‘बुद्ध, पर्यावरण व आजचा महाविद्यालयीन तरुण’ या लेखातील चर्चाविश्वात अजून भर टाकण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न.
सर्वप्रथम तर विशाल चे अभिनंदन आणि आभार. एका नाविन्यपूर्ण विषयाच्या चर्चेची सुरवात वाचकांना त्याने करून दिली आहे. ‘बुद्ध आणि पर्यावरण’ या विषयाला सहसा कोणी हात घालत नाहीत. बुद्ध म्हटलं कि काही क्लिशे नेहमीच डोळ्यासमोर येतात. त्या क्लिशे मधून बाहेर काढण्याचा आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचं नवीन अंग लोकांसमोर आणण्याचं काम केलाय विशालनी.
रोहिणी नदी पाणी वाटप
बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक जोपर्यंत बाबासाहेबानी लिहिलं नव्हतं तोपर्यंत बुद्ध म्हणजे ‘एक राजपुत्र जो आजार, वृद्धापकाळ आणि मृत्यू पाहून घर सोडून गेला आणि प्रज्ञा मिळवली’, ‘ रोहिणी नदीच्या पाणी वाटपाव रून शाक्य आणि कोलीय (कोळी ) गणसंघामध्ये झालेला वाद आणि त्यावर होणार नरसंहार थांबवणे हा उद्देश्य मनामध्ये ठेवून,
वैचारिक परंपरा
शाक्य गणसंघाच्या सभेच्या प्रोटोकॉल प्रमाणे सिद्धार्थाने गृहत्याग केला’ ही थेअरी आचार्य कोसंबी यांच्या ‘बोधिसत्त्व’ नाटकामध्ये आणि बाबासाहेबानी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथात मांडली. थोडक्यात त्याच त्याच चालत आलेल्या क्लिशे मधून बुद्धाला या धम्माच्या दोन गाढ्या अभ्यासकांनी बाहेर काढलं. ‘बुद्ध आणि पर्यावरण’ हा विषय एक त्यातलाच प्रकार आहे असे मी मानतो.
मुळात बुद्ध हा त्याच्या तत्कालीन समाजव्यवस्थेचा आणि सामाजिक नीतिमत्तेच्या द्वंद्वातून उदयाला आलेला एक विचार होता. तो न तश्या द्वंद्वात्मक पद्धतीचा पहिला विचारवंत होता ना हि शेवटचा. बुद्धच वेगळेपण हे त्याच्या कठोर आत्मटिकेतून तयार झालेल्या वैचारिक शिस्तीमध्ये आणि ते विचार लोकसामान्यांच्या भाषेत पोहोचवण्याच्या कलेत मिळते.
एकीकडे शब्दप्रामाण्य मानणारी वैचारिक परंपरा आणि दुसरीकडे तर्कशुद्ध आत्मटीकात्मक ‘खंडण – मंडण’ पद्धतीची वैचारिक परंपरा. या दोन्ही परंपरा प्राचीन जगापासून ते सद्यपरिस्थिती मध्ये पण जिवंत आहेतच.कालौघात एक परंपरा दुसरीवर जड पडून लोकमानाचा ताबा घेते.
अर्थात हा ताबा घेणे त्या वैचारिक परंपरेच्या कावडी ज्यांच्या खांद्यावर आहेत त्यांच्यावर खूप अवलंबून असतात. रोमिला थापर याला ‘ब्राह्मणी वि. श्रमणी’ परंपरा असे नाव देतात. ज्यामध्ये ग्रंथांचे शब्दप्रामाण्य (खास करून वेदपुराणांचे ) एकीकडे तर तर्काधिष्टित इहलोकीच्या प्रश्नांचे आकलन दुसरीकडे आहे.
बौद्ध तत्वज्ञान जे बुद्धापासून उगम होऊन दिग्नाक,धम्मकीर्ती, नागार्जुन, अश्वघोष, वारकरी विचार, आचार्य कोसंबी, आंबेडकरी विचारप्रवाह ते कॉ शरद पाटीलांपर्यंत आले आहेत, ते याच श्रमणी वैचारिक परंपरेचा भाग आहेत.
