सिस्टीम म्हणजे व्यवस्था ती शासकीय प्रशासकीय न्यायालयीन अशी विविध स्तरावरील असू शकते.कोणत्याही नवतरुणास सिस्टीम /व्यवस्था बदलण्याची जाम इच्छा असते.नव्हे ध्येय असतं.यासाठी असे सळसळत्या रक्ताचे तरुण राजकारण समाजकारण जमेल तसं करत असतात.राजकारणात सर्वांनां “नायक” बनायची एक सुप्त महत्वाकांक्षा असतेच.परंतु ती पूर्ण होईलच असं नाही.आणि सामान्य माणूस या सिस्टीमचा कायम बळी ठरत आला आहे.व्यवस्थेचे बळी ठरलेले अनेकजण निराशेत नंतर स्वतःला संपवतात.
ही व्यवस्था बदलण्यासाठी समाजातून व्यापक प्रयत्न करणे गरजेचे आहे.व्यवस्था गेंड्याच्या कातडीची असते आणि तिला कान डोळे भावना काहीच नसतात.त्यामुळे तुमचे नाडलेपण दळलेले पिचलेले असणे तीला कधीही दिसत नाही,ऐकू येत नाही.किंबहुना ती याकडे त्यादृष्टीने कधी बघतच नाही.खरंतर लोकशाही म्हणजे लोकांच्या अधिकार शाहीत लोकांवरच गुदरले गेलेले हे व्यवस्थेचे जोखड बदलून ठोकून त्यात नवा जीव ओतणे गरजेचे झाले आहे.अन्यथा अशी भ्रष्ट संवेदनाहीन व्यवस्था हकनाक बळी घेतच राहील.
व्यवस्थेचे बळी एक दाहक वास्तव
व्यवस्थेचे बळी ठरणारे लोक,प्रामुख्याने सामान्य गरीब असतात.त्यांच्यामागे कुणाचेही पाठबळ नसते.या बळींची सुद्धा वर्गवारी होऊ शकते,म्हणजे बळी ठरल्यानंतर लोकांचं आयुष्य उध्वस्त तर होतंच यात काही लोक स्वतःच निराश हताश होऊन आपलं आयुष्य संपवून टाकतात.लोक आपल्या आयुष्याचा फार मोठा भाग तुरुंगाच्या चार भिंतीत व्यतीत करून संपतात.ही अतिशयोक्ती ठरवणार नाही जर आपण याला ठरवून केलेले खून असं संबोधलं.कारण तुम्ही अशा लोकांना शिक्षाच दिलेली नाही.केवळ संशयावरून तुम्ही त्यांचे जगण्याचे क्षण हिरावून घेत चार भिंतीत कैद करून टाकले आहेत.
अशा प्रकारे अनेक लोकांना अटक करण्यात आल्याचे दिसून येते.समजण्यासाठी काही उदाहरणे पाहता येतील.
झोमॅटो गर्लचं एक उदाहरण पहा
वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या एका युवतीचा विडिओ सोशल मीडियात प्रसारित झाला होता. वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप तिच्यावर होता. पोलिसांनी तिचा पिच्छा पुरवला. तिला घेरलं. अडवून ठेवलं. वाशी पोलिसांना बोलावलं आणि तिच्यावर गुन्हा दाखल केला. वाद सुरू होता, तेव्हा ती भिडली. पण पुढे काय वाढून ठेवलंय तिला कल्पना नव्हती.सप्टेंबर महिन्यात तिला जामीन मंजूर झाला होता. पण वर्ष झालं तरी ती मुलगी जेलमध्येच होती.
प्रियांका लोकांना दिसली पोलिसांकडच्या मोबाईलमधून ! एकतर्फी !ती कोणत्या मानसिकतेत जीवन जगतेय, तिचीही काही बाजू असू शकते. मूळात ती सराईत गुन्हेगार नाही, हे आपण आपली मतं बनवताना लक्षात घेतलं पाहिजे. घरदार सोडल्यानंतर सर्व बाजूंनी उभ्या राहिलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत स्वत:च्या हिंमतीवर जगू पाहणारी ती एक नव्या जमान्यातली बिनधास्त मुलगी आहे. झोमॅटोत नोकरी करून ती मेहनतीने आपलं जीवन जगत होती. तिला एक लहान मुलगी आहे. व्यवस्थेने त्या लहानग्या मुलीला आईशिवाय वर्षभर जगायला भाग पाडलं.
