भारतीय शोषकांच्या जातकुळीचा शोधः कॉ. दिघेंचा स्तुत्य प्रयत्न
‘‘शत्रूची जातकुळी काय?’’
हे पुस्तक लिहून कॉ.अतुल दिघे यांनी परिवर्तनवादी चळवळीत काम करणार्या कार्यकर्त्यांचे काम फारच सोपे करून ठेवले आहे.
चळवळीत काम करणार्या कार्यकर्त्यांच्या मनात असंख्य प्रश्न उभे राहात असतात.
काही व्यवहारिक पातळीवरचे असतात,तर काही वैचारिक पातळीवरचे!
प्रत्येक वेळी व्याख्यानातून, केडर कॅम्पमधून त्या प्रश्नांचे निराकरण होतेच असे नाही.
अशा वेळी कार्यकर्ता आपल्या प्रश्नांची उत्तरे पुस्तकातून शोधण्याचा प्रयत्न करीत असतो.
समाजव्यवस्थेतील आपले स्थान काय,आपला शत्रू नेमका कोण व त्याचे स्वरूप काय वगैरे अनेक मुलभूत प्रश्नांची रांगच मनात निर्माण झालेली असते.
अशा कार्यकर्त्यांचे शंका-समाधान करणारे पुस्तक कॉम्रेड अतुल दिघे यांनी लिहील्यामुळे चळवळीतील प्रबोधनाचे काम फार सोपे झाले आहे.
मी हे पुस्तक वाचल्यानंतर इतरही कार्यकर्त्यांनी ते अवश्यपणे वाचलेच पाहिजे.
या तीव्र इच्छेपायी हा पुस्तक परीचय करून देण्याचा मोह मला आवरला गेला नाही.
मार्क्स,फुले,आंबेडकर,गांधीजी यासारख्या महापुरूषांच्या वैचारिक व कृतीकार्यक्रमांची सांगड घालत
त्यांचे विश्लेषण अत्यंत सोप्या भाषेत करून सांगण्याचे कसब दिघेंनी येथे सिद्ध केले आहे.
स्वतः लिहिलेल्या प्रस्तावनेतून त्यांनी काही मुलभूत प्रश्न विचारले असून या प्रश्नांची उत्तरे देण्यातून या पुस्तकाची वाटचाल सुरू होते-
‘‘कोण आहे शत्रू? कोण महासत्ता बनू पाहणार्या देशात कुपोषण,निरक्षरता निर्माण करते?
कोण लाखो दलित, मुस्लीम, ख्रिस्ती, ओबीसी स्त्री-पुरूषांना निकृष्ट कामात लोटून देऊन त्यांची अमानुष पिळवणूक करते?”
बाबासाहेबांनी दिलेली समतेची घटना प्रत्यक्षात आणण्यापासून कोण रोखते आहे?’’
(पान-4) (जाड ठसा माझा)
या सर्व प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधार्थ ते आपल्याला सहजपणे सिंधू संस्कृती ते वैदिक काल व सरंजामशाही ते भांडवली लोकशाही अशा 5 हजार वर्षांच्या इतिहासातून फेरफटका मारून आणतात. रामायण काळात ब्राह्मण-क्षत्रिय युतीतून दडपशाही कशी सुरू झाली, याचे विवेचन करतांना दिघे लिहितात-
‘‘रामायण काळात ब्राह्मण क्षत्रिय यांच्या जुटीने एतद्देशीय समाजघटकांवर दडपशाही सुरू झाली होती. आता ब्राह्मण क्षत्रियांची दडपशाही संघटितपणे उत्पादकांविरूद्ध चालविण्याचा विचार मनू याने मांडला. उत्पादकांकडून कर घ्यावा परंतू त्यांना चांगले जीवन जगण्यास परवानगी नाही. यामुळे शूद्रांनी निर्माण केलेली संपत्ती त्यांचेकडून हिरावून घेणे सोपे झाले.’’ (पान-10)
उत्तर रामायणातील शंबुकाच्या प्रकरणावरून दिघेंची ही मांडणी चपखल बसते.