बुद्ध आणि पर्यावरण
या श्रमणी परंपरेच्या चर्चाविश्वातच “मनुष्य आणि पर्यावरण” हा विषय मोडतो. केवळ झाडफूले, नदीनाले, सूर्यसमुद्राला दैवत्व देऊन कर्मकांडाने त्याची पूजा करण्याचा बेगडीपणा नाकारून, ‘परस्परावलंब’ या संकल्पाने भोवती पर्यावरणीय परिवेशात बौद्ध तत्वज्ञान फिरते.
मनुष्यप्राणी हा इथल्या नैसर्गिक व्यवस्थेचा एक भाग आहे आणि या व्यवस्थेमधल्या इतर गोष्टी त्याच्याइतक्याच महत्वाच्या आहेत हे बौद्ध तत्वज्ञानाने कायम सूचित केले आहे. अर्थात हि वैचारिक मांडणी निसर्गाच्या दैववादी किंवा रोमँटिसिसम मधून आलेली नाही.
तत्कालीन समाज, मनुष्य, आणि नैसर्गिक संसाधनाची न्याय्य सांगड घालून जे समन्यायी आहे ते आहे परस्परावलंबन.
‘नदीचे पाणी’ यासारख्या मर्यादित नैसर्गिक संसाधनासाठी स्पर्धा व त्यातून संघर्ष आणि त्याचा हिंसेत होणार परिपाक नको म्हणून सिद्धार्थाने गृहत्याग केला.
याचाच अर्थ जे जे नैसर्गिक आहे त्यावर आपल्या प्रमाणेच इतर सजीव अवलंबून आहेत हा विचार त्यावेळी समाजमानामध्ये आणि पर्यायाने सिद्धार्थामध्ये रुजला होता, भलेही तो त्यावेळचा प्रभावी विचारप्रवाह नसेल.त्याचबरोबर जे काही आपल्या कुटुंबासाठी, गणांसाठी, गणसंघासाठी लागते ते क्षत्रिय प्रवृत्तीने प्रसंगी हिंसा करून मिळवावे हा पण विचार त्यावेळी समाजात दिसून येतो.
बुद्ध पर्यावरण
टाळता येणारी हिंसा सिद्धार्थाने गृहत्याग करून टाळली. त्यानंतर त्याला प्रश्न पडला कि या अश्यागोष्टींचे अर्थात ‘दुःखाचे’ कारण काय? यामध्ये सिद्धार्थावर तर्कशुद्ध वैचारिक मांडणी असलेल्या श्रमणी विचारांचा प्रभाव जाणवतो. इहलोकातील प्रश्नांवर विचार करून त्याच्या उत्तरासाठी सिद्धार्थाइतका इतके कष्ट घेणारा या पृथ्वीतलावर कदाचितच झाला असावा.
बौद्ध तत्वज्ञानात ‘निसर्ग’ हा मानवी क्रियांचा मध्यबिंदू ठेवलेला आढळतो. त्याच्या अंगाभोवतीच धम्माचे तत्वज्ञान जातक कथांमधून फिरते. बोलके प्राणी हे दुसरे तिसरे काही नसून मानवी प्रवृत्तीचे प्रतिनिधी आहेत. एवढेच नव्हे तर बुद्ध विचारांची नाळ हि सरळ सरळ भूमीशी आणि भूमिपुत्राशी जुळते.
दर पाच वर्षांनी आपली संपत्ती दान करणारा हर्षवर्धन
मानवाचं माणूसपण हे शेती विकसित झाल्यानंतर आलं. या शेतकरी आणि शेतीप्रधान समाजव्यवस्थेला शोषणमुक्तीकडे नेणारा बौद्ध विचार खरा मार्गदाता होय. मज्जामिका मार्ग आणि पंचशील हे त्यावेळच्या शेतीप्रधान व्यवस्थेलाच अनुसरून आहेत हे खरंतर ठळकपणे जाणवतं. कितीतरी कथा या बुद्ध आणि शेतकरी यांच्यामधील संवादाच्या आहेत.
शेतकरी आणि कारागीर जनतेच्या कल्याणचे राज्य असावे हा उपदेश राज्यकर्त्यांना, आणि अतिविलासाची हाव किंवा अतिश्रमणाचा आत्मक्लेश त्यातून मध्यम मार्गाचा रस्ता जनतेला, बौद्ध तत्त्वज्ञानाने दाखवला. याच वैचारिक परंपरेतून जी राज्ये आणि राज्यकर्ते निर्माण झाले ते लोककल्याणकारी आणि जनता/रयत होती ती ‘परस्परावलंबी’ होती.
