मुंबई दि ३ : कोरोना शी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा.कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत, ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ते आज वृत्तपत्रांचे संपादक, मालक, वितरक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते. याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी यावेळी संसर्ग रोखण्यासाठी प्रामुख्याने इतर काही पर्याय आहेत का ते सर्वांकडून जाणून घेतले व सूचना स्वीकारल्या.
संसर्गाचे राजकारण रोखा
मुख्यमंत्री म्हणाले, आपल्याला कुणाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही. पण जीवांची काळजीही घ्यावीच लागणार, आपण वर्षभरापासून सातत्याने आरोग्याचे नियम पाळण्यास सांगतो आहोत. मधल्या काळात आपण ते गांभीर्याने पाळल्याने साथ बऱ्यापैकी आपण रोखू शकलो. मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
कोरोना शी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा
सरकारला लॉकडाऊन करण्यास आवडत नाही. ही लढाई एकट्या सरकारची नाही तर तुम्हा आम्हा सर्वांची आहे. अशावेळी सर्वांनी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, याचे राजकारण नको. आपण विविध सूचना दिल्यात त्या सरकार निश्चितपणे अंमलात आणण्यासंदर्भात विचार करेल. मात्र कोरोनाशी लढताना भीतीचे वातावरण नको तर एकमेकांची योग्य काळजी कशी घेऊ यादृष्टीने समाजात जागृती निर्माण झाली पाहिजे आणि त्याकामी माध्यमांनी सहकार्य करावे.
आज आपण ऑक्सिजन उत्पादन कसे वैद्यकीय कारणांसाठी राखून ठेवता येईल, खासगी व बंधपत्र-करार स्वरूपाने डॉक्टर्सच्या सेवा कशा उपयोगात आणता येईल, त्याचाही विचार करीत आहोत. ज्येष्ठ डॉक्टर्स, नर्सेस यांच्या सेवाही कशा घेता येतील, ई- आयसीयूचा उपयोग कसा करता येईल, तेही पाहतो आहोत. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेचे हित पाहूनच सरकारने भविष्यात काही निर्णय घेतल्यास माध्यमांनीदेखील त्यामागील हेतू पाहावा व वस्तुस्थिती मांडावी.
या बैठकीत लोकांची प्रतिरोधक शक्ती वाढविण्यासाठी उपाय, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त सुयोग्य वापर,
टेलिमेडिसिन, सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन, कामाच्या वेळांची विभागणी, स्थानिक पातळीवर नियंत्रणाला प्राधान्य,
दुकानदार, विक्रेते यांच्या चाचण्या करून त्यांना विक्रीची परवानगी, कोविड केंद्रांसंदर्भातील धास्ती कमी करणे,
वारंवार जनतेशी संवाद साधणे अशा विविध सूचना देण्यात आल्या.
पुरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात; शालेय वस्तूंचे वाटप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 03, 2021 21 : 30 PM
WebTitle – The fight against Corona is not of the government alone but of all the people; The role of media is important – Chief Minister Uddhav Thackeray 2021-04-3