एकदा यवतमाळात एक संमेलन झालं. प्रभावी वक्ते, उकृष्ट नियोजन, सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश यामुळे हे संमेलन यशस्वी ठरलं. वैचारिक खाद्यासोबतच इथे लोकांनी मटन मांडे या खाद्यावरही चांगलाच ताव मारला. आता तुम्ही म्हणाल की संमेलन आणि मांड्यांचा काय संबंध? तर हे संमेलन एका लुप्त होत असलेल्या मांडे या खाद्यप्रकाराला पुनरुज्जीवन देणारं ठरलं. तेव्हापासून मांड्यांना एक व्यावसायिक रूप मिळालं. मांडे केवळ एक खाद्य प्रकार नाही. तर ती एक कला आहे, खाद्यसंस्कृती आहे. त्याला असमानता, भेदभाव याचेही संदर्भ आहेत. मात्र या संमेलनामुळे मांडे समतेचा एक वाहक बनलं. यात सिंहाचा वाटा ज्या व्यक्तीचा होता ती व्यक्ती म्हणजे तेव्हाचे यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. हर्षवर्धन कांबळे.
मांडे म्हणजे तासभर गव्हाचे पीठ पाण्यासोबत आपटून मडक्यावर तयार केलेल्या पोळ्या. विदर्भात काही मैलावर याचं नाव बदलत जातं. कुठे हे मांडे असतात कुठे रोट्या, लांबपोळ्या, लंब्यारोट्या, रांदण्या रोट्या. तर सर्वात आधी या मांड्यांचा आणि खानदेशात मिळणा-या मांड्यांचा विशेष असा संबंध नाही. फक्त मडक्यावर बनवणे इतकंच यात साम्य आहे.
विदर्भात ही कला केवळ बौद्ध (पूर्वाश्रमीचे महार) महिलांकडे आहे असं बोललं जातं
विदर्भात ही कला केवळ बौद्ध (पूर्वाश्रमीचे महार) महिलांकडे आहे असं बोललं जातं. इतर समाजातील लोक हे तयार ही करत नव्हते आणि खात नव्हते. माझ्या आजीकडे ही कला होती. लहान असताना सुट्टीत आजीच्या गावी गेल्यावर लांबपोळ्याचा बेत हमखास असायचाच. एकदा आजीला म्हटेल ‘तुला लांब पोळ्या बनवता येते तर तुझी तर गावात चांगलीच चलती असेल.’ यावर आजीने सांगितले की ‘हे आपणच बनवतो आणि आपणच खातो. कुणाला खायला दिल्या तरी खात नाही. कच्या असतात, पोट खराब होते असं कारणं देऊन टाळातात’. आजीला म्हटलं की ‘आपलं तर कधीच पोट बिघडलं नाही.’ आजी बोलली की ‘हे कारण नाही. म्हाराच्या घरचं चालत नाही म्हणून दुसरे खात नाही.’
केवळ बोटावर मोजता येणा-या महिला मांडे बनवायच्या
विदर्भात इतर समाजातील महिलांकडे ही कला असलेली माझ्या तरी पाहण्यात नाही. काही ठिकाणी अपवाद असू शकतो. मांडे बनवणे हे अतिशय किचकट आणि कलापूर्ण आहे. अगदी गहु निवडण्यापासून ते जाळ किती असावा यापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते. लांबपोळ्याला चिकट असा गहू हवा असतो. केवळ महागातला गहू घेतला म्हणजे मांडे होईल असं नाही. योग्य तो गहू निवडावा लागतो. पिठाला सुमारे अर्धा ते पाऊन तास पाण्यात मिसळून आपटले जाते. हे पिठ इतकं चिकट केलं जातं की या पोळ्या पोळपाट आणि लाटण्याऐवजी फक्त हातावर करता आल्या पाहिजे. या पोळ्या मडक्यावर खरपूस भाजल्या जातात. या पोळ्या इतक्या पातळ असतात की आपला न्यूजपेपरचा कागदही त्यापुढे जाड असतो.
