1 आत्म्याला शांती मिळावी यासाठी सहा वर्षाच्या मुलाचा नरबळी, आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; सख्ख्या नातेवाईकांचा समावेश
कळंब तालुक्यातील डोळा पिंपळगाव येथील बहुचर्चित नरबळी प्रकरणात उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.कळंब तालुक्यातील पिंपळगावात २०१७ साली सहा वर्षीय कृष्णा इंगोले या चिमुकल्याचा नरबळी देण्यात आला होता. हे नरबळी प्रकरण राज्यात मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. या नरबळी प्रकरणात चिमुकल्याच्या सख्ख्या आत्यासह चुलता, चुलती, आजोबा आणि पुण्यातील एका मांत्रिकाला अटक करण्यात आली होती.
साडे तीन वर्षामध्ये उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयात विविध साक्ष, युक्तीवाद झाला. अखेर शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.जी देशपांडे यांनी निकाल दिला.आत्म्याला शांती मिळावी यासाठी रक्ताच्या नात्यातील मुलाचा नरबळी द्यावा लागेल असे पुणे येथील मांत्रीक आरोपी राहुल उर्फ लखन चुडावकर व सुवर्णा भाडके यांनी आरोपींना सल्ला दिला होता.घटनेच्या १५ दिवसांपूर्वी पिंपळगाव येथे येऊन आरोपीनी कट कारस्थान करुन कृष्णा याचा नरबळी देण्याची योजना आखली.
2 महिलांसाठी लोकल सुरू मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोनामुळे थांबलेलं जनजीवन पूर्ववत रुळावर येऊ लागलं आहे.लोकसेवाही हळूहळू पूर्वपदावर येवू लागली आहे.
सध्या महिलांसाठी लोकल सुरू झाली असून सकाळी ११ ते दुपारी ३
आणि सायंकाळी ७ ते रात्री १२ या वेळेत महिलाना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मात्र लोकल येईपर्यंत रेल्वे पोलिसांमुळे महिलांकड़ून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होताना दिसले.
मात्र लोकल येताच, याचे तीनतेरा वाजले. त्यातही सुरुवातीला कोरोनाचे कारण देत
काही महिलांनी चौथ्या सीटवर बसण्यास नकार दिला. मात्र काही महिलांनी कोरोना गेला.म्हणत वाद घालून चौथ्या सीटवर स्थान मिळवले.
3 “तुमच्यासमोर नतमस्तक होणार आणि काम दुसऱ्याचं करणार; जिथे जातात, तिथे खोटं बोलतात”
बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. केंद्रात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना बिहार मागे पडला. बिहारची 10 वर्षे वाया गेली, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. यानंतर राहुल गांधी यांनी प्रचार सभेतून मोदींवर पलटवार केला. विविध मुद्द्यांवरून पंतप्रधानांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.”तुमच्यासमोर नतमस्तक होणार आणि काम दुसऱ्याचं करणार; जिथे जातात, तिथे खोटं बोलतात” असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
नवादा जिल्ह्यातील हिसुआमध्ये राहुल गांधी व तेजस्वी यादव यांची संयुक्त बदलाव संकल्प रॅली झाली. या रॅलीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. “बिहारमधील जे सैनिक शहीद झाले, त्यांच्यासमोर पंतप्रधान नतमस्तक होत आहेत. संपूर्ण देश शहिदांसमोर नतमस्तक होतो. प्रश्न नतमस्तक होण्याचा नाही. जेव्हा बिहारमधील जवान शहीद झाले, त्या दिवशी पंतप्रधान काय म्हणाले हा प्रश्न आहे” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
4 अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना १० हजार कोटींची मदत; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा
पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबद्दलची घोषणा केली आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीनं वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. तसंच राज्याचे केंद्राकडे ३८ हजार कोटी थकीत असून केंद्रानं अजूनही ही रक्कम दिली नसल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल परब उपस्थित होते.
5 कोरोनाच्या नावाखाली देशात फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. शिवसेनेचा हल्लाबोल
कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडाला त्यानंतर जगाने कोरोनाच्या विषाणूना अटकाव करण्यासाठी लस शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.जगभरात कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे. भारतातही लसीवर संशोधन सुरू आहे.यातच बिहार राज्यात निवडणूका लागल्या आहेत.या निवडणुकात भाजपच्या जाहीरनाम्यात कोरोना लस बिहारला मोफत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.यावरून देशात सर्वच स्तरात भाजपवर टीका होत असून विरोधी पक्षाने देखिल भाजपवर निशाणा साधला आहे.
याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात की,
ज्यांनी भाजपाला मतदान केले नाही त्यांना कोरोनाची लस मोफत मिळणार नाही का?
यापूर्वी जातीधर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात होता,
आता कोरोनाच्या नावाखाली देशात फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे.
जिथं निवडणूक तिथेच लस देणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
6 50 हजारची लाच घेतल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यास अटक
पोलिसांचं काम हे रक्षण करणं हे आहे. मात्र जर पोलिसानेच सहआरोपी बनवतो असा धाक दाखवून पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.संतोष रामदास पाटे असं त्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. औरंगाबादमधल्या सिटीचौक पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी सिटीचौक पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्या बाबत तक्रारदार यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.
सदर गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी फौजदार पाटे यांनी 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला व 50 हजार रुपयांची मागणी करताना व ती स्वीकारल्याचे निष्पन्न होताच पथकाने छापा मारून स्वीकारलेली लाचेची रक्कम जप्त केली. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनीच अशा प्रकारची लाच मागितल्यामुळे कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पोलीस धाक आणि धमकी देऊन असे प्रकार करत असतील तर काय धाक राहणार असा प्रश्न विचारला जात आहे.
