जागतिक महिला दिन निमित्त – ‘कोणत्याही समाजाची प्रगती ही,त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगती वरून मी मोजतो म्हणूनच हा समुदाय पाहिल्यावर मला खात्री वाटते व आनंद होतो की आम्ही प्रगती केली आहे.’ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित ‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वीमेन्स कॉन्फरन्स’मध्ये महिलांना उद्देशून केलेल्या भाषणातील वरील ओळी म्हणजे या महामानवाच्या महिलांच्या सर्वांगीण प्रगतीविषयक दृष्टिकोनाचा परिचय देतात.
धर्म संस्थापकांनी क्वचित महिलांच्या उन्नती प्रगती आणि स्वातंत्र्यासाठी असे उद्गार काढले असावेत.
स्त्रीयांच्या गुलामगिरीचा इतिहास:-
स्वांतञपुर्व भारतातील वर्णव्यवस्थेमध्ये उच्चवर्णीय स्त्री असो की शुद्र व अस्पृश्य स्त्री यांना धर्म, कर्मकांड, अनिष्ठ रूढी व पंरपरेच्या जोखडात अडकवुन, तिला मानवी गुलाम बनवुन, तिचे मुलभुत हक्क व मानव अधिकार नाकारण्यात आलेले होते. स्त्री ही या पितृसत्ता व्यवस्थेतील चुल आणि मुल साभांळणारी एक भोग वस्तु होवुन गेली होती. स्त्रियांकरीता शिक्षणाच्या सोयी असुनही फार तोकड्या प्रमाणातच स्त्री शिक्षण घेत होती. त्यातच अस्पृश्य स्त्रीयांच्या शिक्षणाचे प्रमाण नगन्यच होते.तिच्यावर लग्नसंस्थेच्या नावाखाली अनेक बंधने लादली गेली होती. लहान वयात होणारे बालविवाह, सतत होणारे बाळंतपण, बीजवरां सोबत होणारे विवाह, संपत्तीत नसलेले अधिकार, बहुपत्नी प्रथा असल्यामुळे व स्त्रीया स्वत: आर्थिक सक्षम नसल्यामुळे आहे त्या परिस्थितीत जुळवुन घेत स्व:ताच्या अंताची वाट पाहणारे जीवन भारतीय स्त्रीया जगत होत्या.
प्राचीन काळातील मातृवंशक किंवा स्त्रीप्रधान प्रथा भारतापासून इजिप्तपर्यंत प्रचलित होती आणि ती नागवंशीय लोकांची संस्कृती होती.आईच्या नावावरून मुलांची नावे ठेवलेली आढळून येतील सातवाहन गौतमिपुत्र सातकर्णी हे एका राजाचे त्यावेळचे नाव उदाहरण म्हणून पाहता येईल.बुद्ध धम्मात तथागथाच्या उपदेशाने स्त्रिया अर्हतपदाला पोहोचल्या. तथागथाने स्त्रियांना दीक्षा दिली, ज्ञानार्जनाचे धडे देत संघात स्थान दिले. तथागथाच्या आचार-विचारातून आदर्श जीवनपद्धती स्त्रीजीवनाला पोषक होती.अडीच हजार वर्षापूर्वीच आपल्या संघात स्त्रियांना स्थान देणारे भगवान बुद्ध म्हणूनच स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी प्रगती उन्नतीसाठी आग्रही होते.
जागतिक महिला दिन
आज स्त्रियांना हक्क अधिकार मिळत आहेत त्यामागे ज्या दोन गोष्टी आहेत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात केलेल्या तरतुदी आणि हिंदू कोड बिल सारखे विधेयक आग्रहाने मांडले या दोन गोष्टी महत्वाच्या.भारताचे पहिले कायदेमंत्री असतांना 1948 मध्ये बाबासाहेबांनी संसदेत ‘हिन्दु कोड बील’ सादर केले होते,दुर्दैव असे की त्यावेळी हे बिल संमत होऊ शकले नव्हते त्याला खूप मोठा विरोध झाला.
भारतीय स्त्रीयांना वडीलांच्या संपत्तीत अधिकार, आंतरजातीय विवाहाचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, मुल दत्तक घेण्याचा अधिकार, पोटगी मिळण्याचा अधिकार असे अनेक अधिकार प्राप्त होणार होते. परंतु या बीलाचा तेव्हा विरोधकांकडुन प्रचंड विरोध झाला. विरोध करणा-यात काही उच्चवर्णीय महिलाही होत्या. डाॅ. बाबासाहेबांवर प्रचंड टिका केली गेली त्यांना धमक्याही दिल्या गेल्या. मात्र नंतर संसदेला त्यातील प्रत्येक गोष्ट समाविष्ट करून घ्यावी लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा हा विजय होता.
