आयुष्यात वावरतांना आपल्या आजूबाजूला इतके प्रेरणादायी व्यक्ती असतात की, आपलं त्यांच्याकडे लक्षच जात नाही. परंतु अशी माणसं निस्वार्थ पणे अविरतपणे आपलं कार्य कुठल्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता अहो रात्र समाज कार्यासाठी झटत असतात. असंच एक निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणजे साईनाथ चवळी सर!
ही व्यक्ती एक वेगळंच रसायन
चवळी सर हे माझे गेल्या तीन चार वर्षांपासून माझे फेसबुक मित्र आहेत. प्रत्येक्षात आमची कधी भेट झाली नव्हती. हां फोनवर मात्र आम्ही नेहमीच बोलायचो. त्यांच्याशी विविध विषयांवर बोलतांना ही व्यक्ती एक वेगळंच रसायन आहे हे त्यांच्या बोलण्यातून नेहमी जाणवत राहायचं.. फुले शाहू आंबेडकरी विचारधारा कोळून प्यायलेला अवलिया..! औरंगाबाद ग्रामीण पोलीस मध्ये पाचोड, आडूळ, पिंपरी राजा, चितेगावं, व आजूबाजूच्या तांड्या वरील बरेच मुलं मुली, गेल्या आठ दहा वर्षांपासून भरती झाले आहेत आणि प्रत्येकाच्या तोंडून मी चवळी सरांचे नाव ऐकून होतो. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून मला त्यांना प्रत्येक्षात भेटण्याची जिज्ञासा लागली होती.
गेल्या आठवड्यात त्यांना पितृशोक झाला त्यामुळे निदान आता तरी आपण त्यांना भेटायला जायलाच पाहिजे म्हणून मी रजा टाकून त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या गावी सांजखेड येथे गेलो. शेतातील त्यांच्या निवासस्थानाकडे जात असतांनाच रोडच्या डाव्या बाजूला पत्र्याचा शेड असलेल्या व त्यावर महाराजा सयाजीराव गायकवाड स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी सांजखेडा असा फलक नजरेस पडला आणि सरांबद्दलचा माझ्या मनात असलेला अभिमान अजूनच द्विगुणित झाला. त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी त्यांच्या गावातील व नात्यातील बरीच मंडळी त्यांच्या घरासमोरील झाडाखाली बसलेली होती. मी ही त्यांच्यात जाऊन बसलो. या अशा प्रसंगी सुद्धा सरांनी तिथे जमलेल्या लोकांना माझी ओळख करून दिली. जणू खूप वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो व आमच्यात खूप घनिष्ठ मैत्री आहे इतक्या आत्मीयतेने ते बोलत होते.
सुपर 30
मागील वर्षी बिहारच्या आनंद कुमार या शिक्षकांच्या जीवनावर आधारित सुपर 30 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.त्यातील आनंद कुमार या शिक्षकाच्या ज्ञानदानाच्या कार्या इतकेच महान कार्य चवळी सर करीत आहेत. तेही कुठल्याही धनाची अपेक्षा न करता.. ! मित्रांनो हे सांगत असतांना अभिमानाने माझा ऊर भरून आला आहे. पंचक्रोशीतील दिन दलित, गोर गरीब मुलांना स्पर्धा परीक्षा किंवा सरळ सेवा परीक्षा देण्यासाठी ज्याच्याकडे परीक्षेसाठी लागणारी पुस्तकं नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी सरांनी स्वतःच्या शेतात पत्र्याचा शेड उभारून त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शना बरोबरच निशुल्क पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत.
