दरवर्षी मनु:स्मृती दहन दिन साजरा करण्यात अर्थ नाही. त्यामुळे या विषयावर कधी लिहीले नाही. आंबेडकरी चळवळीने घटनांच्या मागचे हेतू लक्षात घेण्याची गरज आहे.चवदार तळे ते मनु:स्मृती दहन या सलग घटनाक्रमाची माहिती घेतानाच त्या काळात घडणा-या घडणा-या राजकीय घडामोडी जर ध्यानात घेतल्या नाहीत तर मनु:स्मृती दहनाचा कार्यक्रम का झाला हे लक्षात येत नाही.
बाबासाहेबांची या दोन्ही आंदोलने दूरगामी परिणाम घडवून आणणारी ठरली.
मार्च १९२७ ते २५ डिसेंबर १९२७ अशा या घटना घडल्या.त्यानंतर बाबासाहेबांनी मनु:स्मृती दहन दिनाचा वाढदिवस केल्याचे ऐकिवात नाही.
आंदोलन काय असते ?
महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली ती त्यांना मीठ मिळत नव्हते म्हणून काढली असेल का ?
मिठावर कर बसवला तरी देखील सामान्य माणसाला फारसा फरक पडला नसता.
कारण आपण जेवणात मीठ मिठापुरतंच वापरतो.त्यावर कर बसवल्याने तो जाणवला देखील नसता.
तरी देखील मिठाचे आपल्या संस्कृतीतले महत्व अनन्यसाधारण आहे.
खाल्ल्या मिठाला जागणे, ज्या घरचे मीठ खाल्ले त्या घराशी इमान राखणे असे अनेक वाकप्रचार मिठाचे महत्व सांगतात.
त्यामुळेच परकीय सत्तेच्या विरोधात असंतोषासाठी गांधीजींनी मिठाचा उपयोग करून घेतला.यामागे गांधीजींचे वकिली डोकं होतं.लोकांची नाडी ओळखल्याचं ते चिन्ह होतं.
त्यांचा हा फासा अचूक पडला आणि गांधीजींच्या मागे सर्वसाधारण जनता देखील मिठाच्या सत्याग्रहात उतरली.
त्या आधी कॉंग्रेस ही निव्वळ उच्चवर्णियांची होती.
कॉंग्रेसच्या ब्रिटीश राजवटीच्या विरोधातल्या आंदोलनात इथले अलुतेदार बलुतेदार किंवा एससी एसटी ओबीसी उतरायला तयार नव्हते.
भारतात शासक बदलले तरीही या जनतेला त्याचा फरक पडत नव्हता.ब्रिटीश आल्यानेही पडत नव्हता.
उलट ब्रिटीशांचे राज्य चांगले होते हे सांगणारे म्हातारे ९० च्या दशकापर्यंत शिल्लक होते.
अनेकांनी ऐकलेही असेल त्यांच्या तोंडून.
यामुळेच टिळकांनी मुस्लिमांशी लखनौ करार करून मुस्लिमांना कॉंग्रेसमधे आणण्य़ाचा प्रयत्न केला.
त्यासाठी मुस्लिमांना त्यांच्या संख्येपेक्षा जास्त प्रतिनिधित्व कॉंग्रेसने लखनौ करारात दिले.
भारतात ज्या ज्या जमातींनी राज्य केले त्यात पेशवे (ब्राह्मण),जमीनदार (क्षत्रिय) आणि मुसलमान
हेच शिल्लक असल्याने त्यांना परकियांचे राज्य खटकत होते तसे सामान्य जनतेला ते खटकत नव्हते.
१८५७ चे बंड देखील याच जातीजमातींनी केले.
ते त्यांच्याकडच्या शिल्लक सैन्याच्या जोरावर लढले पण त्यातही सर्वसामान्य जनतेचा म्हणावा असा सहभाग नसल्याने फसले.ते आंदोलनात रूपांतरीत झाले नाही.
बनिया हा घटक कोणत्याही राजवटीशी जुळवून घेणारा असतो.मात्र ब्रिटीश हे देखील व्यापारीच होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर भारतातल्या बनियांचा (वैश्यांचा) व्यापार ताब्यात घेतला.
बंगालमधे जमीनदारांना स्वातंत्र्य देताना कर लादले.दक्षिणेतही ब्रिटीशांनी जमीनदारांवर कर लादले.
या काळात महाराष्ट्रात पेशवे राज्य करत होते.पेशव्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या भागात ब्रिटीशांचे कर नव्हते.
त्यामुळे या भागातले जमीनदार ब्रिटीशांच्या विरोधात नव्हते.उलट पेशव्यांनी ब्रिटीशांची मदत घेऊन दक्षिणेतल्या टिपू सुलतानाचे अस्तित्व संपुष्टात आणले.
टीपूच्या नंतर मात्र ब्रिटीशांनी पेशव्यांच्या विरोधात मोहीम उघडली आणि पेशव्यांना तह करायला भाग पाडले. १८१८ च्या लढाईचे महत्व त्यासाठीच आहे.
