डाॅ.भीमराव रामजी आंबेडकर यांचे ज्येष्ठ बंधू बाळाराम आंबेडकर यांना रविवार ता.१२-११-१९२७ रोजी दुपारी बारा वाजता मुंबई येथे एकाएकी हृदयक्रिया बंद पडून देवाज्ञा झाली, हे हृदयद्रावक वर्तमान बहिष्कृत भारताच्या वाचकांना कळविण्याचा कठोर प्रसंग माझ्यावर गुदरला आहे. दादासाहेबांचा व माझा परिचय झाल्यापासून त्यांनी माझ्या शिक्षणासाठी जिवापाड मेहनत घेतली, अंगात ताप असतानाही माझ्यासाठी त्यांनी धावपळ केली हे स्मरले म्हणजे अंतःकरण भरून येते. दादासाहेबांच्या अनपेक्षित मृत्यूने माझा सल्लागार नाहीसा झाला, डाॅ.साहेबांचा प्रेमळ सहोदर गडप झाला. समाजाला सुधारणेच्या मार्गावर आणण्यासाठी अविश्रांत श्रम करणारा एक जातिवंत समाजनायक नाहीसा झाला.
फर्स्ट ग्रेनेडियर फलटणीत बँडमन
दादासाहेब आंबेडकर यांचे चरित्र अपूर्व आहे, स्थलसंकोचास्तव ते येथे इत्यंभूत मला देता येत नाही. याबद्दल फार वाईट वाटते. अफगाणिस्तानच्या समरांगणावर समशेरबहादुरी करुन प्रख्यात पावलेले पुण्यप्रतापी रामजी मालोजी सुभेदार आणि पुण्यस्मरण चिरंजीविनीं मातोश्री भीमाबाई यांना अकरा अपत्ये (एकूण चौदा अपत्ये पैकी तीन मुलगे आणि चार मुली हयात व इतर सात लहान असतानाच निधन पावले.) झाली, यापैकी आठ मुली व तीन मुलगे. बाळाराम, आनंदराव आणि भीमराव होत. त्यापैकी आनंदराव १९१४ साली दिवंगत झाले.
दादासाहेब आंबेडकर फर्स्ट ग्रेनेडियर फलटणीत बँडमन होते.
फलटणीत असतानाच त्यांचे शिक्षण इंग्रजी पाच सहा इयत्तेपर्यंत झाले होते.
काही दिवसांनी ते फलटणीतून मुंबईत आले व म्युझिकच्या धंद्यावर उपजीविका करु लागले.
त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. पैकी फक्त सौ.सखूबाई तांबूसकर याच हयात आहेत.फलटणीत इंग्रजी भाषेचे कितीसे ज्ञान होणार?
चळवळीची सूत्रे
मुंबईत आल्यावर दादासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या हिंमतीने इंग्रजी भाषेचा एवढा अभ्यास केला की, ते विश्वविद्यालयाच्या पदवीधरांपुढे इंग्रजीतून व्याख्यान देऊ शकले. त्यांचे वाचन भारी दांडगे होते. अशा प्रकारच्या स्वाध्यायाने त्यांच्यात एक विशेष प्रकारची धडाडी उत्पन्न झाली होती. या स्वाध्ययन शीलावर ते मुंबई म्युनिसिपालिटीत (भायखळा) येथे पदवीधराबरोबर पगार घेऊन कारकूनाचे काम करीत होते. सामाजिक कार्यात त्यांचा लहानपणापासून हात असे. जातींतील बैठकीत लोक त्यांचा फार आदरसत्कार करीत.
१९१९ पासून ते सामाजिक चळवळीत प्रामुख्याने भाग घेऊ लागले व डाॅ.साहेब लंडनला बॅरिस्टरच्या कोर्ससाठी गेले
तेव्हा सामाजिक चळवळीत जी बजबजपुरी माजली ती नाहीशी करुन चळवळीला चलन देण्याचे ज्या लोकांनी प्रयत्न केले,
त्यात दादासाहेब अग्रेसर होते. १९२२ च्या अखेर तर चळवळीची सूत्रे त्यांच्याच हातात अवचित आली होती,
ती त्यांनी यशस्वी रीतीने हालवून दाखिवली.
कर्मवीर
ते प्रत्येक सभेला हजर राहात असत. त्यांची भाषणे जोरदार, दणदणीत व आकर्षक असत. त्यांची व्याख्याने ऐकल्यावर प्रत्येक श्रोता चैतन्यपूर्ण होऊन जात असे. सामाजिक चळवळीबद्दल ते एक पुस्तक लिहिणार होते. त्याची पहिली दोन प्रकरणे मी वाचली होती. प्रकृती नेहमी नीट रहात नसल्यामुळे ते पुस्तक अपूर्णच राहिले. विद्यार्थ्यांच्या सोयीबद्दल त्यांचे विचार फार मननीय होते. विद्यार्थींची राहण्याची, खाण्याची व पोशाखाची व्यवस्था त्यांच्या इच्छेप्रमाणे झालीच पाहिजे असे ते म्हणत. विद्यार्थ्यांबद्दल त्यांना फार प्रेम वाटे. एका गरीब विद्यार्थ्याला त्यांनी आपल्या घरी ३/४ महिने ठेविले होते. त्याला विलायतला पाठवावयाचे असे ते नेहमी म्हणत.
