‘सफरचंद’ या शब्दाच्या उच्चारात ताज्या रसरशीत सफरचंदाचा तुकडा दातांनी तोडताना जो विशिष्ट आवाज होतो तसा एक नाद आहे. हा शब्द कोठून आला असेल याचे मला नेहमी कुतूहल वाटे. कारण फारशी भाषेत सफरचंदाला ‘सेब’ असे नाव आहे. हिंदी उर्दू मध्येही सेबच म्हणतात. मग एखाद्या ढेरपोट्या गोबऱ्या गालाच्या शेटजीला शोभावं असं हे ‘सफरचंद’ नाव आलं कुठून असावं असा प्रश्न मला अनेकवेळा पडलेला. त्याचं उत्तर अचानकच सापडलं.
आई वडिलांना हजयात्रेला घेऊन गेलेलो, मदिना शहरी मुक्काम होता. तिथल्या एका मॉलमध्ये चक्कर मारताना ‘सफरजल’ (سَفَرْجَل) या नावाच्या पाटीखाली पेअरसारखी पिवळी फळं मांडून ठेवलेली होती. पण ती काही सफरचंदं नव्हती. त्या रसरशीत पिवळ्या लवदार त्वचेच्या फळांना आपल्याकडे ‘बिही’ असे म्हणतात असे पुढे समजले. थोडीफार नाशपतीसारखी दिसणारी हि फळं पण आपल्याकडच्या सफरचंदाच्या जवळचं वाटावं असं ‘सफरजल’ हे नाव त्या फळांना होतं.
सफरचंद हे नाव आलं कुठून ?
आपण ज्याला ‘सफरचंद’ म्हणतो त्याला मात्र अरबीत ‘तुफैहा’ असं नाव आहे. मग सफरचंद हे नाव आलं कुठून ?
सफरचंदाला गुजराती लोक ‘सफरजन’ म्हणतात. हे सफरजल नावाच्या अगदी जवळ जाणारं नाव.
माझ्यामते गुजराती व्यापाऱ्यांनी हे नाव उचललं असावं.
गुजरात्यांनी हे नाव त्यांच्या सुरत वैगेरे बंदरांवरून मध्यपूर्वेच्या प्रदेशांशी चालणाऱ्या अरबी व्यापाऱ्यांकडून ऐकलेलं असू शकेल.
या फळांची बंदरांवरून आवक-जावक असावी.
किंवा सुरतेवरून हजयात्रेसाठी जाणं-येणं करणाऱ्या यात्रेकरूंनी हि फळं नावासकट प्रसिद्ध केली असावी.
मोहम्मद पैगंबरांनी सफरजन फळांची महती सांगणाऱ्या हदीस प्रसिद्ध आहेत.
सफरचंदची फळं भारतात जेव्हा सर्वदूर पोहोचली तेव्हा गुजरात्यांनी आधीचाच ‘सफरजन’ हा शब्द त्यासाठी वापरात घेतला.
मराठी लोकांनी गुजराती ‘सफरजन’ चे शेठीया नावाच्या जवळ जाणारे रूपांतर करून ‘सफरचंद’ केले.
रायचंद, हिराचंद, लखीचंद सारखे सफरचंद.
जगात सर्वप्रथम सफरचंदं माहित होती आणि त्यांची लागवड केली जात होती ती कज़ाख़िस्तानाच्या डोंगराळ भागात.
तिथून हे फळ जगभर पसरले. तिथल्या स्थानिक कीटकांनी परागण करून
इतक्या वेगवेगळ्या जातीची सफरचंदं या प्रदेशात उत्पन्न केली आहेत कि
संशोधक आजही नव्या सफरचंदाच्या जातीच्या शोधात या प्रदेशात फिरत असतात.
हे प्राचीन फळ आहे.सफरचंद हे ज्ञानवृक्षाचं फळ म्हणून प्रसिद्ध.
बायबलमध्ये परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध आदम आणि इव्ह हे फळ खातात आणि स्वर्गातून हाकलून दिले जातात अशी कथा आहे.
डोंगराळ प्रदेशातल्या लोकांची गरिबी दूर करण्यात स्टोक्सचा वाटा मोठा
आपल्याकडे काश्मीरमध्ये सफरचंदं होती पण भारतभर हि फळं कुणाला जास्ती माहिती नव्हती. काश्मीरात सफरचंदं होती पण ती जंगली जातीची. ब्रिटिशांनी हौसेनं आणून सफरचंदांची रोपं रुजवलेली पण ब्रिटिशांना आवडणारी सफरचंदं आंबट असल्यामुळे ती इतकी प्रसार पावली नाहीत. सफरचंदं भारतभर इतकी सर्वज्ञात झाली त्याचे श्रेय जाते सॅम्युएल स्टोक्स या अमेरिकन भारतीयास.
या स्टोक्सची कहाणी सफरचंदाच्या व्युत्पत्तीपेक्षाही रोचक आहे. वयाच्या विसाव्या वर्षी एका श्रीमंत अमेरिकन उद्योगपतीचा हा मुलगा भारतात स्वतःचा अध्यात्मिक शोध घेण्यासाठी आला.शिमल्यात राहून कुष्ठरोग्यांची सेवा केली. तिथले अठरा विश्वे दारिद्र्य, अन्नान दशा पाहून त्या लोकांसाठी काहीतरी करायचे ठरवले.
अमेरिकेत सफरचंदाच्या लागवडीसाठी जसे पोषक हवामान आहे तसेच ते शिमल्याच्या आसपासही आहे हे स्टोक्सच्या लक्ष्यात आले आणि इथे उत्तम आणि मोठ्या प्रमाणात सफरचंदाची लागवड केली जाऊ शकते आणि तसे झाले पाहिजे हा ध्यासच स्टोक्सने घेतला. तो अमेरिकेला गेला आणि फिलाडेल्फीयाहुन उत्तमोत्तम सफरचंदांची रोपं घेऊन भारतात परतला.आधी स्वतः लागवड केली आणि ती रोपं हळूहळू सर्व हिमाचल प्रदेशात प्रसार पावली. आज भारत सफरचंदांची निर्यात करणारा मोठा देश आहे. डोंगराळ प्रदेशातल्या लोकांची गरिबी दूर करण्यात स्टोक्सचा वाटा थोर आहे.
पुढे स्टोक्सने गांधीजींच्या प्रेरणेने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. सत्यानंद हे नाव स्वीकारले आणि या मातीतल्या लोकांसाठी काम करत देह ठेवला. अमेरिकेने भारतास दिलेला आणि पुढे अस्सल भारतीय झालेला हा जॉनी ऍपलसीड आहे. या सत्यानंद स्टोक्सची परवा जयंती होती त्यांना आणि त्यांच्या कार्याला सलाम.
व्लाद दी इम्पेलर : पराकोटीचा द्वेष करणारा शासक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 19, 2021 12 :10 PM
WebTitle – Where did the name ‘apple’ come from? Learn, the journey of words