आपल्या देशात आजवर अनेक दिग्गज राजकारणी, विचारवंत, समाजसुधारक, धर्मपंडित होऊन गेले.परंतु संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांसारखी कणखर भूमिका कोणीच घेतलेली नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या समकालीन लेखकांनी, विचारवंतांनी तसेच काही राजकारणी लोकांनी इतर जाती-धर्माच्या लोकांपुढे सादर करताना एका विशिष्ट जातीच्या चौकटीत बंदिस्त करुन त्यांना खुजे करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. परंतु डाॅ.बाबासाहेबांची भूमिका किती उदात्त व स्पष्ट होती, हे आपण या ठिकाणी समजून घेणे महत्वाचे आहे.
ती पुढीलप्रमाणे:-
“मी कोणत्याही प्रकारचा प्रांतभेद, इतकेच नव्हे तर महाराष्ट्रीय म्हणूनही घेण्यास भूषण मानीत नाही.तसेच भाषा, प्रांतभेद, संस्कृती वगैरे भेदभाव मी कधीच पाळू इच्छित नाही. प्रथम हिंदी नंतर हिंदू किंवा मुसलमान हेही तत्व मला पटत नाही. सर्वांनी प्रथम भारतीय, शेवटी भारतीय, भारतीय पलीकडे काही नको हीच भूमिका घ्यावी, हीच वृत्ती खऱ्या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला परिपोषक आहे.”
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी पारतंत्र्याचे आणि राजेशाहीचे सर्व पाश तोडून भारताच्या लोकराज्यावर शिक्कामोर्तब झाले.
दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेचे अध्यक्ष डाॅ.राजेंद्रप्रसाद यांचे समारोपाचे भाषण होऊन त्यादिवशी भारताचे संविधान संमत झाले.
त्याच्या एक दिवस आधी म्हणजे २५ नोव्हेंबर १९४९ ला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,
भारतीय संविधानाचे शिल्पकार या शब्दांनी ज्यांचा सार्थ गौरव होतो, यांचे संविधान सभेत शेवटचे भाषण झाले.
लक्ष वेधणारी अद्वितीय व्यक्ती:-
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण जवळजवळ ५५ मिनिटे चालले होते.
त्यावेळी घटना समितीच्या भव्य हाॅलमध्ये गंभीर शांतता पसरली होती.सर्व गॅलऱ्या भरगच्च झाल्या होत्या.
तरी कोणाच्या श्वासाची अगर हातापायांची हालचाल देखील कळून येत नव्हती.
उत्कृष्ट वुलन सूट पेहरलेल्या, दुरून धिप्पाड दिसणाऱ्या आणि मधून मधून श्रोत्यांकडे दृष्टिक्षेप करणाऱ्या एकाच व्यक्तीकडे
सर्व प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित झाले होते आणि ती व्यक्ती म्हणजे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हेच होत.
संविधान निर्माणासाठी बाबासाहेबांना किती परिश्रम घ्यावे लागले याची प्रचिती पुढील वृत्तांतावरून येईल.
“संविधान सभेचे कामकाज चालू असता, डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर रोज १२/१२, १४/१४ तास कामात व्यग्र असतात.येत्या वर्षाअखेर म्हणजे ३१ डिसेंबर १९४९ च्या आत त्यांना सर्व घटना पास करुन घ्यावयाची आहे.कारण, नवीन घटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात यावी असा सर्वांचा संकल्प आहे.”
भारतीय संविधान निर्मितीतील बाबासाहेबांच्या योगदानाबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल
संविधान सभेच्या बहुतेक सदस्यांनी आणि वृत्तपत्र क्षेत्रातील या संबंधातील जाणकारांनी त्यांची मुक्तकंठाने स्तुती केली.
त्यातील काहींचे उद्गार पुढीलप्रमाणे :-
१) आर.के.सिधवा:–
हे सर्वोत्तम संविधान आहे. हे लोकांना सांगणे मी माझं कर्तव्य समजतो आणि संविधान सभेचा प्रत्येक सदस्य हे सांगेल अशी माझी अपेक्षा आहे. आपल्यात कितीही मतभेद असले तरी या संविधानाचा आपल्याला अभिमान आहे. आणि आपण जगाला हे जाहीर करु या जेणेकरून जगाला ही जाणीव होईल की हा दस्तावेज संदर्भ घेण्यायोग्यतेचा आहे. २६ जानेवारी १९५० या ऐतिहासिक दिवशी आपण ‘लोकसत्ताक सार्वभौम राज्य’ होऊ आणि त्या दिवशी या संविधानाला कायद्याचे स्वरूप प्राप्त होईल याचा मला अभिमान वाटतो.
