जन्म आणि मृत्यू हे माणसाच्या आयुष्यातील कटू सत्य आहेत हे विश्ववंदनीय तथागत गौतम बुध्दांनी अडीज हजार वर्षापुर्वी सांगितले आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे अन् मृत्यू हा कधीचं स्त्री, पुरुष अथवा जाती धर्मात भेदभाव करत नसला तरी, मृत्यूनंतर स्त्री पुरुषांमध्ये आजही अनेक ठिकाणी भेदभाव केला जातो हे पुरुष सत्ताक संस्कृतीचे दळभद्री लक्षणं आहे की विकृत सनातनी मनुवादी रुढी परंपरेचा शाप आहे ? कालबाह्य रुढी परंपरांचे उच्चाटन कधी होणार? अशा चालीरीतींना छेद द्यायचा असेल तर, स्थानिक पातळीवर प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनांनी, समाज सुधारकांनी पुढाकार घेतला पाहिजे.
एखादया व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या पत्नीची विधवा बाईकडून वेणी फणी करुन केसात फुलांचा गजरा घातला जातो, मळवट भरुन, माहेरुन आणलेली नवीन साडी असेल तर ती परिधान केली जाते, मंगळसुत्र घातले जाते, ओटी भरुन पतीला तिरडीवर ठेवल्यानंतर त्याच्या पायाजवळ बसविले जाते अन् काही वेळातचं तिच मळवट फुसले जाते, मंगळसुत्र काढले जाते, हातातील बांगड्या फोडल्या जातात.
अनेक दळभद्री प्रथा आजही ग्रामीण भागात जीवंत आहेत
सर्व मनाला न पटणाऱ्या कृती केल्या जातात. जी मुलगी जन्मापासून कुंकू अथवा टिकली लावते तिच्या लग्नानंतर तिच्या पतीचे निधन झाल्यास तिचे कुंकू फुसण्याचा कोणाला काय अधिकार आहे ? किंवा तिचा शृंगार उतरविण्याचे कारण तरी काय ? तिच्या पतीचे निधन झाले तर त्यात तिचा काय दोष आहे ? त्यानंतर तर कोणत्याही कार्यक्रमात किंवा इतर ठिकाणी अक्षरशः तिला दुय्यम स्थान दिले जाते. मात्र, त्याचं ठिकाणी एखादया व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाल्यास तो विधूर होतो पण, त्याला कोणतीही बंधने नसतात, तर त्याला सर्व काही माफ असते.
निधन झालेल्या व्यक्तीचे कार्य (जलदान विधी) असेल त्याच्या आदल्या दिवशी सुतीक राहू नये म्हणून पाण्यात तांदूळ, तुळशीची पाने, गोमुत्र टाकून घरात शिंपडले जाते, वाडीतही वितरीत केले जाते. अशा अनेक दळभद्री प्रथा आजही ग्रामीण भागात जीवंत आहेत. बदलत्या परिस्थितीनुसार त्या मोडीत न काढता, जोपासल्या जातात अन् कर्मकांडेही केली जातात. काही ठिकाणी लग्नामध्येही पूजा केली जाते. (?)
बुध्द धम्म आचरणात तुमची जबाबदारी मोठी आहे
चालीरीती, रुढी परंपरा पुर्वीपासून चालत आल्या आहेत म्हणून पुढे चालू ठेवणे योग्य आहेत का ? योग्य, अयोग्य हे आपण कधी ठरवणार आहोत की नाही ? चालीरीती, रुढी, परंपरांबाबत आपण कधी चिकित्सक बनणार आहोत की नाहीत ? धार्मिक श्रध्दा अन् श्रध्दांवर आधारीत चालीरीती, रुढी, परंपरा संदर्भात आपण डोळस कधी होणार ? कालबाह्य रुढी परंपरांचे उच्चाटन कधी होणार?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक धम्मक्रांती घडवून पाश्चात बौध्द जगाशी संबंध जोडला. मनुष्यहीन, भविष्यहीन, अखंड अंधकारमय आपल्या जीवनात परिवर्तनवादी स्थित्यंतर घडविले. त्यामुळे भ्रामक परिघात अडकून न पडता, बाबासाहेबांनी बुध्द धम्म स्विकारतांना बुध्द धम्म आचरणाच्या संदर्भात आपल्यावर जबाबदारी टाकलेली आले आहे. बाबासाहेब म्हणतात, ‘बुध्द धम्म आचरणात तुमची जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी कृती तुम्ही केली पाहिजे. हा धम्म म्हणजे गळ्यात एक मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका.’
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on SEP 9, 2021, 11:59 AM
WebTitle – When will the obsolete traditions be eradicated?