जूने लोक खुप भावनिक आहे बाबासाहेबासोबत. माझे आजोबा (आईचे वडील) स्वभावाने कठोर होते. त्यांच्या डोळ्यात पाणी कधीच येत नव्हतं. अगदी घरचं कोणी मेलं तरी. वाटायचं हा माणुस भावनाशील नाहीये. पण जेव्हा कधी विहारात, कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलायला लागले, तिथे बाबा साहेबांबद्दल गौरवोद्गार काढता काढता कधी भावनिक होऊन डोळ्यात पाणी आणायचे ते कळत नव्हतं. ६ डिसेंबरला तर विचारुच नका.
त्यादिवशी तर दिवसभर शांत उदास बसायचे. आजोबा लहान असताना जेव्हा बाबासाहेब मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद च्या बांधकामानिमित्त मुक्कामी असल्याचे कळाले तेव्हा ते मित्रांसोबत बाबासाहेबांना बघायला म्हणून गावावरून पायपीट करत आले होते. तारेच्या कंपाऊंडवर हात ठेऊन बाबासाहेबांना बघत असताना, बाबा साहेबांनी बोलावलं, इतक्या लांबून फक्त बघायला आल्याचं कळाल्यावर त्यांना रागवलं होतं. तो प्रसंग आठवून खुपदा रडले.
अशीच एक आजी पण आहे. आमच्या विहारात आश्रयाने राहतात विहारात मुलांसोबत. ९० वर्षांच्या आसपास वय असेल तिचं. पण कान व डोळे ठणठणीत. विहारात रविवारी गेलो की तिच्या गप्पा ऐकत बसायचो. विहारात,आजुबाजुच्या वस्तीत मी प्रबोधनाचं काम करतो म्हटल्यावर माझ्याबद्दल आपुलकी होती.मला बाबासाहेबांबद्दल तिला माहीत असलेली गोष्ट सांगावी म्हणून ती एक गोष्ट सांगायची.
बाबासाहेबांची गोष्ट
ती एक गोष्ट मी कितीदा ऐकली, ऐकत आलोय. मागच्या चार पाच वर्षांत भेट नाही झाली तिच्यासोबत. या १४ एप्रिलला तिच्याकडुन तीच गोष्ट ऐकुन घ्यायला जायचंय मला. ती अडाणी आहे, निरक्षर. तिला बाबा साहेबांबद्दल खुप बोलायचं पण बोलता नाही येत. त्या एका गोष्टीत तिची बाबासाहेबाप्रती अख्खी अभिव्यक्ती, कृतज्ञता भाव ती व्यक्त करायची. ती गोष्ट अशी होती की, तिच्या लहान असताना, लग्न होऊन काही वर्षे झाली होती. ते अंजिठ्याला राहत. औरंगाबाद पासुन १०० किलोमीटर.
बाबासाहेब औरंगाबादमध्ये येणार होते, औरंगाबादच्या आमखास मैदानावर जाहीर सभा होणार होती. हा निरोप औरंगाबाद लगतच्या सर्व गावागावात पोहचला होता. बुद्ध वाड्यात सभा घेतली. बाबासाहेबांची जाहीर सभा त्यांना ऐकाची होती. विशेष म्हणजे बाबासाहेब दिसतो कसा ? हे बघायची प्रचंड उत्सुकता होती. पायी तीर्थयात्रेला निघाल्या सारखे निघाले होते.
कित्येकांना जेवायला काही नव्हतं
हे वर्ष कोणतं होतं तिला आठवत नाही पण तेव्हा मिलिंद महाविद्यालय नव्हतं बहुधा तेव्हाची ही गोष्ट आहे. दीड दोन दिवसांत ते औरंगाबादला रात्री पोहचले. जिथं सभा होणार होती, तिथेच त्या ग्राऊंडवर मुक्काम ठोकला. तिथे त्यांच्या सारखे हजारो लोक होते. ते विस्तीर्ण मैदान, ती चांदणी रात्र, लोकांनी आपलं अंथरूण टाकलेलं, ती चीवचीवाट, जात्यावरच्या ओव्या, आणि उद्या सकाळी बाबासाहेबांना प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायची हौस !!
सकाळ झाली, कार्यक्रमाची वेळ झाली, बाबासाहेबांच्या भाषणात पाच पाच मिनिटाला टाळ्या पडत. बाबासाहेब चिडले की परत भयान शांतता होऊन जायची. युद्ध जिंकल्याचा आविर्भावात लोक मैदानावर भाषण ऐकत, ऐटीत उभे होते. बाबासाहेबांच्या अंगावरचा कपडा, कडक आवाजाने तर कित्येकांची मरगळ झटकली. दम आला होता सगळ्यात. दुपारची वेळ झाली होती. भाषणांचा कार्यक्रम आटोपला. बाबासाहेब बोलले की जसे बसलात भाषण ऐकाला तशाच तिथल्या तिथे रांगा करुन सोबत काही भाजी भाकरी आणली असेल तर जेवा आणि लवकर आपल्या घराकडे निघा. उठबस करुन गोंधळ उडवू नका.लोकांनी रांगा टाकल्या, मांडी घालुन बसले पण कित्येकांना जेवायला काही नव्हतं.
बाबासाहेबांनी का हात लावले तोंडावर ? का झाकला तो चेहरा
गावाबाहेर गावकीच्या मेहरबानीवर जगणारी लोकं. राहायचे वांदे तिथे खायला काय भेटणार होतं ?
बाबासाहेबांची सभा ऐकायला जेव्हा निघाले तेव्हाच यांच्याकडे काही नव्हते.
रस्ताने चालताना जे गाव मधात येईल तिथुन काही मागुन भेटलं की खाऊन पुढे निघत.
बाबासाहेबांच्या सभेला चाललो म्हटलं की काही आडमुठे लोक शेताच्या बंधाऱ्याच्या रस्ताने पण जाऊ देत नसत.
अशी अवस्था असताना सभा संपल्यानंतर कोण काय खाणार होतं ?
ही गोष्ट बाबासाहेबांच्या लक्षात आली तेव्हा बाबासाहेब स्टेजवरून खाली लोकांच्या रांगेत उतरले होते.
म्हतारीच्याच रांगेत खाली लोकांच्यासमोर पायेच्या टाचेवर बसले. सगळे बाबासाहेबांकडे बघत होते कुतुहलाने.
बाबासाहेबांनी बसलेल्या लोकांना हालहवाल, विचारपूस केली थोडावेळ आणि बोलतानाच आपले दोन्ही हात झपकन तोंडावर लावुन घेतले. बाबासाहेबांचा चेहरा दिसत नव्हता.
बाबासाहेबांनी का हात लावले तोंडावर ? का झाकला तो चेहरा !! हे तिला कळालं नव्हतं.
आपलं बिऱ्हाड उचलुन घराच्या रस्त्यांनी निघाल्यावर लोक चर्चा करत होते…बाबा आपल्यासाठीच रडले होते म्हणून !!
We are because he was ❤️
हे ही वाचा.. कॅनडामध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
हे पाहा ..‘माऊलीची माया होता माझा भीमराया…
हे ही वाचा..डॉ.आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा स्थापन करणारा मराठा
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 06 , 2021 19 : 55 PM
WebTitle – when ambedkar was crying for you




















































