अलिकडे ओरड असते की पुस्तके वाचली जात नाहीत,सगळं डिजिटल होत असताना लोकांची छापील मजकूर वाचण्याची सवय सुटत चाललीय.त्यात काही अंशी तथ्यही आहे.मात्र सुधीर जाधव यांचे कामाठीपुरा सारखी काही पुस्तकं वाचकांना आपल्याकडे खेचायला यशस्वी झालेली दिसतात.त्यामुळेच अल्पवधीतच दुसरी आवृत्ती निघून कामाठीपुरा ही कादंबरी यशस्वी घोडदौड करत आहे, कामाठीपुरा हे नाव मुंबईतील नागरिकांना परिचित आहे.
मुंबई टाऊन असो की उपनगर कामाठीपुरा हे नाव कधीतरी कानावर पडलेलं असणारच
अन महाराष्ट्र पक्षी देशात सुद्धा हे नाव तसं अनोळखी नाहीच,
जसं आपण कधीही गेलो नसलो तरी बँकॉक थायलंडची ख्याती आपल्याला ऐकून माहितच असते.तसेच हे कामाठीपुरा.
पण कित्येकांचं केवळ दुरून डोंगर साजरे. त्याला अनेक वाजवी कारणं,पापभीरू व्हाईटकॉलर समाज.
सभ्य व्यक्तीने या एरियात देखील फिरकू नये अशी ख्याती असणारं हे ठिकाण.
पण जर आपल्याला इथं न जाताही तिथल्या अधोविश्वातील एकूण एक कोपरा अनुभवता आला तर?
नाही म्हणायला जुनी मुंबई अन त्यातील चित्रित झालेल्या काही अंशी रेडलाईट एरियाची दखल घेत
रुपेरी पडद्यावर स्थान देणाऱ्या ’प्यासा’ (गुरुदत्त) ..‘चमेली’ (करीना कपूर), ते ‘गंगुबाई काठियावाडी’ (आलिया भट) पर्यंत
आपला त्याच्याशी जुजबी परिचय झालेला आहे.चित्रपटाचा आवाका मर्यादित असतो,
त्यामुळे सगळ्याच गोष्टी त्यात येत नाहीत,कामाठीपुरा ती उणीव भरून काढणारी कादंबरी आहे.
कामाठीपुरा कादंबरी ही समांतर जगातील माणसांची गोष्ट.या कादंबरीचा नायक चिनू असला तरी तो नायक नाही,कारण कादंबरीत अनेक पात्रं येत राहतात,त्या प्रत्येक पात्राची एक गोष्ट आहे.पात्रांचे महत्व अधोरेखित करणारा इतिहास भूतकाळ एकूणच कामाठीपुऱ्यातच घडणाऱ्या जीवन संघर्ष मांडणी कथानकामुळे ‘कामाठीपुरा’हाच या कथेचा नायक आहे. भाषासौष्ठव जपतानाच मुंबापुरीची वेगळी भाषाशैली यात प्रसंगानुरूप येत राहते.लेखक सुधीर जाधव यांनी यातील प्रत्येक पात्राला न्याय देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे.
सृजन प्रकाशनाच्या या कादंबरीचे मुखपृष्ठ मिनल माळी योगेश माळी यांनी उत्तम केले असून,कामाठीपुऱ्यातील जुन्या चाळी,पिनकोड दर्शविणारा फलक,लोकांची वर्दळ,कष्टकरी कामगार वर्ग,अशा बारीक सारिक तपशीलासह आतल्या तीन पानात चितारलेली चित्रं त्यावेळची मुंबई,कामाठीपुराची एक प्रतिमा आपल्यासमोर उभी करतात.ही चित्रमय शैली तुम्हाला कामाठीपुऱ्यात प्रवेश करायला मदत करते. ”इंटीस को इंटीधरीच घुंन्टूसाडू क्या?” या प्रश्नार्थक वाक्यानेच पहिल्या प्रकरणाची सुरुवात होते,अन हे काहीतरी वेगळच प्रकरण असल्याची कल्पना वाचकांना येते.