२) पंडित ठाकूरदास भार्गव:-
मसुदा समिती आणि विशेषतः तिचे अध्यक्ष यांच्याप्रती आपण सर्वांनी कोणत्या शब्दात कृतज्ञता व्यक्त करावी हे मला कळत नाही. कायदेविषयक कुशाग्र बुध्दी, अथक परिश्रम, अत्त्युच्च दर्जाचे कौशल्य, दुर्दम्य आत्मविश्वास, आधुनिकतेशी संलग्नता या गुणांनीयुक्त मसुदा समितीचे अध्यक्ष डाॅ.आंबेडकर यांनी या संविधान सभेच्या माध्यमातून नेतृत्व केले आणि या संदर्भात निर्माण झालेल्या सर्व गुंतागुंतीच्या प्रश्नांची सोडवणूक केली.
३) बेगम ऐझाज रसूल:-
संविधानाने भारतीय जनतेच्या आशा आकांक्षाना मूर्त स्वरूप दिले आहे. शब्द योजना, अंतर्भूत तरतुदींच्या निकषावर संविधानाचे मूल्यमापन होणार असेल तर जगातील संविधानात आपले संविधान श्रेष्ठ दर्जा प्राप्त योग्यतेचे आहे. आणि त्याबद्दल आपल्याला असलेला अभिमान न्यायोचित आहे. नेत्रदीपक कार्य केल्याबद्दल मी डाॅ.आंबेडकर आणि मसुदा समितीचे सदस्य यांचे अभिनंदन करतो. धर्मनिरपेक्ष राज्य हे आपल्या संविधानाचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. भारतातील लोकांचे ऐक्य धर्मनिरपेक्षतेवर अवलंबून आहे अन्यथा त्याशिवाय विकासाच्या आशा-आकांक्षा व्यर्थ ठरतील.
४) जे.पी.चतुर्वेदी:-
चतुर्वेदी हे भारतीय पत्रकारितेच्या चळवळीचे जनक समजले जातात. संविधान निर्मितीच्या कार्यातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाविषयी ते म्हणतात, “त्याकाळात त्यांना जवळून पाहण्याचा सन्मान मला लाभला. डाॅ.आंबेडकरांना कोणीही आव्हान देणे अशक्य होते. ते जगातील सर्वच संविधानाचे अधिकारी विद्वान होते. त्यांच्याशी चर्चा करायला मिळणे म्हणजे बौध्दिक मेजवानी होती व मला ही संधी मिळत असे. अस्पृश्यांच्या आणि शोषितांच्या उद्धारासाठी त्यांनी केलेला संघर्ष केवळ, प्रामुख्याने, मुख्यत्वेकरून सांगितला जातो, परंतु भारतीय नवीन प्रजासत्ताकाच्या पायाभरणीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानांबाबत काहीच उल्लेख केला जात नाही. भारतात बाल्यावस्थेत असलेल्या लोकशाहीला त्यांनी संविधानाच्या रुपानी कायदा दिला. संविधान निर्माण करणाऱ्या संविधान सभेतील पितामहांची जेव्हा आपण आठवण करतो त्यावेळेस आपण हे विसरता कामा नये की, भारताच्या संविधान सभेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात उत्तुंग व्यक्तीमत्व होत, ज्यांनी वर्तमान संविधानाची प्रत्यक्षात रचना केली. भारतीय लोकशाही व्यवस्थेच्या उत्क्रांतीला सुव्यवस्थित करण्यासाठी तसेच देशाची अखंडता सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे विचार दिशा दिग्दर्शित करतील.
५) सुप्रसिद्ध घटनातज्ज्ञ एम.व्ही.पायली:-
डाॅ.आंबेडकरांनी आपल्या सोबत विद्वत्ता, कल्पनाशक्ती, तर्कनिष्ठा व वक्तृत्व आणि अनुभव पणास लावले. अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्वावर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि आपली मते अशावेळी अतिशय प्रभावीपणे तितकेच सुलभपणे ते मांडीत. जगातील सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. तसेच १९३५ च्या कायद्याचे बारकावेही त्यांना माहित होते. घटनेचा मसुदा चर्चिला जात असताना उद्भवलेल्या कोणत्याही टीकेला ते स्पष्ट आणि सुटसुटीतपणे स्पष्टीकरण देत. त्यांनी उत्तरे दिल्यानंतर सदस्यांच्या मनातील संदेह, गोंधळ, असंदिग्धपणा यांचे ढग नाहीसे होत. तर्कस्पष्ट युक्तिवाद, प्रभावी आणि सर्वांना समजणारे स्पष्टीकरण, कोणत्याही मुद्याला तात्काळ प्रतिवाद करुन वाद संपुष्टात आणण्याची हातोटी त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती. हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता. म्हणूनच त्यांना आधुनिक मनू अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात, ते साजेसेच आहे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानातील त्यांचे योगदान याविषयी वर नमूद केलेल्या
जाणकारांचे,तज्ञांचे विचार वाचल्यानंतर बाबासाहेबांची कायदेविषयक कुशाग्र बुध्दी,
अथक परिश्रम,विद्वत्ता,तर्कनिष्ठा, कल्पनाशक्ती, वकृत्व,सर्वसमावेशक भूमिका,
शोषित पीडितांविषयी असलेली तळमळ, राष्ट्रप्रेम याची आपल्याला प्रचीती येईल.