इथं मुद्दा तिने केलेल्या गुन्ह्याचा गुन्ह्याचे स्वरूप तिला मिळालेली शिक्षा या सर्वांचा विचार केला पाहिजे,एक समाज म्हणून आपण अशावेळी काय भूमिका घेतो? घ्यायला हवी याचाही विचार व्हावा.आपली संविधानिक व्यवस्था नामचीन गुन्हेगारांनाही सुधारण्याची संधी देते. पण इथे कायद्याचा वापर प्रियांकाला धडा शिकविण्यासाठी झाला. समुपदेशन करून तिला चूक सुधारण्याची संधी मिळायला हवी होती ; ती मिळाली नाही. प्रियांका जामीनानंतरही वर्षभर तुरूंगात का राहिली.प्रियांका ब्राह्मण समाजातील मुलगी आहे हे इथं लक्षात घ्यावं लागेल.प्रियांका ब्राह्मण समाजातील असूनही अव्यवस्थेचा दुष्परिणाम टाळू शकली नाही. अव्यवस्थेविरोधात आपण जातीपातीच्या पलिकडे येऊन का उभं राहिलं पाहिजे हे अधोरेखित करण्यासाठी प्रियांकाच्या जातीचा नाईलाजाने उल्लेख करावा लागतोय.
दुसरं उदाहरण डॉ.कफिल खान यांचं, व्यवस्थेचे बळी
डॉ. कफील खान हे गोरखपूर मधील बाबाराघवदास मेडिकल कॉलेज मध्ये नोडल अधिकारी असताना ऑक्सीजन कांडची घटना घडली होती,आणि ऑक्सीजन अभावी 30 पेक्षा जास्त मुलांचे बळी गेले होते.या घटनेत डॉ. कफील यांना गोवण्यात आल्याचे बोलले जाते.त्यांना त्यात अटक झाली,तुरुंगात सुद्धा रवानगी झाली मात्र त्यांच्यावर गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही.याउलट दुसरीकडे डॉ. कफील खान यांनी आपल्या खाजगी क्लिनिक मधून अतिरिक्त ऑक्सीजन मागवून अनेक लहान बाळांचे प्राण वाचवले होते.राजकीय आकसापोटी आणि प्रकरण दाबण्यासाठी त्यांना यात गोवण्यात आल्याचे बोलले जाते.2018 मध्ये त्यांना न्यायालयाने जामिनावर मुक्त केले.
त्यांनंतर त्यांच्यावर रासुका अंतर्गत कारवाई करण्यात आली.डॉ. कफील खान यांनी सीएए एनआरसीविरूद्धच्या देशव्यापी आंदोलनात भाग घेतला होता.यावेळी त्यांनी भडकाऊ भाषण केले असा आरोप ठेवण्यात आला.2 जानेवारीला यूपी एटीएसने त्याना मुंबईहून अटक केली होती आणि अलीगढ डीएमच्या अहवालावरून त्यांच्यावर एनएसएचा (रासुका) लावला गेला.त्यानंतर ते कित्येक महीने जेलमध्ये राहिले.तुरुंगातील वाईट दिवस,अव्यवस्था,घाणेरडे वातावरण,गैरसोय याबद्दल ते वेळोवेळी बोलत होते.
अलीकडेच न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावत डॉ. कफील खान (dr.kafeel khan) यांच्यावरील रासुका हटवत सुटका केली.त्यांच्यावर आता पोलिसांची आजन्म पाळत असणार.गोरखपूर पोलिसांनी हिस्ट्रीशिटर (history shitter) म्हणून यादी काढली आहे. त्यात डॉ. कफील खान यांचेही नाव समाविष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे पोलिस आता त्यांच्यावर हिस्ट्री शिटर प्रमाणे पाळत ठेवतील आणि तसे ट्रीट करतील.