पुढे ते स्पष्ट करतात कि, या मनूला विरोध करण्यासाठी बौद्ध व जैन तत्वज्ञान लढाईत उतरते.
परंतू मनूची ही शोषणकारी यंत्रणा कीती भक्कम होती व आहे, याचे ते यथार्थपणे विश्लेषण करतात-
‘‘….. 1196 मध्ये प्रथमच मुस्लीम आक्रमक सत्ताधारी भारतात आले. पण मनूच्या पिळवणूकीच्या यंत्रावर गावापासून ते सत्तेच्या केंद्रापर्यंतची सोन्याचा धूर काढणारी यंत्रणा तशीच राहीली. किंबहुना या यंत्रामुळे एकत्रित होणार्या संपत्तीवर कब्जा करण्यासाठी एकामागोमाग एक नवे नवे सत्ताधारी भारतात आलेत……. त्यांचा सामाजिक समज वेगळा व अधिक समतावादी होता. पण मनूच्या पिळवणूक यंत्रात ते खिळे मोळे बदलले जाते तसे बदलले गेले…..’’ (पान-13)
मुस्लीम, शक, हुण आदि आक्रमक हे सरंजामशाहीचेच अपत्य असल्याने त्यांनी भारतीय मनूच्या शोषण यंत्रणेत स्वतःला सहजपणे सामावून घेतले. मनुवाद्यांनीही नाइलाजाने तडजोड करीत दुय्यम स्थान स्वीकारीले व आपले शोषणकारी यंत्र सुरू ठेवले.
परंतू उदारमतवादी व भांडवली लोकशाहीवादी इंग्रज आल्यावर मनूचे यंत्र नव्या पुरोगामी वर्गव्यवस्थेतही कसे मजबूत टिकून राहीले, याचे विवेचन दिघे पुढीलप्रमाणे करतात –
‘‘साहजिकच या स्थितीत देशातील नव्या वर्ग रचनेची व शासन यंत्रणेची वरिष्ठ वर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तोंडावळ्याची रचना तयार झाली.
शूद्र कामगार वर्गात ढकलले गेले, ब्राह्मण बनिया भांडवलदार झालेत.’’
(पान-27) (जाड ठसा माझा)
इंग्रजांनी लादलेल्या अर्धवट औद्योगिक क्रांतीतून भारतात वर्ग निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतू हे नवे वर्ग आधीची कालबाह्य झालेली जातीव्यवस्था मोडीत काढीत नाहीत, तर जातीच्याच पोटात ‘वर्ग’ आकार घेत होते. युरोपमध्ये जुनी कालबाह्य सरंजामी व्यवस्था मोडीत काढण्यातून नवा पुरोगामी भांडवलदार वर्ग व नवा क्रांतीकारी कामगारवर्ग निर्माण झाला. त्यासाठी तेथील नव-सत्ताधारी भांडवलदारांनी महाप्रबोधनाची रेनेसॉन्स मुव्हमेंट राबविली. जुनी व्यवस्था नष्ट करण्यासाठी कायदे केलेत व नवी मानवी मुल्ये प्रस्थापित केलीत. हा क्रांतीकारी वारसा घेउन इंग्रज भारतात आलेत, सतिप्रथाबंदी, बालविवाहबंदी वगैरे सुधारणा करण्यासाठी कायदेही केलेत. राजाराम मोहन रॉय सारख्या समाजसुधारकांना व तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या जात्यंतक क्रांतीकारकांना इंग्रजांनी प्रोत्साहन व संरक्षणही दिले.
परंतू 1857 साली भट-पंड्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सरंजामदारांच्या उठावामुळे ब्रिटिशांनी समाजसुधारणेच्या कार्यातील आपला सहभाग कमी केला. ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार काढून घेत राणीने नवा जाहीरनामा प्रसिद्ध केला. धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे अभिवचन देत राणीने सरंजामी संस्थानिकांना स्वातंत्र्य बहाल केले. याचेच प्रतिबिंब पुढे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेतही उमटले. दिघे लिहितात-
‘‘स्वातंत्र्य चळवळीत कॉंग्रेसची सुरूवातच मुळी प्रतिष्ठीत नागरिकांची हक्क मागणारी संघटना अशी होती. यात मुख्यतः ब्राह्मण वैश्य, गुजराथी, फारसी अशी मंडळी होती. लोकमान्य टिळाकांनी जहाल राष्ट्रवादाचा पुरस्कार केला पण ते कुणबी बलुतेदारांना हक्क देण्याच्या विरोधात होते….’’