ते फार प्रेमळ, सरळ, मनमिळाऊ, करारी, निर्भीड व विनोदी होते. मनुष्यस्वभावाची पारख ते लवकरच करीत. स्वतःच्या कर्तबगारीने प्याद्यापासून सव्वाशे रूपये पगाराच्या कारकुनाची जागा यशस्वी चालविणारा दादासाहेबांसारखा स्वाध्यायशील कर्मवीर स्पृश्य वर्गातही सापडणे कठीण मग अस्पृश्य वर्गाचे नाव कशाला? गेल्या दोन वर्षात ते खाजगी बैठकीत उद्गार काढीत की, “मला पेन्शन सुरु झाले की झोळी अडकावून बहिष्कृत हितकारिणी सभेकरिता मदत मागण्यास मी वाटेल तिकडे फिरेन!” पण दैवाची विचित्र लीला! पेन्शन चालू व्हावयास अवघे ६ महिने राहिले होते. इतक्यात क्रूर काळाने त्यांच्यावर झडप घातली. कालाय तस्मे नम:।
उठा! कंबर कसा आणि सामाजिक बंडाची उभारणी करा
ते साठीच्या घरात आले होते. तरी त्यांचा जोम अडाखेबाज तरुणाप्रमाणे होता. व्यासपीठावर पाय ठेवला की, त्यांच्या अंगात चैतन्य शिरे आणि आपल्या तडफदार भाषणाने ते श्रोत्यांच्या अंगावर रोमांच थरारवीत. स्पृश्यांचा बहिष्कृतांना चोहोंकडून प्राणांतिक त्रास होत होतो आणि माबाप सरकार त्यांच्या रडण्याकडे ढुंकूनही बघत नाही, अशा आशयाच्या विषयावर ते बोलू लागले म्हणजे आवेशाने उद्गारत, “आमची गुलामगिरी आम्हीच नाहीशी केली पाहिजे. कोणाची कशाला मदत मागता? उठा! कंबर कसा आणि सामाजिक बंडाची उभारणी करा.! सर्व देशात क्रांती करा आणि गुलामगिरीतून सुटका करा. या बंडात मरणे म्हणजे फार भाग्याचे आहे.मी महाडच्या सत्याग्रहात मरणार आहे.”
…… हाय! कोण ही हृदयविदारक भविष्यवाणी!दादासाहेबांनी मृत्यूबद्दल विचार केला असेल, मी कधी मरेन? त्याचे उत्तर त्यांनीच ता. ६/१०/१९२७ रोजी दसऱ्याच्या सीमोल्लंघन संमेलनात जाहीर केले.
सतांहि संदेहपदेषु वस्तुषू।
प्रमाणमंत:करणप्रवृत्तय: ॥
-:कालिदास
दादासाहेब! महाडच्या जलसंगरात आपणाला समशेर गाजविण्याची परमेश्वराने मुभा दिली नाही. त्याने तुम्हाला लवकरच बोलविले. काही तरी विशेष जरूरीचे काम असेल. ते संपताच आम्हांला दुसऱ्या देहाने लवकरच भेटा! नंतर आपण सामाजिक बंडाची उभारणी करू! त्यांच्या प्रेतयात्रेला अस्पृश्य समाज तीन हजारावर होता. प्रेतयात्रा स्मशानात गेल्यावर तेथे मेसर्स शिवतरकर, मोरे, गंगावणे, शिवदास नडगवाकर वगैरे मंडळींची मृताच्या गुणवर्णनपर भाषणे झाली.
(ले.एक विद्यार्थी) ✍
बहिष्कृत भारत,
शुक्रवार ता. २५ माहे नोव्हेंबर सन १९२७
महत्वाचे :- माझ्या वडील बंधूच्या मरणसमयी मी मुंबईत नव्हतो. अंबादेवीच्या सत्याग्रहासाठी जी अमरावती येथे ता. १३ नोव्हेंबर रोजी माझ्या अध्यक्षतेखाली परिषद भरण्याचे ठरले होते, त्या परिषदेला मी गेलो होतो. माझ्या गैरहजेरीत ज्या ३।४ हजार अस्पृश्य बंधूनीं प्रेतयात्रेस हजर राहून असल्या दुःखप्रसंगी आपली सहानुभूती दर्शविली त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे.
-: भीमराव आंबेडकर
BY Suraj Talvatkar
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)