.
अर्थातच या सत्तेचे शिल्पकार संजय राऊत निर्विवाद आहेत.
यानंतर वर्षभरात भाजपने जे हिडीस राजकारण खेळले ते राजकीय पातळीवरील अनैतिक राजकारण म्हणता येईल.
लाज गेलीय परंतु मान्य करून नाक कोण कापून घेणार?
त्यामुळे वर्षभरापासून सुरू असलेली खडाजंगी दसरा मेळाव्यात आणखी टोकदारपणे दिसेल अशी अपेक्षा होती. कालच्या भाषणातील मुद्यावर अनेक लोक आता चर्चा करत आहेत.त्यांचे अर्थ लावत आहेत.शिवसेना अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करत होते.अर्थातच हा शासकीय कार्यक्रम नसल्याने मुख्यमंत्री या पदाचे वलय असण्याचे कारण नाही.
भाषणात त्यांनी जीएसटी सपशेल फेल गेल्याचे आणि पूर्वीची कर प्रणाली पुन्हा राबविण्याची सूचना केली.राज्यांचे पैसे घ्यायचे आणि पुन्हा परतावा मात्र द्यायचा नाही,आणि गंमत म्हणजे वर राज्यांनी आपल्याच पैशांसाठी कर्ज काढायचे असे खुळे धोरण केंद्रातील भाजपच्या बुध्दिमान नेत्यांनी राज्यसमोर ठेवले आहे.या धोरणावर हसावे की रडावे अशी परिस्थिती आहे.लाज गेलीय परंतु मान्य करून नाक कोण कापून घेणार? असा पेच भाजपसमोर आहे.कारण ही नवी करप्रणाली आणताना भाजपने 1947 नंतरचे जणू दुसरे स्वातंत्र्यच देशाला मिळवून दिले अशा थाटात रात्रीच्या अंधारात रोषणाई करत आपलेच कौतुक करवून घेतले. यासाठी जो अवाढव्य खर्च झाला तोही याच कररूपी पैशातून बरं का.कदाचित पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही म्हणून भाजपला हे मिरवून घ्यायचे होते मात्र तज्ज्ञ लोकांचे वावडे असल्याने अडाणी लोकांना हाताशी धरून उभारलेला डोलारा हा जेवढ्या वेगाने उभा राहतो तेवढ्या वेगाने तो कोसळून भुईसपाट देखील होतो.
हिंदुत्व पूजाअर्चा यात अडकलेलं नाही
उद्धव ठाकरेंच्या भाषणात इतर मुद्यांच्या अनुषंगाने कंगना राणावत,सुशांत सिंग राजपूत भगतसिंग कोश्यारी इत्यादी मुद्यावर त्यांनी भाषण केले.पोलिसांच्या मुद्यावरही त्यानी राज्यप्रमुख या नात्याने पालकत्व असल्याचे बोलून दाखवले.जे ठीक होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत तसे ते त्यांच्या कुटुंबाचे देखील प्रमुख आहेत. आणि मग साहजिकच एक बाप म्हणून त्यांना आदित्य ठाकरेंच्या संदर्भाने जे वाटलं असेल ते नैसर्गिक आहे.ज्या पद्धतीने भाजप आणि त्यांचे ट्रोलर तुटून पडले होते.ते अतिशय हीन आणि विखारी स्वरूपाचे होते.
त्याचे वर्णन करताना शेण खाऊन गॊमुत्राच्या गुळण्या करून पिचकाऱ्या मारणे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेला शब्दप्रयोग बरंच काही सांगणारा आहे.शेण आणि गोमूत्र हे अस्वीकृत गलिच्छ आहे.हा मुद्दा यातून अधोरेखित होतो.हिंदुत्व पूजाअर्चा यात अडकलेलं नाही.देवळात जाऊन पूजा करणे हिंदुत्व नाही.हे मुद्दे खरे वास्तववादी आहेत.मुळात उद्धव ठाकरे हे किंवा अनेकवर्षे शिवसेना हिंदुत्व हा शब्द का कवटाळून आहे हा मला प्रश्न पडला आहे.
कारण त्यांची समजूत त्यांचे राजकारण आणि त्यांचे कर्तृत्व हे हिंदुत्ववादी नाही.त्यांनी हा शब्द सोडला पाहिजे.हिंदुत्व हा राजकीय शब्द आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख हे हिंदूत्ववादी.शिवसेना, शिवसेनाप्रमुख त्यांचं हिंदुत्व हे राजकीय आहे. धार्मिक नाही.शिवसेना भट भिक्षुकीच्या अनुषंगाने राजकारण करत नाही.परंतु तरीही कडवी हिंदुत्ववादी असल्याचे दाखवते.दाखवावं लागतं.
