गौतम बुद्ध – एक निसर्गवादी
मी तेवीशीचा महाविद्यालयीन युवक. या विशी-तिशीच्या काळात बरेच मतप्रवाह, विविध विचार, व्यक्तीमत्वं, तत्वज्ञानाच्या शाखा, परस्परविरोधी मतमतांतरं इत्यादी बरंच काय काय आपल्या मेंदूवर येऊन आदळत असतं.त्यातून आपली काही मतं बनत असतात. हा प्रवास सतत चालणारा असतो, प्रवाही असतो. अशावेळी आपली मतं ठाम असणं मला उथळ किंवा मूर्खपणा वाटतो. आपल्या वाचनातून, निरीक्षणातून, चिंतनातून, चर्चेतून ही मतं जागोजागी बदलत जातात, एखाद्या विषयाचे वेगवेगळे पैलू लक्षात येत जातात. त्यामुळे मला असं वाटतं की आपली मतं ‘अठाम’ असलेलीच बरी.
तर, तीन वर्षांआधी आंबेडकरांचं ‘भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म’ वाचलं. त्यामध्ये गौतम बुद्धाबद्दल काही गोष्टी नव्याने कळत गेल्या. काही गैरसमज दूर झाले. बौद्ध तत्वज्ञानाची खोली उमजत गेली. त्यांतले बारकावे समजत गेले. अजुन इतर काही गोष्टी वाचायला लागलो.
” गौतम बुद्ध आणि त्याचा पर्यावरणीय विचार” किंवा
” गौतम बुद्ध – एक निसर्गवादी ”
अशा अंगाने कोणी काय मांडणी केली आहे, याची मला कल्पना नाही पण मला मागच्या तीन वर्षात बुद्ध वाचताना, बुद्धाबद्दलच्या दंतकथा वाचताना, बुद्धाबद्दलच्या लोककथा वाचताना आणि निसर्गवाद/पर्यावरणवाद ही संकल्पना समजून घेताना काही गोष्टींची नव्याने समज आली. काही गोष्टींचे ‘कनेक्टिंग डॉट्स’ कळले. त्यामुळे हा लेखप्रपंच.
सिद्धार्थ गौतम ‘अंतिम ज्ञानप्राप्ती’ च्या उत्कट आशेने विविध मार्गांची चाचपणी करत होता. सर्वात आधी तो भृगू ऋषींना भेटला. त्यांनी त्याला तपस्येचे विविध प्रकार शिकवले. तपस्येच्या मार्गाने मोक्षप्राप्ती हाच त्यांचा अंतिम उद्देश होता. परंतु सिद्धार्थ गौतम त्यांना नम्रतेने म्हणाला, “मला अंतिम मोक्ष, मरणोत्तर मुक्ती नको असून मला याच जीवनातील भौतिक दुःखांचे मूळ कारण हवे आहे.” तेथून निघून मग तो आलारकालाम/आळारकाळाम या सांख्य तत्त्वज्ञानाच्या ऋषीला भेटला. त्याने त्याला ध्यान मार्गातल्या तीन पद्धती आणि एकूण सात पायऱ्या शिकवल्या. त्यात आनापान, प्राणायाम आणि समाधी या पद्धती येतात.
मग नंतर उद्दक रामपुत्ताने बुद्धाला आठवी पायरी शिकवली. त्यानंतर बुद्धाने गयेला जाऊन वैराग्य मार्गाची कसोटी अवलंबायला सुरुवात केली. ही कसोटी भयंकर उग्र असून त्यात त्याने आत्मक्लेशाचा अवलंब केला. कधी फक्त ओंजळभर धान्य, कधी फक्त वाटीभर पीठ, तेही दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा किंवा पंधरवड्यातून एकदा भोजन करणे. कधी फक्त पाण्यातल्या वनस्पती, तांदळाची पेज किंवा धान्याचं पीठ असायचं. नंतर नंतर तर ही तपश्चर्या इतकी उग्र होत गेली की सिद्धार्थ गौतम एखादी शेंग, तीळ-तांदूळ अशा गोष्टींवर पोट भरू लागला. ही आत्मक्लेशाची परिसीमा होती.