याच परिसरात जन्मलेल्या लेखक (चिनू) सुधीर जाधवांनी सुरुवातीला जुजबी ओळख करून देत कामाठीपुरा त्याचं स्थान,भौगोलिक रचना, कादंबरीतील पात्रांची प्रसंगानुरूप ओळख करत देत सर्व इतिहास भूगोल जीव ओतून चितारला आहे.पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठा कविता संग्रहात कामाठीपुऱ्यातील घटकांचा तिथल्या उपेक्षित वर्गाचा दु:ख शोषण रोगराई इत्यादींचा ओघवता उल्लेख येतो,त्याची आठवण कामाठीपुरा वाचताना येते.कादंबरीत मात्र हे सगळं अगदी सविस्तरपणे आलेलं आहे.अलिखित समाजमान्य संभोगाची बजबपुरी माजलेल्या दलदलीतून उबग येऊन शेवटी बाहेर पडू पाहणारी लक्ष्मीअक्का इतर दुर्गा,परमेश्वरी,त्यासाठी किंमत मोजणाऱ्या पात्रांची गोष्ट,पळवून आणलेल्या मुलीला सुखरूप पोहोचवणारे भाईगीरी करणारे शांत्यादा,पासकिन मामा,लट्या,नितीन काण्या,चिनू हे केवळ राडेबाजी करणारे नव्हते.तर कमजोर,गरिबांचे तारणहार,मुलींना छेडणारे,अपमान करणारे,दंगलीत घर जाळणाऱ्या जमावाशी भिडणारे रमेश जावडेकरसाठी माफियांशी पंगा घेणारे रॉबिनहुड अशा जीवन दर्शन घडविणाऱ्या कादंबरीने वाचक अंतर्मुख होत जातो.
कुंटणखाण्यात विकलेल्या एका मुलीची सोडवणूक करताना अन नंतर गुंडांनी त्यामुळे केलेला हल्ला हे प्रकरण एखाद्या चित्रपटातील अस्सल सीनचा आभास निर्माण करणारं आहे.ते इतकं उत्कट आहे की या घटनेत तुम्ही सुद्धा त्या घटनेचा नकळत एक भाग होता,अन हे सगळं तुमच्या आजूबाजूलाच घडत असल्याचा तुम्हाला फील येतो,अर्थातच लेखक सुधीर जाधवांची लेखन शैली अन शब्दांची ताकद यामुळे हे सगळं जीवंत चित्रं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं.सुधीर जाधवांची कामाठीपुरा ही चित्रपट किंवा अलिकडे सुरू झालेल्या वेबसिरीजसाठी एक उत्तम कथा आहे.प्रेम,विरह,लैंगिकता,गॅंगवार,अंमली पदार्थ तस्करी, माफिया,दंगलीतील राडे,सर्वधर्मीय भाईचारा,पोलिस कोठडीतलं आणखी वेगळं विश्व, दोस्तीसाठी कायपण..मरायला मारायला तयार असणारी दोस्तांची गॅंग,अलिकडे ग्लॅमरप्राप्त झालेली दही हंडी असा सगळा दारुगोळा यात ठासून भरलेला आहे.
सुधीर जाधवांनी नाटकांमध्ये काम केलेलं आहे. जाहिरात क्षेत्रात काम केलेलं आहे,त्यामुळे कलाक्षेत्र त्यांना नवं नाही,
त्यामुळेच प्रत्येक प्रसंग प्रत्येक घटना त्याचं नेपथ्य अगदी बारीकसारिक तपशीलासह सुधीर जाधवांनी
आपल्या कादंबरीत आणल्यामुळे पटकथा लिहिणाऱ्यांना फार कमी काम ठेवलेलं आहे.
असा हा एक लाईफटाइम अनुभव आहे,तो चोखंदळ वाचकांनी चुकवला नाही पाहिजे.
माणसांचे स्वभावधर्म आयुष्य जगण्याची धडपड, संघर्ष,सेक्स,शोषण, फसवणूक, दु:ख,एकतर्फी प्रेम,अधुरी प्रेमकथा,ओढवलेल्या प्रसंगात भिडण्याची वृत्ती,राजकारण माफियाराज,आत्मसन्मान,प्रतीशोध अशा विविध स्तरातील आशयसूत्रात बांधलेली वेगळं भावजीवन चित्रित करणारी ही २५२ पानांची कादंबरी एकूणच वाचकांच्या अभिरुचीला समृद्ध करणारी एक सशक्त कादंबरी ठरलीय.
कामाठीपुरा
– लेखक – सुधीर जाधव
- किंमत – ३०० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 7738009654
‘स्थलांतर ते स्थित्यंतर’ आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील सोनेरी पान पुस्तक प्रकाशित
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 25,2023 | 13:00 PM
WebTitle – kamathipura sudhir jadhav