नुराकुस्ती
कदाचित प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा असल्याने.अन्यथा त्यांच्याकडून कोदण्डाचा टणत्कार दिसला नसता. रथयात्रा सुरू झाल्यानंतर मागेपुढे त्यांनी हिंदुत्व हा शब्द राजकीय सत्तेसाठी कवटाळला.सेनेची स्थापना हिंदुत्व हिंदू धर्म या मुद्यावर झालेली नाही.मराठी भाषिक मराठी माणूस मुद्यावर झाली.हे विचारात घेतलं पाहिजे.
याबद्दल त्यांच्या सैनिक कार्यकर्ते अन समर्थकांनी सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे.काळ्या टोपीखाली (डोकं) मेंदू असला पाहिजे असेही ते म्हणालेत.आणि तुमच्याकडे लाठ्याकाठ्या असतील आमच्याकडे मजबूत मनगट आहे.हे संघाला दिलेलं आव्हान लक्षात घेतलं पाहिजे.महाराष्ट्राची बदनामी ही संघ परिघावर खेळली गेलीय.भाजप आयटीसेल कामाला लावला गेला.मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे हे काम करणाऱ्यांच्या चिंधड्या करून टाका या अशा सूचना शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
एकीकडे हे सगळं संघ+भाजप विरुद्ध शिवसेना असं नेपथ्य असलं तरी भागवताना राष्ट्रपती करा म्हणणारी सेना इथं गंडलेली वाटते.म्हणजे मंचावर वेगळंच दाखवायचा प्रयत्न आहे.मुळात आता राष्ट्रपती कुणीही का असेना,शेतातलं बुजगावणं जरी बसवलं तरी तसा काही फरक पडेल असं दिसत नाही.गेल्या सहा वर्षात याची प्रचिती अनुभव आपल्याला आला आहेच. त्यामुळे त्या पदावर कुणी का बसेना त्यांचं काम होत आहे.हे त्यांना महत्वाचे.आणि यामुळे कधी कधी ही नुराकुस्ती वाटते.शिवाय बिहार मध्ये उमेदवार उभे करूनही त्यांनी स्पष्टपणे मतदान कुणाला करायचं हे न सांगणे बुचकळ्यात टाकणारे आहे.
महाराष्ट्रात गाई माता आणि पलीकडे जाऊन खाता
किमान आम्हाला मतदान करा हे तरी बोलता येणारच होतं की.तेही नाही केलं.म्हणजे तिकडचे उमेदवार नक्की कुणाच्या विरोधात आहेत हे तपासले पाहिजे.गेल्या वर्षभरात सुरू असलेले शीतयुद्ध त्यात आदित्य ठाकरेंनाही लक्ष केले गेले या पार्श्वभूमीवर टोकदार भाषा आणि इशारे अपेक्षित होते. तसे तेवढे काही दिसले नाही.
महाराष्ट्रात गाई माता आणि पलीकडे जाऊन खाता हा मुद्दा मात्र महत्वाचा होता.तो पाच वर्षांनी सोबत राहून न बोलता आता युतीतून बाहेर पडल्याने तरी स्पष्ट केला याबद्दल अभिनंदन केले पाहिजे. हा दांभिकपणा सामान्य हिंदू व्यक्तीने देखिल लक्षात घेणे गरजेचे आहे.सरकार कोसळणार पाडून दाखवा असा थेट इशारा एक तेवढाच काय तो दिसला.येत्या काळात सेना-भाजप आणखी खटके उडत राहतील.आणि सेना संघाला अशीच सेजेने घेत राहील.राजधर्म आणि पदाचे गांभीर्य विसरणाऱ्या राज्यपालांना थोडं व्यवस्थितपणे आठवण करून देणे गरजेचे होते.तसे झाले नाही.शेरेबाजी झाली.
भाजप म्हणजे संघाच्या इशाऱ्यावर चालणारा पक्ष
शिवसेना प्रधानमंत्र्यांना मात्र थेटपणे भिडणे टाळत आहे असे दिसते.शिवाय ते संघालाही चुचकारत आहेत.उद्या पुन्हा वेळ आलीच तर भाजपसोबत जायचे असा एक दोर सेना शाबूत ठेवून आहे असे वाटते.शेवटी भाजप म्हणजे संघाच्या इशाऱ्यावर चालणारा पक्ष. त्याचच अपत्य त्यामुळे ही राजकीय खेळी लक्षात येते.किंवा आक्रमता दिसते आणि पुरेशी स्पष्टता नसल्याने गोंधळही.
येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वकाही “महा”असणार आहे. असे संकेत संजय राऊतांनी दिलेले आहेत.मात्र मागच्या टर्मला उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानणारे आताही उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानून असणारे आणि सर्वांना धक्का देत भाजपसोबत थेट शपथ घेणारे अजितदादा पवार किंवा कॉँग्रेस हे शिवसेनेच्या नेतृत्वात पुढील निवडणूकीत निवडणूक लढविण्यास तयार होतील का? हा एक प्रश्न आहे.घोडा मैदान तसे दूरच आहे.
BY – टीम जागल्या भारत
दुर्गाबाई भागवत यांच्या वेश्यासंबंधीत मतावर समाचार घेणारे राजा ढाले
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)