(पान-28) (जाड ठसा माझा)
पारंपरिक वर्गवादी ब्राह्मणी कम्युनिस्ट पक्षाच्या भुमिकेशी कॉ. दिघे फारकत घेतात. हेच सत्य (1971-78) कॉ. शरद पाटलांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात असतांना जाहिरपणे मांडले व त्यांना हकालपट्टीची शिक्षा मिळाली. कॉ दिघे लाल निशाण पक्षात असल्याने तेथे सत्य मांडणार्याचे स्वागत केले जाते व लोकशाही पद्धतीने चर्चाही होते. कॉ. दिघे भारतीय इतिहासाची मांडणी ब्राह्मणी-अब्राह्मणी अशी बहुप्रवाहवादी करतात, हे त्यांचे फार मोठे धाडस म्हटले पाहीजे.
पारंपरिक मार्क्सवादाशी तात्विक फारकत घेण्यासाठी त्यांनी केलेली ही अभ्यासपूर्ण मांडणी नव्या पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.
मात्र जात्यंताची मांडणी करतांना पुन्हा ते शूद्ध वर्गलढ्याचाच आग्रह धरतात, ही त्यांची फार मोठी मर्यादा या पुस्तकात स्पष्टपणे दिसते.
लाल निशाण पक्षाच्या मध्यवर्ती समितीने केलेल्या ठरावात ही विसंगती स्पष्टपणे दिसते.
पान नंबर 46 वर ‘‘शारिरिक कष्टाची कामे ब्राह्मण बनिया करतांना दिसत नाहीत, असे ठळकपणे लिहीणारे कॉ. दिघे त्यासाठी डॉ. बाबा आढावांचाही संदर्भ देतात. इंग्रज काळात ब्राह्मण बनिया भांडवलदार झालेत व शूद्र कामगारवर्गात ढकलले गेलेत, असेही ते पान नंबर 27 वर स्पष्टपणे लिहीतात.
मात्र पक्षाच्या मध्यवर्ती ठरावात या जात्यंतक मांडणीला छेद दिल्याचे स्पष्ट दिसते. ठराव म्हणतो-
‘‘परंतू बहुसंख्य जातींची नेमून दिलेली कार्ये नष्ट झालेली आहेत.अशा स्थितीत या जाती पायास्वरूपात शिल्लक नसून इमला स्वरूपात शिल्लक आहेत. म्हणजे उच्च निच्चतेच्या कल्पनेत शिल्लक आहेत. अशा स्थितीत या बंदिस्त कप्प्यामध्ये असणार्या अवशेषांवर हल्ला करावा लागेल हे स्पष्ट आहे.
भांडवली लोकशाही क्रांतीच्या कार्याचा हा भाग आहे’’
(पान-54) (जाड ठसा माझा)
हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी ते कुंभाराचे उदाहरण देतात-
‘‘जात जन्मसिद्ध असते.जातीत जन्मलेली व्यक्ती त्या उत्पादक वर्गात जमा होते.अशा अर्थाने ती पूर्वी पायाचा भाग होती. तर आता ती व्यक्ती जन्मतः कुंभार म्हणून ओळखली जाईल.कुंभार पोट वर्गात (बलुतेदार) प्रत्यक्ष सहभाग राहणार नाही. म्हणजे हे वैशिष्ट्य पाया स्वरूपात नष्ट झालेले आहे पण आधी वर्णीलेल्या इतर बाबी या इमल्यात सहभागी आहेत, त्या नष्ट झालेल्या नाहीत.’’
(पान-53)
जात म्हणजेच वर्ग ?