मग तो सम्राट अशोक आणि त्याच्या शिलालेखात दिलेले पशुवैद्यक नीती असो, दर पाच वर्षांनी आपली संपत्ती दान करणारा हर्षवर्धन असो किंवा याच तत्वज्ञानाचा आत्मा आणि वारकरी विचाराचा देह घेऊन घडलेलं स्वराज्य असो. ते सुखी आणि नैतीकरित्या समृद्ध रयतेचे नसावे तर नवलंच.
नैसर्गिक संसाधनासाठी गळेकापू स्पर्धा
आज निसर्गाशी सगळ्यात जवळचे नाते असणारा शेतकरी थंडीत रस्त्यावर बसलेला आहे. मोठमोठे देश खनिजतेलाच्या हव्यासापायी संपूर्ण इकोसिस्टिम नष्ट करत आहेत. हवामान बदल आणि जागतिकतापमानवाढ पुरावे असूनसुद्धा सरळ सरळ नाकारली जातीये. समुद्राच्या तळापर्यंत मानवाचे यांत्रिक हात गेलेत.
या सर्व उठाठेवीमागे केवळ एकमात्र उद्धेश आहे तो म्हणजे मर्यादित ‘नैसर्गिक संसाधनासाठी गळेकापू स्पर्धा’. हि स्पर्धा सिद्धार्थाच्या वेळी भौगोलिक परिकल्पनेत जरी मर्यादित असली तरी आज ती अखंड पृथ्वीचं नव्हे तर अंतराळपण व्यापून टाकते आहे.
बौद्ध तत्वज्ञान आणि श्रमण परंपरा
या स्पर्धेमागचे उद्दिष्ट काय तर ‘ वधारलेले मानवी जगण्याचे माप ( एलेवेटेड स्टॅंडर्ड ऑफ लिविंग )’.
पण आज जिथे उन्हाळ्यात थंडी, पावसाळ्यात ऊन, आणि हिवाळ्यात ढगफुटी होत असेल तिथे खरंच स्टॅंडर्ड ऑफ लिविंग वाढलाय का?
सिद्धार्थाने यावर आयुष्य खर्ची घालून आपल्याला याचे उत्तर ‘मध्यम मार्गात’ दिलंय.
आपल्याही ते नेणिवेत आहे फक्त त्यासाठी बुद्धी थोडीशी झटकण्याची गरज आहे.
बौद्ध तत्वज्ञान आणि श्रमण परंपरेचे विचार हे मानवाला निसर्गाच्या मांडीवर लाडिक शिशुसारखे खेळायला लावतात
तर पाश्चिमात्य प्रोटेस्टंट भांडवलशाहीतून आलेले विचार हे निसर्गाला मानवाची बटीक बनवतात.
ब्राह्मणी वैचारिक परंपरा निसर्गाला तकलादू दैवरूप देते
जेव्हा कि ब्राह्मणी वैचारिक परंपरा निसर्गाला तकलादू दैवरूप देऊन इहलोकीच्या प्रश्नाऐवजी परलोकी परमार्थात गुंततीये.
या जगातील पर्यावरणीय समस्या या इथल्याच क्रियाकृतींचे फळ आहेत.
आजपावेतो चुकीच्या विचारांचा पगडा मानवी मनावर होता म्हणून या समस्या उगवल्या.
या समस्या वैयक्तिक विचारपरिवर्तनातून एका दीर्घ चळवळीने सुटतील.
पर्यावरणाच्या अतिशोषणामुळे शेवटी मानवी दुःखे हि वाढणारच आहेत.
अंततः मूठभरलोक हे त्या संसाधनाच्या मालकीमुळे इतरांना गुलामी दारिद्र्यात ढकलनार आहेत.
पर्यावरण आणि निसर्ग यावर सर्व सजीवांचा सामान हक्क आहे
हा विचार व्यक्तिपातळीवर पटला तरच धोरणात्मक बदल होऊन या समस्यांवर उपाय निघेल.
हा वैचारिक बदल बौद्ध तत्वज्ञानाने नक्कीच येऊ शकेल.
समाधान वर्गीय असू शकत नाही
काहीलोक बौद्ध तत्वज्ञानाला किंवा श्रमण परंपरेला धर्मनिरपेक्षता किंवा टोकाच्या वस्तुनिष्ठ विज्ञानवादाच्या कसोटीवर नाकारतात.
