काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेल येथील जागावाटपाच्या बैठकीत अद्यापि निमंत्रित घटक असलेल्या वंचित बहुजन आघाडी तर्फे काही प्रस्ताव दिले गेले.यामध्ये महाराष्ट्रातील 27 लोकसभा मतदारसंघात आपली निवडणुकीची यंत्रणा सक्षम असून यापैकी काही जागा आम्हाला लढण्यासाठी जागावाटपातून मिळाव्यात असा एक प्रस्ताव होता.यावेळी या 27 पैकी काही जागा non negotiable राहतील असे वंचित कडून स्पष्ट करण्यात आले.त्याचप्रमाणे अजून काही महत्वाचे प्रस्ताव वंबआ तर्फे देण्यात आले. यामध्ये एकूण 48 पैकी 15 जागांवर OBC उमेदवारांना तिकीट देण्यात यावे,3 जागांवर अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना तिकीट देण्यात यावे,मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांना जालना तसेच जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे पुत्र डाॅ.अभिजीत वैद्य यांना पुणे येथून महाविकास आघाडीने common consensus candidate (सामायिक सर्वमान्य उमेदवार) म्हणून उभे करावे अशा मागण्या आहेत. चौथी आणि सर्वात अनोखी आणि महत्वाची मागणी म्हणजे सर्व पक्षांनी आणि उमेदवारांनी निवडणूकी आधी किंवा नंतर BJP शी हातमिळवणी करणार नाही असे लेखी प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे.
खरच या मागण्या नवीन आहेत का ? या मागण्या अव्यवहार्य आहेत का ?
जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात अशा प्रकारच्या नवीन मागण्या केल्यामुळे महाविकास आघाडीतील पक्ष आणि मिडीया यांमध्ये VBA च्या हेतूविषयी उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. खरच या मागण्या नवीन आहेत का ? या मागण्या अव्यवहार्य आहेत का ? यामागचा वंचितचा नक्की हेतू काय ? या बाबींचा या लेखात उहापोह करूया. या मागण्यां चा वंचितच्या पक्ष धोरणांशी परस्परसंबंध वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या जुन्या-नव्या विधानांशी जोडून पहावा लागेल कारण अध्यक्ष हा पक्षाचा सर्वोच्च प्रवक्ता असतो.
पहिली मागणी आहे OBC समाजाच्या उमेदवारांना 48 पैकी 15 जागा मिळाव्यात आणि दुसरी मागणी आहे मनोज जरांगे पाटील यांना संयुक्त उमेदवारी देणे. या मागण्या परस्परसंबंधीत आहेत. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे , ज्याचे नेतृत्व जरांगे करत आहेत. मराठ्यांना कुणबी म्हणून सरसकट OBC तून आरक्षण मिळावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. मागील सर्वपक्षीय सरकारांकडून दिले गेलेले 50 टक्क्यांवरील मराठा आरक्षण सरकारला कोर्टात टिकवता आले नाही. यामुळे मराठा समाजात अविश्वासाचा भावना निर्माण झाली असून टिकणारे आरक्षण 50 टक्केच्या आतच मिळेल असा त्यांचा समज झालेला आहे. यातून त्वरित मार्ग काढण्यासाठी कुणबी म्हणून OBC मधून आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात आहे . OBC चे आरक्षण मर्यादित आहे त्यामुळे त्या आरक्षणात नवीन समूहाचा समावेश झाला तर आधीच अपुरे असलेले आरक्षण अजून कमी होईल असे OBC ना वाटत आहे. याचा फायदा घेऊन काही प्रतिगामी शक्ती मराठा विरूद्ध OBC असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
ॲड. प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षण आणि OBC मेळावा या दोन्ही मंचावर जाऊन मराठा आरक्षण व OBC यांचे ताट वेगळे असावे अशी भूमिका घेतली आहे . तसेच गरीब मराठ्यांना 50 टक्के मर्यादेच्या वर कोर्टात टिकणारे आरक्षण देता येऊ शकते तसा Formula ही माझ्याकडे आहे मात्र तो मी सध्याच्या सरकारला देणार नाही कारण ते अप्रामाणिक आहेत , आम्हाला सत्ता दिल्यास तो formula लागू करू अशी भूमिकाही आंबेडकरांनी घेतली आहे.