7 Online परीक्षेचा गोंधळ, युवासेनेचा राडा; कुलगुरूंच्या ऑफिसची तोडफोड
कोरोनाचा संकट काळात त्रासलेल्या विद्यार्थ्यांना Online परीक्षेत आलेल्या अडचणींमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे युवसेनाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या ऑफिसमध्ये राडा केला. कुलगुरूंची खुर्ची आणि इतर सामानांचीही तोडफोड केली त्यामुळे विद्यापीठात एकच गोंधळ उडाला.अमरावती विद्यापीठात ऑनलाईन परीक्षेचा पुरता गोंधळ उडालेला आहे विद्यापीठाला तिसऱ्यांदा परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहे. विद्यापीठाच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तीव्र संताप आहे.
विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी प्रो मार्क या गुणवत्ता नसलेल्या कंपनीसोबत हातमिळवणी करून ऑनलाइन परीक्षेचा कंत्राट दिलं असा आरोप होत आहे. या कंपनीची क्षमता नसल्याने विद्यापीठ प्रशासन तोंडघशी पडलं व विद्यार्थ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याचा जाब विचारायला गेलेल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या खुर्चीची व दालनाची तोडफोड केली तसेच कुलगुरूंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
8 दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले तर FIR दाखल होऊ शकतो
दसऱ्याच्या (Dussehra) दिवशी रावणाचा पुतळा जाळला तर तुमच्यावर एफआयआर (FIR) दाखल होऊ शकतो. जर एफआयआरनंतर पोलिसांनी कोणती कारवाई केली नाही तर हे प्रकरण कोर्टातही जाऊ शकतं असे वकील ओमवीर सारस्वत यांचे म्हणने आहे.रावण महाराज यांचा पुतळा जाळल्यामुळे आमची आस्था दुखावली जाते.आम्ही रावणाची (Ravan) पूजा करतो. सदर वकील मथुरा येथे राहणारे असून ते म्हणाले की आम्ही रावण महाराजांच्या गोत्रातून आहोत. या आस्थेमुळे आम्ही त्यांची पूजा करतो. ते एक महान ज्ञानी आणि तपस्वी होते. मात्र काही लोक कुप्रथेमुळे प्रत्येक वर्षी रावण महाराजांचा पुतळा दहन करतात. मात्र पुतळा दहन केल्यामुळे काय होतं? आणि यामागे काय कारण आहे? लोकांना असं काही विचारल्यास त्यांच्याकडे काही उत्तर नसतं. यासाठी आम्ही एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
9 त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन; एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा
एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
पक्षप्रवेशानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपा नेतृत्वावर हल्लाबोल केला.
आतापर्यंत केलेल्या आरोपांचा पुर्नरुच्चार करत खडसे यांनी भाजपाला इशारा दिला.
“ज्यावेळी मी राष्ट्रवादी प्रवेश करण्यासंदर्भात पक्षातील नेत्यांशी चर्चा करत होतो.तेव्हा एकदा जयंत पाटील यांच्यासोबत एकदा बोलत होतो. तेव्हा जयंत पाटील मला म्हणाले की, ‘तुम्हाला राष्ट्रवादी यायचं आहे. पण त्यांनी तुमच्यामागे ईडी लावली तर काय?’ जयंत पाटलांना मी म्हणालो त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन,” असं सांगत खडसे यांनी गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला.
10 कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या पुनर्विचारासाठीचं विधेयक पाकिस्तानच्या संसदेत मंजूर
हेरगिरी व दहशतवादी कृत्ये केल्याच्या आरोपावरून देहदंडाची शिक्षा झालेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या पुनर्विचारासाठीचं पाकिस्तानच्या संसदेत एक महत्वाचे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. भारताच्या प्रयत्नांसाठी हे मोठं यश असल्याचं मानलं जात आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. पाकिस्तान नॅशनल असेंब्लीच्या कायदा व न्यायविषयक स्थायी समितीने लष्कराच्या कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या भारतीय नागरिक असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेबद्दल फेरविचार करण्यासाठी विधेयक मंजूर केले आहे.इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (समिक्षा आणि पुनर्विचार) अध्यादेश, असं या विधेयकाचे नाव आहे.
या विधेयकाला पाकिस्तानच्या संसदेत (नॅशनल असेंब्ली) विरोधकांचा मोठा विरोध असतानाही कायदा आणि न्यायसंबंधी स्थायी समितीने चर्चा करुन विधेयकाला मंजुरी दिली आहे. या समितीच्या चर्चेत भाग घेताना पाकिस्तानचे न्याय आणि कायदा मंत्री फरोग नसीम “हे विधेयक आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी आणण्यात आले आहे. जर या विधेयकाला नॅशनल असेंब्लीमध्ये मंजुरी मिळाली नसती तर पाकिस्तानला आंतराराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाचे पालन न करण्याबद्दल प्रतिबंधांचा सामना करावा लागला असता असे म्हणाले.
Jaaglyabharat.com brought to you world wide news updates
News produced by Team Jaaglya भारत
jaaglyabharat.com
===========================================
Jaaglya_Top_10 नियमित अपडेट्स साठी
या लिंकवर क्लिक करून आपलं हक्काचं जागल्याभारत हे फेसबुक पेज लाईक करा,फॉलो करा, सी फर्स्ट करा
ताज्या घडामोडींसाठी jaaglyabharat.com हा ग्रुप जाईन करा
===========================================
News date 23 – OCT-2020
Team Jaaglyabharat