मुंबई- सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी आता आपली नाराजी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवली आहे. अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्यामुळे नाराज झालेले परमबीर सिंग हे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचं समजते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. १०० कोटी च्या हप्तेबाजीवर अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण दिले आहे.
यामध्ये “गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं”, असा गंभीर आरोप केल्यामुळे या प्रकरणावरून आता राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता प्रतिक्रिया दिली असून “कायदेशीर कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी परमबीर सिंग यांनी हा आरोप केला”, असं ट्वीट अनिल देशमुख यांनी केलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेलं तीन पानी पत्रात धक्कादायक माहिती उघड केली असून त्यामध्ये अनेक मुद्दे परमबीर सिंग यांनी मांडले आहे.
“गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गेल्या काही महिन्यांत सचिन वाझे यांना अनेकदा त्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वर बंगल्यावर बोलावलं होतं.
यावेळी त्यांनी सचिन वाझे यांना फंड जमा करण्यासाठी मदत करण्याचे आदेश देण्यात आले होते.
साधारणपणे फेब्रुवारीमध्ये आणि त्यानंतर सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी त्यांच्या घरी बोलावलं असं या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यावेळी गृहमंत्र्यांचे पर्सनल सेक्रेटरी पाळंदे आणि इतर काही कर्मचारी देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितलं की त्यांना महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट होतं. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबईत साधारणपणे १७५० बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनं आहेत. जर त्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये जमा झाले, तर महिन्याला ४० ते ५० कोटी जमा होतील. उरलेले पैसे इतर मार्गांनी जमा करता येतील,असं गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितलं होतं”, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.
काय आहेत पत्रातील मुद्दे?
मार्च महिन्याच्या मध्यात वर्षा बंगल्यावर मी तुमची भेट घेतली. त्या ठिकाणी अँटिलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो.
त्याचवेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दल तुम्हाला कल्पना दिली.
इतकंच नाही तर अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चुकीच्या कृतीबद्दलही माहिती दिली.
परंतु त्या ठिकाणी असलेल्या अन्य मंत्र्यांना याची पूर्वीपासूनच कल्पना असल्याचं निदर्शनास आल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं.
फडणवीस यांची प्रेस कॉन्फरन्स घेऊन राजीनामा देण्याची मागणी
फडणवीस म्हणाले,“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र हे केवळ खळबळजनक नाही, हे धक्कादायक अशाप्रकारचं पत्र आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात डीजी रँकच्या अधिकाऱ्याने इतक्या खुलेपणे गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचं पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पत्रात त्यांनी एक चॅट जोडली आहे, हा थेट पुरावाच दिसतो आहे की ज्यामधून अशाप्रकरे पैशांची मागणी झाली आहे. त्यामुळे एकुणच हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ”
“ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या पोलीस विभागात वेगवेगळ्या प्रकारचे प्रकरणं उघडकीस येत आहेत. यामधून पोलीस दलाचं खच्चीकरण होताना आपल्याला दिसत आहे. आज ही घटना म्हणजे याचा कळस आहे. दुर्देवाने इतक्या वाईट प्रकारे, ही सर्व परिस्थिती समोर आल्यानंतर, आमचं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की आता या परिस्थितीत गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत. गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे.
ही चौकशी केंद्रीय यंत्रणांकडून केली पाहिजे, त्यांना केंद्रीय यंत्रणा मान्य नसतील या ठिकाणी कोर्ट मॉनिटर अशाप्रकारची चौकशी झाली पाहिजे. पण जो पर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होत नाही, तोपर्यंत हा सगळा जो विषय आहे. हा महाराष्ट्राची मान खाली घालणारा आहे. महाराष्ट्र पोलीस दल, मुंबई पोलीस दल, ज्याचं एवढं नाव आहे. त्या पोलीस दलाला एकप्रकारे बदनाम करणारा हा सगळा प्रकार आहे. म्हणून आमची मागणी आहे, याला गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि यातलं तथ्य बाहेर येईपर्यंत गृहमंत्री जर आपल्या पदावर राहिले, तर याची चौकशी कशी होऊ शकेल? हा कुणी साधारण व्यक्तीने केलेला आरोप नाही, म्हणून आम्हाला असं वाटतं की याप्रकऱणी तत्काळ कडक कारवाई झाली पाहिजे. ” असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.
अनिल देशमुख यांचे आरोपावर स्पष्टीकरण
हा खोटा आरोप असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी
सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार
असल्याची शक्यता तपासातून होत असताना,परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी
तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.
या प्रकरणाने महाराष्ट्रासह देशभरातील राजकारणात खळबळ माजली असून सोशल मिडियात सुद्धा उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे.
मातंग समाज अन तरुणांच्या अधोगतीला जबाबदार कोण?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 20, 2021 20:30 PM
WebTitle – serious allegations made by parambir singh against the home minister Anil deshmukh