संविधान जर प्रामाणिकपणे राबविले तर ते चांगलेच ठरेल.
आज आपल्या देशात राजकीय सत्ता ही मूठभर लोकांची मक्तेदारी झाली आहे आणि बहुतांश लोक केवळ ओझे वाहणारे प्राणी नव्हे तर भक्ष्यस्थानी असलेले प्राणी झाले आहेत. हे कोणालाही नाकारता येणार नाही. डाॅ.बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणतात कि, “माझ्या मते संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही.” सत्तेचा उपभोग घेणाऱ्या राजकारणी लोकांनी ही गोष्ट नीट समजून घेणे गरजेचे आहे. कारण तुम्ही संविधान जर प्रामाणिकपणे राबविले तर ते चांगलेच ठरेल. परंतु तुम्हीच जर अप्रामाणिकपणे वागलात तर संविधान वाईटच ठरणार. त्यामुळे जाहीर सभेत भारताच्या घटनेविषयी नरक ओकणे, वायफळ विधाने करणे सोडून देऊन, घटनेनुसार योग्य अंमलबजावणी करावी हेच योग्य राहील.
बाबासाहेबांविषयी द्वेष बाळगणाऱ्या, गरळ ओकणाऱ्यांनी २५ नोव्हेंबर १९५१ ला शिवाजी पार्क,मुंबई या ठिकाणी बाबासाहेब आपल्या भाषणात काय सांगतात हे नीट लक्षात घ्यावे. बाबासाहेब म्हणतात,
“मतभेद असतानाही मी मंत्रिमंडळात राहिलो याचे मुख्य कारण राष्ट्राची घटना तयार करण्याचे महान कार्य माझ्या शिरावर होते. मी ते सर्वात अधिक महत्वाचे समजत होतो. ते पार पाडण्यात माझ्या कर्तव्यबुध्दीचाच भाग होता. त्या कामावर मी लाथ मारून बाहेर जावे असे म्हणणाऱ्या माणसाला वेड्यातच काढले पाहिजे.“
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
या विधानावरुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा कर्तव्यदक्षपणा, राष्ट्रप्रेम, कार्यनिष्ठा लक्षात येते.
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या श्रेष्ठ मानवी मूल्यांचे अधिष्ठान
तत्कालीन काळात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा देश परदेशात गौरव होत राहिला, आजही होत आहे. चिरंतन स्मरणात राहावे असे महत्वाचे राष्ट्रकार्य त्यांनी करुन दाखविले होते. बाबासाहेबांनी घटनेद्वारे अस्पृश्यतेचे कायमचे उच्चाटन केले होते. एवढेच नव्हे तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या श्रेष्ठ मानवी मूल्यांचे अधिष्ठान भारतीय जीवनात प्रस्थापित केले. ह्यामुळे जगातील एक थोर घटनापंडित म्हणून त्यांना कीर्ती लाभली. सुप्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञ आणि ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठांचे माजी नामवंत प्राध्यापक अर्नेस्ट वार्कर यांनी १९५१ साली आपला ‘प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पोलिटिकल थिअरी’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रसिध्द केला. तो त्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेस (Preamble) अर्पण केला आहे. ग्रंथाच्या प्रास्तविकात ते म्हणतात, “माझ्या प्रस्तुत ग्रंथाचे विचारसार ह्या उद्देश पत्रिकेत सामाविलेले आहे. भारतीय जनतेने आपल्या स्वातंत्र्याचा प्रारंभ करताना ह्या श्रेष्ठ मानवी मूल्यांचा अंगीकार केला याचा मला अभिमान वाटतो. भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचा ह्यापरता मोठा गौरव तो कोणता असणार!
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील करोडो लोकांचे भवितव्य भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार केले आहे.
तसेच भारतीयांच्या विकासाची व उत्कर्षाची दारे खुली केली आहेत.
याबद्दल प्रत्येक भारतीय नागरिकाने डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केलीच पाहिजे.
संदर्भ:-
(डाॅ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग २,३)
ON RECORD: डॉ. आंबेडकरांच्या संविधान निर्मिती योगदानाबद्दल
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
Comments 1