देशभरात गाजलेलं आणखी एक उदाहरण सोनी सोरी
एनआयएच्या विशेष न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या सोनी सोरी (soni sori) यांची 11 वर्षांनंतर देशद्रोहाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. सोनी सोरी यांच्यावर माओवाद्यांशी संबंध असल्याचा आणि त्यांना निधी पुरवल्याचा आरोप होता. 11 वर्षांनंतर निर्दोष सुटल्यानंतर सोनी सोरी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्र आणि राज्य सरकार त्यांची 11 वर्षे त्यांना परत करू शकतील का, असा सवाल त्यांनी केला.
सोनी सोरी ही दंतेवाडा जिल्ह्यातील काटेकल्याण तालुक्यात स्थित बडा बेडमा येथील रहिवासी आहे.
पूर्वी ती दंतेवाडा येथील सरकारी शाळेत शिकवायची.माओवाद्यांसोबत पैशाच्या व्यवहाराच्या प्रकरणात
सोनी सोरीचे नाव समोर आल्यानंतर तिला शिक्षक पदावरून निलंबित करण्यात आले होते.
सोनीचे वडील मुंडा राम हे काँग्रेस नेते होते आणि बडे बेडमा गावचे सरपंचही होते.
कोठडीत तिचा शारीरिक छळ
2010 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी 14 ऑगस्ट रोजी 6 ट्रक जाळले होते.
या प्रकरणात पोलिसांनी सोनी सोरी यांनाही आरोपी केले होते.
पोलिसांनी सोनी सोरी यांच्यावर देशद्रोह, दंगल, खंडणी अशा अनेक कलमांखाली गुन्हे दाखल केले होते.
2011 मध्ये सोनी सोरीला पैसे देण्याच्या प्रकरणात दिल्लीतून अटक करून छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.
यादरम्यान, कोठडीत तिचा शारीरिक छळ होत असल्याचा आरोप सोनी सोरी यांनी केला आहे. सोनी सोरी यांनी तुरुंगातूनच पत्र लिहिले.
या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, आम्हाला देशवासीयांकडून जाणून घ्यायचे आहे की आमच्या महिलांवर असे अत्याचार का होत आहेत. सोनी सोरी यांनी तत्कालीन एसपी अंकित गर्ग यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, खुर्चीवर बसलेले एसपी गर्ग त्यांचे नग्न शरीर पाहून अश्लील वक्तव्य करतात. मात्र, गर्गने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
11वर्षानंतर निर्दोष मुक्त
माओवाद्यांचे संबंध आणि पैशाचे व्यवहार याशिवाय छत्तीसगड पोलिसांनी सोनी सोरीला आणखी 6 प्रकरणांमध्ये आरोपी बनवले होते.
मात्र, आता ती सर्व खटल्यातून निर्दोष मुक्त झाली आहे.पण, निर्दोष सुटल्यानंतर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असे त्यांनी पीटीआयवरील एका वक्तव्यात म्हटले आहे.
मला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी 11 वर्षे लागली, मी लढत राहिले. मी शाळेत शिक्षिका होते.
पण, खोट्या आरोपांमुळे माझे आयुष्य, माझी प्रतिष्ठा आणि सन्मान नष्ट झाला.
माझ्यासोबत माझ्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला. माझी 11 वर्षे कोण परत करणार?
केंद्र आणि राज्य सरकार त्यांची 11 वर्षे परत करू शकतील का, असा सवाल त्यांनी केला.