यावर माझे मत असे आहे कि, विज्ञानवादाला (प्रज्ञा ) जर शुद्ध हेतू/विचार ( शिल )
आणि अखंड भूतदया ( करुणा ) याची जोड नाही मिळाली तर तो विनाशकारी ठरतो.
यासाठी विज्ञानाला तत्वज्ञानाची पक्की बैठक लागतेच.काही मार्क्सवादी मित्र ‘पर्यावरण’ या विषयवार वर्गीय संघर्षाची मांडणी करतात,
ती मांडणी जरी बरोबर असली तरी त्याचे समाधान हे वर्गीय असू शकत नाही.
विविध भौगोलिक परिस्तिथी,संस्कृती, संसाधने इ.मध्ये मार्क्सचा वर्गीय एकजिनसीपणा आणणे हे नैतिक अधिष्ठानाशिवाय शक्य नाही.
बुद्धाला वाचण्यासाठी तुम्ही दीक्षाच घेतली पाहिजे असे काही नाही
हे नैतिक अधिष्ठान सद्यस्थितीला बौद्ध तत्वज्ञान देऊ शकते.
या तत्वज्ञानातून माणसाच्या नैतिकतेत बदल झाला कि सातासमुद्रापलीकडे असणाऱ्या
त्याच नैतिकतेच्या माणसाशी वैचारिक गाठ जुळून बदल घडण्यास सुरवत होईल.
थोडा वेळ लागेल पण बदल होईल, तो हि शांततापूर्ण सहचरणाच्या मार्गाने !
कोणत्या कारणाने माहित नाही पण बौद्ध तत्वज्ञान किंवा बुद्ध वाचायचे म्हंटले कि अनेक तरुणमित्र कचरतात. कदाचित पूर्वाश्रमीच्या “अस्पृश्य” समाजाने शिवला म्हणून कि काय हि अनुत्सुकता असावी .पण मित्रहो बुद्धाला वाचण्यासाठी तुम्ही दीक्षाच घेतली पाहिजे असे काही नाही.
शोषणमुक्ती
तो स्वतःला धर्मसंस्थापक म्हणवत नाही, तर मग धर्माचा विषय येतोच कुठे?
तो देव किंवा देवाचा अवतार नाही त्यामुळे त्याचा शब्द आणि उपदेश हे अंतिम नसून मुक्तीच्या वाटेवरचे मैलाचे दगड आहेत.
तिथे थांबून तुम्ही तुमची वाट सुद्धा चोखाळू शकता.
एकदा का तुम्ही तुमच्या अंतिम ध्येयाकडे पोहोचलात कि मग इतरांना हि मैलाचा दगड बनून मार्ग दाखवा.
त्याचा उपदेश हा कोणाच्या धर्मांतरासाठी नसून शोषणमुक्तीसाठी आहे.
खुद्द बुद्ध म्हणतो कि माझ्या नावरूपी धम्मातून दुःखाची नदी ओलांडून जा, एकदा का पलीकडे गेलात कि ती नाव इकडेच सोडून द्या.
तुम्ही बुद्धाशी वाद घाला, त्याला वाचा, त्याच्यावर लिहा , त्याचे शब्द नव्याने शोषणमुक्तीसाठी मांडा.
तुमच्या प्रज्ञेला सतत प्रज्वलित करत राहा, त्या प्रज्वलनाचा भडका न उडता उजेड पडून इतरांना मार्ग दिसावा
यासाठी बुद्ध तुम्हाला शिल आणि करुणेची ओंजळ त्या प्रज्ञेभोवती ठेवायला नक्कीच लावेल.
या अंती जो अहिंसक समन्याय्यी वाटपातून समाज तयार होईल तो दुःखमुक्त नक्कीच असेल.
टीप : प्रस्तुत लिखाणातील मते हि अंतिम नाहीत, ज्यांना यामध्ये अजून काही मांडणी, विवाद आणि चर्चा करायची असल्यास नक्की करावी.
अगोदरचा लेख शृंखला – गौतम बुद्ध – एक निसर्गवादी : बुद्ध आणि आजचा महाविद्यालयीन तरुण
हेही वाचा… भगवान बुद्धांचे दोन महत्वाचे संदेश
हेही वाचा…सिद्धार्थ यशोधरेला सोडून गेला होता का ?
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)