सतत आणि सलग सहा वर्ष सिद्धार्थ गौतमाची ही घोर तपश्चर्या सुरू होती. एक वेळ तर अशी आली सिद्धार्थ गौतमाचं शरीर अत्यंत क्षीण झालं. तो जेव्हा पोटाला हात लावायचा तेव्हा त्याच्या हाताला पाठीचा कणा लागायचा.
…बरं एवढं सगळं करूनही सिद्धार्थ गौतमाला ज्ञान मात्र प्राप्त होत नव्हतं. मनुष्याच्या दुःखाचं, दैन्याचं अंतिम कारण काय आहे, हे त्याला अजूनही समजलं नव्हतं. अशा आत्मक्लेशाने आपला लवकरच मृत्यू होईल, याची त्याला जाणीव झाली. त्याने ठरवलं शरीराला त्रास देऊन ज्ञानप्राप्ती होणार नाही. त्यामुळे आधी शरीराच्या प्राथमिक गरजा पूर्ण करूयात, मग चिंतनाच्या मार्गाने प्रत्येक गोष्टीच्या मूळापर्यंत जाऊन ज्ञानप्राप्ती होते का ते बघुयात. मग त्याने सुजाताच्या दासीने आणून ठेवलेलं सुग्रास अन्न शांतपणे ग्रहण केलं. काही काळ शांत बसला. त्यानंतर पुढची दिशा स्पष्ट झाल्यावर चाळीस दिवस पुरेल इतकं अन्न जमा करून तो एक पिंपळाच्या झाडाखाली दीर्घ चिंतनाला बसला.
आता गौतम चिंतनाला बसला खरा पण त्याच्यासमोरच्या अडचणी संपल्या नव्हत्या. ज्याप्रमाणे हिंदू धर्मात प्राचीन काळी ऋषीमुनींच्या तपश्चर्येत राक्षस, असुर लोक (किंवा मग देवराज इंद्र) विघ्न आणत असत अगदी त्याचप्रमाणे अत्यंत महाभयंकर असा ‘मार’ (mara) नावाचा राक्षस आपल्या विशाल सैन्यानिशी गौतमाला त्रास द्यायला उभा ठाकला. पाली भाषेतील बौद्ध साहित्यात या माराचा खूपदा उल्लेख आलाय. तर मग माराने आपल्या सैन्याला गौतमावर आक्रमण करायला सांगितलं. गौतम तपश्चर्या करत करत त्यांच्याशी लढत होता.
‘मार’ आपले “एक से बढकर एक” पराक्रमी आणि क्रूर योद्धे गौतमावर हल्ले करायला पाठवत होता. सिद्धार्थ गौतम कितीही काय भारी असला तरी तो एकटा होता. समोर सैन्य महाबलवान आणि संख्येनेही जास्त होतं. लढून लढून, हल्ले परतवून त्याला थकवा जाणवायला लागला. बरं अजुन तर स्वतः राजाधिराज मार मैदानात उतरलाही नव्हता. आधीच प्रचंड थकलेल्या सिद्धार्थाला त्याने क्षणात हरवले असते. ज्ञानप्राप्तीही झाली नसती. गौतम काळजीत पडला.
काय करावं, काय करावं, काय करावं….!!
पण सिद्धार्थ गौतम प्रचंड बुद्धीमान होता. त्याने विचार केला की आपण सगळ्या जगाचा विचार करतो आहोत, पण या समग्र जगाला, मला, ‘मार’ ला, सगळ्यांना भारी पडेल अशीही शक्ती कुठलीतरी असेलच की !! मग त्या शक्तीची आपण मदत का नको घ्यायला !! ….आणि मग क्षणात सिद्धार्थ गौतमाने आपला उजवा हात जमिनीला लावला. पृथ्वीला स्पर्श केला. मातीला स्पर्श केला. निसर्गाला स्पर्श केला आणि त्याने भूमातेला विनंती केली, “dear mother earth, witness me !!