काल परवा आत्महत्या करून जीवन संपवलेले विकास सूर्यकांत केदारे
आसनगाव मध्ये राहणाऱ्या विकास सूर्यकांत केदारे या युवकांने आपल्या अकरा वर्षाच्या शाळकरी मुलीसह आत्महत्या केली. विकासवर त्याची पत्नी मोनाली हिच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप होता. विकास आणि त्याची वयोवृद्ध आई अशा दोघांनीही या आरोपाखाली काही महिने जेलमध्ये काढले होते. आपण काही गुन्हा केलेला नसताना केवळ संशयावरून भोवतालच्या व्यवस्थेने जो आपला छळ केला तो सहन करण्याच्या पलीकडचा होता, असं उद्विग्न होऊन नमूद करत विकासने मुलीसह स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला.
आत्महत्यापूर्व चिठ्ठीत विकासने शहापूर पोलीस ठाण्यातील क्षीरसागर नावाच्या पोलिस अधिकाऱ्यावरही बोट ठेवलं आहे. क्षीरसागर याच्यावर विकासकडे पैशाची मागणी केल्याचा व ते न दिले गेल्याने त्याचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. एकंदरीत पाहता संवेदनाहीन समाजव्यवस्थेने विकास आणि त्याची मुलगी आर्या यांचा बळी घेतला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
अगोदर पत्नीने केली आत्महत्या
गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी विकासची पत्नी मोनाली हिने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. घटना घडली तेव्हा विकासची आई पुष्पलता आणि मुलगी आर्या या दोघीच घरात होत्या. कुठूनतरी औषधाचा वास येतोय म्हणून शोधाशोध करत असताना आपल्या घरातून बेडरूममधूनच वास येतोय असं लक्षात आल्यावर गच्चीवर असलेल्या विकासला बोलावलं आणि बेडरूमचा दरवाजा फोडून पाहिलं असता मोनालीने कीटकनाशक प्राशन केल्याचं आढळून आलं. त्यानंतर तिला त्वरेने हॉस्पिटलला हलवण्यात आलं, परंतु त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला, असं विकासची आई पुष्पलता यांचं म्हणणं आहे.
यावेळी घरात मोनालीला विचारणा केली असता तिने ‘तुझ्या पप्पांना घाबरवत होते’, असं मुलीला म्हटल्याचंही ६५ वर्षीय पुष्पलता सांगतात. दोघा नवराबायकोत कधी वाद असल्याचं, झाल्याचं मी तत्पूर्वी कधीही पाहिलं नव्हतं, असंही त्यांचं म्हणणं आहे. मोनालीच्या माहेरच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवरून, पती व सासूने छळ केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी विकास व पुष्पलता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुष्पलता यांना दोन महिन्यांत जामीन झाला तर विकासला ४ महिने जेलमध्ये राहावं लागलं. जेलमधले दाहक अनुभव त्याने मोजक्या मित्रांना सांगितले होते. जेल, नातेवाईक, समाज, पोलिस यंत्रणेच्या अनुभवांनी त्याच्या मनावर खोल जखमा केल्या असाव्यात, असं विकासची आत्महत्यापूर्व चिठ्ठी वाचल्यावर लक्षात येतं.
आत्महत्यापूर्व विकासने लिहिलेली चिठ्ठी
आज १५ मार्च २०२२, जवळपास ७ महिने झालेत. मोनाली गेली. ती गेली पण मागे खूप सारे प्रश्न सोडून गेली.
७ महिन्यामध्ये मी रोज माझं मरण पाहिलं आहे. खूप त्रास होत आहे. कदाचित कुणीच समजू शकणार नाहीत.
कुणाच्या तरी सांगण्यावरून तक्रार झाली. त्यानंतर मी काण आयुष्य भोगले ते फक्त मीच सांगू शकतो.
आर्याकडे पाहून पुन्हा उभं रहायचा खूप प्रयत्न केला, पण आत खूप असह्य होत आहे.
मी आणि आर्या आम्ही दोघेही आत्महत्या करीत आहोत…विकासच्या चिठ्ठीची सुरुवात ही अशी आहे.
मला मी न केलेल्या गुन्ह्यासाठी – शिक्षा भोगायला लावली गेली. माझा अति प्रामाणिकपणा मला नडला.