हा सगळा पट महत्वाचा आहे. या सर्व घडामोडींमुळे शासक जातींना ब्रिटीश सत्ता परकीय वाटत होती.
पण शासक जातींच्या गुलामांना फरक पडत नव्हता.
गांधीजींनी सर्वप्रथम सर्वसामान्यासारखा वेष परिधान करून त्याच्याशी आपली नाळ जोडली.
आणि त्याच्याशी भावनिक रित्या कनेक्ट होत मिठाच्या विषयावर सत्याग्रह छेडला.
परिणामी गांधीजींना ब्रिटीशांच्या विरोधात जनआंदोलन उभे करता आले.बघता बघता एक कोटीच्या आसपास लोक या सत्याग्रहाशी या ना त्या प्रकारे कनेक्ट झाले.हा ब्रिटीश सत्तेला बसलेला मोठा हादरा होय.
चवदार तळ्याचे आंदोलन किंवा मनुस्मृती कडे या चष्म्यातून पहायला हवे.गांधीजी मोठे नेते बनून बसले होते. ब्रिटीशांनी देखील त्यांना रेकग्निशन दिले होते.इतके की गांधीजींच्या विरोधात गेले तर ते या एक करोड जनतेला आंदोलन करायला भाग पाडतील ही भीती ब्रिटीशांना होती. भारताची लोकसंख्या त्या काळी फार तर ३५ ते ४० कोटी असेल.
मात्र गांधीजींचे आंदोलन हे उच्चवर्णियांचे सत्तेसाठीचे आंदोलन आहे. आम्हाला ब्रिटीश जाऊन एतद्देशीय उच्चवर्णिय आल्याने काही एक फरक पडणारा नाही, उलट आमचे हाल कुत्रे खाणार नाही हे बाबासाहेब सांगत होते.त्यामुळे गांधीजी हे एकटेच भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करत नाहीत.
भारतीय जनता एकसंध नसून त्यात वेगवेगळी राष्ट्रे आहेत हे प्रतिपादन बाबासाहेब करत होते.मात्र गांधीजी बाबासाहेबांना अस्पृश्य़ांचा नेता म्हणून मान्यता द्यायला तयार नव्हते.
बाबासाहेबांना शाहू महाराजांनी अस्पृश्यांचे नेते म्हणून माणगाव परीषदेत मान्यता दिली.
शाहू महाराजांचे लोकमान्य टिळकांशी धार्मिक सत्तेवरून खटके उडत होते.शाहू सुधारणावादी होते. तेव्हांपासून कॉंग्रेस त्यांच्या विरोधात होती.
छत्रपतींनी मान्यता दिली तरी गांधीजी मान्यता देत नव्हते.ब्रिटीशांना गांधीजी मीच अस्पृश्यांचा एकमेव नेता आहे असे सांगत होते.
ब्रिटीश बाबासाहेबांना तसे सांगत होते.त्यामुळे आम्ही तुमचे निवेदन स्विकारू शकत नाही असे त्यांनी सांगितले होते.यावर अस्पृश्य हिंदू नाहीत,गांधीजी हिंदूंचे नेते आहेत असे बाबासाहेब म्हणत होते.
ही गोष्ट सिद्ध करण्यासाठीच नाशिकच्या काळाराम मंदीराचा सत्याग्रह, चवदार तळ्य़ाचा सत्याग्रह आणि मनुस्मृती जाळण्याचे आंदोलन या घडामोडी बाबासाहेबांनी घडवून आणल्या.
याचा परिणाम असा झाला की अस्पृश्य हे सांस्कृतिक, धार्मिक आणि सर्वच दृष्ट्या हिंदू समाजाचे अंग नाहीत हे ब्रिटीशांना समजले.न्यायालयात चवदार तळ्याचा खटला गेल्याने त्याला कायदेशीर स्वरूप आले.
बाबासाहेबांनी अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार नाही हे सिद्ध केले.तसेच अस्पृश्यांनाही ज्या देवाला तुम्ही पूजता तो देव तुम्हाला देवळात येऊन दर्शन घेऊ देत नाही.तुमचे रक्षण करू शकत नाही तर तो देव तुमचा कसा या मानसिकतेकडे झुकवले.
हे अगदी मिठाच्या सत्याग्रहाप्रमाणेच झाले.जनावरांना पाणी पिऊ दिले जाते त्या तळ्यात अस्पृश्य़ांना पाणी पिऊ दिले जात नाही या अन्यायाला सामूहिकरित्या वाचा फोडली.
पाणी प्यायला आलेल्या माणसांवर दगडफेक करून स्पृश्य हिंदूंनी बाबासाहेबांचा क्लेम पक्का केला.
त्याच वेळी सुरेंद्रनाथ टिपणीस यांच्या पत्नी आणि जी एन सहस्रबुद्धे यांच्या पत्नी यांनी महार स्त्रियांना त्या सत्याग्रहादरम्यान स्पृश्य हिंदूंप्रमाणे साडी नेसवली. त्या आधी अस्पृश्य स्त्रियांना संपूर्ण अंगभर साडी नेसण्य़ाचा अधिकार नव्हता.
