विरार: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरारमधील एका हॉटेलात ₹५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने (BVA) केला आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. या प्रकारानंतर तावडे तब्बल २.५ तास हॉटेलमध्ये अडकून पडले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.यामुळे उद्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरच अशा प्रकारची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
घटनेचा तपशील
बविआच्या मते, विनोद तावडे विरार पूर्वेच्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. हॉटेलमध्ये भाजप उमेदवार राजन नाईक आणि अन्य पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू होती. बविआच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप केला आणि पोलिसांना पाचारण केले. तपासात पोलिसांना दोन डायऱ्या सापडल्या, ज्यावर बविआने दावा केला की याचा उद्देश पैशांचे वितरण करणे हा होता.
हितेंद्र ठाकूर यांचा आरोप आणि प्रतिक्रिया
बविआ प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्यावर टीका करत, “₹५ कोटी वाटण्यासाठी आणले होते. मतदानापूर्वी ४८ तास बाहेरील नेत्यांनी मतदारसंघ सोडायला हवा, हे तावडे यांना माहिती नाही का?” असा सवाल उपस्थित केला. त्यांनी दावा केला की, विनोद तावडे यांनी त्यांना २५ वेळा फोन करून माफी मागितली आणि प्रकरण न वाढवण्यासाठी विनंती केली.
क्षितीज ठाकूर आणि बविआ कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये केली कारवाई, विनोद तावडे यांना घेराव
विरारमध्ये भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. क्षितीज ठाकूर आणि बविआ कार्यकर्त्यांनी विवांत हॉटेलमध्ये घुसून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना घेराव घातला. यावेळी बविआ कार्यकर्त्यांनी तावडेंच्या बॅगेची तपासणी केली, ज्यामध्ये पैसे भरलेले लिफाफे सापडले.
लिफाफ्यात सापडलेले पैसे आणि व्हायरल व्हिडिओ
कार्यकर्त्यांनी बॅगेतील लिफाफे उघडून पैसे दाखवताच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या बॅगेतून लॅपटॉप आणि काही डायऱ्याही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कारवाईची मागणी
क्षितीज ठाकूर यांनी सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली असून, विनोद तावडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी धाव घेतल्याने दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद झाला.
राड्याची परिस्थिती
भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि वाद झाला.
या गोंधळामुळे हॉटेल परिसरात मोठी गर्दी झाली असून, पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या घटनेचा पुढील तपास आणि कारवाईसाठी सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपची प्रतिक्रिया आणि आरोप फेटाळणी
भाजपच्या राजन नाईक यांनी म्हटले की, “पैशांच्या बंडलांचा भाजपशी काही संबंध नाही. तुम्ही हॉटेल बंद करून तपास करू शकता.” तसेच, अतुल भातखळकर यांनी आरोपांना रडीचा डाव म्हणत विरोधकांवर टीका केली की, पराभवाच्या भीतीने असे आरोप होत आहेत.
ठाकरे गटाची भूमिका
उद्धव ठाकरे म्हणाले, मी तुळजा भवानी मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो असताना माझी बॅग चेक केली गेली. पण त्याही सापडले नाही,विनोद तावडे यांच्या बॅगेत पैसे सापडले असं तुमच्याकडून कळलं,काल अनिल देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हे दगड आणि बॅग कोण चेक करणार? म्हणून मी आई तुळजा भवानीला साकडे घातले आहे की,ही भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक”
सरतेशेवटी
या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत असून, वस्तुस्थिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 19,2024 | 14:45 PM
WebTitle – vinod-tawde-cash-distribution-virar-bjp-bva-clash hitendra thakur