जीर्णमतवादी यांचा विरोध प्रचंड वाढू लागला होता. त्या विरोधाला न जुमानता जवाहरलाल नेहरू हिंदू कोड बिल मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करू लागले होते. काँग्रेस पार्लमेंटरी ची बैठक 7-9 -1951साली दिल्लीत झाली.त्या बैठकीला जवाहरलाल नेहरू हजर होते .त्यावेळी जवाहलाल नेहरू यांनी असे म्हटले होते की “हिंदू कोड बिल हे पुढील निवडणुकीच्या आत मंजूर झालेच पाहिजे त्याबद्दल दिरंगाई होता कामा नये हे बिल मंजूर करून घेण्यासाठी सरकार बांधील आहे “.
या बिलामध्ये घटस्फोट आणि एकपत्नीव्रत ही कलमे वेगवेगळी मतभिन्नता निर्माण करण्यास कारणीभूत झाली होती.त्यावर चर्चा करून विरोधकांच्या मतांना मान देण्याची तयारी बाबासाहेबांनी दाखवली होती. कसेही करून बिल मंजूर व्हावे हा बाबासाहेबांचा हेतू होता. काँग्रेस पार्लमेंटरीची बैठक पुन्हा 13 सप्टेंबर 1951 ला झाली.तेव्हाच्या लोकसभेच्या चालू अधिवेशनात बिलाची विवाह आणि घटस्फोट कलमे मंजूर करून घ्यावीत तसेच वारसा हक्क आणि इतर विवादात्मक कलमे वेळ मिळाल्यास चालू अधिवेशनात अगर त्यानंतरच या अधिवेशनात मंजूर करावीत असे ठरले.
करपात्री महाराज
हिंदू कोड बिलाचे कलम 2 नुसार यात निरनिराळ्या विषयाची क्षेत्र व्याप्ती याबद्दलच्या तरतुदी केलेल्या होत्या. हे कलम कोणकोणत्या धर्मातील लोकांना लागू करता येईल आणि कोणकोणत्या धर्मातील लोकांना लागू होईल याची तरतूद केली होती. हे कलम 17 सप्टेंबर 1951 लोकसभेला चर्चेत आले तेव्हा त्याच्यावर लोकसभेतील अनेक सदस्यांनी हल्ले केले.त्यामध्ये मुसलमान ,ख्रिस्ती ,जैन ,शीख वगैरे इतर धर्मातील सभासदांनी हे कलम आपल्या लोकांना लागू करू नये अशा प्रकारचा गोंधळ सुरू केला.
हिंदूंच्या तर्फे श्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी हल्ला चढवला होता. त्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणाले होते की
“हिंदू धर्माचे मोठमोठे शास्त्री आणि संप्रदायाचे प्रमुख यांचा सल्ला न घेता आंबेडकरांनी हे बिल बनवले आहे.हा आंबेडकरांचा उतावीळपणा आहे.”
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना उत्तर देताना म्हणाले होते की “हे प्रमुख लोक म्हणजे करपात्री जी महाराज की काय?”
त्यावर श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणाले “त्यांचा सल्ला तुम्ही घेतला असता तर बिघडले असते का ?”
या प्रश्नावर ती बाबासाहेब म्हणाले,”काही बिघडले नसते,
मी त्यांना भेटण्यास येण्याची विनंती केली होती पण ते आले नाहीत मी त्यांची भेट घेण्यास टाळाटाळ केलेली नव्हती”.
सुधारणांना विरोध करणे म्हणजे जुन्या परंपरेला चिकटून राहण्याचा प्रकार आहे.
18 सप्टेंबर 1951 ला लोकसभेत अनेक सभासदांची भाषणे झाली. या भाषणांमध्ये न. वी.गाडगीळ ( जे तत्कालीन जवाहरलाल नेहरू मंत्रीमंडळात मंत्री होते) यांचे भाषण आवेशपूर्ण झाले. गाडगीळांनी आपल्या खास विनोदी शैली मध्ये विरोधकांचा समाचार घेतला. त्यामध्ये गाडगीळ म्हणाले की “हिंदू कोड बिल यातील 80 टक्के भाग निरनिराळ्या हिंदू धर्मशास्त्रातील आधारावर आणि हिंदू कायद्यावर उभारून डॉक्टर आंबेडकरांनी हे प्रचंड संहितीकरण याचे काम केले आहे.बाकीचा 20 टक्के भाग नवीन सुधारणा घडवून आणणारा आहे.
80 टक्के भागाला विरोध करण्याचे कोणालाही कारण नाही कारण ते कायदे अस्तित्वात आहेतच मग हिंदूंनी त्यांना विरोध करणे आततायीपणाचे नाही का?
20 टक्के भाग हा सुधारणा घडवून आणणारा आहे त्या सुधारणा भारतीय घटनेतील स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या तत्वांना धरून आहेत.
तेव्हा त्या सुधारणांना विरोध करणे म्हणजे जुन्या परंपरेला चिकटून राहण्याचा प्रकार आहे.
मी माझे जानवे तोडले आहे
यावरती त्यांनी एक संस्कृत श्लोक सांगितला होता तो श्लोक म्हणजे ” तातस्य कर्मोयमिती ब्रुवाणं क्षार जलं क: पुरुषो पिबपि” अर्थात विहिरीचे पाणी खारट असले तरी मी ते पिणार कारण ती वीर माझ्या वाडवडिलांची आहे.” यावर जीर्णमतवादी यांनी पुन्हा एकदा गाडगीळ यांच्या भाषणावर हल्ला केला.त्यावर गाडगीळ यांनी म्हणाले की “ज्या जुन्या चाली आहे त्या टाकून दिल्या गेल्या पाहिजेत. जुन्या चालीत बदल करु नये असा हट्ट धरणे खुळचटपणा चे लक्षण आहे.
यापुढे ते म्हणाले की “मी जरी ब्राह्मण असलो तरी मी ब्राह्मणाचे कर्तव्य करत नाही .मी माझ्या ब्राह्मण जातीचा हट्ट का धरावा? माझ्या मनात आले तेव्हापासून मी जानवे घालत नाही. मी माझे जानवे तोडले आहे,मी जानवे वापरत नाही. असे म्हणत त्यांनी आपला कुर्ता उचलून दाखवला यासंबंधीची हकीकत तत्कालिन वर्तमानपत्रात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध करण्यात आली होती.
क्रमशः
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी 2
मातंग समाज अन तरुणांच्या अधोगतीला जबाबदार कोण?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 02, 2021 22:00 PM
WebTitle – Hindu Code Bill dr b r ambedkar 3 2021-04-02