हिंदू कोडबिलाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात
” समाजातील वर्गवर्गातील असमानता ,स्त्री-पुरुष यांच्यातील असमानता तशीच अस्पर्शीत राहू देवून आर्थिक समस्यांशी निगडीत कायदे संमत करीत जाणे म्हणजे संविधानाची चेष्टा करण्यासारखे आहे.आणि शेणाच्या ढीगऱ्यावर राजप्रासाद बांधण्या सारखे होय.म्हणून या हिंदू संहितेला (हिंदू कोड बिल) मी महत्व देतो.”
स्त्रियांनीच पुढाकार घेऊन आपलं जग निर्माण करणे गरजेचे आहे
आज स्त्री आकाशाला गवसणी घालते आहे.जगातील अर्धी लोकसंख्या स्त्रियांची आहे.
कधीकाळी या अर्ध्या लोकसंख्येस अर्थार्जन करणे वर्ज्य होते.पुरुषांवर विसंबून राहावे लागत होते,शिक्षण बंदी होतीच.
अनेक प्रकारची सामाजिक बंधने होती,ती संविधानाने निरस्त झाली.स्त्रियांना संधी प्राप्त झाली.आकाश खुले झाले.
परंतु आजही स्त्रियांवर बंधने लादाण्याचे तीला मालकी हक्क समजण्याचे प्रकार समाजात दिसून येतात,
यातूनच तीच्या पसंतीने केलेल्या विवाहामुळे चिडून वडील किंवा भाऊ तिचा जीव घ्यायला मागे पुढे पाहत नाही.
स्वमर्जीने केलेलं हे लग्न या पुरुषांच्या अहंगंडाला आव्हान देणारे अपमानित करणारे ठरते.
त्यातूनऑनर किलिंग म्हणजे प्रतिष्ठा जपण्याच्या मानसिकतेतून अशा घटना घडतात.
दुसरीकडे स्त्रियांना संरक्षण देणारे कायदे सुद्धा अपुरे दिसतात किंवा राबावणारी यंत्रणा पुन्हा पुरुषप्रधान दिसते. संसदेत कायदे करण्यासाठी असणारे स्त्रियांचे प्रमाण अत्यल्प दिसते.खरेतर ते 50% म्हणजे निम्मे असले पाहिजे हा बेसिक मुद्दा परंतु आपल्याकडे ते आताशा 33% पर्यन्त बोलण्यात आलेलं आहे. लागू सुद्धा झालेलं नाही.तर मग पुढील गोष्टी स्वप्नवतच ठरतात,त्यामुळे याविषयी स्त्रियांनीच पुढाकार घेऊन आपलं जग निर्माण करणे गरजेचे आहे.
जागतिक महिला दिन
आज सोशल मिडियात महिला दिनानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे शुभेच्छांचा पाऊस पडतो आहे. ही चांगलीच गोष्ट आहे.
यातील किती लोक आपल्या बहिणीला मुलीला तीच्या निवडीचे स्वातंत्र्य देणारे आहेत? देण्याची तयारी आहे?
जर तुमच्याकडून हे होणार नसेल तर हा सोशल दिखावा काही कामाचा नाही भाऊ,
फक्त ते लाइक कमेन्ट आणि खोटी प्रतिमा जपण्याचा प्रकार आहे.मग करूच नकोस ना.
केवळ महिलांना महिला दिनी शुभेच्छा देवून आपली जबाबदारी संपणार नाही.
त्यांना त्यांचे अर्धे आकाश आपण मोकळे करून दिले पाहिजे हाच खरा महिला दिन असू शकतो
- टीम जागल्या भारत
चिपळूण पुरग्रस्तांना महिला बचत गटांनी दिला मदतीचा हात
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on March 07, 2021 1:30 PM
WebTitle – 8 march women’s day dr ambedkar thought
डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे उपकार कोणत्या शब्दात व्यक्त करावे हे समजत नाही. हजारदा विचार करतो की या महामानवास आमच्या आयुष्यातून वजा केल्यास आमच्या अस्तित्वाचे मूल्य शून्य होईल.