आंबेडकरांच्या मते हा वाद मराठा विरूद्ध OBC असा नसून, गरीब रयतेचे मराठे विरूद्ध श्रीमंत निजामी मराठे असा आहे. प्रस्थापित पक्षांवर वर्चस्व स्थापन करून निजामी मराठे अधिकच प्रस्थापित झाले आणि त्यांनी गरीब मराठ्यांना वंचित ठेवून त्यांचा vote bank म्हणून उपयोग केला असे बाळासाहेब म्हणतात. जरांगे पाटलांना जर असे वाटत असेल की त्यांचे आंदोलन आधीच्या अण्णासाहेब पाटील , शशिकांत पवार यांच्या आंदोलना प्रमाणे निजामी मराठ्यांनी जिरवून टाकू नये तर त्यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उभे राहून खासदार होऊन आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत मांडावा , त्यानंतर पक्षबांधणी करून विधान सभा sweep करून ते आपली मागणी अधिक बळकट करू शकतात असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना दिला आहे..त्याप्रमाणेच OBC मेळाव्यात जो आरक्षणवादी पक्ष कमीत कमी 14 OBC उमेदवार लोकसभेला देईल त्यांनाच OBC नी मत द्यावे असे विधान आंबेडकरांनी केले आहे.
लोकशाहीचे सामाजिकीकरण हे वंचित बहुजन आघाडीचे धोरण प्रकाश आंबेडकरांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. त्याअंतर्गत मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी देऊन गरीब मराठ्यांच्या स्वतंत्र आरक्षणाचा पाया ठेवणे आणि ऐतिहासिक रित्या राजकारणातून डावलल्या गेलेल्या OBC ना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देणे .याकरवी या दोघांतील संघर्ष थांबवणे आणि त्यांची मोट बांधून बीजेपी ला सत्तेतून पायउतार करणे आणि सामाजिक लोकशाही स्थापन करणे हा उद्देश वंचित बहुजन आघाडीचा असावा.
डाॅ. अभिजीत वैद्य हे ह्रदयविकार तज्ञ असून त्यांचे वडील भाई वैद्य हे संयुक्त महाराष्ट्र चळवळतील तसेच समाजवादी विचारांचे नेते होते ,आणीबाणीच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला होता . त्यामुळे पुरोगामी समाजवादी विचारांची पाश्र्वभूमी त्यांना आहे . डॉ. वैद्य हे CKP समाजातून येतात . BJP पुणे मतदारसंघातून सातत्याने ब्राम्हण उमेदवार देते . त्याला काऊंटर म्हणून विरोधी पक्षांनी एकमताने सुशिक्षित, समाजवादी , पुरोगामी ,CKP उमेदवार म्हणून डॉ अभिजीत वैद्य यांना उभे करावे असा वंचित बहुजन आघाडीचा आग्रह आहे अस दिसतय.
वंचित बहुजन आघाडीने सातत्याने समाजातील अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधित्वासाठी ठाम भूमिका घेतली आहे .मागील लोकसभा व विधान सभा निवडणूकीत VBA कडून देण्यात आलेल्या अल्पसंख्याक, मुस्लिम तसेच Micro OBC उमेदवारांची संख्या इतर पक्षांच्या तुलनेत लक्षणीय होती .VBA हा असा एकमेव पक्ष असावा की ज्याच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर या एक महिला आहेत , त्याही OBC समुहातून येतात . पक्षाच्या कार्यकारणीत आणि प्रवक्ता पदावर अनेक अल्पसंख्याक तसेच तृतीयपंथी सदस्य आहेत. त्यामुळे अल्पसंख्याक समाजासाठी केली गेलेली 3 जागांची मागणी पक्षाच्या धोरणांशी सुसंगत आहे .
तसेच बीजेपी कडून डावलल्या गेलेल्या अल्पसंख्याक समाजाला स्वतःकडे आकृष्ट करून घेणे हा हेतूही त्यामागे असेल.
आता सगळ्यात अनोखी मागणी म्हणजे प्रतिज्ञापत्राची. ही मागणी खरतर एक गिमीक आहे,
पक्षांतर बंदी कायद्याला न जुमानणारे लोक प्रतिज्ञापत्राला जुमानतील ही आशा फार मोठी आहे .