लांबपोळ्या, मांडे बनवायची कला ही जवळपास लोप होत चालली होती. केवळ बोटावर मोजता येणा-या महिला मांडे बनवायच्या.
यामागे असलेली प्रचंड मेहनत.खाणारेही एकाच समाजातील लोक होते.
शिवाय एका किलोच्या पोळ्यासाठी दोन ते तीन तास वेळ देणं परवडणारं नव्हतं.
सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येत हा महोत्सव साजरा करावा अशी यामागे भावना होती.
सुमारे 15-16 वर्षांपूर्वी यवतमाळ येथे डॉ. हर्षदीप कांबळे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. तेव्हा त्यांनी यवतमाळ येथे ‘समता पर्व’ या नवीन आणि अनोखा उपक्रम सुरू करण्याचे ठरवले. थोडक्यात संकल्पना म्हणजे 11 एप्रिल महात्मा फुलेंची जयंती ते 14 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपर्यंत चालणारं एक संमेलन. सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येत हा महोत्सव साजरा करावा अशी यामागे भावना होती.
केवळ साहित्य, विचार, नाट्य, संगीत यांचंच संवर्धन होणं हे समता पर्वाचं उद्धीष्ट नसावं तर खाद्य संस्कृती यांचंही यातून संवर्धन व्हावं हा यामागचा उद्देश होता.
‘समता पर्व’ जेव्हा सूरू झालं तेव्हा तिथे पहिल्यांदाच मांड्यांना स्टॉल देण्यात आले.
व्यावसायिकरित्या पहिल्यांदाच हे मांडे विकले जात होते. सुमारे 5-7 स्टॉल पहिल्या वेळी लागले.
हे मांडे मांसाहारी खवय्यांसाठी मटन सोबत मिळायचे तर शाकाहारी लोकांसाठी पाटवडी,
वांग्याची भाजी किंवा डाळभाजी हे ऑप्शन असायचे.उन्हाळ्यात आंब्यांचा सिजन असल्याने आमरसही मांड्यांसोबत उपलब्ध होता.
‘समता पर्व’ हा असा कार्यक्रम होता जिथे पहिल्यांदाच सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले.
आधी केवळ बौद्ध समाजापुरते असलेले हे मांडे या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतर समाजातील लोकांपर्यंत पोहोचले.
आयुष्यात कधी मटन मांडे, वांगे मांडे किंवा आमरस मांडे न खाल्लेल्या खवय्यांना हा प्रकार चांगलाच आवडला.
चार दिवस लोकांच्या त्यावर उड्या पडल्या.काही लोक तर समता पर्वात केवळ मटन मांडे खाण्यासाठी गेले होते
अशी ही आठवण यवतमाळकर देतात.तिथून मांडे हे पहिल्यांदाच पाटीपु-यातून आझाद मैदानात आझाद झाले.
मागणी वाढल्याने इतर ठिकाणीही घराघरातून मांड्यांची विक्री सुरू झाली
उत्कृष्ट नियोजन, सर्वसमावेशकता, दर्जेदार वक्त्यांची भाषणं, नाट्य, नृत्य, संगीत, विविध स्पर्धा इ. मुळे समता पर्व चांगलेच हिट झाले. यासोबतच इथल्या मांड्यांचीही चांगलीच चर्चा झाली. लोकांनी तिथल्या मांडे विक्रेत्यांचे नंबर घेऊन ठेवले होते. समता पर्व संपल्यावरही लोकांची मागणी सुरू होती. त्यामुळे तिथल्या महिलांनी घरून मांड्यांची विक्री सुरू केली.