प्रबोधिनी सांजखेडा
कोरोनाच्या काळात त्यांनी ऑनलाईन क्लास च्या माध्यमातून त्यांच्या अनेक शिक्षक मित्रांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले आहे. त्यांचे सहकारी मित्र जालिंदर निमसे सर, खोडेगावचे पोलीस पाटिल संतोष वीर सर या दोघांचा उल्लेख करतांना चवळी सर त्यांना थेट कर्मवीर भावराव पाटलांची उपमा देतात. हे दोघांच्या पाठबळ व त्यांच्या सहकार्याने मी हा शिवधनुष्य पेलला आहे हे सांगावयास मात्र ते विसरत नाही.या दोन हस्तीनी कोणत्याही बाबीची अपेक्षा न करता सतत मुलांना मार्गदर्शन करत आहेत व भविष्यात देखील करीत राहतील. त्यांच्या या अथक परिश्रम मुळेच त्यांच्या हाताखाली त्यांच्या महाराजा सयाजीराव गायकवाड स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी सांजखेडा या ज्ञानाच्या तालमीत तयार होऊन त्यांचे शेकडो विद्यार्थी आज शासकीय क्षेत्रात विविध ठिकाणी नोकरी करीत आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी चतुर्थ श्रेणी पासून ते क्लास 1 अधिकारी आहेत. हे सर्व सांगत असतांना त्यांच्या चेऱ्यावरील अभिमानाचे भाव स्पष्टपणे दिसून येत होते.
बोलता बोलता मात्र त्यांनी एक खंत व्यक्त केली की, इथून तयार झालेले विद्यार्थी नोकरी लागल्या नंतर पूर्णपणे बदलून जातात. बाबासाहेबांना जसा काही शिकलेल्या लोकांनी दगा दिला तसे हे लोकं वागतात याचाच मला वाईट वाटते. अशी खंत व्यक्त करीत असताना मलाही खूप वाईट वाटलं.परंतु क्षणार्धात त्यांनी ती खंत फेकून देत म्हणाले की जाऊ दे! आपण मात्र आपलं ज्ञानदानाचे कार्य अविरत चालू ठेऊ..! त्यांच्या या महान कार्याला आपला कडक सॅल्युट.
चवळी सरांचा अल्पसा परिचय
साईनाथ चवळी :
शिक्षण Ded
Bed
Med
M a english
M a political science
प्रथम जॉब :- गरवारे कंपनि औरंगाबाद क्वालिटी कॅट्रोल विभाग नंतर शेती,
काही दिवस धुत कॉम्पॅक् लिमिटेड येथे नोकरी,तद्नंतर यवतमाळ शिक्षक, सध्या जयसिंग नाईक तांडा औरंगाबाद येथे शिक्षक.
व महाराजा सयाजीराव गायकवाड स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी सांजखेडा स्पर्धा परीक्षा केंद्र चालवीत आहेत.
अडाणी लोकांना शिक्षणाचं महत्त्व सांगणारा अवलिया
परंपरागत चालू असलेल्या रूढी परंपरांना छेद देऊन विज्ञानाची कास धरून अंधश्रद्धेच्या मुळावरच घाव घालणारा सामाजिक कार्यकर्ता,
आपल्या निवडक सहकाऱ्यांना सोबत घेऊन महाराज सयाजीराव गायकवाड ज्ञान प्रबोधनी
या स्पर्धापूर्व क्लासेस च्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना नवी दिशा, नवा मार्ग देऊन,
त्यांचे जीवनमान घडवणारे शिल्पकार औरंगाबाद जिल्ह्यातील चवळी गावचे सुपुत्र
आमचे जिवलग मित्र व मार्गदर्शक आयुष्यमान साईनाथ चवळी सर उर्फ आनंद कुमार.
आधुनिक काळातील खरा शिक्षण सम्राट. शिक्षण सम्राट या साठी की, त्यांची स्वतःची अशी कोणतीही शैक्षणिक संस्था नाहीये परंतु गोरगरीब, दिनदलितांची मुलं शिकावी, शिकला तो टिकला हा मूलमंत्र घेऊन पंचक्रोशीतील अडाणी लोकांना शिक्षणाचं महत्त्व सांगणारा अवलिया..शेताच्या बांधा बांधावर जाऊन कष्टकरी मुलांच्या शिक्षणासाठी आग्रही असलेला एक सच्चा शिक्षक.महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना आपला आदर्श मानणारे आणि आज फुले शाहू आंबेडकरी विचारांचा धगधगता ज्वाला..!
शब्दांकन – बाबासाहेब थोरात
(लेखक महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत आहेत)
हेही वाचा.. सेव्ह मेरिटवाल्यांना SC विद्यार्थ्यांची चपराक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)