‘‘जात म्हणजेच वर्ग व वर्ग म्हणजेच जात’’ असे म्हणत जातींना अवशेष मानण्याची व त्यांना पुन्हा ईमल्यात ढकलण्याची जी चूक पारंपरिक ब्राह्मणी कम्युनिस्टांनी केली व करीत आहेत, तीच चूक लाल निशान पक्ष करीत आहे. कम्युनिस्टांच्या या चूकीची शिक्षा काळ त्यांना आजच देत आहे. पश्चिम बंगालामध्ये 34 वर्षांचे प्रदिर्घ सातत्य ठेवत ज्या बॅनर्जी, चटर्जी, द्वीवेदि, त्रिवेदी, बंदोपाध्यायांनी क्रांतीकारी(?) कम्युनिस्ट पक्षाची सत्ता भोगली, तेच बॅनर्जी, चटर्जी, द्वीवेदि, त्रिवेदी, बंदोपाध्याय आता ‘जयश्रीराम’च्या घोषणा देत भाजपाची सत्ता आणण्यासाठी धडपडत आहेत.
जातिव्यवस्थेची जी सहा लक्षणे (पान-52) कॉ. दिघे देतात, त्यातील पायाभूत जातीय उत्पादनसंबंध नष्ट झालेत काय? म्हणजे गावाकडचा कुंभार हा उच्चवर्गात सोडा, मध्यमवर्गात तरी गेला का? मंडल आयोगाची अंशतः झालेली अमलबजावणी अजून त्याला प्रशासनात कारकूनही करू शकलेली नाही.
इंग्रजांच्या अर्धवट औद्योगिक क्रांतीमुळे मडक्याची भांडी जाऊन स्टेनलेस स्टीलची भांडी आली. त्या स्टीलच्या भांड्याचे कारखानदार एकतरी कुंभार-लोहार-तांबोळी आहे काय? भारतात जमिनीचे फेरवाटप अजून व्हायचे आहे, त्यामुळे जुने सरंजामी संबंध आजही कायम आहेत. अर्धवट औद्योगिक क्रांती व खाऊजा धोरणामुळे तो कुंभार भांडी-उत्पादनव्यवस्थेतून बाहेर ‘आला’ नाही, तर तो बाहेर ‘फेकला’ गेला आहे. एरवी भांडवली औद्योगिक क्रांती पूर्णपणे झाली असती तर तो भांडी उत्पादनव्यवस्थेतील ‘जात-मालक’ न राहता ‘वर्ग-मालक’ म्हणून ‘बाहेर आला’ असता.परंतू अर्धवट औद्योगिक क्रांतीमुळे तो ‘बाहेर फेकला’ गेला. तो आता ‘जात-मालक’ न राहता ‘जात-मजूर’ वा ‘जात-वेठबिगार’ झालेला आहे. म्हणजे जातीव्यवस्थेच्या गर्तेत अधिक फसला आहे. त्याला तुम्ही मजूर या अर्थाने ‘शूद्ध-मजूरवर्गीय’ म्हणू शकता का? म्हणजे आज त्याची ‘कुभार-जातही अस्तित्वात आहे व त्याचे ‘कुंभार-मजूर’ म्हणून होणारे शोषणही अस्तित्वात आहे. आणी हे कुंभार-मजूर म्हणून होणारे शोषण अधिक तीव्र व अधिक जीवघेणे आहे, कारण ते शोषण केवळ जातीय नाही, तर ‘जातीय-वर्गीय’ (दुहेरी) आहे. त्याची ही नवी मजूर अवस्था ‘जात-वर्ग’ व्यवस्थेमुळे झालेली आहे, शूद्ध वर्ग-व्यवस्थेमुळे नाही. त्या कुंभाराला पूर्ण मुक्ती मिळवून देण्यासाठी (वर्गीय) भांडवली लोकशाही क्रांतीचा कार्यक्रम उपयोगी नाही, तर कॉ. शरद पाटील सांगतात त्याप्रमाणे ‘‘जात्यंतक’’ भांडवली लोकशाही क्रांतीचा कार्यक्रम आवश्यक आहे.