या सगळ्या घनघोर लढाईत मला बळ दे. तुझ्या शक्तीच्या पाठबळावर मला या दुष्ट शक्तींविरोधात विजयी कर…”
पृथ्वीही गौतमाच्या त्या मनापासून केलेल्या विनंतीचा मान राखून मदतीला धावून आली.
तिच्या सहाय्याने सिद्धार्थ गौतमाने सगळ्या शत्रूंना नेस्तनाबूत केलं.
एवढंच काय, त्याने ‘मार’ला एवढं वाईट हरवलं की नंतर तो कधीच गौतमाच्या वाटेला गेला नाही.
मग या पृथ्वीमातेच्या साक्षीने “सिद्धार्थ गौतमाचं” रुपांतर “गौतम बुद्धात” झालं.
बुद्ध म्हणजे शहाणा (wise) ! ज्याला जगातलं सगळं ज्ञान प्राप्त झालेला आहे, असा तो बुद्ध !!
म्हणून फोटोतल्या मुद्रेला “भूमिस्पर्श मुद्रा” म्हणतात. साक्षात निसर्गाची ताकद त्याच्या मदतीला आली म्हणून ही माझी लाडकी मुद्रा ♥️
प्रस्तुत कथा रूपकात्मक आहे. अर्थात, आता हे नीट समजून घेतलं तर कळेल की ‘मार’ आणि त्याचं सैन्य हे कुठले बाह्य शत्रू नसून अंतर्मनातील शत्रू आहेत.
क्रोध, लोभ, मोह, मत्सर वगैरे जे षड्रिपू (सहा शत्रू) सांगितले जातात, तेच हे रिपू होत.
त्यामुळे या सगळ्यांशी गौतमाचा लढा, संघर्ष सुरु होता.
त्यामुळे आंतरिक शत्रूंवर (Inner Demons) विजय मिळवताना
निसर्गाशी, पृथ्वीशी कनेक्टेड असणं फार जास्त गरजेचं आहे,असा साधा सोप्पा अर्थ
आपण नक्कीच काढू शकतो.
आपल्या मदतीसाठी सर्वशक्तीशाली भूमीला स्पर्श करणं, ही कल्पनाच माझ्या अंगावर काटे आणून जाते.
आपल्या मातीशी नाळ जुळलेलं असणं,कितीही वर गेलो तरी आपल्या मूळांशी नातं न तुटलेलं असणं अशा गोष्टी त्यातून प्रतित होतात.
अशा वेळी गौतम बुद्ध आणि ऊंच आभाळात गेले तरी जमीनीशी नातं न तोडणारे वृक्ष मला सारखे वाटायला लागतात.
‘हेन्री डेव्हिड थोरो’ नावाचा एक अमेरिकन निसर्गवादी होता.
त्याने निसर्गाबद्दल सांगितलेली काही महत्वाची तत्वं मला खूप आधीच्या बौद्ध तत्वज्ञानात सापडतात.
त्यामुळे ‘ बुद्ध आणि पर्यावरण ‘ किंवा ‘ गौतम बुद्ध – एक निसर्गवादी ‘ हे सांगताना
त्याच्या शिकवणीत अजुन काही निसर्गाबद्दलचं भान,शिकवण असेल तर
त्याच्यावर अभ्यास करुन ही वेगळी मांडणीही करता येऊ शकेल.
आजच्या जगात पर्यावरणाचा प्रश्न सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न बनलेला असून,
बुद्धाच्या तत्वज्ञानाचा त्या दृष्टीने विचार करून ते अनुसरणं अधिक जास्त महत्वाचंय.
तूर्तास एवढंच ! थांबतो.
लेखन – विशाल राठोड
(पुणे विद्यापीठ येथे शिकत आहेत )
हेही वाचा… भगवान बुद्धांचे दोन महत्वाचे संदेश
हेही वाचा… माझा सहोदर सखा वाट्याडा बुध्द
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
प्रत्येकाच्या घरी असावं ऑक्सीमीटर
First Published on JAN 21, 2021 18: 39 PM
WebTitle – Buddhist-philosophy-and-nature 2021-01-21