झाले ते सर्व वाईट होते पण त्यात माझ्या आईची काय चूक होती? असा सवाल करीत विकासने स्पष्टपणे लिहिलंय की
पोलिस अधिकारी आर एस क्षीरसागर सारखे नीच पैश्याला हपापलेले लोक भेटले.
त्यांना द्यायला लाखों रुपये नव्हते म्हणून माझ्या आयुष्याची वाट लावली !
पोलिस व इतर सरकारी लोक जे पैश्यासाठी निरपराध लोकांना अडकतात, त्यांना माझा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही.
व्यवस्थेचे बळी
जेलमध्ये माझ्यासारखे ८०% लोक माहित आहेत जे फक्त तपास अधिकाऱ्याला द्यायला पैसे नाहीत
म्हणून नरकयातना भोगत आहेत, असंही विकासने चिठ्ठीत नमूद केलंय.
त्याने असं का लिहिलंय हे विचारलं असता विकासची आई पुष्पलता केदारे यांनी मीडिया भारत न्यूज ला सांगितलं की क्षीरसागर या पोलिस अधिकाऱ्याने आमच्याकडे दीड लाखांची मागणी केली होती. तो फ्लॅटचे पेपरही मागत होता. सारखा दबाव आणत होता. त्याने विकासचा खूप छळ केलाय. तारखेवर आम्हाला, मोनालीच्या माहेरचे लोक मारणार आहेत, म्हणून भीती घालायचा.
पुष्पलता यांच्या आरोपांची पुष्टी उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्ता शिवाजी रगडे यांनीही केलीय.
क्षीरसागर यांच्या पैश्याच्या मागणीबद्दल आणि छळाबद्द्ल विकास आपल्याकडे बोलला होता,
असा रगडे यांचा दावा आहे. जेलमधल्या अनुभवांनीही तो अस्वस्थ होता, असं रगडे यांनी मीडिया भारत न्यूज ला सांगितलं.
वरील उदाहरणे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अन्यायकारक व्यवस्था ही शासकीय प्रशासकीय न्यायालयीन अशा विविध स्तरावर नागरिकांना नाडत असल्याचे दिसते.आणि ही उदाहरणे आणखी यासाठी महत्वाची आहेत कारण यात सर्व जातीय सर्व धर्मीय लोक दिसतात,म्हणजे मुस्लिम आहे.ब्राह्मण आहे आणि मागासवर्गीय ,आदिवासी असे सर्वच स्तरातील लोक या व्यवस्थेच्या अन्यायी फेऱ्यात गुंतून संपून जाते.ज्यावेळी देशात जात-धर्माच्या नावाखाली ध्रुवीकरण सुरु आहे.अशावेळी या गोष्टी सुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की इथं सर्वांचा नंबर कधी ना कधी लागणार आहे.सबका नंबर आयेगा…
हे सगळं मांडत असताना आणि यावर विचार करत असताना आपण हेही लक्षात घ्यावं की
आपण इथं सराईत गुन्हेगार अतिरेकी कट्टरवादी दहशतवादी इत्यादींचा उल्लेख केलेला नाही.
खरतर सर्वांचाच मुद्दा असा की जोपर्यंत तुम्ही गुन्हेगार म्हणून सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही व्यवस्थेच्या नजरेतून आरोपी असता.
आणि आपण या स्टेजवरच्या होणाऱ्या मानवाधिकार हननाचा मुद्दा इथे चर्चेला घेतला आहे.
व्यवस्था लोकांनी लोकांसाठी बनवली आहे.ती निकोप न्यायी आणि सर्वांसाठी समान न्याय देणारी असावी यासाठी लोकांनीच प्रयत्न करायचे आहेत.
या अशा व्यवस्थेचे बळी उद्या कदाचित तुम्ही सुद्धा….असू शकता.त्यामुळे तुम्हाला यावर विचार करावा लागेल.आपण सर्वांनाच.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
झुंड मुव्ही: रितेश देशमुख यांची पोस्ट व्हायरल; दोन भारताचा विचार..
झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 19, 2022 17:00 PM
WebTitle – Victims of the system: Maybe tomorrow you too