चित्रपटाची भाषा वेगळी असते, त्याच्या व्यवसायाची गणितं सुद्धा वेगळी असतात, ती बदलत जातात.आज ती भाषा आणि गणितं बदललेली दिसतात.समाजाची अभिरुची आणि प्रायोगिक कलेची भाषा ह्या गोष्टी काही वर्षात झपाट्याने सोबत बदलताना पाहिल्या आहेत. मराठी चित्रपटाने ती बदललेली नाही असं म्हणणं म्हणजे विषयांतर करत किंवा मुद्दा भरकटत नेल्यासारखं होईल.
मराठी सिनेसृष्टीला आलेली सुमार गुंगी फँड्री च्या फटक्याने उडवली त्याच बरोबर फँड्रीने चित्रपटाची भाषा बदलली आणि एक वेगळी अभिरुची निर्माण केली हि अभिरुची इथल्या सामाजिक विषमतेवर, जात वास्तवावर भाष्य करु पाहणाऱ्या प्रेक्षकाला पोषक वाटली, गरजेची वाटली. एक वेगळा ऑडियन्स तयार झाला, ज्याला इथल्या साहित्याने, इथल्या प्रायोगिक कलेने त्याच्या सामाजिक वास्तवाला हात घालणाऱ्या आशयाला कधीही दखलपात्र मानले नाही. हा ऑडियन्स फक्त बहुजन वर्गातलाच नसून…तो समता बंधुता आणि न्याय या विचाराने प्रेरित झालेला प्रेक्षक म्हणता येईल. आणि महत्वाचं म्हणजे तो तरुण विचाराचा आहे.
चित्रपटाला विशिष्ट भाषा नसून चित्रपटाची एक स्वतंत्र भाषा असते
फॅन्ड्री हा चित्रपटच नसून एक उत्तम कथा आहे, तिने इथल्या साहित्य जगतात सुद्धा खळबळ उडवली हे दुर्लक्षित करून चालणार नाही. फॅन्ड्रीच्या निर्मितीचा काळ २०१३/१४ आहे, यानंतर सामाजिक विषमतेचा आशय असणारे सिनेमे तमिळमध्ये आले आणि इथला सामाजिक विषमतेवर भाष्य करु पाहणारा प्रेक्षक तिकडे आकर्षित झाला कारण चित्रपटाला विशिष्ट भाषा नसून चित्रपटाचीच एक स्वतंत्र भाषा असते. काही वेळेला या प्रेक्षकाने फँड्रीला त्यात शोधण्याचा प्रयत्नही केला. खरंतर मराठी चित्रपटसृष्टीने हि भाषा आणि हा टार्गेट ऑडियन्स ओळखला नाही असं म्हणता येणार नाही परंतु त्यांनी या ऑडिअन्सला दखलपात्र मानलेलं नाही हे त्यानंतरच्या येणाऱ्या काळाने दाखवून दिलेलं आहे.
या प्रेक्षकांची दखल मराठी सिनेसृष्टीने घ्यायला हवी होती परंतु ती तमिळ दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी घेतलेली दिसते. खरं पाहिलं तर हा प्रेक्षक नुसता चित्रपट पाहून समाधानी होत नाही तर तो त्यातली कथा, पटकथा,आशय विषय या सगळ्या बाबी सुजाण अभिरुचीच्या भिंगातून तपासून पाहत आहे.फँड्रीच्या निमित्ताने या प्रेक्षकांना आपली अभिरुची शोधण्याची संधी मिळाली, चित्रपटात दिग्दर्शकाला आणि पटकथेला शोधण्याची संधी मिळाली. चित्रपट आणि नाट्य यातला फरक समजून घेण्याची संधी मिळाली. अशी कलाकृती प्रेक्षकांनी आपल्या मनात जोपासलेल्या सामाजिक कल्पनेला तपासून पाहायला प्रवृत्त करत असते, तिच्यात सकारात्मक ताकद असते. असे चित्रपट निर्माण व्हावेत अशी या प्रेक्षकांची मागणी वारंवार त्यांच्या प्रतिक्रियेतून, प्रतिसादातून पाहायला मिळते. या प्रेक्षकाने नायक खलनायकाच्या जुनाट संकल्पना सपशेल नाकारलेल्या दिसतात.