या सर्व घटनांमुळे मानवमुक्तीच्या आंदोलनाला झळाळी आली. तसेच केवळ राजसत्तेसाठी चाललेल्या कॉंग्रेसच्या आंदोलनामधील उणिवा स्पष्ट केल्या.
मनुस्मृती हे हिंदूंचे धर्मग्रंथ आहेत. बाबासाहेबांनी यात अस्पृश्यांच्या विरोधात कायदे असल्याने आम्ही ते जाळत आहोत असे सांगितले. त्याला विरोध होण्याचे कारणच नव्हते.मात्र गांधीजींनी त्य़ास विरोध केला. मी अस्पृश्य़ांचा नेता आहे पण मनुस्मृतीचा समर्थकही आहे असे गांधीजी म्हणाले. गुजराती पेपरमधे गांधीजी उघडपणे मनुस्मृतीचे समर्थन करत. त्यावर विचारल्यावर गांधीजी म्हणाले की आक्षेप असेल तो भाग काढावा पण मनुस्मृती रद्द करू नये.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच गोष्टींसाठी गांधीजींचे नाव घेतो. समरसता हीच आहे. यासाठीच संघ म्हणतो की गांधीजींचे आक्षेपार्ह विचार वगळून त्यांना स्विकारता येऊ शकते. गांधीजींच्या या दृष्टीकोणासाठी गांधीजी त्यांना प्रात:स्मरणीय आहेत. तर थॉट्स ऑन पाकिस्तान मधल्या हिंदू भाग वगळून मुस्लिमांवर असलेल्या भाष्यामुळे बाबासाहेब त्यांना हवे आहेत. तेव्हढेच हवेत.
सध्य़ा सरकार देखील शेतक-यांना तिन्ही कायद्यातले आक्षेप वगळून सुधारणा आणूयात असे म्हणतेय. पण शेतकरी म्हणतात की पहिल्यांदा हे काळे कायदे रद्द करा मगच नव्या कायद्यांसंदर्भात चर्चा होऊ शकेल. शेतक-यांचे हे आंदोलन या कायद्यांमुळे उभे राहू शकले ते उन्मत्त होत चाललेल्या मोदींच्या मनमानी कारभाराला वेसण घालण्यासाठीच. ते जनआंदोलनात बघता बघता रूपांतरीत होऊ शकते.
बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली हा मोठा आवाज करण्याचा डाव होता. त्यामुळे लक्ष वेधून घेता येते. तो आवाज अचूक असायला हवा.
मनुस्मृती जाळल्याने अस्पृश्य हे हिंदू समाजाचा भाग नाहीत हे ब्रिटीशांना कायदेशीररित्या,सांस्कृतिक आणि धार्मिक रित्याही लक्षात आले.
कोणताच धर्मग्रंथ आपल्या धर्माच्या अनुयायांविरोधात कायदे करत नाही.ना बायबल,ना कुराण ना झेंद अवेस्ता ना शिखांचा गुरू ग्रंथ साहिब.
मनुस्मृती जाळणे ही तत्कालीन महत्वाची घटना होती. आपल्याला तिचे महत्व समजलेले नाही.आपण तो इतिहास नीट समजून घेत नाही. आपण या घटनेचं कर्मकांडात रूपांतर केले.मनु:स्मृती दहन दिन सुरू केला.
वास्तविक बाबासाहेबांनी तत्कालीन परिस्थितीत ज्या पद्धतीने आपल्याला अनुकूल हवा करून घेण्य़ासाठी कल्पक आंदोलने उभारली त्याप्रमाणे आपण काय करावे यावर चर्चाच होत नाही.आपण फक्त बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या घटनांकडे दैवी घटना म्हणून पाहतो आणि त्याच कर्मकांडात रूपांतर करतो.त्यामुळे त्यातले गांभीर्यच नष्ट होते. मानवंदना देणे वेगळे.त्यासाठी त्य़ा इतिहासाचे वाचन आणि त्याचे आकलन करणे हे सुद्धा महत्वाचे झाले असते. भीमा कोरेगावला मानवंदना देताना आपण तलवारी घेऊन कापाकापी करत सुटत नाही. दरवर्षी मानवंदना दिल्याने त्या इतिहासाला उजाळा मिळाला.आज इतिहासात ही दडपलेली घटना पटलावर आली.
दर वर्षी मनुस्मृती जाळल्याने किंवा मनु:स्मृती दहन दिन साजरा केल्याने काय होते नेमके ?आपल्याला आंदोलनाचे महत्व,आंदोलनाचे डिझाईन त्याचा इंपॅक्ट हे शास्त्रच मुळातून समजलेले नाही.
त्याचा विचार या निमित्ताने व्हावा ही अपेक्षा.तरच आपण आंदोलनातून मोठे ध्येय गाठू शकू.
लेखन – किरण चव्हाण
(लेखक आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक विश्लेषक आहेत)
हे ही वाचा..डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत तरुण वर्ग – अपेक्षा आणि वास्तव
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 25 , 2020 06 : 53 AM
WebTitle – Manusmriti-burning-day & The Ambedkarite movement