पण स्वतःचे मत एका विशिष्ट विचारसरणीच्या पक्षाला दिलेले असताना
त्याचा लोकप्रतिनिधी बिनबोभाट विचारधारा खुंटीला टांगून विरोधी पक्षात उडी मारतो ,
यामुळे मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे . जनता एकूणच मतदानाबाबत उदासीन झाली आहे ,
काहीजण NOTA सारखा पर्याय वापरत आहेत.या सर्वांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हे प्रतिज्ञापत्राचे गिमीक उपयोगी ठरू शकते.
यातून मतदानाचे प्रमाण वाढून त्याचा फायदा विरोधी पक्षांना होऊ शकतो.
वंचित ने एकूण 27 जागांवर आपली भक्कम तयारी झाली आहे असे सांगून त्याची यादी VBA ने सार्वजनिक केली आहे.
हा एक Strategy चा भाग आहे. राजकारण हे अपारदर्शक कसे राहिल याची काळजी प्रस्थापित राजकारण्यांनी घेतली आहे.
जेणेकरून त्यांना जनतेला अंधारात ठेवून आपलं साटलोट चालवता येईल. या अपारदर्शकतेला सुरूंग लावण्यासाठी
VBA प्रत्येक महत्वाची बोलणी सार्वजनिक करत आहे. यामुळे काही साटलोट वाले राजकारणी
आणि त्यांचे पाळीव पत्रकार व तथाकथित विचारवंत अस्वस्थ वाटत आहेत.
या मंडळींनी मिळून 2019 च्या निवडणुकीवेळी वंचित विषयी BJP ची B Team असा दुष्प्रचार करून नुकसान केले होते.
आजही असे प्रयत्न सुरू आहेत. यातून धडा घेऊन VBA या वेळी social media चा परिणामकारक वापर करत
आपले म्हणणे मतदारांपर्यंत पोहोचवत आहे.
नागपूर येथील नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत आम्ही स्वतंत्र लढलो तर किमान सहा जागा जिंकू शकतो ,
तरीही आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडीसोबत लढण्याचा प्रयत्न करू कारण आमचे ध्येय RSS-BJP ला हरवणे आहे.
असे विधान प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. हे बोलताना ते पुढे म्हणाले की, VBA चे प्रत्येक मतदारसंघात मुस्लिमेतर 2.5 लाख मते आहेत .
तरी आम्हाला आमच्या ताकदीच्या प्रमाणात जागा मिळाव्यात. मविआतल्या अनेक पक्षाची शकले झाली आहेत.
शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार आणि आम्ही (VBA) यांना मान्यताप्राप्त पक्ष व कायम चिन्ह मिळायला
ठराविक मते किंवा जागा यांची आवश्यकता आहे .एकमेकांच्या सहाय्याने आपण ही सगळी उद्दिष्टे पूर्ण करू शकतो असे ही ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडी हा एक फुले,शाहू,आंबेडकरवादी आणि संत परंपरेला मानणारा पक्ष आहे. Assertion (ठाम भूमिका)
हा आंबेडकरवादी राजकारणाचा पाया राहिलेला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या या जागावाटपाच्या प्रस्तावाला या Assertion चा भाग म्हणता येईल.
वर्षानुवर्ष मुख्य प्रवाहातून बाहेर ठेवलेल्या वंचित, बहुजन ,शोषित वर्गाची प्रस्थापितांच्या दारावरची जोरदार थाप असे याचे वर्णन होऊ शकते.
यावर जर सन्मानाने चर्चा करून आघाडीची बोलणी झाली तर देशाच्या राजकारणाचे चित्र काही वेगळेच दिसू शकते.
ॲड प्रकाश आंबेडकर नेहमी म्हणतात, राजकारणात एक प्रकारचा साचलेपणा आला आहे , तो घालवायला हवा. या सर्व उहापोहातून तो साचलेपण निघून जावा आणि लोकशाहीचे पाणी खेळते व्हावे ही आशा !
डाॅ.सुश्रुत दिलीप सावंत
sushrutsawant2@gmail.com
लेखक सामाजिक चळवळींचे अभ्यासक असून,गेली अनेक वर्षे सोशल मिडिया आणि ब्लॉगिंगच्या विश्वात लेखन करत आहेत.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 02,2024 | 16:00 PM
WebTitle – Seat sharing , ‘Vanchit Bahujan Aghadi’ is going on exactly?