सामाजिक समतेचा हुंकार: जीवन संघर्ष
—–
पुस्तक परीक्षण
विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
सं. ९४२१४४२९९५
—–
नवनाथ रणखांबे यांचा ‘जीवन संघर्ष’ हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. सामाजिक जाणिवा अधोरेखित करणाऱ्या संग्रहात ४६ कवितांचा समावेश आहे. बहिष्कृत, शोषित, पिडीत वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या रचना मानवतावादी विचार करतात.
अंधाराकडून प्रकाशाकडे प्रवासीत होतात. चळवळीचे अंग आणि प्रतिकाराचे स्फुल्लिंग चेतविण्याची यशस्वीता कवितेत आहे. भटकंती पोटाची, अधोगती देशाची, साद, शोध स्वतःचा या रचना मानवतेचा प्रदेश पादाक्रांत करू इच्छतात.
तर जात, धर्म, पंथ याचबरोबर गरीब, श्रीमंत, वर्णभेद, रंगभेद या बाबतीत विश्लेषणही कवितांतून डोकावते.
काळाच्या छाताडावर
मी उभा ताठ
अंधारातून शोधतो
मी उजेडाची वाट (मोडेल कणा)
गावकुसाबाहेरचे जगणे, शोषितांचे शोषण, अन्यायविरूद्ध पेटून उठण्यातील संघर्ष, सामाजिक समतेचा हुंकार या संग्रहात पदोपदी जाणवतो. बापाविषयी ‘बानं शिकवलं’, सजीवाचे, निसर्गसंवर्धन सांगणारी ‘तोल ढळला’, ‘उधळण’, ‘पाऊस पेरणी’, सामाजिक संदेश देणाऱ्या ‘गावात आता कसं जगायचं?’ आणि ‘जातीचे ग्रहण’, ‘इतिहास पुरूष’, ‘मात’, ‘जीवन,’ ‘दाहकता’ या कवितांचा समावेश होतो. तर प्रेम आणि विरह व्यक्त करणारी कविताही आहेत. उत्तम कांबळे, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे यांनी कवितेतून उपेक्षित वर्गाचे अंतरंग मांडले. तद्वतच रणखांबे मांडू इच्छितात. आशावाद व्यक्त करतात.
जीवन माझे, सुखमय होईल
एक दिवस, सुंदरता येईल
(यशाच्या मी दर्दीत)
एकंदरीत कविता नेमकेपणाने बोलत नाहीत. नाविन्याच्या पाऊलखुणा जाणवतात. भाव मात्र सरळ व्यक्त करतात. मानवाचे जगणे सुसह्य व्हावे एवढीच माफक अपेक्षा कवीची आहे. तत्वज्ञान आणि वस्तुस्थिती यांची सम्यक सांगड घालणारी ही कविता आहे.
स्वानुभवातून आलेली कविता प्रेरणादायी होते. नवनाथ रणखांबे यांचा पिंड चळवळीचा असल्याने व्यवस्थेविरुद्ध संघर्ष त्वेषाने उभा राहतो. वर्तमान काव्यलेखनात हा वेगळा प्रयोग वाटतो. सामाजिक स्तरीकरणावर भाष्य करणारी कविता नव्याने येवू पाहतेय.
सहजतेने उतरलेली काव्यरचना ‘जीवन संघर्ष’ नविन असली तरीही वाचनीय आहे.
जीवन संघर्ष (कवितासंग्रह)
नवनाथ रणखांबे (कवी)
शारदा प्रकाशन, ठाणे
पृष्ठेः ८०, मूल्य : ८० रू
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 04 , 2021 20 : 25 PM
WebTitle – The cry for social equality: Jivan Sangharsh 2021-07-04