मोर्चा आंदोलन हे सामान्य लोकांच्या आयुष्यातील काही अविभाज्य घटक आहेत.आपल्या आयुष्यात सामान्य घरातील एकतरी व्यक्ती या मोर्चा आंदोलन निषेधाचा मागणीचा भाग झालेला असतो,सिस्टिम/व्यवस्थेविरुद्ध लढण्याचा लोकशाहीतील तो एक अविभाज्य पर्याय आहे.याबद्दलची अशीच एक आठवण सांगतायत अपेक्षा पवार..
साल आठवत नाही , नाशिक वरून काही कामानिमित्त पंचवटी एक्सप्रेस ने मी आणि पप्पा CST ला उतरलेलो . तिथून टॅक्सी ने किताबखाना च्या दिशेने जात होतो . माझ्या political science च्या पुस्तकांची खरेदी करायची होती. पुणे युनिव्हर्सिटी च्या external – political science च्या पदवी अभ्यासक्रमासाठी preparation चालू होतं तेव्हा ची गोष्ट ….
मोर्चा आंदोलन आणि आझाद मैदान
तर टॅक्सी मधून जाताना तेच आपलं नेहमीच आझाद मैदान नजरेस पडलं ,
माझा जन्मं जरी मुंबईत झाला तरी कधीतरी मोठ्यापणी मुंबईत आल्यावर कुतूहलच वाटायचं .
CST स्टेशन वर ,रस्त्यावर ,आजूबाजूला ,वडापावच्या गाडीवर , छोटेखानी हॉटेलसमोर
लांबून लांबून आलेली काहीसा आदिवासी पेहराव असलेली बायका ,माणसं , मुले मला नजरेस पडली …
त्या सगळ्यांना न्याहाळताना सहज च हसून पप्पां ना प्रश्न केला.. इतके सगळे मोठाले प्रश्न जगात आहेत , भारतात आहेत ..
त्यांच्यावर चर्चा आणि निर्णय होत नाहीत आणि हे काय मूर्ख लोकं आपले दुःख मांडायला जीवाची वणवण करत चाललेत .? ?
पप्पांचा चेहरा तेव्हा रागाने बुलंद झाला होता ,तात्काळ टॅक्सी थांबून त्यांनी मला भर उन्हात खाली उतरवलं .
दलित पँथर चळवळीत काम करतानाचे पप्पांचा मोर्चा ,आंदोलन यातील सहभाग मला ठाऊक होता.
पण मला वाटलेलं पॅन्थर संपली तसा पप्पांचा दृष्टिकोण हि बदललेला असावा ह्या सगळ्याकडे बघण्याचा.
पण झालं भलतच माझ्या सकट संपूर्ण आझाद मैदान त्यांनी भर उन्हात पालथं घातलं.
प्रत्येक मोर्चा धारीच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत मी मैदान तुडवत होते.
Silence is Violence
घामाने भिजलेल्या अवस्थेत पप्पांनी मला नेहमी सारखं “गुलशन -ए- इराण” ला न नेता वडापाव च्या गाडीवर नेलं ,
२ वडापाव खाऊ घातले आणि पुस्तकांची खरेदी करून आम्ही पुन्हा पंचवटी एक्सप्रेस ची वाट बघत CST स्टेशन वर बसून होतो.
ह्या पूर्ण दिवसात पप्पा काहीही बोलले नाही माझ्याशी.
स्टेशन वर बसलो असताना अचानक म्हणाले ” Silence is Violence” ह्याचा मराठीत अर्थ सांगशील? मी म्हणाली ” मौन म्हणजे हिंसा ” .
ते बोलायला लागले…..एक सामान्य नागरिक म्हणून जर तुझ्यावर अन्याय झाला तर तू काय करशील ? शांत राहून कोणतीही प्रतिक्रिया न देणं किंवा आपली जबाबदारी झटकन कितपत योग्य आहे , आणि प्रतिक्रिया म्हणजे काय गं ? तुझ्या वर झालेल्या अन्यायाचा तू आवाज उठवला नाहीस तर तुझी काय किंमत आहे ह्या जगात ? होणाऱ्या अन्यायाला प्रतिकार करणं , विरोध दर्शवण , आवाज उठवणं ह्याची राजकारणी किंवा देश चालवणारी आणखी कोणी सनदी अधिकारी आपली दखल घेवो नाही घेवो , तुझा प्रतिकार , तुझा आवाज तुला अन्याया विरोधात लढण्याची जी ताकद देतो ना ते तू नाही नाकारू शकत ..
सिस्टिम विरोधात लढण्याचं स्वातंत्र्य
बाबासाहेब आपले आदर्श आहेत , त्यांनीही प्रतिक्रियात्मक कृती नसती केली तर तुला आज पोलिटिकल सायन्सचा अभ्यास करण्याची पुस्तक घेण्याची माझी लायकी नसती बघ .मोर्चा,आंदोलन यांचा end result काय ह्याचं उत्तर शोधण्याआधी,आझाद मैदानात आलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीची सामान्यांसारखी जगण्यासाठीची तळमळ नजरेत साठव. आपल्या जीवाची किंमत आहे , आपल्याला सिस्टिम विरोधात लढण्याचं स्वातंत्र्य आहे , आपण झोपलेल्या सरकार ला जागं करू शकतो हा त्यांच्यातला आत्मविश्वास बघ…
पप्पा हे सगळं सांगताना जेम्स अल्बरी चे एक वाक्य डोक्यात फिरत होत ” चंद्राच्या शीतल छायेत ज्याने निद्रा घेतली , सूर्यस्नानाचा आनंदही लुटला , हे करिन ते करिन म्हणत आयुष्य जगला आणि एक दिवस काही न करताच त्याचा ग्रंथ आटोपला”
सामान्यांना रोजच्या जीवनात साधं जगण्यासाठी लढा द्यायचा आहे त्यांना स्वस्थ बसून कस चालेल ?? हे त्या दिवशी डोक्यात शिरलं … मोर्चा आंदोलनांनी काही होत नसत असं म्हणणार्यांनी स्वतःच्या so called sophisticated life मधून बाहेर येऊन जरा आझाद मैदानाची चक्कर जरूर मारावी …. शिष्यवृत्ती अभियानाचा भाग म्हणून मी काही वर्षांनी त्याच आझाद मैदानात माईक हातात घेऊन होते हे आठवतंय … जास्त नाही पण छोट्या मोठया आंदोलनाचा भाग झालीये . तेव्हा मोर्च्या , आंदोलनाचा end result शोधण्याच्या ऐवजी मी मला शोधत गेले, माझ्यातल्या कधीही कोणताही अन्याय न झेलणाऱ्या “अपेक्षाला” भेटत गेले.
अपेक्षा पवार
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 17,2023 | 15:30 PM
WebTitle – Morcha Andolan questions in the life of common citizens – apeksha Pawar
Very well articulated.. Silence for violence 🔥🔥