त्यानंतर इतर कार्यक्रम, संमेलनातही मांड्यांना स्टॉल मिळाले. यावेळी स्टॉलची संख्या वाढली. आज समता पर्वात हे स्टॉल 15 च्या जवळपास असतात. यवतमाळमध्ये शेकडो महिला मांडे बनवतात. आधी बोटावर माजता येणारी लोकांकडे असलेली ही कला याला व्यावसायिक रूप मिळाल्याने पुढच्या पिढीकडे गेली. आज पाटीपुरा, अशोकनगर, उमरसरा या भागात घरून मांड्यांची विक्री केली जाते. सव्वाशे ते दिडशे रुपये किलो दराने हे मांडे विकले जाते.
त्यानंतर प्रत्येक संमेलनात मांड्याचे स्टॉल सुरू झाले. मागणी वाढल्याने इतर ठिकाणीही घराघरातून मांड्यांची विक्री सुरू झाली.
आज अमरावती, नागपूर, चंद्रपूर इत्यादी ठिकाणी वर्षभर मांडे मिळतात तर विदर्भात अनेक ठिकाणी ऑर्डरवर घरून मांडे विक्री केली जाते.
नागपूरमध्ये तर केवळ मटन मांड्यासाठी रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे.तर इंदोरा भागात मांडे विक्री करणा-या गल्या आहेत.
जर समता पर्वात या खाद्य प्रकाराला प्रसिद्धी मिळाली नसती तर कदाचित त्याला व्यावसायिक रूप मिळाले नसते.
सुप्रसिद्ध कवी आणि विचारवंत आनंद गायकवाड सांगतात की खाद्य संस्कृतीचंही संवर्धन व्हावं हा समता पर्वाचा एक उद्देश होता.
आज पाहुणचार म्हटलं मटण मांडे आलेच. हे बनवणारे लोक जरी कमी असले तरी ऑर्डर करून बोलवणारे अधिक आहेत.
त्यामुळे यवतमाळात शेकडो महिलांना रोजगार मिळाला.जर समता पर्वात मांड्यांना व्यावसायिक रूप मिळालं नसतं तर हा प्रवास संपूर्ण विदर्भात पसरला नसता.
समता पर्वात व्यावसायिकरित्या सुरू झालेले मांडे ख-या अर्थानं समाजात समता प्रस्थापित करणारे ठरले.
असं म्हणतात की कुणाच्याही मनात शिरण्याचा पोट राजमार्ग आहे. संस्कृतीमध्ये वेश, भाषा, सण, उत्सव इत्यादीसोबतच आहार येतो.
आहाराचा संबंध केवळ पोटापुरता नसतो तर तो संस्कृतीशी जुळलेला असतो.सर्व संस्कृती एकमेकांना जुळलेली असते
संस्कृतीच्या देवाणघेवाणात संकोच आणि कुतुहल याला मोठे महत्त्व आहे.संकोचामुळे बरेचदा आपण दुसरी संस्कृती स्वीकारात नाही,
त्यामागे सामाजिक पार्श्वभूमी असते. मांडे हे न स्वीकारण्याच्या माग फक्त संकोचच नाही तर त्यामागे वर्णव्यवस्थेची नजरकैदही होती.
मात्र संकोच आणि कुतुहल यात अखेर कुतुहल विजयी झाले.
आज विदर्भात प्रत्येक मोठ्या कार्यक्रमात संमेलनात मांड्यांचा स्टॉल असतो. याची सुरूवात ही समता पर्वापासून झाली. विविध बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला मांडे बनवून विकतात. व्यावसायीक रूप मिळाल्याने ही कलाही पुढच्या पिढीपर्यंत गेली आहे. आधी मागणी नव्हती त्यामुळे पुरवठा नव्हता. केवळ एका समाजापुरतं असलेले हे मांडे आज सर्व समाजातील लोक कोणताही भेदभाव न ठेवता आवडीने खातात. समता पर्वात व्यावसायिकरित्या सुरू झालेले मांडे ख-या अर्थानं समाजात समता प्रस्थापित करणारे ठरले. या खाद्यप्रकाराला पुनरुज्जीवण देण्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या मोलाची भूमिका असलेले डॉ. हर्षवर्धन कांबळे यांचेही योगदान कधीही विसरता येणार नाही.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)