चित्रपटाची भाषा प्रभावी जरी असली तरी ती मर्यादित असते
अशा चित्रपटांमध्ये नेमकं वेगळेपण काय असतं, तर या चित्रपटात ज्या तळागाळातल्या शोषित वर्गाची कथा पटकथा आहे त्यातली पात्रं जो शोषित वर्ग जसा दिसतो तशीच दिसतात, जशी राहतात, जशी बोलतात तसाच त्यांचा त्यात वावर दाखवलेला असतो. असा चित्रपट नाट्यमय संवादापेक्षा वास्तववादी चित्रीकरणातून त्याच्या फ्रेम्स मधून अधिक बोलका झालेला असतो त्याला विशिष्ट भाषेची, बोलीची गरज भासत नाही. असा चित्रपट सामाजिक जाणीव प्रगल्भ झालेल्या प्रेक्षकाला आकर्षित केल्याशिवाय राहत नाही.कुठलीही कला प्रेक्षकांच्या मनाचा, संकल्पनेचा ठाव घेते ती कला उत्तम समजली जाते.
तर असा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो तेव्हा त्याची चिकित्सा आणि समीक्षा जरूर करायला हवी.प्रायोगिक चित्रपट हा व्यवसाय जरी असला तरी चित्रपट हि एक कला आहे त्या कलेची चिकित्सा सामाजिक दृष्टीने जरूर व्हायला हवी. चित्रपटाची भाषा प्रभावी जरी असली तरी ती मर्यादित असते हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे, काही चित्रपट याला अपवाद देखील असतात. कथा किंवा चित्रपट हे काही वास्तवाचा इतिहास नसतो तर कथा किंवा चित्रपट हे वास्तववादी अनुभवाचे साधनरूप असू शकते. त्यामुळे एखादा चित्रपट सत्यघटनेवर असला तरी तो सत्यघटनेवर आहे किंवा नाही हे शोधणे व्यर्थ ठरते.आपल्या अभिरुचीला चित्रपटाची भाषा समजत नसेल तर त्या अभिरुचीला आपण पुन्हा एकदा पडताळून पाहण्याची गरज आहे.
आपल्या दिसण्यात आणि पाहण्यात खूप अंतर असतं
नुकताच प्रदर्शित झालेल्या जयभीम चित्रपटाचं एक उदाहरण घेऊ. काहींचं म्हणणं आहे कि हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे मग त्यातील काही फ्रेम्स ह्या सिनेमॅटिक वाटतात किंवा त्याला जे जयभीम हे दिलेलं टायटल आहे ते चित्रपटात कुठेही पाहायला मिळत नाही किंवा त्याचा साधा उच्चारही कुठे दिसत नाही.अजून एक गोष्ट म्हणजे काही समीक्षकांचं म्हणणं आहे कि काही ठिकाणी सेंगनी हे पात्र अतिशय नाट्यमय पद्धतीने पटकथेत आलेलं आहे हे समीक्षकांना खटकत आहे,समीक्षकांचं म्हणणं आहे कि सेंगनी हे पात्र गरोदर दाखवून एक भावनिकतेचा उच्च दर्जाचा वापर केला आहे.
तेच पात्र नॉर्मल स्त्रीचं दाखवलं असतं तरी फारसा फरक पडला नसता. किंवा ते सुंदरही वाटलं असतं.
त्यांच्या मते उलट असं पात्र रंगवल्याने ते नाटकी आणि अवास्तव झालेलं आहे.
या समीक्षकांचं म्हणणं खोटं आहे किंवा त्यांनी जाणीवपूर्वक म्हटलेलं आहे असंही म्हणता येणार नाही,
कारण जे स्क्रिनवर चित्र दिसतं ते पाहता येईलच असं म्हणता येत नाही.आपल्या दिसण्यात आणि पाहण्यात खूप अंतर असतं.