आपल्या शत्रूची जातकूळी शूद्ध जातीय असती तर त्याने जातीव्यवस्थेच्या पुनरूज्जीवनासाठी केवळ ‘जातीय’ कार्यक्रम हाती घेतला असता. म्हणजे त्याने फक्त जातीय आरक्षण रद्द करणे, लॅटरल एंट्रीने प्रशासनात ब्राह्मण वर्चस्व कायम ठेवणे, वर्ण-वर्चस्वासाठी राममंदिर बांधणे, कर्नाटकच्या संघ-भाजपा सरकारने ब्राह्मण पुरोहितासाठी ‘खास’ हिताचे कायदे करणे, ‘ब्राह्मण म्हणून मुलाहिजा करणारच’ या नावाचे नवे विधेयक पार्लमेंटमध्ये मंजूर करून घेण्यासाठी धार्मिक पार्श्वभूमी तयार करणे, काश्मिर-प्रश्न वगैरे यासारखे जातीय-प्रतिक्रांतीचेच कार्यक्रम हाती घेतले असते. परंतू आपला शत्रू केवळ तेवढेच करून थांबत नाही तर तो वर्गीय प्रतिक्रांतीचेही कार्यक्रम हाती घेत आहे. संविधानातले कामगारवर्गाच्या हिताचे सर्व (21) कायदे रद्द करून ‘पेशवाई काळातील वेठबिगारीचे पुनर्रूज्जीवन’ करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. भांडवलदार-मक्तेदारांना कामगारांच्या तीव्रतर शोषणाचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. शेतकरीवर्गाच्या हिताचे कायदे रद्द करून नव्या तीन कायद्यांच्या माध्यमातून त्यांना कूळ-दास बनविणे व पुन्हा नव्याने ब्राह्मण-वैश्य जातीतून ‘जमिनदार-वर्ग’ निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. बलात्कार-पिडित स्त्रियांना जेलमध्ये टाकून बलात्कार्याला संरक्षण देणे, बलात्कारपिडिताला न्याय देण्याऐवजी तीला बलात्कार्याशीच लग्न लावायला सुप्रिम कोर्टाने भाग पाडणे (डॉ. आ.ह. साळुंखे लिखित- तुळशीचे लग्न), स्त्रीया व अस्पृश्यांना मंदिरबंदीचा आग्रह धरणे, यावरून आपल्या शत्रूची जातकूळी केवळ जातीय नाही, केवळ वर्गीय नाही व केवळ स्त्रीदास्यवादीही नाही. आपल्या शत्रूची जातकूळी अगदी स्पष्टपणे ‘‘जात-वर्ग-स्त्रीदास्यवादी’’ आहे, आणि म्हणून या तीन पायांच्या शत्रूशी लढण्यासाठी आपल्याला स्पष्टपणे ‘जात-वर्ग-स्त्रीदास्यांतवादी’ भुमिका व कार्यक्रम घेऊनच क्रांतीच्या रणांगणात उभे राहावे लागेल.
अर्थात लाल निशाण पक्षाने श्रमिक ओबीसी महासंघ स्थापन करून त्यामार्फत 13 फेब्रुवारी 2021 रोजी कोल्हापूरात ओबीसी सक्षमिकरण परीषद घेऊन ‘जात्यंतक’ भांडवली लोकशाही क्रांतीच्या दिशेने स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. या पावलांची संख्या वाढेल व देश जात्यंताच्या महामार्गावर लवकर गतीशील होईल, त्यात या पुस्तकाचे भरीव योगदान निश्चितच राहणार आहे, यात शंका नाही.
(लेखनः 11मार्च2021….प्रकाशनः 21मार्च21,दै. बहुजन सौरभ)
पुस्तक समिक्षकः प्रा. श्रावण देवरे 94 227 88 546
पुस्तकाचे नावः शत्रूची जातकुळी काय?
लेखकः– कॉ. अतुल दिघे (मोबाइलः 98 224 31 996)
पाने- 72, किंमतः रू. 40 मात्र
हे ही वाचा.. आधुनिक भारतातील ‘शैक्षणिक क्रांती’चा दस्ताऐवज
हे ही वाचा.. पुस्तक मोफत वाचा – काश्मीरबाबतच्या कलम ३७० ची कुळकथा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 07, 2021 20 : 13 PM
WebTitle – Caste is class and class is caste is the mistake of Brahmin communists – Shravan Deore 2021-04-07