सेंगनीच्या गर्भाशयात वाढणारा अर्भकसुद्धा या पटकथेचा पात्र आहे
सेंगनी ला गरोदर रंगवलेल्या पात्रात आपल्याला सामाजिक अंगाने कायकाय शक्यता उलगडून पाहता येतील हे महत्वाचं ठरेल.सेंगनी चं कुटुंब हे आदिवासी जातीतील आहे,या आदिवासी जातीतील स्त्रिया गरोदर असताना सुद्धा कामधंदा करत असतात कधी कधी त्यांचीप्रसूती रानात सुद्धा झाल्याच्या घटना आहेत, त्या सातव्या महिन्यात सुद्धा बाहेर फिरतात, एकंदरीत त्या कणखर असतात.
सेंगनी हि त्याच जातीतील आहे, हि गोष्ट तिच्या पात्रातून अधोरेखित होत नाही का? हि कथा वंचित जातींच्या समूहातली आहे, इथला वंचित समाज घटक जातीयतेच्या चक्रव्यूहात हजारो वर्ष अडकलेला आहे, किंबहुना त्याला अडकवलं गेलेलं आहे. इथे जन्माला आल्या आल्या माणसाला जात चिकटवली जाते तशीच ती माणूस गर्भात असतानाच त्याच्या इतिहासाला चिकटली जाते. आपण गर्भात असताना आपल्या आईवडिलांवर जातीयतेच्या अत्याचाराने झालेल्या खुणा एखाद्या संवेदनशील माणसाला जाणवत नसतील का? असा इतिहास ऐकून मनात चीड निर्माण होत नसेल का? माणसाच्या नेणिवा सुद्धा सामाजिक घडामोडींवर घडत असतात.
जयभीम हि कथा/ पटकथा फक्त सेंगनी, तिचा नवरा राजाकन्नु आणि वकील चंद्रू यांचीच नाही तर सेंगनी च्यागर्भात वाढत असलेल्या अर्भकाची सुद्धा आहे.तो सेंगनीच्या गर्भाशयात वाढणारा अर्भकसुद्धा या पटकथेचा पात्र आहे. हे पात्र समीक्षकांच्या नजरेला स्क्रिनवर दिसत नसल्याने त्यांना ते पहाता आलेलं नाही यात त्यांचा मुळीच दोष समजू नये, कारण चित्रपट दिसणे आणि पाहणे यात फरक असावा.चित्रपटाचा सुजाण प्रेक्षक या शक्यतांना पाहत असेल तर चित्रपट निर्मिती करताना प्रेक्षकांच्या यादृष्टीकोनाची दखल घेणं निर्मात्यांना भाग पडत असावं किंवा भाग पाडलं जाऊ शकतं.
बाजारात जशी मागणी तसा पुरवठा
खरंतर यावरील चर्चा किंवा प्रश्न असे असायला हवेत कि, सामाजिक, जात वास्तवावर भाष्य करणारा चित्रपट प्रदर्शित होतो
तेव्हा या प्रेक्षकांनी आपल्या अभिरुचीला पुन्हा पुन्हा तपासून पाहायला हवंय का?
हि अभिरुची येणाऱ्या काळात समाजाच्या किती उपयोगाची आहे? तिचे महत्व कसं टिकेल?
हळूहळू आपली अभिरुची सुमार आणि कट्टर होऊ नये याची काळजी कशी घेणार?
किंवा अशाअभिरुचीने इथली शोषक, शासक व्यवस्था अधिक बळकट होणार आहे का?
कारण कोणत्याही प्रायोगिककलेची निर्मिती आपला टार्गेट ऑडियन्स डोळ्यासमोर घेऊन केली जात असते.
आपली अभिरुची सजग व्हावी हे रास्त आहे परंतु आपली अभिरुची टार्गेट बनतेय का,
हे पडताळूनपाहणं सुद्धा सजग आणि सुजाण प्रेक्षकाचं काम आहे.
अशा कलाकृतीवर एकसुरी चर्चा न करतावेगवेगळ्या अँगल्सने बोलत राहणं महत्वाचं ठरेल.
अन दुसरं महत्वाचं म्हणजे, बाजारात जशी मागणी. पुरवठाही तसाचं केला जातो.
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
हे वाचा जय भीम चित्रपटातील ती केस कायद्याच्यादृष्टीने का महत्वाची जाणून घ्या
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
Jai bhim film Review – इरुलर जमातीचे भेदक चित्रण करणारा सिनेमा ‘ जयभीम ‘
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 12, 2021 20:12 PM
WebTitle – Film language: Social content and your film tastes